महाराष्ट्र दिन चिरावू होवो!
महाराष्ट्र दिन हा दिवस महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी झालेल्या मुंबई राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र दिन हा सामान्यतः परेड आणि राजकीय भाषणे तसेच समारंभांशी संबंधित आहे. तसेच इतर विविध सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा या दिवशी साजरे करतात.
राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ सार भाषांच्या आधारे भारतातील राज्यांसाठी सीमा परिभाषित केल्या गेल्या. या कायद्याचा परिणाम म्हणून जे मुंबई राज्य निर्माण झाले, ते मात्र वेगवेगळ्या मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे मिळून बनले होते. संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई राज्याचे दोन राज्यात विभाजन करण्याच्या चळवळीत आघाडीवर होती; एक भाग जेथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरा भाग जेथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोकणी बोलतात. २५ एप्रिल १९६० रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा, १९६० नुसार या चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती झाली. हा कायदा १ मे १९६० रोजी अंमलात आला.
२१ नोव्हेंबर १९५६ दिवशी पलोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी पलोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, पलोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा.सर्व मराठी बांधवांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
”आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा आहे मातीशी.”
-प्रविण बागडे