स्टेथोस्कोप

डॉक्टर पायऱ्या उतरत होते.. हॉस्पिटलच्यावर त्यांचे घर, खालच्या मजल्यावर कॅन्सलटिंग आणि हॉस्पिटल. वेटिंगरूम वर त्यानी नजर टाकली, वेटिंगरूम भरून वहात होती. त्याच्या डोवयावर आठ्या पडल्या..त्यांनी रेश्माकडे पाहिले, तिने मान खाली घातली. डॉक्टर आपल्या कन्सलटिंग रूममध्ये गेले आणि त्यानी रेश्माला आत बोलावले.

"तुला किती वेळा सांगितलं, वीसपेक्षा जास्त पेशन्टना घेऊ नकोस.. मला झेपत नाही एवढं काम..”

"पण डॉवटर पेशन्ट ऐकतच नाहीत.... त्याचं म्हणणं, डॉक्टरनी फक्त हात लावावा, स्टेथोेस्कोप छातीला लावावा आणि औषधे द्यावीत.. मी तरी काय करू? माझं ऐकतच नाहीत पेशन्ट,..”

"बरं बरं.. आता कुणाला घेऊ नकोस..”
एकएक पेशन्ट आत येऊ लागला, डॉक्टर त्याच्याशी आपुलकीने बोलू लागले, त्यांचे ब्लडप्रेशर पाहू लागले. जयंतला औषध सांगू लागले.. जयंत प्रिस्क्रिपशन लिहून देऊ लागला. मध्येच एखाद्याचा कर्डीओग्राम, एखाद्याचा एक्सरे, कुणाला मोठया शहरात पुढील उपचारासाठी पाठवण, कुणाला ॲडमिट करणे सुरु झाले. दुपारचे दोन वाजले तरी पेशन्ट संपेनात. परत डॉक्टरांनी रेश्माला बोलावले..

"अग काय हे..किती पेशन्ट पाठवतेस..”
"सर.. यमुनाआजी आल्यात. त्या ऐकतच नाहीत.”
"बर, त्याना पाठव.. ही शेवटची ना..”
"हो..”
यमुनाआजी आत आल्या..
"महेश.. मी आल्ये... मला तुझी ती रेश्मा आत सोडतं नव्हती.. मी म्हटलं, फक्त माझं नाव सांग. कसा मला आत घेत नाही ते पाहते..”
डॉ. हसून म्हणाले "तुला कोण थांबवणार? बोल का आली होतीस?”
"तुला खरवस घेउंन आले.. तुला आवडतो ना? इथे कोण तुला प्रेमाने देणार आहे?”
डॉवटरांच्या डोळ्यात पाणी आले. "खरवस? एवढ्यासाठी आलीस?”
"आणि तपासून घ्यायला पण.. तू तपासलास म्हणजे महिनाभर टेन्शन फ्री.”
डॉवटर हसले.. त्यानी तिला तपासले. तीच औषधे चालू ठेवायला सांगितली. यमुना काकूंनी डब्यातून आणलेला खरवस त्यांच्या हातात दिला.

"खा आठवणीने.. नाहीतर विसरशील.. किती रोडावलास तू महेश.. माझ्याघरी येतोस का.. तुला तूझ्या आवडीचं खाउपिऊ घालते. कसा पूर्वीसारखा होतोस की नाही बघ..”
डॉक्टर मोठयाने हसले.

"राणीचा फोन येतो ना?”
"हो तर.. सकाळ संध्याकाळ..”
"आणि मुलांचा?”
"ती बिझी असतात त्यांच्या जॉबमध्ये, पण सुट्टीदिवशी फोन करतात.”
"आता काम कमी कर रे बाबा.. कुणासाठी एवढंं काम?”
"कमीच करत आलोय.. म्हणून रेश्मा तुला आत घेत नव्हती.”
यमुना काकी गेली. आणि डॉक्टर महेश आपल्या खुर्चीत शांत बसले.

