स्वतःचा वाचकवर्ग जोपासलेले दैनिक

निरनिराळ्या विषयांवरील लेख, फिचर्स, फोटो, मुलाखती, बातम्या, वृत्तांत  इ. मुळे ‘नवे शहर' वाचनीय होण्यास मदत होते. स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, विविध क्रीडा स्पर्धा शैक्षणिक संस्थांचे उपक्रम, स्वयंसेवी संस्था, सेवाभावी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटना यांच्या कार्याची सुयोग्य दखल घेतली जाते. या सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी घटनांची, प्रसंगांची व्यक्तींची दखल घेण्याने या वृत्तपत्राचा नवी मुंबईतील जनतेशी ऋणानुबंध प्रस्थापित करण्यात ‘आपलं नवे शहर' इतर वर्तमानपत्रांच्या तुलनेने निश्चितपणे यशस्वी झाले आहे असे म्हणता येईल.

नवी मुंबई शहर स्थापनेनंतर १ मे १९९४ या दिवशी आपलं नवे शहर हे एक साप्ताहिक वृत्तपत्र नव्याने सुरू झाले. गेली तीन दशके हे (सध्या दैनिक स्वरूपातील) वृत्तपत्र नवी मुंबईच्या विकासाच्या आणि प्रगतीच्या प्रत्येक टप्प्याचे गुणग्राहक साक्षीदार म्हणून सर्वदूर परिचित आहे.

विशेष म्हणजे ‘आपलं नवे शहर' ने आता आपला स्वतःचा एक वाचक वर्ग निर्माण केला आहे. हा वाचक वर्ग या दैनिकाच्या अनेक वर्षांच्या निःपक्षपाती वाटचालीद्वारे कधी नकळत तर कधी जाणीवेने जोडला गेलेला आहे, जोडला जात आहे. नवे शहर बरोबर अनेक साप्ताहिके त्याकाळी सुरू झाली होती. पण निखळ पत्रकारिता या उद्देशाशी एकनिष्ठता राखणे अनेकदा शक्य होत नाही. दुसरे असे की राजकीय राजाश्रय असेल तर त्यापासून जाणकार वाचक साधारणपणे दुरावतो.

त्या सगळ्या सुरुवातीच्या आव्हानांना तोंड देत संतुलित आणि निखळ पत्रकारितेचे व्रत जपत राहिल्याने आपलं ‘नवे शहर' चं वेगळेपण अधोरेखित झाले आहे. काळाच्या ओघाबरोबर सातत्य आणि दर्जा या दोन बाबतीत या वृत्तपत्राकने कधी तडजोड केल्याचे दिसत नाही. सुरुवातीला नवी मुंबईपुरते सीमित असणारे या वृत्तपत्राचे कार्यक्षेत्र आता रायगड आणि ठाणे जिल्ह्यापर्यंत विस्तारले आहे. तसेच कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथील बातम्यासाठी पुरवणीवजा एक पान दिले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना आपल्या जवळपासच्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्यांतून कळतात.

आज हे ‘आपलं नवे शहर' लोकप्रिय होण्याचं आणखी एक कारण म्हणजे सुजाण वाचकाची बौद्धिक भूक भागविणाऱ्या ताज्या घडामोडी वरील वैचारिक, रास्त भूमिका मांडणारे लेख. उदा. मी आताच वाचलेला सागर तायडे यांनी लिहिलेला ‘बौद्धांची पोरं पुन्हा वाचण्याकडून नाचण्याकडे?' हा विचारप्रवर्तक लेख. अशा प्रकारचे अद्ययावत आणि चांगला आशय देणारे लेख निश्चितच वाचनीय असतात. खासकरून नव्या लेखकांना इथे संधी दिले जाते हीसुद्धा बाब स्वागतार्ह आहे. नव्या लेखकांबरोबरच प्रवीण पुरो, भीमराव गांधले, डॉ.श्रीकृष्ण तुपारे, प्रदीप केळुसकर इ.लेखकांचे कसदार लेखन ‘नवे शहर' मधून वाचायला मिळते. आणखी विशेष म्हणजे वाचकाला प्रतिक्षा असते ती म्हणजे दस्तुरखुद्द उपसंपादक राजेंद्र घरत यांच्या ललित लेखनाची. त्यांचं 'मुशाफिरी' हे सदर आता ‘नवे शहर' ची ‘पहचान' म्हणायला हरकत नाही. त्यातला प्रत्येक लेख व्हाट्‌सअप, फेसबुक किंवा वेबसाईटवर प्रसारित केल्याने असंख्य वाचकांपर्यंत तो पोहोचतो. एवढंच नव्हे, तर त्यावर मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत असलेला आपण पाहतो. स्थानिक स्वरुपाच्या अशा वृत्तपत्रात दर्जेदार लेखन करणारे फार क्वचित सापडतात. विविध नामांकित लेखक स्तंभलेखन करीत आहेत. प्रासंगिक, नैमित्तिक लिखाणाला स्थान दिले जाते. यातूनच वृत्तपत्राची संवेदनशीलता आणि विविध समाज घटकांबद्दल असलेली आस्था आणि बांधिलकी दिसून येते.

