आठवणीतले काश्मिर
काश्मिर आमचे व देशप्रेमी काश्मिरीही आमचेच. देशद्रोही काय...बैंगनवाडी, भेंडीबाजार, कुर्ला, मालेगाव, भिवंडी, नयानगर-मीरा भाईंदर, संभाजीनगर, मुंब्रा, नागपूर, मुर्शिदाबाद, मेरठ, मुरादनगर, मलियाना, मुझपफरनगर, हजारीबाग, कोटा, बदायुँ, भागलपूर, सुरत, चन्नपटना, बिजनौर, हैद्राबाद, अलिगढ या व अशा अनेक भारतीय नगरांमध्ये गेली अनेक वर्षे आहेत व दंगेच करीत आहेत. पण म्हणून आपण तिथे जायचे थांबवत नाही. कारण हा आमचा देश आहे. म्हणून काश्मिरला जाणे थांबवता कामा नये.
‘कितनी खूबसूरत ये तस्विर है मौसम बेमिसाल बेेनजीर है ये कश्मिर है ये कश्मिर है ..' हे गाणं आपण अनेकदा ऐकलं असेल. अमिताभ बच्चन, राखी व विनोद मेहरा यांच्यावर चित्रीत झालेलं हे गाणं १९८२ साली रजतपटावर झळकलेल्या ‘बेमिसाल' चित्रपटातील असून किशोर कुमार, लता मंगेशकर व सुरेश वाडकर यांनी ते गायिलं होतं. विख्यात गीतकार आनंद नक्षी यांनी लिहिलेल्या या नितांतसुंदर गीताला राहुल देव बर्मन यांनी स्वरसाज चढवला होता. जयवंत पाथरे या मराठी सिनेमॅटोग्राफरने या चित्रपटाचे चित्रीकरण करताना आपले कसब पणाला लावले होते. काश्मिरमध्ये पाकपुरस्कृत दहशतवादाला प्रारंभ होण्यापूर्वी ज्या काही चित्रपटांचे चित्रीकरण सोनमर्ग, पहलगाम भागात झाले होते, त्यातलाच एक बेमिसाल हा हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट होता. आजमितीला यापैकी लता मंगेशकर, विनोद मेहरा, राहुल देव बर्मन, आनंद बक्षी, किशोर कुमार, जयवंत पाथरे, हृषिकेश मुखर्जी या मंडळींनी पृथ्वीवरले नंदनवन सोडुन स्वर्गातल्या नंदनवनाची वाट धरल्यालाही अनेक वर्षे होऊन गेली आहेत.
२२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हे सगळं आठवणं स्वाभाविक आहे. १९८९ पासून काश्मिरमध्ये काही स्थानिक लोक, प्रशासनातील काही फितुर कर्मचारी-अधिकारी, काही बदमाश देशद्रोही राजकारणी यांच्यामुळे काश्मिरातील हिंदु समुदायाला लक्ष्य करणं, त्यांची श्रध्देची ठिकाणं उध्वस्त करणं, महिला-मुलींच्या अब्रूला हात घालणं, त्यांची घरे जाळणं, मालमत्ता बळकावणं आणि त्यांना पळवून लावणं या प्रकारांना सुरुवात झाली ती पार २०१९ मध्ये धारा ३७० रद्द करीपर्यंत हे प्रकार सुरुच राहिले. १९८९ ते २०१९ दरम्यान काश्मिरमध्ये तब्बल ४२ हजार व्यक्तींच्या हत्या करण्यात आल्या. हत्या करणारे कोण आणि यात मरणारे कोण होते हे वेगळं सांगायला नकोच! एकूण १ लाख २० हजार ते १ लाख ४० हजार पंडित लोकसंख्येपैकी ९० हजार ते १ लाख पंडितांना आपली राहती घरे, मालमत्ता १९९० च्या सुमारास सोडाव्या लागल्या होत्या. त्या आधीच्या काळातही कुरबुरी चालू होत्याच; सगळं काही आलबेल होतं अशातला भाग नाही. मी तर लहानपणापासून वर्तमानपत्रांतून वाचत आलो आहे की कुपवाडा, अनंतनाग, शोपिया, बडगाम, बैसरन व्हॅली, कालुचक्र आर्मी कॅम्प, अमरनाथ यात्रा मार्ग या व अशा ठिकाणी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ले केले. सीमेवर कुरापती काढल्या. भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. चूकून सीमा ओलांडलेल्या मेंढपाळांना अटक केली वगैरे वगैरे. परक्या मुलखातून येऊन काश्मिरमधील नेमवया हिंदु समाजातील व्यक्तींनाच शोधून ठार मारणं हे स्थानिक नागरिक, स्थानिक घोडेवाले, तेथील प्रशासनातील फुटीरतावादी मानसिकतेच्या लोकांच्या मदतीशिवाय केवळ अशवय आहे.