यमुनाकाकी म्हणाली कुणासाठी एवढं काम? खरंच कुणासाठी? मुलांना पैशाची गरज नाही, बायकोला नाही. स्वतःलापण नाही? गेली काही वर्षे आपण पेशन्ट कडून पैसे घेत नाही तरी नको म्हंटल तरी पेशट टेबलावर ठेऊन जातात.. त्यात हॉस्पिटलचा खर्च आणि स्टाफ पगार भागतो. आपला खर्च तो किती? कुणाला पैसे पाठवायचे नसतात. आपण बाहेर गेलो तर रिक्षावाला पैसे घेत नाही..इस्त्रीवाला पैसे नको म्हणतो.. हे सर्व आपल्याला देव समजतात. कारण गेली तीस वर्षे या छोटया शहरात आपण प्रॅक्टिस करतो आहोत आणि कमी पैशात अनेकांना बरे केले आहे. ज्यांची ऐपत नसेल त्याना स्वतः औषधे विकत घेऊन दिली आहेत... लोकांना त्याची जाण असते.. आता आपले वय झाले आहे, हाताला  कंपवायुचा त्रास सुरु आहे.. शुगर वरखाली होते आहे.. पण आपण हॉस्पिटल आणि कन्सलटिंग बंद करू शकत नाही.. हा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर बाहेर आले, एक नजर त्यानी हॉस्पिटलवर टाकली आणि ते पायऱ्या चढून त्याच्या घरात आले.. किल्लीने दार उघडलं आणि कपडे बदलून, वॉश घेऊन ते जेवायला बसले. विमल मावशींने झाकून ठेवलेले जेवण त्यानी ताटात वाढून घेतले आणि एक घास तोंडात ठेवला. घास तोंडात घेताना त्याना त्यांच्या कन्येची - निलाची आठवण झाली.. लहानपणी रोज जेवायच्या आधी तिला घास भरवावा लागे.. तिचे जेवण झाले की आपले जेवण. गेले ते दिवस.. मुले मोठी झाली.. पिल्लाना पंख फुटले..

आज यमुनाकाकी म्हणाली "काम कमी कर.. कुणासाठी एवढं काम करतोस?” या यमुनाकाकी मुळेच मी या गावात आलो.. नाहीतर मुंबईत पैसे मोजत राहिलो असतो. यमुनाकाकी अधूनमधून आपल्या घरी मुंबईला यायची. लांबच नातं होतं. तिच्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला आणि पुढील उपचारासाठी ती नवऱ्याला घेउंन मुंबईत आली. आपण होतो त्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार झाले.. आपण तेंव्हा श् होऊन पाच वर्षे झाली होती. राणीसोबत लग्न झाले होते आणि मयूर चार वर्षाचा आणि राणी एक वर्षांची होती.यमुनाकाकी मला म्हणाली, ”महेश, माझ्या गावात तुझ्यासारख्या डॉक्टरची गरज आहे, या मुंबईत तुझ्यासारखे खुप डॉक्टर आहेत.. तू माझ्याबरोबर ये आणि माझं गाव पहा.”

मी यमुनाकाकीच्या गावी दोन दिवसासाठी आलो, इथले डॉक्टर्स पाहिले.. पेशन्टवर होणारे उपचार पाहिले आणि अंदाज आला.. इथल्या पेशन्टना चांगल्या उपचारांची गरज आहे आणि मी इथे आलो तर पेशन्टना योग्य उपचार देऊ शकतो. मी निर्णय घेतला... या गावात प्रॅक्टिस करण्याचा...आईबाबांना कमालीचा आनंद झाला आणि राणीचा विरोध.. पण शेवटी राणीच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून आपण या गावात आलो.. सुरवातीला यमुनाकाकी आणि तिच्या यजमानांनी खुप पाठिंबा दिला. या गावातील आणि तालुक्यातील डॉक्टर्स मंडळींनी खूपच सपोर्ट केला. बँकेचे कर्ज घेऊन बारा बेडच हॉस्पिटल सुरु झाले. हळूहळू एकएक मशीन्स येऊ लागली. इन्टेन्सिव्ह केअर रूम तयार झाली. जिल्ह्यातून गावागावातून पेशन्ट येऊ लागले. वेळ मिळेना.. झोप मिळेना.. दमूनभागून रात्री डोळे मिटावे तर कुणीना कुनी सिरिअस पेशन्ट येऊ लागला. रोज अपुरी झोप.. राणी वैतागली आणि मुलांना घेउंन मुंबईत गेली. तिथल्या कॉन्व्हेंट स्कुलमध्ये यांची नावे घातली. आईबाबा सोबत होते. हॉस्पिटल जोरात होत. पैसे कमी घेतले तरी येतच होते. सुट्टीत राणी आणि मुले इथे येत.. पण आपल्याला त्याच्यासोबत वेळ घालवायला वेळ नसे. मुलगा मयूर चिडे.. मुलगी नीला रुसून बसे. बायको एवढे पेशन्ट आणि त्त्यांचे नातेवाईक रात्री-अपरात्री सुद्धा घरची बेल वाजवतात म्हणून चिडे आणि आठ दिवसात मुंबईला परते.

