हरी भक्त परायण श्रीनारदमुनी

‘नारायण...नारायण  असे भक्ती स्वरात म्हणत वीणेचा झंकार करून कधी, कुठेही अवतरणाऱ्या नारद मुनीची ओळख अगदी पुराण कालापासून सर्वश्रुत आहे. ‘एक कळलाव्या नारद' म्हणून थोडेसे उपहासानेदेखील नारदमुनी प्रसिद्ध आहेत. ‘कळलाव्या' म्हणून त्यांच्यामागे बिरुदावली जरी लावली गेली तरी ते उत्तम पत्रकार [reporter] होते व ते जगद्‌मान्य होते.

‘कळलाव्या' म्हणून मिळालेली उपाधी श्री नारद मुनींनी आनंदानी स्वीकारली आहे,  हेदेखील तितकेच खरे आहे. इकडच्या गोष्टी तिकडे सांगत असताना सर्वत्र त्यांना कुठेही प्रतिबंध नव्हता. साऱ्या त्रिभुवनात कुठे प्रवेशण्यास त्यांना पूर्ण मोकळीक होती. सर्वत्र त्यांचा उत्तम आदर, सन्मान, सत्कार होई. उदा. देव, दानव, गंधर्व, यक्ष इत्यादी़ .केवळ भक्ती प्रचार व प्रसारासाठी त्यांनी सन्मान, सत्कार ह्यांना फारसे महत्व कधीच दिले नाही..

उभी शेंडी, हाती चिपळ्या अंगात भगवी कफनी, पायात खडावा व मुखी सदैव नारायणाचे नाव व सर्वाना सहकार्याची भावना हे झाले नारद मुनीचे प्रत्यक्ष मूर्त स्वरूप. तसेच कारण असल्याशिवाय नारद मुनीचा वावर विशिष्ट ठिकाणी होत नसे. नारद मुनीच्या व्यक्तिमत्वाची सर्वाना आवश्यकता असते. महाभक्ती पारायण नारदमुनी भक्तीच्या भूमिकेतच सदैव व्यस्त असलेले व्यक्तिमत्व होय. नारदमुनी नेहमी सर्वत्र वंदनीयच ठरण्याचे कारण त्यांच्या सल्ल्याने व सुचनांमुळे कधी कुणाचे नुकसान झालेले नाही; उलट भलेच झालेआहे. त्यामुळेच नारद मुनींचे आगमन प्रत्येकास सद्‌भाग्याचे लक्षण वाटत होते. केवळ वानगीदाखल पुढील दाखले पुरेसे आहेत.

१़. अत्यंत क्रूर, खुनशी, वाटमारी करून आपल्या कुटुंबाची गुजराण करु पाहणाऱ्या वाल्या कोळ्याला केवळ रामनामाचा सल्ला देऊन त्याचे सारे जीवनच बदलून टाकले व तो रामचरित्र निर्माता झाला..२़. ध्रुव बाळाला हरीनामाचा उपदेश करून अंती अढळपद प्राप्त करून दिले. ३़. बानासुरा पासून श्रीकृष्ण नातू अनिरुध्दास सोडविले. ४़. दत्तात्रयाचे जन्मरहस्य..५़  राजसूय यज्ञानंतर युधीस्थिरास राजनीतीवर केलेला अनमोल उपदेश .६. द्यूतात कपटाने हरल्यावर युधीष्ठीरास नारदाने संभाव्य महानाशाचा दिलेला इशारा. इ.इ. हे करण्यात त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ व अभिलाषा व अपेक्षा नव्हती. त्यांच्या उपदेशातून सर्वत्र भक्तीचेच रोपटे ते लावीत होते. समाजातील तामसी वृत्तीचा कायापालट होऊन सात्विकतेकडे नेण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असे.....भगवंतकृपेने ते त्रिकालज्ञ असल्याने भूत, भविष्य, व वर्तमानातील प्रसंग/घटना/गोष्टी त्यांना सहजी अवगत असत. श्रीकृष्णच्या सुवर्ण तुला प्रसंगी रुख्मिणी व सत्यभामा ह्याच्यामधील प्रसंगातून खरा त्याग व प्रेमाचे दर्शन त्यांनी घडविले. त्याचप्रमाणे कंस/वध,/रावण/शिशुपाल वध इ.प्रसंगातून नारदांनी प्रत्येकाला सूचना, सल्ला, इशारा दिलेला म्हणजे केवळ चतुराई नसून विलक्षण सत्कार्याचे ते दर्शन होते. रामायण, महाभारतासारखे महा ग्रंथ लिहूनही व्यास मुनिना खरे सुख व मनशांती न लाभल्याने नारदांच्या सूचनेनुसार केवळ भक्तिमार्गाचा प्रसार करणारे श्रीमद भागवत त्यांनी लिहिले. विशिष्ट कार्य घडण्यासाठी अनेक वेळा केवळ कारण मात्र नारदमुनी झालेले आहेत. हे सारे ध्यानी घ्ोता त्यांचा सर्वत्रसंचार, वार्ता, इ.गोळा करून दुसऱ्यांना पुरविणे हे कार्य सर्वांनाच नक्कीच वंदनीय होते. म्हणूनच ‘कळलाव्या नारद' ह्या टीकेला व्यापक अर्थ प्राप्त होतो....