साहित्यविषयक घडामोडींच्या बातम्या आवर्जून दिल्या जातात असे माझे निरीक्षण आहे. नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकांचे परीक्षण ‘आपलं नवे शहर' मध्ये येणं हेसुद्धा आता अभिमानस्पद वाटते. अलीकडे राज्यस्तरावरील वृत्तपत्रांमध्ये पुस्तक परीक्षणाची शब्द मर्यादा इतकी आकसली जाते आहे की त्या पुस्तकाचं ना परीक्षण ना परिचय अशी अवस्था झाली आहे. इथे मात्र पुस्तक परीक्षण योग्य रीतीने केलेले वाचायला मिळते. निरनिराळ्या विषयांवरील लेख, फिचर्स, फोटो, मुलाखती इ मुळे नवे शहर वाचनीय होण्यास मदत होते. स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, विविध क्रीडा स्पर्धा शैक्षणिक संस्थांचे उपक्रम, स्वयंसेवी संस्था, सेवाभावी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटना यांच्या कार्याची सुयोग्य दखल घेतली जाते. या सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी घटनांची, प्रसंगांची व्यक्तींची दखल घेण्याने या वृत्तपत्राचा नवी मुंबईतील जनतेशी ऋणानुबंध प्रस्थापित करण्यात ‘आपलं नवे शहर' इतर वर्तमानपत्रांच्या तुलनेने निश्चितपणे यशस्वी झाले आहे असे म्हणता येईल.

बातम्यांबाबत बोलायचं तर बातमी देणाऱ्याला कुठेतरी खात्री असते की आपली बातमी छापून येणारच आणि खरोखरच त्याला ती दुसर्या किंवा तिसऱ्या दिवशी खात्री पटते. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा एखाद्या विचारसरणीला बांधील नसल्याने बातम्या देण्याचा जो मूळ उद्देश आहे तो निकोप राहतो. ‘आपलं नवे शहर' मधील कल्पक आणि वेधक शीर्षकांमुळेसुद्धा बातम्यांची वाचनीयता वाढलेली दिसून येते.

आज हे दैनिक आपल्या स्वरुपात कोणत्याही प्रकारचा साचलेपणा येऊन देता नवनवीन बदल घडवत नवी मुंबईकरांचा एक सच्चा मित्र म्हणून कार्यरत आहे. १५ डिसेंबर २००९ पर्यंत या दैनिकाचे  कार्यालय वाशी प्लाझा येथे होते. त्यानंतर हे कार्यालय वाशी रेल्वे स्थानकाजवळच्या  रियल टेक पार्क येथे  अधिक प्रशस्त जागेत स्थलांतरित झाले. काळाची पावले ओळखत २०२० पासून फेसबुक पेज, युट्यूब, इंस्टाग्राम, टि्‌वटर, वेबसाईट अशा समाजमाध्यमांवरही ‘नवे शहर' सतत सक्रिय राहिले आहे.

कोणतेही वृत्तपत्र हे पैशाच्या जोरावर नव्हे, तर वाचकांच्या पाठबळावर उभे असते. हे पाठबळ मिळवायचे असेल तर वाचकांची सहभाग कसा वाढवता येईल याचा सतत विचार केला जात असतो. या दैनिकाने एक एक अत्यंत स्पृहणीय असा उपक्रम अलीकडे सुरू केला आहे. तो म्हणजे सध्याच्या कोणत्याही ज्वलंत प्रश्नावर प्रतिक्रिया मागवायच्या आणि त्या लेखकाच्या फोटोसह प्रसिद्धीस द्यायच्या. यामुळे समाजात आम जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांविषयी सामान्य वाचकालाही लिहिण्याची संधी मिळते आणि यातूनच पुढे तो वाचक स्वतंत्रपणे लेखनसुद्धा करू शकतो. याचबरोबर वाचक संवाद या सदरात वाचकांच्या प्रतिक्रिया प्रतिसाद छापला जातो. यातूनही अनेक जण ‘नवे शहर'शी जोडले जातात.

अशा तर्हेने ‘नवे शहर' ने तयार केलेला वाचक वर्ग आणि जनमानसात मिळवलेलं एक स्थान यामुळे हे दैनिक लोकप्रिय झाले आहे. ‘आपलं नवे शहर च्या वर्धापन दिनानिमित्त पुढील दमदार वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा !! - डॉ अजित मगदूम, बेलापूर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 आपले नवे शहर वर्धापन दिन आणि मी...