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायानुसार प्रत्येक काश्मिरी नागरिकाला आपण सरसकट पाकिस्तानधार्जिणे, गद्दार, देशद्रोही, फुटीरतावादी, दहशतवाद्यांना मदत करणारे असे समजणे हे चूकच आहे. आपल्यामध्येही देशाच्या गुप्तचर यंत्रणांची रहस्ये विदेशीयांपर्यंत पोहचवणारे, या देशाचे खाऊन याच देशाच्या सुरक्षेला अडचणीत आणणारे फितुर, गद्दार, घरचे भेदी लोक असतातच की! जम्मू व काश्मिर यांचे मिळून एक विशेष दर्जाचे राज्य दीर्घकाळ होते. जम्मूमध्ये वैष्णोदेवी हे हिंदुंसाठी परमपवित्र देवस्थान आहे. मात्र तिथे पर्वतावर यात्रेकरुंची ने-आण करणारे अनेक घोडेमालक-कर्मचारी हे मुस्लिमच आहेत व त्यांची आर्थिक परिस्थिती यथातथाच असते. एका फेरीत कटरा ते वैष्णोदेवौ हे १४ किलोमीटरचे अंतर यात्रेकरुला घोड्यावर बसवून आपण सोबत पायी चढणे व तेवढेच अंतर उतरणे हे नक्कीच सोप्पे काम नव्हे. दिवसाला अशा दोन फेऱ्या मारल्या तर एकूण ५६ किलोमीटरची पायपीट होते. ती केली तरच त्यांची चूल पेटणार अशी स्थिती आहे. असे घोडेवाले अमरनाथ मार्गावर, पहलगामला, सोनमर्ग, गुलमर्ग येथे नेहमी पाहायला मिळतात. त्यांच्यातल्या ज्या लोकांनी पाकिस्तानी हल्लेखोरांना माहिती पुरवली असेल त्यांना मात्र मोकळे सोडता कामाचे नाही. काश्मिर हे भारताचे नंदनवन आहे. त्यावर पाकड्यांचा डोळा होताच, पण भारताने पाकिस्तानपासून पूर्व बंगालला वेगळे करुन बांगला देश निर्माण केला तेंव्हापासून पाकिस्तान्यांचा जळफळाट आणखी वाढला व आरपारच्या लढाईत भारताला पराभूत करता येणार नाही म्हणून मग अंमली पदार्थ, नकली नोटा, अजमल कसाब सारखे दहशतवादी पाठवणे, सीमेवरुन घुसखोरी करत अतिरेकी संघटनांचे हल्लेखोर पाठवणे या मार्गांचा जास्त अवलंब करायला अधिक प्रमाणात सुरुवात झाली आणि त्यांच्या या वाढत्या कुरापतींना भारतातील काही अल्पख्यंकांचे ‘स्लीपर सेल्स' हे कसे मदत करत आले आहेत हेही आपण सारे जाणून आहोतच.
२००८ साली २६/११ घडले तेंव्हा मी मनाली येथे होतो. ते वृत्त आम्हाला तेथील हॉटेलमध्ये टीव्ही चॅनल्सच्या बातम्यांवरुनच समजले होते. २००९ सालच्या नोव्हेंबर महिन्यात मी प्रथमच काश्मिरच्या भूमीवर पाऊल ठेवले. त्या वर्षी २६ नोव्हेंबरला काश्मिरच्या श्रीनगर व अन्य शहरांत मी पाहिले की तेथील स्थानिकांनी, तेथील स्थानिक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मुंबई हल्ल्याला एक वर्ष झाल्यानिमित्त त्या हल्ल्यात मृत झालेल्या भारतीय नागरिकांना साधी श्रध्दांजली अर्पण करण्याचेही सौजन्य दाखवले नव्हते की कोणत्याही रस्त्यावर, चौकात, तिठ्यावर, बाजारात मृतांना श्रध्दांजली अर्पण करणारे कोणतेही बॅनर, पोस्टर लागले नव्हते. फुटीरतावाद्यांची, कट्टरपंथीयांची वेगवेगळ्या विषयांवर मात्र अनेक प्रकारे पोस्टरबाजी सुरु असल्याचे दिसत होते. आम्ही श्रीनगरच्या शंकर मंदिरासमोर २६/११ च्या मृतांना श्रध्दांजली वाहिली होती. श्रीनगरपासून २५ कि.मी. वर गंडेरबाल येथील तुलमुल्ला गावात क्षीरभवानी (स्थानिक उच्चार खीरभवानी ) देवीचे मंदिर आहे. त्याला सुरक्षा जवानांचा सतत वेढा असतो. तेथील एका जवानाला मी विचारले की ‘इथले वातावरण, जनजीवन या देवळाप्रतीचा स्थानिकांचा दृष्टीकोन कसा आहे?' त्याने सांगितले की ‘सैनिकांची सुरक्षा या मंदिराला अखंडपणे पुरवलेली असल्यामुळेच हे देवस्थान तुम्हाला पाहायला मिळतंय. अन्यथा....' मी काय समजायचे ते समजून गेलो. त्यावेळी आम्ही श्रीनगरच्या दल लेक मधील शिकारा बोटीत मुक्कामही केला होता. ऐन थंडीच्या दिवसांत नोव्हेंबर महिन्यात गेल्यामुळे बोचरी थंडी होती. शिकारा बोटीत वावरणारे कर्मचारी अंगभर पायघोळ कपड्यांत असत. काहींच्या पोटावर उष्णता पुरवणारी शेगडीही बांधलेली असे. कधी कधी वाटून जाई की त्याच पायघोळ कपड्यांतून त्यांनी चटकन एके 47 किंवा तत्सम काही हत्यार काढून आमच्यावर रोखले किंवा चालवले तर?
