आठ हजार मुलींचा बापमाणूस ... डॉ. हेमंतराजे गायकवाड
‘श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल)' या संस्थेची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि चरित्राचा अभ्यास आणि प्रचार करणारे मुंबईमधील डॉ. हेमंतराजे गायकवाड त्यांच्या ‘शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट' या मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, संस्कृत या भाषांत बेस्ट सेलर ठरलेल्या ग्रंथामुळे महाराष्ट्रात परिचित आहेत. परंतु त्या अगोदर ते गेल्या ३० वर्षांपासून स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या १८ वर्षांवरील आठ हजाराहून अधिक कुटुंबवत्सल मुलींचे बाप बनले आहेत...काय ? विश्वास नाही बसत का ? पण हे खरं आहे. आईविना पुरुषाने बाळाच्या पालकत्वाची जबाबदारी घेऊन जन्मापासून बाळ वाढविणे हे आपल्या समाजाला सवयीचे झाले आहे.
आताचे शतक हे तंत्रज्ञानाचे, अद्ययावत कॉम्पुटरचे शिक्षण घेऊन उत्तमोत्तम नोकरी पटकावण्याचे. परंतु उच्च शिक्षण घेऊनही गलेल्ठ्ठ पगार आणि त्यातून आर्थिक स्थैर्य मिळेल की याची कुणालाही खात्री नाही. अशावेळी वयाची पंच्याहत्तरी साजरी करणाऱ्या डॉ हेमंतराजे गायकवाड या व्यक्तीने मुलींच्यातील न्यूनगंड घालवून हजारो लेकींना आर्थिक स्थैर्य आणि सुखासमाधानाने जगण्यासाठी सशक्तपणा दिला आहे. डॉ हेमंतराजे हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका सधन घरातले. सेंट झेव्हियर्स मध्ये शिक्षण घेऊन ते ग्रँट मेडिकल कॉलेजमधून MBBS DOMS झाले. विद्यार्थीदशेत कॉलेज/विद्यापीठ स्पर्धांमध्ये वादविवाद, रॉक-क्लायंबिंग आणि बॅडमिंटनमध्ये यामध्ये अनेक बक्षिसे जिंकताना रावबहादूर मणियार त्वचा आणि लैंगिक रोगासाठी पुरस्कार, बी.बी. योध संशोधन फेलोशिप, बॉम्बे मेडी मीटमधील पारितोषिक पेपर हे पुरस्कार मिळाले. १९८० मध्ये त्यांच्या इंटर्नरशिप दरम्यान त्यांनी पनवेल तालुक्यातील चिरनेर ग्रामीण वैद्यकीय केंद्राची स्थापना केली, जे चाळीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय बनले. या ठिकाणी त्यांनी काळवेळ न पाहता गोरगरिबांसाठी रुग्णसेवा केली. नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून अनेकांना दृष्टी दिली. अनेक वैद्यकीय शिबिरे घेतली. त्यासाठी राज्यपालांच्या संयुक्त समितीने त्यांना राजीव गांधी शिरोमणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना देशसेवा करण्याची तीव्र इच्छा होती आणि गणवेशावरील प्रेम पूर्ण करण्यासाठी १९८६ मध्ये ते होमगार्डमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले आणि २००४ मध्ये ते बृहन्मुंबईचे कमांडंट झाले. त्सुनामीच्या काळात केलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक झाले होते. त्यांनी महिला प्रवाशांचा छळ आणि विनयभंग रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा पथक सुरू केले. मुंबईच्या किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मच्छिमारांची होमगार्ड म्हणून नोंदणी केली. १९९७ मध्ये स्वतंत्र सुवर्ण जयंती पदक, तर २००६ मध्ये महाराष्ट्र राज्य होमगार्ड हिरक जयंती पदकाने त्यांना गौरविण्यात आले. पहिल्या तीन मुंबई मॅरेथॉनच्या आयोजनातही त्यांचा मोलाचा मुख्य वाटा आहे. पल्स पोलिओसाठी WHO ने त्यांचे कौतुक केले आहे. त्यांना लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. त्यांना ‘भारतीय चिकीत्सा रत्न' पुरस्कारही मिळाला आहे.पं जवाहरलाल नेहरू संस्थापक-अध्यक्ष असलेल्या भारत सेवक समाजाचे प्रादेशिक अधिकारी (महाराष्ट्र) म्हणून त्यांनी पद भूषविले आहे.
