काव्यलीला... एक प्रवास
सुनिता बेलोसे यांच्या एकूण वैचारिक बैठकीत एक ममत्व आहे. तेंव्हा आपलेपणा होता तो आजही जाणवला. फार कठीण असे शब्द न वापरता आत्मिक, वैचारिक, बुद्धी मत्ता आणि सकस असे काव्य त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून ‘काव्यलीला' या कवितासंग्रहाद्वारे व्यक्त केले आहे. सुनीता बेलोसे या मुळात गणित आणि विज्ञानाच्या शिक्षिका. मात्र त्यांच्यातले कविमन कायम कवितेच्या माध्यमातून व्यक्त होण्यास प्रवृत्त करत असावे.
सुनिता बेलोसे रचित ‘काव्यलीला' या मराठी कवितेच्या १०२ पानी पुस्तकाचे दापोलीत वराडकर-बेलोसे सांस्कृतिक सभागृहात अलिकडेच प्रकाशन झाले. या इव्हेंटला माय कोकण या साप्ताहिकाचे संपादक मुश्ताक खान यांची विशेष उपस्थिती होती. कारण या काव्य संग्रहाचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मंचावर अर्थातच कवयित्री सुनीता ताई उपस्थित होत्या.
कॉलेजचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात अतिशय तरल असे अनुभव कथन केले. उत्तम पाटील यांनी व्यक्त केलेले विचार पुस्तकास अनुसरून होते, ते पुस्तक पूर्ण वाचल्यानंतर ध्यानी आले. कविता वाचायला वेळ लागत नाही, त्या समजून घ्यायला वेळ लागतो. शांता सहस्त्रबुद्धे, रेणू दांडेकर, प्रा.गंधे सर मी स्वतःअसा त्याकाळी एक साहित्यिक चमू तयार झाला होता. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून. त्यावेळी सुनीता ताई कोमसापच्या साहित्यिक बैठकीत हजर रहायच्या. जमल्यास काव्य सादर करायच्या. दापोली येथील मुकबधीर शाळेच्या एका वर्गात भारतीय आसनावर बैठक जमायची.
बेलोसे मॅडम यांच्या एकूण वैचारिक बैठकीत एक ममत्व आहे. तेंव्हा आपलेपणा होता तो आजही जाणवला. फार कठीण असे शब्द न वापरता आत्मिक, वैचारिक, बुद्धी मत्ता आणि सकस असे काव्य त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. ते सतत वाचावे, असे आहे. संगीतकार गोखले सर यांनी तर भर कार्यक्रमात तत्काळ चार कवितानां सहज चाली लावल्या आणि आपल्या श्रवणीय स्वरात श्रोत्यांसमोर काही निवडक कविता सादर केल्या. त्यामुळे कार्यक्रमाचा एकूणच स्तर वाढला. गेय काव्यात श्रोते लीन झालेले दिसले.बेलोसे मॅडम यांचे मनोगत ऐकण्या सारखे होते. त्यांचे हे पुस्तक त्यामानाने थोडे उशिराच आले. पण मॅडम या बेलोसे घराण्यातील व्यक्ती असल्याने, शिवाय शिक्षकी पेशा स्वीकारल्याने त्यांची एकूणच आकलनक्षमता खूप सशक्त आहे. मुश्ताक खान खरंतर मॅडम यांचे विद्यार्थी! असं असूनही मॅडम यांनी आपल्या विद्यार्थ्यांस साजेशा खुर्चीवर स्थानापन्न केले! हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. त्यांचे अनेक विद्यार्थी आजही बेलोसे मॅडम यांनी आम्हास घडवले...असे स्पष्ट सांगतात. त्यांत माझा मुलगा कामरान मुकादम हाही एक आहे. जो आज ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत आहे.
वेळात वेळ काढून काव्यलीला या पुस्तकास शुभेच्छा देण्यासाठी म्हणूंन माझे मित्र डॉ.अशोक निर्बाण, आणि दीपक सुर्यवंशी हे दोघेही जाणकारानी कार्यक्रमाचा शेवटपर्यंत आनंद घेतला. जुने जाणकार शिक्षक चिंदे सर आणि देवकाते सर हे आवर्जून उपस्थित होते.
वराडकर-बेलोसे कॉलेजमध्ये साहित्यिक कार्यक्रमात मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. सुमारे पस्तीस वर्षांनंतर हा योग बेलोसे मॅडम यांच्या पुस्तकामुळे जुळून आला. शिवाय ह्याच कॉलेजातून पदवीधर झालेले स्थानिक कविराज पांडुरंग जाधवांनी मला त्याच कॉलेजात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. तो दिवस आठवला.
काव्यलीला हा काव्यसंग्रह खरंच वाचनीय आहे. सुनीता बेलोसे या मुळात गणित आणि विज्ञानाच्या शिक्षिका. मात्र त्यांच्यातले कविमन कायम कवितेच्या माध्यमातून व्यक्त होण्यास प्रवृत्त करत असावे, म्हणुनच त्यांनी पुस्तकातील आपली आवडती एक कविता सादर केली, जी मी येथे इतर सर्व वाचकांना शेर करत आहे.
सुख
सुख ते कसे असते?
सुख मोरपिसासारखे असते
हळुवार स्पर्श करते
आणि अलगद पूढे सरकते
सुख ते कसे असते!
सुख ते गुलाबासारखे असते,
जणू काट्यातच जन्म घेते
पण राजा म्हणून मिरवते
सुख ते कसे असते?
सुख लहान बाळासारखे असते,
हसता हसता ते रडते,
आणि रडता रडता ते झोपी जाते
सुख ते कसे असते?
जणू ते फुलपाखरासारखे असते
क्षणासाठीच ते विसावते,
पकडताना हळूच निसटते
अशा या प्रतिभावंत कवयित्री ज्यांच्या मनी वसलेले प्रगल्भ वैचारिक भावविश्व त्यांनी आपल्या या पुस्तकीं व्यक्त केले आहे. ज्याची दखल सर्व मराठी काव्यरसिकांनी अवश्य घ्यावी. काव्यलीला मुळे त्यांचा साहित्यिक प्रवास सुरु झाला आहे, पुढे त्या यशवंत होवोत असे शुभ चिंतीतो आणि थांबतो. - इक्बाल शर्फ मुकादम