नवे शहरच नाही, तर नवे विचारसुद्धा
"वाचकांच्या मनातील वृत्तपत्र” अगदी ह्या ब्रीद वाक्याप्रमाणे वाचकांच्या मनातील ठाव घेण्याचं हे काम करत असतं. नवी मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील शाळा, महाविद्यालयात जे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याची रास्त माहितीसुद्धा ह्या ‘नवे शहर' मधून निक्षून प्रकाशित केली जाते. ह्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते व शाळा महाविद्यालयांनी राबविले उपक्रम इतरांपर्यंत पोहचतात.
‘आपलं नवे शहर' चा वर्धापन दिन १ मे रोजी येत असतो त्याबद्दल ‘आपलं नवे शहर' परिवारास ३१ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! वर्धापन दिन साजरा करण्याचा आनंद हा काही औरच असतो. वर्धापन दिन साजरा करणे म्हणजे सिंहावलोकन सुद्धा असते. म्हणजे काय, तर गतवर्षात आपण जी कामगिरी केली ह्याचा आढावा घेणे होय. वर्धापन दिन साजरा करत असताना आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचलो काय? वाचकांच्या अपेक्षेमध्ये खरे उतरलो काय? ह्यासुद्धा गोष्टींचा आढावा घेणे असते.
१ मे हा क्रांतिकारी दिन आहे. १ मे ला जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनसुद्धा साजरा केला जातो. ह्या १ मेच्या क्रांतिकारी दिनी आपल्या क्रांतिकारी आपलं नवे शहर ह्या दैनिकाची स्थापना झाली आणि ते जनतेच्या सेवेत दाखल झाले. शेवसपियर म्हणतो नावात काय? परंतु नावातच बरेच काही दडलेलं असत. ‘आपलं नवं शहर' म्हणजे नावातच ‘आपलं' आहे. म्हणजे आपलेपणा आहे. जवळीक आहे. म्हणजेच काय, तर कनेक्ट होऊ पाहतो आहे आणि वर्तमानपत्र म्हटले की कनेक्ट होणं आलंच. आपल्या नवे शहरला ३१ वर्षे कनेक्ट होऊन झाले आहेत आणि समाजाच्या सर्व स्तरापर्यंत चांगलेच कनेक्शन जोडले गेले आहे. आपल्या लाडक्या ”आपलं नवे शहर मध्ये दुसरा शब्द आहे ‘नवे शहर'. ‘नवं शहर' म्हणजे एक नवा विचार. नवीन शोधन. नवीन शिकण्याची उम्मीद राखणं ह्या ब्रम्हांडातील नवीन माहिती जाणून घेणं, त्याचा शोध घेणं आणि आपल्या समाजासमोर ठेवणे, त्यांना अवगत करणं, त्यांना शहाणं करणं, त्यांना माहितीचा भांडार उपलब्ध करून देणं. त्यांच्या सामान्य ज्ञानामध्ये भर घालणं म्हणजे नवं शहर. ‘नवं शहर' म्हणजे वर्तमानपत्राच्या युगात आपलं ‘नवे शहर' निर्माण करणं.
नवं शहर म्हणजे एव्हढ्या मोठ्या वर्तमानपत्राच्या युगात आपली जागा करणं, एक वेगळी ओळख निर्माण करणं. ह्या नवीन युगात आपली वेगळी छाप टाकणं.अगोदरच एव्हढे दर्जेदार अनुभवी वर्तमानपत्र जनतेच्या सेवेत आहेत. त्यात उडी घेणं म्हणजे खरंच नवे शहरचे जेव्हढे कौतुक करावं तेवढे थोडेच आहे. वर्तमानपत्राचा खरा आत्मा असतो तो म्हणजे संपादकीय पानांवरील कॉलम/लेख. हे संपादकीय पानावरचे लेख दररोज फार चांगले, दर्जेदार, उत्तम व सध्या चालू घडामोडीवर प्रकाश टाकणारे असून त्यातून वाचकांना मार्गदर्शनसुद्धा मिळत असते. तसे बघितले तर हे वर्तमानपत्र वाशी, नवी मुंबई येथून प्रकाशित होते. परंतु ह्यात नवी मुंबई, मिरा-भाईंदर, भिवंडी, उरण, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल येथील शहरांच्या स्थानिय बातम्यांना भरपूर स्थान दिले जातं. त्यामुळे हे वर्तमानपत्र सर्वांना आपलेसे असल्यासारखं वाटते. उपसंपादक राजेंद्र घरत यांनी बऱ्याचजणांना आपलंंसं करून घेतलं आहे. ते आपल्या वर्तमानपत्रात संधी देऊन नवोदितांचे व अनुभवी लेखकांना वारंवार प्रोत्साहन देत असतात. त्यांनी बरेच कवी आणि लेखक जोडले आहेत व अजूनही हे मोलाचे कार्य सुरूच आहे.
