बड्डे... बिड्डे.... अन रिटर्न गिपट...!
माझ्या वाढदिवसाला काहीतरी गोड द्यायचं म्हणून कोणी उसाचा रस आणला, कोणी लस्सी, कुणी गुलाबजाम ज्याने त्याने आपापल्या परीने काही ना काहीतरी आणलं होतं. कुणी पारले बिस्कीट, कुणी गुड डे बिस्किट, कुणी वडापाव, कुणी केळी, तर कोणी प्रसादात मिळालेला शिरा... तेही कुणी आणलं होतं? तर ज्यांना आपण मतिमंद, गतिमंद, अंध, अपंग, अनाथ समजतो..त्यांनी. त्या प्रत्येकाला वाटत होतं त्यांनी आणलेली प्रत्येक गोष्ट मी संपूर्णपणे खाऊन इथेच चट्टामट्टा करावी.
१७ एप्रिल रोजी माझा जन्मदिवस होता. ज्यांना माहित होते, त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या, या सर्वांचा मी ऋणी आहे. मी नेहमीसारखाच त्याही दिवशी भिक्षेकऱ्यांच्या सेवेसाठी ठरलेल्या स्पॉटवर गेलो, तिथे एक वेगळा सुखद धक्का बसला. श्री अमोल शेरेकर, स्वतः दिव्यांग असून आपल्या सोहम ट्रस्टमध्ये अन्नदान प्रकल्प पहात आहेत. यांच्या निमित्ताने अनेक दिव्यांग कुटुंबांनी मला त्यांच्यात सामावून घेतले आहे. माझ्या स्पॉटवर मी पोचलो, मोटरसायकल स्टँडवर लावताना अचानक माझे पाच-पन्नास दिव्यांग बंधू-भगिनीं समोर दिसले.
कुणी कुबडी घेऊन आले होते, कोणी काठी, तर कोणी व्हीलचेअरवर. नेमकं झालंय काय मला कळेना... त्यांच्याजवळ जाऊन मी भांबावून विचारले, ‘अरे काय झालं ? तुम्ही इथे सर्व कसे ?' सगळे एका सुरात म्हणाले, हॅपी बड्डे सेेेर...!'
‘अच्छा असं आहे होय ? घाबरलो की रे मी...' असं म्हणत हसत सर्वांचे हात हातात घेतले. ज्यांना हातच नाहीत त्यांच्या पायांना स्पर्श केला. कोणाला पाय नाहीत, कोणाला हात नाहीत...याही परिस्थितीत कुबड्या काठ्या व्हीलचेअरवर ही मंडळी कुठून कुठून कसरत करत, बस/रिक्षा /करत किंवा चालत आली होती... हे प्रेम, ही माया कुठून आणि कशी उत्पन्न होत असेल ? मतिमंद म्हणून ज्यांच्यावर शिक्का बसला आहे अशी तीन मुलं माझ्या कमरेला विळखा घालून, हॅपी बड्डे ... हॅपी बड्डे... म्हणत नाचत होती... नव्हे मला नाचवत होती...! कसं म्हणायचं यांना दिव्यांग ? कसं म्हणू यांना मतिमंद ? समुद्रात/नदीमध्ये विसर्जित केलेली मूर्ती...कालांतराने या मूर्तीचे हात, पाय, मुकुट आणि चेहऱ्यावरचा रंग अशा अनेक बाबी निसर्गामध्ये विलीन होतात. पण अशी हात नसलेली, पाय नसलेली, मुकुट नसलेली मूर्ती दिसूनही श्रद्धा असलेल्या माणसाचे हात नमस्कारासाठी आपोआप जुळतात! वेगवेगळ्या समुद्रातून, नदी मधून, तलावामधून अशा सर्व भंगलेल्या मूर्ती आज माझ्यासमोर प्रत्यक्ष येऊन, मूर्त स्वरूपात मला आशीर्वाद द्यायला माझ्यासमोर उभ्या होत्या...कुणी दिव्यांग म्हणो...कोणी मतिमंद म्हणो...माझ्यासाठी या भंगलेल्या, परंतु पवित्र मूर्तीच आहेत...भंगलेल्या या पवित्र मूर्तींसमोर मग मी नतमस्तक झालो... !
