पालकांचे शिक्षण

पालक आपल्या मुलांचे जन्म दाखले घेऊन शाळेत येत होते. शिक्षकांना भेटत होते. शिक्षकदेखील आनंदाने पालकांचे स्वागत करत होते. शाळा कधी सुरू होणार ते नव्या पालकांना सांगत होते. येत्या जून महिन्यात आपले मूल आपल्या घराचा उंबरठा ओलांडून आपले बोट सोडून शाळेमध्ये पहिले पाऊल टाकणार या विचाराचा वेगळाच आनंद आणि उत्साह पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. जीवनाला आकार देणाऱ्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात याच तर ज्ञान मंदिरात होणार आहे याची जाणीव पालकांमध्ये जाणवत होती.

महिन्याची सुट्टी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती. मुलांच्या मनात सुट्टीचे बेत शिजत होते. कुणी आपल्या मामाकडे, कुणी आपल्या मावशीकडे तर कुणी पुण्या-मुंबईला जाणार होते. मुलांच्या मनातील स्वप्नं त्यांच्या डोळ्यात सहज वाचता येत होती. त्यातच परीक्षा नुकतीच संपल्यामुळे मुलं अगदी मोकळेपणाने शाळेचा आनंद घेत होती. झाडांवरच्या कैऱ्या आणि रानातील मेवा जणू मुलांची आतुरतेने वाट पाहत होता. उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या धबधब्याला लाजवेल असे वेगळेच चैतन्य मुलांच्या गप्पांमध्ये दिसत होते. कोण कोणाशी भांडत नव्हतं. कोण कोणाची तक्रार करत नव्हतं. कोणाचेच कसलेही नियंत्रण नसताना सगळं काही सुरळीत चालू होतं. ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे' याचा साक्षात्कार शाळा घेत होती.

शिक्षक त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते. कोणी वार्षिक परीक्षेचा निकाल तयार करत होते. कोणी पुढच्या वर्षीच्या कामाचे नियोजन करत होते. पहिलीचे शिक्षक मात्र नवीन वर्षात पहिलीमध्ये येणाऱ्या मुलांचे जन्म दाखले घेण्यामध्ये मग्न होते. पालक आपल्या मुलांचे जन्म दाखले घेऊन शाळेत येत होते. शिक्षकांना भेटत होते. शिक्षकदेखील आनंदाने पालकांचे स्वागत करत होते. शाळा कधी सुरू होणार ते नव्या पालकांना सांगत होते. येत्या जून महिन्यात आपले मूल आपल्या घराचा उंबरठा ओलांडून आपले बोट सोडून शाळेमध्ये पहिले पाऊल टाकणार या विचाराचा वेगळाच आनंद आणि उत्साह पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. जीवनाला आकार देणाऱ्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात याच तर ज्ञान मंदिरात होणार आहे याची जाणीव पालकांमध्ये जाणवत होती. या जाणीवेपोटीच काही पालक पहिलीच्या शिक्षकांना विचारत होते, ”सर, पुस्तके कोणती कोणती घ्यायची? ”वह्या किती घ्यायच्या? यावर्षी पेन घ्यायचं की पेन्सिल चालेल?” पहिलीचे शिक्षक मात्र आनंदी वाणीने आणि आश्वस्त भावाने ”तुम्ही काही काळजी करू नका, आधी शाळा सुरू होऊ देत, नंतर आम्ही सगळं सांगू आणि काही कमी पडलं तर मी आहेच ना.” पालकांशी बोलताना शिक्षक मुलांची जन्मतारीख शाळेत येण्यासाठी योग्य आहे का, याची खात्री करत होते आणि पालकांनी दिलेले मुलांचे दाखले फाईलमध्ये ठेवत होते. इकडे वर्गातील मुले आनंदात नाचत होती. नव्याने पहिलीत येणारी काही मुले आपल्या पालकांचे बोट धरून शाळा बघायला आली होती. त्यातली काही धीटपणे हलकेच आपल्या आई-बाबांचे बोट सोडून बाहेरूनच आत बसलेल्या मुलांकडे बघत होती. तर काही चौफेर शाळेवर नजर टाकून जे जे डोळ्यात साठवता येईल ते ते उत्सुकतेने डोळ्यात साठवत होती.