असे आपले आयुष्य.. डॉक्टर महेश ग लरीत आले.. तिथल्या झोपाळ्यावर विसावले. पुन्हा त्याना मागच्या आठवणी येऊ लागल्या. बायको मुले मुंबईत. हळूहळू मुलांच बापाबद्दलच प्रेम कमी व्हायला लागलं. ती दोघे या गावी यायलापण टाळू लागली. हॉस्पिटलचा व्याप वाढत होता..कमी करायचे म्हंटले तरी कमी होत नव्हता.पण धक्का पुढेच होता. मुलगा मयूर दहावीपरीक्षा देऊन आला. आपल्याला खुप आनंद झाला.. आता बारावीनंतर तो मेडिकलला जाऊन डॉक्टर होईल अशी अपेक्षा होती. कारण हॉस्पिटल तयार होते.. जिल्ह्यात नाव होते.. पैसे होते.. अगदी मेडिकलला ऍडमिशन मिळण्यास अडचण आली तर पैसे भरून सीट मिळविण्याची आर्थिक तयारी होती.

मी मयूरला म्हणालो
"बाळा.. बारावीमध्ये जेइइ परीक्षा दयायला लागेल.. मुंबईतील चांगला क्लास लाव..”
तो चिडून म्हणाला "जेइइ परीक्षा... इथे मेडिकलला जायचे आहे कुणाला?”
"अरे पण.. माझे हे एवढे मोठे हॉस्पिटल.. कोण सांभाळणार?”
"काय माहित? एवढे वाढवायचे कशाला? तुम्हाला लाईफ आहे का? तुमच्या प्रोफेशनला आणि हॉस्पिटलला कंटाळून आई आणि आम्ही मुंबईत राहिलो. रात्र नाही.. दिवस नाही.. शनिवार नाही रविवार नाही.. पेशन्ट आणि हॉस्पिटल.. तुम्ही आईचा आणि आमचा कधी विचार केला आहे का.. कधी पंधरा दिवस यांच्यासोबत सुट्टीला जावं.. कधी नाटक सिनेमाला जावं.. सॉरी बाबा.

परदेशी जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करीन पण डॉक्टरकी... सॉरी..”
मी दुखावलो.. रात्री राणीला म्हंटल, ”मयूरला म्हंटल.. बारावीनंतर मेडिकलला जाणार ना? तर तो उलटाच बोलला..”

"मग काय चूकलं त्याच? त्याने बघितलं, बाबा आपल्याला आणि आपल्या बायकोला किती वेळ देतो? बाकी डॉक्टर नाहीत? ते पैसे मिळवतातच.. औषध कंपनीकडून परदेशी ट्रिप्स घेतात... गाड्या भेट म्हणून घेतात.. महेश, तू असा डिव्होटेड डॉक्टर असशील याची मला कल्पना नव्हती.. नाहीतर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं.. डिव्होर्स घयायचा किती वेळा विचार आला मनात माझ्या.. पण आपली मुले.. त्याना काय सहन करावे लागेल म्हणून विचार बदलला मी. आणि नीलापण मेडिकलला नाही जायची हा.. ती बारावीनंतर फ्रांसला जाईल फॅशन डिझाईन शिकायला.. तेंव्हा तूझ्या हॉस्पिटलचे तूच काय ते बघ...”