नारद मुनींचा परिचय  हरीभक्तीमध्ये रममाण होणाऱ्या नारद मुनीचे अनेक जन्म झालेले आहेत. त्याचे फलित स्वरूप म्हणजे हा नारदीय अवतार होय. त्यांच्या सल्ल्यांने त्यांनी महाभारत लिहिले. त्याच्या व्यासा प्रभावी व्यक्तिमत्वाने प्रभावीत होऊन व्यासांनी त्याचे गूढ विचारल्यानंतर नारदांनी गूढकथन करण्यास सुरवात केली.”त्यावेळी मी अवघा ५ वर्षाचा होतो. माझी माता सर्पदंशाने स्वर्गवासी झाली. मरताना तिने मला साधुसंतांच्या स्वाधीन केले. त्यांनीच माझा सांभाळ केला व श्रीकृष्णाच्या कथा सांगून भक्तीची गोडी लावली. साधुसोबत माझा बराच प्रवास झाला. पुढे मला आत्मज्ञानाचा बोध झाल्याने मी त्यामध्येच रंगून गेलो.” पुढील अवताराविषयी पुनः व्यासांनी विचारल्यावर नारदांनी ब्रह्मदेवानी दिलेली विना छेडली व ते बोलू लागले. विना छेडल्यावर ईश्वर कृपेने त्यांना त्रिकाळाचे ज्ञान होत असे़. ते व्यासाना सांगू लागले.”पूर्वजन्मीचा माझा पंचमहाभूतात्मक देह जळून गेल्यावर मी क्षीर समुद्रात कल्पांतापर्यंत शयन केले. ब्रह्मदेवदेखील तेथेच होते. सृष्टी निर्माण कार्यात त्यांनी काही प्रजापती निर्माण केले. त्यात मलाही एक स्थान देऊन सृष्टीची वाढ करण्यास सांगितले. पण मला संसाराच्या मायाजालात पडायचे नसल्याने मी माझ्या पित्याची आज्ञा नाकारली. ते माझ्यावर रागावले व मला शाप देऊन प्रजापतीऐवजी कमी योग्यतेचे गंधर्व पद दिले. मी भगवद्‌भक्ती करीत सर्वत्र संचार करू लागलो. मी माझ्या पित्याचा लाडका असल्याने माझ्या पितृभक्तीने ते संतुष्ट झाले व मला श्रीमद्‌भागवत सांगून त्याचा प्रसार/ प्रचार करण्यास सांगितले. नंतर मी हेच भागवत व्यासांना सांगितले. पुढे त्यांनी ते त्यांचे पुत्र शुक मुनिना सागितले.  पुढे हेच भागवत शुकानी राजा परिक्षिताला सानितले. तीच परंपरा आजदेखील चालूच आहे व पुढेही चालणार.”

नारद मुनी उत्तम कीर्तनकार होते. आजही त्यांची नारदीय कीर्तनाची ही परंपरा चालू आहे. त्यांचे कीर्तन म्हणजे भक्तीचे जनजागरण होय. हे कार्य समाजाच्या विविध भागातून संपन्न होत असते. कीर्तनात पौराणिक कथांचा आधार घेवून त्याचे मूळ तत्व सांप्रत काळात चपखलपणे बसविले जाते. हीच तर नारदीय कीर्तनाची खासियत आहे, साहजिकच नारद मुनी हे व्यक्तीरुपात न राहता नारदीय कीर्तन संस्थेतून सामान्यांपुढे आदराने उभी आहे. पुण्यातील नारद मंदिर व दादर प.येथील विठल मंदिरात नारदीय कीर्तनाचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचा व्यवस्थित अभ्यासक्रम असून त्यांना कीर्तनालंकार सारख्या पदव्या देऊन समाजात कार्य करण्यासाठी पाठविले जाते. पत्रकार मंडळी मोठे नारदाचे कार्य करीत असल्याने गेल्या १० वर्षापासून मुंबईत विश्व संवाद केंद्रातर्फे दरवर्षी नारद जयंती संपन्न होत असते. त्या निमित्ताने अनेक लेखकाकडून वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्यास प्रेरित केले जाते. त्याची पत्रे केंद्राच्या पत्र सामर्थ्य नावाची पुस्तिका काढून शानदार समारंभात सक्षम पत्रकारांहस्ते प्रदर्शित केली जाते.
-रामकृष्ण विनायक अभ्यंकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

ऑफिस बॅाय