१९८८ मध्ये त्यांनी पॅरामेडिक्सला प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवात केली. सरकारी रुग्णालयांसाठी परिचारिका, लॅब अस्टिटंट व इतर महत्वाच्या कामासाठी मुलींना प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली. लोकांची सेवा करण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या मुलींना स्वतःच्या पायावर आयुष्यभरासाठी उभे केले. १२ वी पास होऊन महाविद्यालयातून जीवनाची दिशा शोधण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुलींसाठी डॉ हेमंतराजे यांनी १९९६ मध्ये ‘डॉ. गायकवाड्स इन्स्टिट्यूट' ही नोंदणी संस्था सुरु केली. व्यवसायाचे स्वरूप म्हणून सुरु केलेल्या या संस्थेच्या स्थापनेपासूनच सर्वच विद्यार्थिनींना आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे त्यांनी आस्थेने शिक्षण दिले, मुलींचे शैक्षणिक संगोपन करताना त्यांना सुरक्षित वाटणं, त्यांच्या आकांक्षांना नवे पंख फुटणे फार महत्त्वाचं असतं. सातत्याने त्यांनी प्रॅक्टिकल करून घेतल्या. ‘नर्र्सिंग होमसाठी स्वाध्याय' म्हणून वीस नियमावली लिहिल्या. प्रत्येक विषय पुन्हा पुन्हा समजून सांगितला. त्यामुळे आज डॉ हेमंतराजे हे यशस्वी झालेल्या सर्व मुलींसाठी शिक्षक न ठरता एक आदर्श पिता ठरले आहेत. जेव्हा आपले शिक्षकच वडिलांच्या रूपात आपल्यामागे ठामपणे आहेत याची हमी मुलीला असते, तेव्हा तिच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. डॉ हेमंतराजे यांची बाप बनण्याची कहाणीही काही अशी निराळीच आहे.
आयुष्य घडविलेल्या मुलींचे जैविकदृष्टया रक्ताचे नाते डॉ हेमंतराजे यांचे नसले तरी या सगळ्याजणींसाठी ते त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा देणारे बाप ठरले आहेत. आपण एक व्यावसायिक डॉक्टर किंवा शिक्षक नसून वैद्यकीय क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या मुलींचे आयुष्य घडविणारे बाप आहोत हे त्यांनी प्रथम स्वतःच्या मनावर बिंबवले. मुलीचा बाप होणे फार अवघड असते हे त्यांना सुरुवातीला लक्षात येऊ लागले; मात्र नंतर अंतर्मनाला बजावले, पैसा महत्वाचा नाही, तर आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुलीचे आपल्याला आयुष्य घडवायचे आहे.
एका लेकीचा बाप होणं आणि बापाचं काळीज असणारी लेक होणं हे फक्त त्या बाप लेकीच्या नात्यालाच ठाऊक असतं. असं नातं निर्माण झालं तरच आपल्या मनातले इप्सित साध्य होईल हे ओळखून डॉक्टरांनी मनाशी निश्चय केला, शिक्षणाचे धडे देताना आपल्याला प्रत्येकवेळी कठोर व्हावे लागेल. त्याचबरोबर आपल्याकडे शिक्षण घेतलेल्या मुलींचा मानसिक आणि भावनिक विकास कसा होईल याकडे त्यांनी सुरुवातीला लक्ष द्यायला सुरुवात केली. नोकरीसाठी असणारे आवश्यक ते धडे देताना त्यांनी या मुली मानसिकदृष्टया कशा सक्षम होतील याचेही वर्ग घेण्यास सुरुवात केली. ‘समाजात वावरताना कोणत्याही दडपणाखाली किंवा न्यूनगंड मनात ठेवून वावरू नका. कधीही लाचार व्हायचं नाही. स्वाभिमानानं जगायचं. हे क्षेत्र समाजसेवेचे आणि लोकांना मानसिक आधार देण्याचे आहे हे सदैव लक्षात ठेवा' असा मंत्र प्रत्येकीला दिला.