माझे विचारचक्र सुरु झाले.. आपला हा मेडिकल प्रोफेशन आपल्या समवेत संपणार. मग आई आजारी पडली आणि चार महिन्यात गेली. मग या गावात राहिलो मी आणि बाबा.. मयूर घ्घ्ऊ कानपुरला गेला.. नीला फ्रांसला गेली. त्त्यांचे शिक्षण सुरु होते. राणी मुंबईत.डॉ. महेश झोपळ्यावरून उठले आणि त्यानी डॉ. मुंगी यांनी दिलेल्या गोळया घेतल्या टेबलावर गितेचा तिसरा अध्याय काल वाचायला घेतला होता. तो वाचायला घेतला.. आणि हळूहळू डॉ. मुंगी यांच्या गोळयाचा अंमल व्हायला लागला आणि ते झोपी गेले. पहाटे पाच वाजता त्त्यांचा मोबाईल वाजू लागला.. ते खडबडून जागे झाले.. खाली अटॅक आलेला पेशन्ट आला होता.. डोळयांवर गोळ्यांची गुंगी असताना सुद्धा त्यानी कपडे चढवले आणि स्टेथोस्कोप घेऊन ते खाली उतरले.

त्या पेशन्टला त्यानी तपासले.. त्याचे ब्लडप्रेशर चेक केले...स्टेथोस्कोप काढला आणि फ्रीजमधील दोन इंजेवशन त्याच्या हृदयात टोचली आणि त्याला घ्ण्ळ मध्ये ठेवला. त्या पेशन्टची पुढील स्थिती पहाण्यासाठी ते तेथेच खुर्चीवर बसले. डॉ. महेश यांच्या डोळयांवर झोप होती - गोळ्यांचा परिणाम; पण पेशन्टसाठी त्याना बसावेच लागले होते.. गेले चार महिने ते डॉ. मुंगी या मोठया शहरातील मानसोपचार तज्ञ डॉक्टरकडून उपचार करून घेत होते. अर्धवट झोपेत त्याना आठवू लागले... मयूर अमेरिकेत गेला आणि एका मोठया कॉर्पोरेटमध्ये जॉबला लागला.. नीला फान्सला गेली फॅशन डिझाईनमध्ये ती मास्टर्स बनली.. त्यांंची आईपण काही दिवस मुलाकडे काही दिवस मुलीकडे राहू लागली.  डॉ महेशचे बाबा महेशसमवेत होते, तोपर्यत त्याला एकटे वाटत नव्हते; पण चार वर्षांपूर्वी बाबा गेले आणि महेश एकटा पडला.

मग त्याला झोप लागेना.. कधीकधी थोडी झोप येते आहे असे वाटत असताना खाली सिरीयस पेशन्ट यायचा आणि त्यांची झोप जायची. मग त्त्यांची चिडचिड व्हायची. झोपेच्या गोळया घेऊनही झोप येईना. डॉवटरांनी ओळखले, आपल्याला मानसोपचाराची गरज आहे.. त्यांनी शहरातील डॉ. मुंगी यांची भेट घेतली. डॉ. मुंगी यांना डॉ. महेशबद्दल ऐकून माहिती होती. परत एकदा त्यांनी डॉ. महेश यांच्याकडुन सर्व ऐकले.

डॉ. मुंगी -डॉक्टर, तुम्ही जे सांगता आहात ते मी ऐकले.. तुमची मूलं तुमच्या प्रोफेशनमध्ये आली नाहीत याचे तुम्हाला दुःख आहे.. पण हल्ली पुण्या-मुंबईतसुद्धा डॉक्टरांची पुढील पिढी या प्रोफेशनमध्ये येत नाहीत. कारण या प्रोफेशनमध्ये वेळ-काळ नाही.. डॉक्टर पेशन्टला चोवीस तास उपलब्ध हवा असतो.. डॉक्टरचे काही पर्सनल लाईफ असते, याची जाणीव पेशन्टला नसते.. यापेक्षा कॅर्पोरेटमधील जॉब त्याना आकर्षित करतो. कारण पाच दिवस भरपूर काम आणि दोन दिवस मजा. पगारपण आकर्षक.

