पत्रकारितेचा वसा जपणारे वृत्तपत्र : आपलं नवे शहर
‘आपलं नवे शहर' या वृत्तपत्राचे मुख्य काम आहे ते लोकांना माहिती, बातम्या, लेख आणि मनोरंजनात्मक साहित्य पुरवणे. ज्यामुळे वाचकांना माहिती मिळून त्यांचे ज्ञान वाढवणे आणि त्याचबरोबर त्यांचे मनोरंजनही करणे. ही भूमिका हे वृत्तपत्र योग्यरित्या बजावत आहे. हे वृत्तपत्र सामाजिक, राजकीय, शैक्षणिक समस्यांवर प्रकाश टाकत असल्याने हे वृत्तपत्र लोकांना एकत्र येऊन काम करण्यासाठी प्रेरित करत आहे. ज्यामुळे जनतेत सामुदायिक भावना वाढल्याने येथील जनतेच्या मनात खोल रुतले आहे.
ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा या दरम्यानचे क्षेत्र म्हणजे नवी मुंबई. १९७० साली सरकारने मुंबईची नवीन नागरी वसाहत म्हणून निर्मिती केली. नवी मुंबईतील वाचक अनेक वर्तमानपत्रे वाचतात. मीसुद्धा दिवसाला ४ वर्तमानपत्रे वाचतो. त्याबरोबर सुमारे ७ वर्षे दररोज मी ‘आपलं नवे शहर' हे वर्तमानपत्र वाचत आहे. किंबहुना त्यात स्वतः सुचलेले लेख, तर काही उपसंपादक यांनी सुचवल्याप्रमाणे सध्याच्या परिस्थितीवरील लेख, पुस्तक परीक्षणे, कविता लिहित आहे. तसेच वर्तमान घडामोडीवरील सूचनात्मक सदरातही माझी परखड भूमिका साडेतोडपणे मांडत आहे.
‘आपलं नवे शहर' हे साप्ताहिक १ मे १९९४ रोजी सुरू झाले. तेव्हा फारच कमी साप्ताहिके या नवी मुंबईत होती. त्यात हे साप्ताहिक नवी मुंबईत महत्वाची भूमिका बजावत असल्याने त्याचे नंतर वर्तमानपत्रात रूपांतर झाले. नवी मुंबईसह पनवेल, उरण, ठाणे परिसरासोबतच, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर, मीरा भाईंदर भागातील घडामोडींना हे वृत्तपत्र प्रसिद्धी देते. वैशिष्ट्य म्हणजे आजतागायत हे वृत्तपत्र धूमधडाक्यात कायम जनतेच्या सेवेत रुजू आहे. ‘करोना' सारख्या भीषण दुष्टचक्राच्या काळातसुद्धा हे वृत्तपत्र इमानेइतबारे जनतेची वाचनाची भूक भागवून वाचकाना मार्गदर्शन करण्याचे काम घेतलेल्या वसाप्रमाणे बजावत होते. हे मला जाणवले.
माझ्या करोनाचे दस्तावेज असलेल्या ‘करोनाच्या कविता' या संपादित प्रातिनिधिक कवितासंग्रहावर परीक्षण लिहून या वृत्तपत्राने मोलाचे सहकार्य केले आहे. ते मी विसरू शकत नाही. तसेच माझे अनेक लेख प्रसिद्धी करून माझ्यातील लेखनाची ऊर्मी कायम जागृत ठेवली आहे. त्यामुळे या वर्तमानपत्राविषयी माझ्या मनात चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे.
आठवड्यातून सहा दिवस प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राचे मुख्य काम आहे ते लोकांना माहिती, बातम्या, लेख आणि मनोरंजनात्मक साहित्य पुरवणे. ज्यामुळे वाचकांना माहिती मिळून त्यांचे ज्ञान वाढवणे आणि त्याचबरोबर त्यांचे मनोरंजनही करणे. ही भूमिका हे वृत्तपत्र योग्यरित्या बजावत आहे. हे वृत्तपत्र सामाजिक, राजकीय, शैक्षणिक समस्यांवर प्रकाश टाकत असल्याने हे वृत्तपत्र लोकांना एकत्र येऊन काम करण्यासाठी प्रेरित करत आहे. ज्यामुळे जनतेत सामुदायिक भावना वाढल्याने येथील जनतेच्या मनात खोल रुतले आहे. समाजिक तसेच राजकीय समस्या आपलं नवे शहर वृत्तपत्र जबाबदारीने साडेतोडपणे मांडत आहे. परिसरातील नागरिकांच्या घडामोडीबरोबर इतर प्रादेशिक आणि काही जागतिक घडामोडींच्या विश्लेषणात्मक बातम्या आणि लेख देत विचारांची देवाणघेवाण करण्याचे काम हे वृत्तपत्र सचोटीने करीत आहे.