सध्या नवे शहर एक दर आठवडल्याला वाचक संवाद प्रतिक्रिया राबवित आहे. ह्या उपक्रमाला वाचकांचा व लेखकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लिहिणारे तर चातकासारखी आठवड्याच्या प्रश्नांची वाट बघत असतात. साधारणतः सरासरी एका संवाद प्रतिक्रियेवर ५० वाचक /लेखक सहभाग घेत असतात. विशेष म्हणजे ज्या प्रतिक्रिया येत असतात त्यासुद्धा दर्जेदार, निर्भीड, स्पष्ट, कोणाचेही मन न दुखावणाऱ्या असतात. ह्या सदरामुळे नवे शहराची एक वेगळीच शान वाढलेली आहे. हा वाचकाचा संवाद ज्वलंत सध्या समाजात होत असणाऱ्या घडामोडीवर असतो. ह्यामुळे काय घडत असतं ह्याच टू वे ट्राफिक सुरु असते. त्यामुळे नागरिकांच्या मनात काय आहे हे सुद्धा वर्तमानपत्राला त्यांच्या मनाचा वेध घेता येतो. तसेच चांगल्या पुस्तकांवर समीक्षासुद्धा विस्ताराने केली जाते. त्यामुळे पुस्तकाचा आढावा व लेखाजोखा यासह पुस्तक हे सर्वांपर्यंत अगदी सहज पोहचत असते. नवे शहर मध्ये महत्वाचे सदर आहे ते म्हणजे मुशाफिरी. राजेंद्र घरत हे खूपच चांगली मुशाफिरी करत असतात. समाजात जे सध्या प्रश्न भेडसावत असतात. त्या सर्व सामाजिक, प्रश्नावर ‘नवे शहर मधून उद्बोधक लेखन असते. ह्यात कधी-कधी निसर्गासोबत केलेली मुशाफिरीसुद्धा असते. आपल्याला घरी बसल्या बसल्या जंगल सफारीसुद्धा घडवून आणली जाते. ‘नवे शहर'मध्ये लेखकांचे प्रकाशित होणारे लेखसुद्धा दर्जेदार, दिशा निर्देश व मार्गदर्शन करणारे असतात. ह्यातील कथा ह्या खिळून ठेवणाऱ्या, मनोरंजक व गुंतवून ठेवणाऱ्या असतात. ‘नवे शहर'मध्ये महामानवांच्या जयंंती, पुण्यतिथी ह्यावर भरपूर लिखाण प्रकाशित केल्या जातं. त्यामुळे महामानवांच्या कार्याचा आढावा घेऊन महामानवाच्या कार्याची तरुणांना ओळख पटते. वाचकांचे मनोगत सदर सुद्धा दररोजच्या अंकात चालविले जातं.
नवी मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील शाळा, महाविद्यालयात जे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याची े रास्त माहिती सुद्धा ह्या ‘नवे शहर' मधून निक्षून प्रकाशित केली जाते. ह्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते व शाळा महाविद्यालयांनी राबविले उपक्रम इतरांपर्यंत पोहचतात. मोलाची कामगिरी करणारे नागरिक, विद्यार्थी त्यांचेसुद्धा कौतुक ह्या वर्तमानपत्राद्वारे खुल्या दिलाने केले जाते. वर्तमानपत्र हा एक समाजाचा आरसा असतो आणि हे ‘आपले नवं शहर' अगदी समाजाचा चेहरा स्पष्टपणे ह्या आरश्यात प्रतिबिंबित होत असते.
शेवटी नवे शहराचं ब्रीद वाक्य आहे, "वाचकांच्या मानतील वृत्तपत्र” अगदी ह्या ब्रीद वाक्याप्रमाणे वाचकांच्या मनातील ठाव घेण्याचं हे काम करत असतं. म्हणूनच तर हे ‘आपलं नवे शहर' वाचकांच्या गळ्यातील ताईत झालं आहे.
हे नवे शहर एक वर्तमानपत्र नसून एक नवा क्रांतिकारी विचारसुद्धा आहे. ‘नवे शहर'ला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! - अरविंद मोरे