डॉ. महेश - पण डॉ.. या प्रोफेशनमध्ये समाधान असत.. समाजसेवा असते असे या मुलांना वाटतं नाही काय? मी माझे आयुष्य पेशन्टसाठी दिले..

डॉ. मुंगी - तीच तर तक्रार आहे ना तुमच्या पत्नीची आणि मुलांची.. त्याना तुमचा सहवास हवा होता तो मिळाला नाही. तेंव्हा महेश.. तुम्ही आता सत्तरीकडे आला आहात.. तुमचे कुटुंब तुमच्यासोबत नाही.. शारीरिक तक्रारी वाढू लागल्या आहेत..तेंव्हा तुमचा स्टेथोस्कोप लांब ठेवण्याची वेळ आली आहे.

डॉ. महेश- म्हणजे डॉक्टर?

डॉ. मुंगी- म्हणजे हळूहळू पेशंटपासून लांब राहायला हवे.. रोजचे पेशंट कमी करा..इमर्जन्सी पेशन्ट घेऊ नका... जर तुम्हाला जास्त वर्षे जगावे असे वाटतं असेल तर हॉस्पिटल बंद करा आणि कुठेतरी म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे मन रमेल त्या ठिकाणी जा.. बायको-मुलासमवेत पुढील आयुष्य घालवा... कारण मी कितीही औषधे लिहून दिली तरी रात्री अपरात्री पेशन्ट येत रहाणार... तुम्ही उठत राहणार..तुमची चिडचिड होणार...परत झोप येणार नाही आणि तुमची शुगर वरखाली होत राहणार.

डॉ. मुंगी यांनी डॉ. महेश याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या.. मनावरील ताण कमी करण्यासाठी औषधे दिली.. योगासने करायला सांगितली.

डॉक्टरनी ठरवले जर आपल्याला जास्त वर्षे जगायचे असेल तर स्टेथोस्कोप लांब ठेवायला हवा...त्याच्याकडे आजूबाजूचे अनेक डॉक्टर मंडळी पुढील उपचारासाठी पेशंट्‌स पाठवत...त्या डॉक्टरमंडळींना आता पेशन्ट आपल्याकडे न पाठवता दुसऱ्या डॉक्टरकडे पाठविण्याची विनंती केली; तसेच रोज फक्त वीस पेशन्टना सकाळी आणि दहा संध्याकाळी तपासणार असा बोर्ड लावला.. पण काही उपयोग होत नव्हता. रोज सकाळी पेशन्ट्‌सची झुंबड उडत होती.. रात्री-अपरात्री पेशन्ट्‌स येऊन धडकत होतेच. डॉ. महेश हे हॉस्पिटल बंदच करत आहेत आणि लवकरच बायको-मुलाकडे परदेशी जाणार आहेत.. अश्या बातम्या समाजमाध्यमावर फिरू लागल्या.. लोकांत चुळबुळ सुरु झाली.. असंख्य पेशन्ट्‌सनी फोन करून तुम्ही हे गाव सोडून जाऊ नका अशी विनंती केली. तरी डॉक्टर हो म्हणत नाहीत हे समजल्यावर गावातील पेशन्ट्‌सनी मोर्चा काढला. शेवटी डॉक्टर त्याला सामोरी गेले आणि त्यानी मोर्चेवाल्याना शांत केले. डॉक्टर महेश गाव सोडून चाललेत हे ऐकून आमदार भेटायला आले..

”डॉक्टरसाहेब.. मी ऐकतोय ते खरे काय?”

"काय?”

"तुम्ही गाव सोडून चालला म्हणे? असं करू नका.. या भागातील लोक तुमच्या भरवश्यावर आहेत..”

"तब्येत चांगली नाही साहेब.. काही चुका झाल्या तर.. ज्या गावात फुले वेचली त्या गावात गोवऱ्या वेचायची वेळ यायची.. आणि आता समाजमाध्यम एवढी फास्ट झालीत.. कुणाची बदनामी व्हायला वेळ लागत नाही.”

"ते इतरांना हो.. तुमी तीस वर्षे या गावात आहात.. लोक तुम्हाला देव म्हणतात.. तीनतीन पिढ्यावर तुम्ही उपचार केलेत.. तुमच्या हातून चूक होईलच कशी?”