असे सगळेजण आपापल्या कामात व्यस्त असताना एक पालक पहिलीच्या शिक्षकांच्या वर्गात गेले. शिक्षकांपासून थोड्या अंतरावर उभे राहिले. बाकीच्या पालकांशी शिक्षक काय बोलत आहेत ते दुरूनच ऐकू लागले. पाच दहा मिनिटे झाली असतील. शिक्षक आधीच्या पालकांबरोबर बोलत होते. काही वेळात बाकीचे पालक वर्गातून निघून गेले. आता वर्गामध्ये दूर उभे राहिलेले  पालक आणि पहिलीच्या मुलांची दाखल्याची फाईल हातात घेतलेले वर्गशिक्षक दोघेच होते. शिक्षकांनी थोड्या अंतरावर उभे असलेल्या पालकाला अदबीनं नमस्कार करून जवळ यायला सांगितलं. पालक सावकाश दोन पावलं पुढे झाले. ”तुम्ही मुलाचा दाखला आणला आहे का? द्या जरा माझ्याकडे,जन्मतारीख बघू दे मला.” असं म्हणत शिक्षकांनी टेबलावरची फाईल बंद करून ठेवली. पालक मात्र काहीच बोलला नाही. शिक्षकांनी पुन्हा विचारले, ”दाखला देताय ना?” पालकाने एक पाऊल पुढे टाकलं. काहीतरी बोलावं म्हणून ओठांची नुसती हालचाल केली.  पण मुखातून शब्दच बाहेर आले नाहीत. क्षणभर शिक्षकांना काही कळलच नाही, तेही शांतच राहिले. शिक्षक आणि पालक दोघे एकमेकांकडे बघत होते. बोलत मात्र कोणीच नव्हते. बाजूच्या वर्गातून मुलांचा तेवढा आवाज येत होता.

”तुम्ही नीट शिकवाल ना माझ्या मुलाला?” पालकाच्या बोलण्याने वर्गातील शांतता भंग पावली. सकाळपासून हा प्रश्न शिक्षकांना कोणी विचारला नव्हता. अचानक अनपेक्षित प्रश्न आल्यामुळे काय बोलावे हेच त्यांना सुचत नव्हते. ”माझा मुलगा खूप हुशार आहे म्हणून म्हटलं त्याला तुम्ही नीट शिकवाल ना?” पालकाच्या या  प्रश्नामुळे शिक्षकाच्या डोळ्यापुढे त्यांच्या आजपर्यंतच्या तीस वर्षांच्या शैक्षणिक अनुभवाचा पट उभा राहिला. खरंच आपण आजपर्यंत मुलांना नीट शिकवले आहे का? आजपर्यंत  आपल्याला पालकांनी असा प्रश्न न विचारणे ही चूक आहे का? या प्रश्नांची आंदोलने शिक्षकाच्या मनात निर्माण झाली. त्या परिस्थितीत एका दृष्टीने पालकाचा प्रश्न बरोबर होता. पण या प्रश्नाला ‘हो'  किंवा ‘नाही' असे उत्तर देताना शिक्षकाचा शैक्षणिक कस लागला होता. हातातली फाईल शिक्षकाने टेबलावर ठेवली आणि तेवढ्याच शांतपणे, ”आपली शाळा खूप चांगली आहे, पाठवा तुम्ही त्याला शाळेत. असं म्हटले.

”शिकवाल ना नीट माझ्या मुलाला?” हे वाक्य आणि त्यातील अपेक्षा शिक्षकाच्या मनात खोलवर गेली. आजपर्यंत मला असं कोणीच विचारलं नाही, तरीही त्या सर्व मुलांना मी चांगलंच शिकवलं. मग आज या प्रश्नाने मी एवढा अस्वस्थ का झालो? हा विचार शिक्षकाच्या मनात सतत येत होता. शिक्षकांनी त्यांची अस्वस्थता बोलता बोलता मला सांगितली. शिक्षकांच्या कथनातून शाळेकडून मला काय अपेक्षित आहे हे आता पालक स्पष्टपणे सांगू लागले आहेत याची जाणीव झाली आणि पालकांच्या बदलत्या अपेक्षांचा हा कंगोरा किती वेगळा आणि विचार करायला भाग पाडणारा आहे हे कळले. शाळेच्या बाबतीत पालकांनी फक्त व्यवहारी न होता कर्तव्यतत्पर देखील असायला हवं याची जाणीव झाली. ‘पालकत्व हा अपघात नसून परमोच्च जबाबदारी आणि संवेदनशीलता यांचे कोमल कोंदण आहे', हे प्रत्येक पालकाला कळायलाच हवे. हे कळणे म्हणजे नेमकं काय असतं, ते सव्वाशे वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टीतून पालकांना कळेल.

