आपले नवे शहर वर्धापन दिन आणि मी...

  नवी मुंबईतील दैनिक ‘आपलं नवे शहर' चा ३१वा वर्धापन दिन १ मे २०२५ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मी एखादा लेख लिहावा असा आग्रहवजा विनंती उपसंपादक आणि माझे मित्रवर्य राजेंद्रजी घरत यांनी केली म्हणून या खास लेखाचे प्रयोजन...

     सन १९९४...नवी मुंबईतील वृत्तपत्र व्यवसाय सुरू करताना ‘आपलं नवे शहर' पहिल्यांदा साप्ताहिक स्वरुपात प्रसिद्ध होऊ लागले. त्यानंतर कालानुरूप त्यात बदल घडत असतानाच साप्ताहिकाचे दैनिक झाले. आठवड्यातून एकदा होणारा जनसंपर्क रोज होऊ लागला. साप्ताहिकाचे विषय ठराविक होते. मात्र दैनिक झाल्यामुळे पसारा वाढला. विषय वाढले. लिखाणाचा आवाका वाढला. सदरांची संख्या वाढली. रोजच्या रोज संपर्क वाढल्यामुळे नवनवीन क्षेत्रातील बातम्यांची वाढ झाली आणि पर्यायाने वाचकांची संख्या वाढली. ‘वाढता वाढता वाढे ... ' अशी भरभराट सुरू झाली.

        नवी मुंबईची जडणघडण, बदलतं स्वरुप, निरनिराळ्या क्षेत्रातील दमदार वाटचाल, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरारी सोबतच राजकारणातील उलथापालथ वगैरेची वेळोवेळी दखल घेऊन ती जनतेपुढे आणताना वाचकाला आकर्षण वाटेल असं काहीतरी नाविन्यपूर्ण सादर करणंही तितकंच महत्वाचं असतं. त्यासाठी तसं लेखनही हवंच. केवळ वृत्तपत्र किंवा बातमीपत्र न समजता सामाजिक बांधिलकीचं भान ठेवताना समाज प्रबोधन, समाज सुधारणा, सामाजिक विषय समाजातील घडामोडी, गाठलेली उंच शिखरे, मिळवलेले पुरस्कार, ज्येष्ठ, मध्यमवर्गीय, किशोरवयीन आणि लहान मुलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न तसेच वृत्तपत्राकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता समाजाचं देणं देण्याची भावना...त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणं आलंच.

       आदर्श, उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या मुलाखती घेऊन त्यांना समाजापुढे आणणं वगैरे नानाविध कामं करुन आपलं वृत्तपत्र आघाडीवर ठेवणं म्हणजे केवळ खप वाढवणं नाही, तर जनतेच्या तक्रारी, अडचणी, सूचना समोर आणणं एवढंच नाही, तर त्याचा पाठपुरावा करुन त्याला वाचा फोडणं वगैरे गोष्टींमुळे वाचक टिकून राहतो आणि वाचकवर्ग वाढतो.

        आता माझा संबंध या वृत्तपत्राशी कसा आला त्याबाबत... खरं तर मी अलिबाग तालुक्यातील चोंढी गावचा जन्मापासूनचा रहिवासी. आयुष्याची साठ वर्ष तिथेच गेली. मुलं आणि सुनांच्यामुळे मी दुकानाचा पसारा बंद करुन निवृत्त जीवनात नवी मुंबई या सुनियोजित शहरात कायमस्वरुपी राहण्यासाठी आलो. त्यालाही आता बारा वर्षे म्हणजे एक तप उलटून गेलं. या काळात संपूर्ण शहरातील सर्व प्रकारच्या घडामोडी पाहिल्या... अनुभवल्या. नवी मुंबईच्या आठही विभागात मी काहीना काही कारणाने गेलोय. एक मात्र खरं की, नवी मुंबई हे शहर गुणांची कदर करणारं शहर आहे. माझ्या अंगी असलेल्या कलागुणांचा विकास होण्यासाठी या शहराने मला खूप काही दिलं.

       मानसन्मान, सत्कार, आदर आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ‘नवी ओळख'... जी मी कधीही विसरू शकत नाही. माझ्या कलेची ( हस्ताक्षर आणि  सुलेखन ) पहिली ओळख जनतेला करुन देण्यात पहिला नंबर लागतो तो घणसोलीचे माजी नगरसेवक कै. दीपकजी पाटील यांचा. माझ्यावर विश्वास टाकून पहिलीवहिली ‘हस्ताक्षर स्पर्धा' घेऊन ४५० विद्यार्थ्यांच्या घरोघरी मी पोहोचलो. अर्थात त्याची बातमी ‘नवे शहर'ने प्रसिद्ध करुन माझे नाव नवी मुंबईत सर्वदूर नेले. त्यानंतर मी कधी मागे वळून पाहिलंच नाही.

 लोकांसमोर माझी कला, माझं अक्षर येतच राहिलं. त्यातच नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे ३५ शाळांमध्ये सुंदर ‘हस्ताक्षर कार्यशाळा' आणि ‘हस्ताक्षर प्रदर्शन' भरवण्याची संधी मिळाली. त्याचीही वेळोवेळी दखल ‘नवे शहर'ने घेतली.

      ‘आपले नवे शहर' केवळ छापील  वृत्तपत्र न राहता फेसबुक, यू ट्यूब, इन्स्टाग्राम वगैरे सर्व प्रकारच्या आधुनिक सोशल मिडीयावर घोडदौड चालू झाली आणि वाचकांबरोबर श्रोते आणि प्रेक्षकांचीही  वाढ झाली. अशातच उपसंपादक राजेंद्र घरत यांनी माझी सविस्तर मुलाखत घेऊन ती यू ट्यूबवर प्रसारीत केली. त्यांनी दिलेली ‘अक्षर श्रीमंत' ही उपाधी म्हणजे माझा यथोचित गौरवच ! माझे लेख, माझ्या कविता, माझ्या चारोळ्या, काही विषयांवरील प्रतिक्रिया वगैरे सतत प्रसिद्ध करतानाच ‘आपले नवे शहर'शी माझं आपुलकीचं जिव्हाळ्याचं नातं जोडलं गेलं. आजच्या वर्धापनदिनी केवळ शुभेच्छा देऊन मोकळं होणं मनाला पटत नाही. आयुष्यभर मी स्वतः वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय केल्यामुळे सर्वच वृत्तपत्रांशी माझे संबंध आजही चांगले असून तसाच संबंध ‘आपले नवे शहर' शी असल्याचा आनंद आणि अभिमानही आहे.

       पुनःश्च एकवार मनापासून शुभेच्छा !
  - विलास खंडेराव समेळ, घणसोली, नवी मुंबई 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कामगार दिन आणि भारतीय कामगार : बदलते संदर्भ