"शेवटी माणूस आहे मी.. देव नाही.. लोक मला देवमाणूस म्हणतात तो त्यांचा मोठेपणा आहे.. पण मी माणूसच आहे.. वय वाढतेय.. हात कापायला लागलेत.. शुगर वरखाली होते आणि झोप उडाली अलीकडे.. तेंव्हा आता थांबलेलं बर. नाही का?”

"अहो डॉक्टर.. तुम्ही मस्त म्हणाल मी जातो परदेशी.. पण आमची मानसं सोडतील तेंव्हा ना.. तुमाला काय अडचण असेल तर सांगा.. वाटल्यास पंधरा दिवस बायको-मुलाकडे जाऊन या.. पण आमची प्रेमाची विंनंती.. तुमी हे गाव सोडून जाऊ नका..”

आमदार गेले आणि मग असंख्य लोक भेटायला येऊ लागली. म्हातारी नव्वद वर्षांची आजी आली आणि "मी तुमच्यावर विसंबूून आहे डॉक्टर.. तुम्ही इथून गेलात तर मी दोन दिवसात मरेन” अशी प्रेमळ धमकी देऊन गेली.

डॉ. महेश मोठया कचाट्यात सापडले होते.. डॉ. मुंगी म्हणाले होते.. "तुम्हाला जर जगायचे असेल तर स्टेथोस्कोप दूर ठेवा म्हणजेच हळूहळू निवृत्ती घ्या” पण या भागातील लोक सोडतं नव्हते... काही तरी निर्णय घयायला हवा.. कितीही नको म्हंटले तरी पेशन्ट गर्दी करतच होते.. रात्री अपरात्री दार ठोठावत होते.. गोळ्यांनी झोप येत होती.. पेशन्ट झोप मिळू देत नव्हते.

     एक दिवस महेश यमुना काकीकडे गेला आणि त्याने सर्व परिस्थिती सांगितली तसेच डॉ. मुंगी यांचे उपचार आणि त्यानी दिलेला सल्ला सांगितला. यमुना काकी कळवळली
"किती त्रास करून घेतोस महेश.. तुला मुंबईतून इथे मी आणला.. तू इथल्या पेशन्टच्या मनात स्थान मिळविलंस.. त्यांना तुझी सवय झाली.. काही झालं तरी महेश डॉक्टर आहे.. तो बरा करणार हा विश्वास निर्माण केलास; पण शेवटी तू माणूस आहेस.. तुझे शरीर आणि मन दमले आहे.. तुझी पत्नी राणी आणि मुले तुझ्यावर रागावून परदेशी गेली आहेत.. तू एकटा आहेस.. तुझी झोप उडालीय.. हात कापू लागलेत.. शुगर आली आहे.. पैसे खुप आहेत.. काय उपयोग? खरं तर मी तुझी पेशन्ट.. तू गेल्यावर माझं काय हा मलापण प्रश्न आहे, पण.. पण तू जा महेश.. हे गाव. पेशन्ट, हा डॉक्टरी व्यवसाय सोडून दूर जा.. तरच काही वर्षे जगशील.”

यमुना काकीचा निरोप घेऊन महेश हॉस्पिटलमध्ये आला.. इतक्यात त्याला बातमी समजली.. पूण्यात एक हॉस्पिटलमध्ये लोक घुसली.. त्यानी तोडफोड केली.. राजकारणी हॉस्पिटलमध्ये आले.. टीव्हीवर त्या हॉस्पिटल आणि डॉक्टर्सची बदनामी सुरु होती..डॉ. महेशला हे हॉस्पिटल माहिती होते आणि डॉक्टर्स माहिती होते.. पण त्यांच्या हातातून चूक झाली होती. त्याची मोठी भरपाई करायला लागली होती.. डॉक्टरनी राजीनामे दिले होते.