मी कुठल्याही मंदिर, मशीद, गुरुद्वारा चर्चमध्ये गेलो नाही... तरी मला भेटायला, आज द्येवच माज्या दारात आला, माऊली! माझ्या या सर्व देवांनी केक आणला होता, माझे स्नेही डीडी (फेसबुकचा आणि मनाने अत्यंत श्रीमंत असलेला राजा, श्री धनंजय देशपांडे) हे कानीकपाळी ओरडून सांगतात, केक नका कापू, कलिंगड कापून वाढदिवस साजरा करा... ! माझा तोच विचार होता, परंतु या सर्वांनी येतानाच खूप महागाचा केक आणला होता, आता केक नको, कलिंगड कापू असं म्हणून त्यांचा हिरमोड करण्याचं माझं धाडस झालं नाही.... नक्की. तर या सर्व गोष्टी आमच्या भिक्षेकरी आजी-आजोबा, मावश्या, बंधू भगिनी यांच्यासमोरच सुरू होत्या. डाक्टरचा आज वाडदिवस हाय, हे समजल्यानंतर आम्हाला का नाही सांगितलं म्हणून त्यांनी आधी माझी खरडपट्टी काढली. ‘आगं हो, आरे हो...सांगणारच होतो'; म्हणत वेळ मारून नेली.
मी आमच्या लोकांना मग वैद्यकीय सेवा द्यायला सुरुवात केली. बाजूला सहज लक्ष गेलं, अनेक आज्या मावश्या आणि माझे भाऊ एकत्र येऊन, गंभीर चेहऱ्याने काहीतरी खलबतं करत होते. भारताची अर्थव्यवस्था, अमेरिकेने भारतावर लादलेले कर, कोसळलेला शेअर बाजार, महागाई अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते गहन चर्चा करत असावेत; असं समजून हसत मी माझं काम चालू ठेवलं. माझं काम संपलं... मी उठलो, पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो, इतक्यात एक मावशी आली आणि दरडावणीच्या सुरात म्हणाली, ‘वाडदिस हूता तर आदी आमाला का नाय सांगटलं, पयलं ह्याचं उत्तर दे... '
‘आगं...'
‘आगं आनं फगं करू नगो, हुबा ऱ्हा...' रोबोटप्रमाणे तिने जिथे सांगितले तिथे मी उभा राहिलो. यानंतर एक भला मोठा हार माझ्या गळ्यात घालण्यात आला, पेढ्यांचे चार पाच बॉक्स समोर आले. काहीतरी गोड द्यायचं म्हणून कोणी उसाचा रस आणला, कोणी लस्सी, कुणी गुलाबजाम ज्याने त्याने आपापल्या परीने काही ना काहीतरी आणलं होतं. कुणी पारले बिस्कीट, कुणी गुड डे बिस्किट, कुणी वडापाव, कुणी केळी, तर कोणी प्रसादात मिळालेला शिरा... प्रत्येकाला वाटत होतं त्यांनी आणलेली प्रत्येक गोष्ट मी संपूर्णपणे खाऊन इथेच चट्टामट्टा करावी...मी लटक्या रागाने म्हणालो....
‘म्हातारे तु सहा केळी आणली, बाबांनं चार वडापाव आणले, मावशीनं पारलेचे सहा पुडे आणले... पाच पेढ्याचे बॉक्स आणलेत.... एकदाच खाऊ घालून काय मारता का काय मला वाढदिवसाला?' ती म्हणाली ‘खा रं ल्येकरा, आमी भिकारी हाव, भिकारी म्हणून, आमाला कुनी बी कायबाय देतंया, पण नौकरी, कामधंदा सोडून तू आमच्यासाठी एवड्या खस्ता खातो... तू काय कुटं कामाला जात न्हायी.... मंग तुला तरी कोन देइल?
‘खा रं माज्या सोन्या.. तुला माज्या हातानं सोन्याचा न्हाय... पन येवडा तरी योक घास भरवू दे... खा रं... माज्या बाळा... आ कर. . आ कर... हांग आशी...'