हा कालखंड साधारण १९१० ते १९२० दरम्यानचा आहे. महान  भारतीय मानववंश शास्त्रज्ञ इरावती कर्वे या थोर गणिततज्ज्ञ व फर्ग्युसन विद्यालयाचे प्रिन्सिपॉल रँगलर परांजपे यांच्या घरी शिक्षणासाठी होत्या. इरावतीच्या सोबत परांजपे यांची मुलगी शकुंतला देखील होती. रँगलर परांजपे त्याकाळी भारतीय समाजकारणात, राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असतानाही घरामध्ये उत्तम पालक म्हणून त्यांचे काम करत होते. घरामध्ये नियमित रोज सकाळी इंग्रजी साहित्याचे दोन्ही मुलींकडून ते वाचन करून घ्यायचे.  फक्त वाचनच करायचे नाहीत, तर शब्दांचे अर्थ विचारायचे आणि वाचताना योग्य उच्चार, स्पष्ट आवाज याकडे लक्ष द्यायचे. एवढेच नव्हे तर प्रत्येक शनिवारी, रविवारी इंग्रजी नाटकांचे घरातील प्रत्येक सदस्यांकडून वाचन करून घ्यायचे. यामध्ये प्रत्येक सदस्याला त्याची त्याची भूमिका दिली जायची. प्रत्येकाला आपल्या पात्राचे संवाद वाचावे लागायचे. प्रत्येक शनिवारी रविवारी नाट्य वाचनाचा दोन तासांचा कार्यक्रम घरामध्ये ठरलेला असायचा. परांजपे घरामध्ये थोर साहित्यिकांची विधाने सहज जाता येता बोलायचे. मुलींनी ती वाक्य आधी वाचलेली असायची. बालवयात जागतिक दर्जाचे साहित्य आणि त्यातील संदेश मुलांच्या मनावर अशाप्रकारे कोरल्यामुळे रँगलर परांजपे यांना त्यांच्या मुलींसाठी कोणत्याच शिक्षकांना तुम्ही माझ्या मुलींना नीट शिकवाल का, असे विचारावेसे वाटले नसेल.

भारतातील शाळेवर आजही आपण विश्वास ठेवू शकतो याची अनुभूती वारंवार येते.

पहिलीची मुलं गोल करून बसली होती. गोलामध्ये छोट्याशा ट्रे मध्ये काहीतरी ठेवलं होतं. ओळीने प्रत्येक मूल ट्रे मधली वस्तू हातात घेत होते. उत्सुकता म्हणून मान वर करून पाहिले.  ट्रेमध्ये छोटी छोटी वाक्य असलेली कार्ड होती. मुलं आनंदाने वाचत होती. प्रत्येकाला वाटायचं माझा नंबर कधी येईल. कार्ड हातात घेतले की एका दमात वाक्य वाचायची. एकाने ते कार्ड ट्रेमध्ये ठेवण्याआधीच दुसऱ्या मुलाची दुसरे कार्ड उचलण्याची घाई असायची. असं करता करता एका मुलीच्या हातात कार्ड आलं आणि तीने ते वाचलं  ‘ताई बाळाला लाडवाचा घास भरवते' पहिलीतल्या वाक्यात वाक्प्रचार असल्यामुळे त्याचा अर्थ मुलांना समजला आहे का ही उत्सुकता माझ्या मनात निर्माण  झाली. पहिलीतल्या मुलांना अर्थ सांगता येणार नाही हा माझा पूर्वानुभव होता. म्हणून मग चौथीच्या वर्गातील मुलांना विचारले, ”घास भरवणे म्हणजे काय?” चौथीच्या मुलांनी नाही सांगितलं. मग तिसरीतल्या मुलांना विचारले. त्यांनीही नाही सांगितलं. मग दुसरीतल्या मुलांना विचारलं. त्यांनापण सांगता आले नाही. मग पहिलीतील ज्या मुलीने वाक्य वाचले होते तिलाच विचारले, ”घास भरवणे म्हणजे काय?”  पहिलीतली चिमुरडी म्हणते, ”आई आपल्याला घास भरवते. मी विचारलं, ”म्हणजे नेमकं काय?”  ”आई तिच्या हाताने आपल्या तोंडात घास घालते” हे सांगताना तिने घास भरवण्याची कृतीसुद्धा करून दाखवली. मग मी विचारलं, ”अजून कोण कोणाला भरवतं?”  ”आई बाळाला भरवते किंवा घरात कोणी आजारी असेल तर त्याला आपण भरवतो. वाक्प्रचाराचा अर्थ सांगताना पहिलीतली मुलगी गोड हसत होती. वाचायला आणि वाचलेलं समजून सांगायला ही चिमुरडी पहिलीच्या वर्गात शाळेतच शिकली. तिच्या पालकांनी तिच्या शिक्षकांना, ‘माझ्या मुलीला नीट शिकवाल का?' असं विचारलं असेल का?
-अमर मोहनराव घाटगे, केंद्रप्रमुख रत्नागिरी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आठ हजार मुलींचा बापमाणूस ... डॉ. हेमंतराजे गायकवाड