यात वर्तमान प्रश्न किंवा समस्या देऊन त्यावरव जनतेने आपली वेगवेगळी विचारसरणी आणि मतं मांडण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. ज्यामुळे क्षेत्रातील विविध समस्यांवर भाष्य होऊन लोकांमध्ये चर्चा आणि संवाद वाढतो. तसेच त्या समस्या नगरपालिका, महानगरपालिका आणि सरकार दरबारी पोहचून त्यांचे निराकार होत आहे. माझ्याप्रमाणे बऱ्याच वाचकांनी या सदरात समस्या मांडल्या त्यावर कार्यवाही सुद्धा झालेली माझ्या निदर्शनास आलेली आहे. उदाहरणार्थ पदपथावरील अतिक्रमण यावर लिहिल्यावर त्वरित त्यावर कार्यवाही होऊन अतिक्रमण दूर करण्यात आले आहे. तसेच मराठी भाषा बोलण्याच्या समस्यावर जनतेने लिहिल्यावर सरकारने सर्व व्यवहारात आणि कार्यालयात, बँकांमध्ये मराठी बोलले गेलेच पाहिजे याचे आदेश दिले आहेत. हा या वर्तमानपत्राचा विजय आहे. अशा अनेक समस्या आपलं नवे शहरने मांडल्याने त्या सुटत आहेत. यामुळेच वाचक आणि जनतेतील सामुदायिक भावनांना प्रोत्साहन मिळत आहे.
माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक संपादकीय लेखांबरोबर यातील राजेंद्र घरत यांची मुशाफिरी हे सदर म्हणजे वर्तमानातील समस्या त्या ते ललितबद्धतेने शब्दबद्ध करतात. त्यातून माहिती तर मिळतेच; पण चांगले मनोरंजनही होते. कालांतराने त्यावर वाचकांच्या विचार करण्याजोग्या प्रतिक्रियाही असतात. साप्ताहिक मनोरंजनात्मक साहित्य, जसे की कथा, कविता, विनोद ,चित्रपट विषयक लेख, विभागाविभागांतील घडामोडी, शैक्षणिक वृत्त, राजकीय वार्ता, समाजकारण, कला, क्रीडा, सांस्कृतिक विश्व या साऱ्याला कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता उचित प्रसिध्दी हे वर्तमानपत्र देते. जी आजच्या काळाची गरज आहे.
सामाजिक, राजकीय विश्लेषणात्मक लेख, पुस्तक परीक्षणे, आपले सण आणि महोत्सव यावरील लेख, आरोग्य आणि विज्ञान यावरील मार्गदर्शक लेख आणि विविध माहिती या वर्तमानपत्रात समाविष्ट असल्यामुळे त्यापासून वाचकांना चांगले ज्ञानात्मक खाद्यही मिळते.
साहित्य, संस्कृती आणि कलाविषयक बातम्या फोटोंसह उत्कृष्ठरित्या मांडलेल्या असतात. यातील फोटोंची निवडही यथायोग्य असते. मोठी प्रसिद्ध वर्तमानपत्रे संस्थांच्या होणाऱ्या कार्यक्रमांच्या तसेच झालेल्या कार्यक्रमांच्या बातम्यांना तेवढीशी प्रसिद्धी देत नाहीत, याची मला खंत वाटते. होणाऱ्या आणि होऊन गेलेल्या कार्यक्रमाची माहिती लोकांना आणि संस्थाना प्रसिद्धीसाठी आवश्यक असते. ती इतर वर्तमानपत्रात दिली जातेच असे नाही. पण आपलं नवे शहर वर्तमानपत्र नवी मुंबई , ठाणे, पनवेल, कल्याण, मीरारोड, भाईंदर आणि रायगड येथील बहुतांश कार्यक्रमांना प्रसिद्धी देते. हेच तर जनतेच्या, वाचकांच्या दृष्टीनं महत्त्वाचे असते. ज्यामुळे या वर्तमानपत्राची नाळ सर्व वाचकांशी चांगली जुळली गेली आहे. ती तशीच जुळून राहो आणि ‘आपलं नवे शहर' वर्तमानपत्राची उत्तरोत्तर प्रगती आणि भरभराट होवो ही सदिच्छा ! तसेच ‘आपलं नवे शहर,' चा संपादकीय विभाग, कर्मचारीवर्ग आणि वाचकांनाही ‘आपलं नवे शहर' च्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! - शिवाजी गावडे, ठाणे