‘आम्हाला कुनी बी देईल, तुला कोण देणार ? या वाक्याने अंगावर काटा आला... ती मला स्वतःच्या तराजूत तोलते... स्वतः ज्या पायरीवर उभी आहे त्याच पायरीवर ती मला पाहते...ती मला सुद्धा भिक्षेकरी समजते... स्वतःला जी दुःख आहेत तीच दुसऱ्याला असतील हे ती समजते... दुसऱ्याशी ती एकरूप होऊन जाते... अद्वैत म्हणजे आणखी काय असतं ?स्वतःला ठेच लागली की, आपल्या डोळ्यातून पाणी येतं, हि असते ती वेदना.... दुसऱ्याला ठेच लागल्यावर मात्र आपल्या डोळ्यातून पाणी येतं, तेव्हा होते ती संवेदना... ! आपण स्वतःच्या वेदना कुरवाळतो... ती दुसऱ्याच्या संवेदना जपते...गरीब कोण .... श्रीमंत कोण.. ? इथे माझे डोळे दगा देतात...भर उन्हाळ्यात डोळ्यातून मग पाऊस कोसळतो. तिच्याच पदराला मग मी डोळे पुसायला खाली वाकतो...
‘का रडतो रं...?' ती माऊली विचारते
‘कुठे काय ? मी कुठे रडतोय ? घाम पुसत होतो...' हुंदका आवरून मी तिला स्पष्टीकरण देतो.
‘डोळ्याला कुठे घाम येतो बाळा...?' कातरलेल्या आवाजात ती बोलते... तीच्या पदराला डोळे पुसायला वाकलेला मी.... आता माझ्या पाठीवर अश्रूंच्या धारा बरसतात... ‘मावशी आता तु का रडते ?' मी मान वर करून विचारतो
‘तुज्यागत माज्या बी डोळ्यांना घाम आला बाळा ....' ती पदराने डोळे पुसत हसत बोलते. फसवा फसवीच्या या खेळात आम्ही रोज फसतो.... रोज रोज फसतो... आणि आपण फसलोच नाही असं दाखवत पुन्हा हसतो पुन्हा पुन्हा हसतो ! तर, इतक्या महागाचा हार आणला, पेढे आणले... अच्छा, मघाची गहन चर्चा वर्गणीसाठी चालू होती, या वर्गणी मधून हार पेढे आणि इतर साहित्य आणले गेले. मी माझ्या लोकांना म्हणालो, ‘हा खर्च करायची काय गरज होती ? ऋण काढून सण करणे मला पसंत नाही... ' मी माझी नाराजी मोठ्या आवाजात बोलून दाखवली.
‘ए आव्वाज खाली...'
‘शांत बसायचं गप गुमान...'
‘सांगटले तेवडंच करायचं...'
‘आज लय शान पना करायचा नाय..'
माझ्या वेगवेगळ्या माणसांकडून, वेगवेगळ्या धमकीवजा प्रेमळ सूचना येत राहिल्या.. भिजलेल्या मांजरागत, भेदरून मी सर्व ऐकत राहिलो... ते सांगतील ते करत राहिलो. यानंतर माझ्या लोकांनी रस्त्यावर माझं औक्षण केलं... एकाच वेळी उसाचा रस, लस्सी, पाणी, ताक, नीरा, लिंबू सरबत, गुलाबजाम, केक, वडापाव, समोसा, प्रसादाची खिचडी, शिरा या सर्व बाबी पोटात घेऊन मी दिवसभर गर्भार बाईसारखा कमरेवर हात ठेवून मिरवत आहे. माझ्यासाठी जे पार्ले बिस्कीट, गुड डे बिस्कीट, शिरा, केळी गिपट म्हणून मिळाली होती, ती सर्व एका बॅगेमध्ये माहेरी आलेल्या मुलीला, सासरी जाताना आई पिशवीत घालून देईल तशा पद्धतीने भरून दिलं.
आज खूप लोकांनी विचारलं डॉक्टर आज काय विशेष ? हो...आज एक हात आणि पाय निसर्गात विलीन झालेली नवरा बायकोची मूर्ती भेटली. त्यांची नऊ वर्षांची मुलगी धडधाकट आहे, सुदृढ आहे, गोड बाळ आहे, शिकायची इच्छा आहे. मी या दिव्यांग मूर्तीला विचारल, ‘मी काय करू शकतो?'