मनःशांती गमावलेल्या डॉ. महेशना हे एक आणखी दुःख झाले.. आपल्या हातून अशी काही चूक झाली तर? एवढी वर्षे नाव मिळविले ते मातीत जायला किती वेळ लागेल? मग लोक काय करतील? शेण मारतील अंगावर? म्हणजे ज्या गावात फुले वेचली तिथे...महेश अस्वस्थ होता.. हल्ली राणीचापण फोन येईनासा झाला. मुले जवळजवळ विसरली होती बापाला.. काय मिळविले आपण.. आपण येथून जावे हे बरे.. नाहीतर पुण्याच्या डॉक्टरसारखी परिस्थिती व्हायची.. काहीतरी निर्णय घ्यायला हवा.. पण इथली लोक सोडणार नाहीत आपल्याला..अचानक बातमी आली... एका तज्ञ न्युरोलॉजिस्ट्‌सची घरात आत्महत्या... काय चालले आहे?

लोकांना वाटतो तसा डॉक्टर सुखी नाही. सतत पेशन्टचे दडपण आणि आता समाजमाध्यमाचे? सर्वांचे समाधान होत नाही.. कोण कधी येऊन धमकी देईल सांगता येत नाही? म्हणून डॉक्टरांची पुढील पिढी या प्रोफेशनपासून लांब चालली आहे. डॉ. महेशनी ठरविले.. आपण या गावापासून आणि हॉस्पिटलपासून दूर जायचे... दूर, अगदी दूर..

आपल्यानंतर या  हॉस्पिटलचे काय? येईल कुणीतरी आणि करील चालू हॉस्पिटल.. किंवा काही दिवसांनी आपण कुणालातरी देऊन टाकू.... किंवा मुले येतील आणि करतील काही व्यवस्था.. पण आता आपण थांबायचे नाही.. कुणाचा तरी जीव आपल्या हातून जाण्याअगोदर आपण निघून जावे.. कुठे जावे? सुरवातीला अंदमानला.. मग चेन्नई, बंगलोर. दिल्ली.. काशी.. ऋषिकेश फिरावे मनसोक्त.. मग मयूरकडे.. मग नीलाकडे.. मुले रागावलीत माझ्यावर.. त्यांचा राग काढावा.. नातवंडांचे लाड करावेत...

डॉ. महेशनी गुपचूप सर्व तयारी केली; पण या कानाचे त्या कानाला कळविले नाही.. स्टाफला काहीही कल्पना दिली नाही. एक छोटी सुटकेस तयार केली.. तीनचार कपडे, औषधे आणि आईबाबांचे फोटो सोबत घेतले. रात्री एका ओळखीच्या रिक्षावाल्याला सकाळी सात वाजता यायला सांगितले. दोन दिवस आधीच डॉक्टरनी सर्व ऍडमिट पेशन्टना डिस्चार्ज दिला होता.

रोजच्याप्रमाणे त्यानी सर्व पेशन्ट तपासले. कोणी ॲडमिट नव्हता त्यामुळे सर्व स्टाफ घरी गेला.. रात्री उशीरपार्यत डॉक्टर जागे होते. त्यानी सर्व स्टाफच्या अकाउंटवर एक वर्षाचा पगार ट्रान्फर केला आणि वर प्रत्येकाला दोन लाख जास्ती पाठविले.

रात्री झोपायच्या आधी त्यानी गीतेचा सातवा अध्याय वाचला..आणि गोळया घेऊन आणि गजर लाऊन ते झोपी गेले.

सकाळी साडेसहाला रिक्षावाला आला...खालून हॉर्न वाजवू लागला.. डॉक्टर खाली येत नाहीत हे पाहून बेल वाजवू लागला.. कंटाळून त्याने बाजूच्या केमिस्टला उठवले... त्यांनी त्यांंच्या मोबाईलवर कॉल केले...उत्तर येईना.. शेवटी दोघांनी पोलीस कम्लेट केली.. पोलीस आले.. बेल वाजवली.. शेवटी दार फोडले ..पोलीस. केमिस्ट आणि रिक्षावाला बेडरूममध्ये घुसले.

डॉ. महेश बेडवर शांत झोपले होते.. पोलिसांनी त्यांच्या गार पडलेल्या शरीराला हात लावला.. डोळे उघडून पाहिले.. डॉ. महेश हे जग सोडून गेले होते आणि बाजूला टेबलावरुन स्टेथोस्कोप खाली लोंबत होता. - प्रदीप केळुस्कर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

नाम हेच कैवल्य