‘मुलीचे लग्न म्हणजे कर्जाचा डोंगर' ही वस्तुस्थिती आजही बदललेली नाही. जग बदलतंय, समाजही आधुनिक होतोय असं म्हणतात. पण समाजव्यवस्थेने दिलेलं ‘मुलीचा बाप' हे नातं तो ओझ्यासारखं वाहताना दिसतो आहे. बऱ्याच वडिलांना तर ऋण काढून लग्न करण्याशिवायही पर्याय नसतो. अगदी मध्यमवर्गीय वा निम्नमध्यमवर्गीय कुटुंबांमध्येही आज मुलीच्या लग्नापोटी पाच ते सात लाख रुपये खर्च आणि सुमारे तेवढेच तोळे सोनं, असे समीकरण महाराष्ट्रात कायम आहे. हे ओळखून डॉ हेमंतराजे गायकवाड यांनी आपल्याकडे प्रवेश घेतलेल्या मुलीने लग्नवेदीच्या पाटावर उभे राहण्यापूर्वी कधीही कुणाही समोर हात पसरू नये. स्वकमाईने लग्नाला सामोरे जावे यासाठी इन्स्टिट्यूटमध्ये १८ वर्षाच्या विद्यार्थिनीने प्रवेश घेतल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट व नोकरीची १०० टक्के लेखी हमी दिली. २० ते २३ वर्षाचे असताना काम केले तर सुमारे रु. १५,०००/-x ३६ महिने रु. ५,४०,०००/- ही रक्कम त्यांना मिळते. या रकमेत त्यांचा लग्नाचा खर्च निभावतो. क्लास ३ तास २५ दिवस= ७५ x ४ महीने ३०० तास, प्रॅक्टिकल २० महिने २५ दिवस x ८ तास = ४००० ५००० तासांचा क्लास, प्रदीर्घ अनुभव. ट्रेनिंग दोन भागात असते. पहिले क्लासरूम ट्रेनिंग जे चार माहिने चालते व नंतर प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे २० महिने चालते. नेत्र तज्ञाला ऑप्टोमेट्रीस्ट ऑष्टिशन, एक्स रे तज्ञाला एक्सरे टेक्निशियन, शस्त्रक्रियेला ओ.टी असिस्टंट, पेशंट केअर, डी. एम.एल.टी (लॅब टेक्निशियन) हे प्रोफेशनल कोर्स शिकवले जातात. डॉ. गायकवाड्स इन्स्टिट्यूटचे ब्रीद वाक्यच आहे, १०० टक्के नोकरीची लेखी हमी. विद्यार्थ्यांचा उत्साह, जिद्द आणि मेहनत यामुळे गेली ३० वर्षे इन्स्टिट्यूटचा निकाल १०० टक्के लागत आहे. गेल्या ३० वर्षात एकही मुलगी जॉबलेस (विना नोकरीची) नाही.
वडील आणि मुलीमध्ये नेहमी एक सुंदर नातं असतं. त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यातील त्यांच्या आठवणी सुंदर असतात. डॉक्टर हेमंतराजे हे वेगळ्याच प्रकारचे बाप आहेत, त्यामुळे उगाच नाही त्यांच्याकडे शिकलेल्या मुलींना मदर्स डे पेक्षा फादर्स डे ची उत्सुकता असते.
साहित्यामध्ये, व्यवहारामध्ये मातृमहती मोठ्या गौरवाने गायली जाते. परंतु पितृप्रेमाकडे तेवढे लक्ष दिले जात नाही. पित्याची माया ही मुकी असते. ती दिसत नाही. अंतरीची कळकळ कधीकधीच प्रकट होते. बोलकी होते. बरेचदा तर आयुष्याच्या उत्तरार्धात माणसाच्या आठवणी जाग्या होतात आणि नियती माणसाला त्या त्या वयाच्या टप्प्यावर आणून बसवते तेव्हा माणसाला आपल्यातला ‘बाप' कळतो. आज आयुष्याचा अमृत महोत्सव साजरा करताना डॉ हेमंतराजे गायकवाड नावाचा बापमाणूस कृतार्थ आहे. अनेक मुलींचा फोन येतो आणि मोबाईलमधून आवाज येतो ‘बाबा' कसे आहात....तेव्हा तीन दशकातील अनेक आठवणी त्यांच्या मनाला उभारी देतात.
- रवींद्र मालुसरे, अध्यक्ष : मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई