नाम हेच कैवल्य

”केवल एकमेव भगवंत” ही अनुभूती म्हणजेच कैवल्य. जिथे केवल एकमात्र वस्तू आहे तिथे कोणालाही कोणाचेही बंधन असू शकत नाही. बंधन रहित अवस्था म्हणजेच मोक्ष. समर्थ म्हणतात ‘रामनाम' हेच मनुष्यासाठी कैवल्य आहे. त्याला स्वानंदाची प्राप्ती करून देणारे आहे.

बहू चांगले नाम या राघवाचे।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे।
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे।
जिवा मानवा हेचि कैवल्य साचे । श्रीराम ८८।

भगवान शंकर, रामभक्त हनुमान हे महान योगी आहेत. स्वतः ब्रह्मस्वरूप आहेत. ज्ञान-वैराग्य-सामर्थ्य संपन्न आहेत. तरीही ते नित्य रामनामाचा जप करीत असतात. कारण रामनाम मनाला विश्राम देणारे आहे. आत्यंतिक आनंदाची अनुभूती देणारे रामनाम ‘बहू चांगले' आहे. अतिशय सुंदर, साजिरे आहे. कारण ‘राम' म्हटले की डोळ्यांसमोर दाशरथी रामाचे घनश्याम, लावण्यसंपन्न, मनोहर रूप उभे राहते. तसेच हे नाम उच्चारायला सोपे, छोटेसेच आणि मुख्य म्हणजे बिनखर्चाचे आहे. एक शब्द म्हणून ‘राम' हे नाम लहान असले तरी त्याचे सामर्थ्य महान आहे.

नाम हेच भगवंताचे रूप असल्याने भगवंताचे सर्व गुण, सर्व ऐश्वर्य,सर्व शक्ती, नामात असतातच. अशा नामाच्या संगतीत राहिल्याने भवदुःखाचे समूळ उच्चाटन होते. वासना हेच भवदुःखाचे, पुनःपुनः जन्म-मरणाचे बीज आहे. जेव्हा अंतःकरणात नाम भरून राहते तेव्हा तिथे विषयवासनांना प्रवेश करायला जागाच नसते. विषयासक्तीच्या ऊर्मी उठायच्या आधीच नामाला पाहून मागे फिरतात. वासना संपल्या की दुःखाचे कारण संपून जाते. जीवन जगत असताना जेव्हा अनेक वासना, कामना, इच्छा निर्माण होतात तेव्हा त्या पूर्ण करण्यासाठी मनुष्य अविरत धडपड करतो. कष्ट सोसतो. एवढे करून इच्छा पूर्ण झाली तर ठीक. नाही झाली तर दुःख होते. निराश वाटते आणि इच्छा पूर्ण झाली तरीही ही अनुकूलता टिकेल ना याची चिंता लागून राहते. मन सतत त्या विषयांच्या चिंतनात राहते. भलभलत्या कल्पना करत राहते. त्याचा परिणाम म्हणजे सतत वाटणारे भय, चिंता, दुःख आणि असमाधान. कल्पनेच्या राज्यात राहणाऱ्या मनाला अणुमात्र विश्रांती मिळत नाही. परंतु तेच रामनामाचे चिंतन करत राहिल्यास सर्व सैराट कल्पना विराम पावतात. वासनांचा क्षय होतो. नामाच्या भक्कम आधारामुळे भय, चिंता, नाहीसे होतात.

भगवंताची गोडी लागली की मनाचे जगातल्या विषयांपाठी व्यर्थ हिंडणे थांबते. भगवंताच्या नामापाशी मन मोठया श्रध्देने विसावते. जीवाला बंधन असते ते वासनांचे. वासनाच संपल्या की बंधन सुटते. मोक्षाचा अनुभव येतो. वासना संपणे याचा अर्थ हवे-नकोपण संपणे. आसक्ती संपणे. आसक्ती मध्ये मी, माझे ही अहंता असते. अहंतेमुळे बंधन होते. नित्य नामजपाने भगवंताप्रती शरणागत भाव निर्माण होत जातो. ही लीनता जशी दृढ होत जाते तशी अहंता संपत जाते. स्वकर्तृत्वाचा वृथा अहंकार नाहीसा होतो. खरा कर्ता भगवंतच आहे याची स्पष्ट जाणीव होते. एकदा त्याचे कर्तेपण मान्य केले की आपली देहबुध्दी नाश पावते.म्हणजे ‘मी देह, मी कर्ता, मी भोक्ता'  ही वृत्ती नाहीशी होते. माझा देह, माझी माणसे, माझी संपत्ती, माझी सत्ता ही भावनाही नाहीशी होते. नामाच्या सान्निध्याने ”सर्व काही भगवंत आहेत” हा विचार दृढ होतो.अर्थातच ”मीही भगवंतच आहे” ही एकरुपता साधते. ह्यालाच ”कैवल्य” म्हणतात. ”केवल एकमेव भगवंत” ही अनुभूती म्हणजेच कैवल्य. जिथे केवल एकमात्र वस्तू आहे तिथे कोणालाही कोणाचेही बंधन असू शकत नाही. बंधनरहित अवस्था म्हणजेच मोक्ष. समर्थ म्हणतात रामनाम हेच मनुष्यासाठी कैवल्य आहे. त्याला स्वानंदाची प्राप्ती करून देणारे आहे. बंधनात, पारतंत्र्यात आनंदाचा अनुभव येत नाही.

बंधन तुटले, परवशता संपली की माणूस मोकळा श्वास घेतो. मुक्त आनंदाचा अनुभव घेतो. नामाने नेमके हेच साधते. सगळ्या चिंता, भय, दुःख यापासून तसेच जन्म-मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त होतो. नामाच्या पुण्याईने या जन्माचे दुःख तर संपतेच; शिवाय मागील अनेक जन्मांचे पापही जळून जाते. महापातकांच्या राशी भस्म करण्याचे सामर्थ्य रामनामात आहे. नामाने पापे जळून नाहीशी होतात आणि त्यांना जाळून पुण्य संपून जाते. पाप-पुण्य दोन्ही संपले की जन्म-मरणाचे बंधन तुटते. जीव मुक्त होतो. कलियुगात मोक्षप्राप्तीसाठी नामाइतके सोपे, सहज, सुलभ आणि सामर्थ्यवान साधन अन्य नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, ”तुटे भवरोग। संचित क्रियमाण भोग। ऐसे विठोबाचे नाम। उच्चारिता खंडे जन्म”

जय जय रघुवीर समर्थ  
-सौ. आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पालकांचे शिक्षण