ते म्हणाले ‘आमचे आयुष्य संपले आहे, मुलीला शिकवा...' आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी या दिव्यांग मूर्तींना वचन दिले आहे, ‘आजपासून ही पोरगी माझी, जोपर्यंत तिची इच्छा आहे तोपर्यंत मी तिला शिकवेन. मी जर जिवंत असेन, तर बाप म्हणून कन्यादान करून, तिचे लग्न सुद्धा लावून देईन.' या वेळी आई बापाच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले.... माझ्यासारख्या पन्नास वर्षाच्या माणसाच्या पदरात, निसर्गाने वाढदिवसाच्या निमित्ताने एक पोरगी घातली.... यार, वाढदिवस वाढदिवस.... सेलिब्रेशन सेलिब्रेशन म्हणजे अजून दुसरं काय असतं ? आपल्या वाढदिवशी आपलं अपत्य जन्माला यावं.... आपला आणि तिचा बड्डे सेम टु सेम दिवशी असावा, याहून भाग्य ते काय... ? एका मुलीचा बाप होऊन आज माझा वाढदिवस साजरा झाला !
साला आज मैं तो बाप बन गया.... ! मी आता निघालो. पारले, गुड डे, खिचडी, शिरा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींची माझी बॅग तयार होती. बॅगेचे वजन असेल अर्धा ते एक किलो... ! एक आजी मध्येच आली आणि म्हणाली, हे पैसे ठेव आणि जीवाला वाटेल ते घेऊन खा...ती वीस रुपयांची नोट होती... ! नाईलाजाने उचलला जातो तो बोजा... .दुसरे डोक्यावर टाकतात तो भार...
आपणहून आपल्या माणसांचं उचलतो ते वजन... ! रोज शंभर ते सव्वाशे किलो वजनाचं साहित्य घेऊन या कडक उन्हाळ्यात मी रस्त्यावर फिरतोय... मला दिलेल्या गिपटने ही भरलेली बॅग मात्र उचलताना, आज ती मला अनेक पटींनी वजनदार जाणवली... ! या बॅगेचे वजन तरी कसं करावं ? फुलांचं वजन होतं माऊली, सुगंधाचं वजन कसं करायचं ? गिपटच्या बॅगेचं वजन होईलसुद्धा, पण प्रेमाच्या या भावनांचं वजन करण्यासाठी मी कुठला वजन काटा आणू ? आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करताना दरमहा पाच लाख रुपये पगार घेत होतो, बँकेतून पैसे काढून, पाच लाख रुपये एका खिशात सहज मावायचे....
"जीवाला वाटेल ते घेऊन खा... म्हणणारी वीस रुपयांची नोट मात्र आता खिशात बसेल, एवढा मोठा खिसाच आता माझ्याकडे नाही, माऊली... !!!काय करावं ? कसं करावं ? माझ्याकडे उत्तर नाही... ! आज ती किलोभर बॅग आणि ती वीस रुपयांची नोट खूप खूप वजनदार भासली... !रिटर्न गिपट द्यायची हल्ली प्रथा सुरू झाली आहे...
मला जे माझ्या माणसांकडून गिपट मिळाले त्या बदल्यात मी त्यांना रिटर्न गिपट काय देऊ ? काय देऊ... काय देऊ.... अं... काय देऊ... ??? ... ठरलं....
१७ एप्रिल 202५ नंतर माझं जे काही आयुष्य उर्वारित आहे, ते माझ्या भीक मागणाऱ्या लोकांना माणसात आणण्यासाठी, जे काही मला करावे लागेल, ते करण्यासाठी माझं संपूर्ण आयुष्य त्यांना समर्पित... !!!
यापेक्षा वेगळं माझ्याकडे रिटर्न गिपट नाही...!!!
-आपले स्नेहांकित,
डॉ. अभिजीत आणि डॉ. मनीषा सोनवणे डॉक्टर फॉर बेगर्स सोहम ट्रस्ट पुणे