जून २०२२ मध्ये दुसऱ्यांदा काश्मिरमध्ये जाण्याचा योग आला. तेंव्हा मात्र २००९ च्या तुलनेत रस्ते, रेल्वे, बोगदे या सगळ्या वाहतुकीच्या मार्गांबाबत पुष्कळ सुधारणा दिसून आल्या. पण स्थानिकांची मानसिकता मात्र भारतीय बहुसंख्यंकांकडे पाहण्याची तशीच कायम होती. आम्ही पहलगाम येथील हॉटेलात दोन दिवस मुक्काम केला होता. तेथील बेताब व्हॅलीला जाता आले नव्हते. पण अन्य ठिकाणे पाहिली. बर्फात खेळता आले. राजेश खन्ना, मुमताज, संजीवकुमार अभिनित ‘आपकी कसम' या सुंदर चित्रपटातील अनेक दृश्ये काश्मिरमधील आहेत. ‘करवटे बदलते रहे सारी रात हम आपकी कसम' आणि ‘जय जय शिवशंकर काटा लगे ना कंकर' ही गाणीही तेथेच चित्रीत करण्यात आली आहेत. मराठी चित्रपट ‘मधुचंद्र' मधील महेंद्र कपूर यांनी गायिलेले ‘हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू नवतरुणी काश्मिरी' हे गीत काश्मिरवरच बेतलेले आहे. तुम्हा आम्हाला पृथ्वीतलावर नंदनवनाची अनुभुती देणारेे अनेक चित्रपट, अनेक गीते भारताचे अभिन्न अंग असणाऱ्या काश्मिरमध्ये चित्रीत करण्यात आली आहेत. जसे की जंगली, कश्मिर की कली, जब जब फुल खिले, शर्मिली, कभी कभी, बॉबी, सिलसिला, बेताब, रोजा, दिल से, मिशन कश्मिर, लक्ष्य, यहाँ, लम्हा, रॉकस्टार, जब तक है जान, ये जवानी है दिवानी, हायवे, हैदर, द कश्मिर फाईल्स वगैरे वगैरे...ते काश्मिर आज पुन्हा रक्तरंजित बनले आहे. आपल्याच घरात वावरायची जणू चोरी असे तिथले वातावरण पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी करुन ठेवले आहे. त्यांचा आपल्या सरकारने योग्य तो बंदोबस्त करायला हवा. काश्मिर आमचे व तेथील काही देशप्रेमी काश्मिरीही आमचेच. देशद्रोही काय...बैंगनवाडी, भेंडीबाजार, कुर्ला, मालेगाव, भिवंडी, नयानगर-मीरा भाईंदर, संभाजीनगर, मुंब्रा, नागपूर, मुर्शिदाबाद, मेरठ, मुरादनगर, मलियाना, मुझपफरनगर, हजारीबाग, कोटा, बदायुँ, भागलपूर, सुरत, चन्नपटना, बिजनौर, हैद्राबाद, अलिगढ या व अशा अनेक भारतीय नगरांमध्ये गेली अनेक वर्षे आहेत व दंगेच करीत आहेत. पण म्हणून आपण तिथे जायचे थांबवत नाही. कारण हा आमचा देश आहे. म्हणूनच पर्यटकांनी काश्मिरला जाणे थांबवता कामा नये. केंद्र सरकार व भारताच्या सुरक्षा बलांनी संपूर्ण काश्मिरात योग्य ते संरक्षण स्थानिक बहुसंख्य नागरिकांना व पर्यटकांना पुरवावे.
दै. ‘आपलं नवे शहर'च्या सर्व वाचक, लेखक, बातमीदार, जाहिरातदार, शुभचिंतक, हितचिंतकांना आमच्या ३२ व्या वर्षातील पदार्पणानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई