जर्मनी : युरोपचे हृदय
लहानपणी मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते की मी जर्मनीला जाऊन येईल. ब्रह्मदेवाने येऊन सांगितले असते की तुमचा परदेशात जाण्याचा योग आहे तेव्हाही मला ते पटले नसते. कारण परिस्थितीच तशी होती. पण आयुष्य ही योगायोगाची मालिका आहे असे म्हणतात ना! त्याप्रमाणे मला जर्मनीला जाण्याचा योग आला.
जगाच्या नकाशात प्रगत व विकसनशील म्हणून जर्मन देशाची केलेली गणना मी शालेय जीवनात अभ्यासली होती. त्यावेळी मला जर्मनीबद्दल खूपच अप्रूप वाटायचे. कारण त्यावेळी भारत देश हा आजच्या इतका प्रगत झालेला नव्हता. त्यामुळे जर्मनीबद्दल विशेष आकर्षण वाटले. येथील शिक्षण फुकट असून बालवाडीत मुलांना प्रोटीनयुक्त नाश्ता दिला जातो. तणावमुक्त वातावरणात या छोट्या मुलांचा विकास होतो. अभ्यास हा शब्द अस्तित्वात नाही. मुलांच्या वाढदिवशी त्यांना बरोबर घेऊन केक बनवून साजरा करतात. बर्ड डे कॅप दिली जाते. डान्स करुन केक कापून मुलांना आनंद देतात.
लहानपणी मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते की मी जर्मनीला जाऊन येईल. ब्रह्मदेवाने येऊन सांगितले असते की तुमचा परदेशात जाण्याचा योग आहे तेव्हाही मला ते पटले नसते. कारण परिस्थितीच तशी होती. पण आयुष्य ही योगायोगाची मालिका आहे असे म्हणतात ना! त्याप्रमाणे मला जर्मनीला जाण्याचा योग आला. जाण्याचे निश्चित झाल्यावर माझ्यावर दडपण आले. त्या देशाची जर्मनी भाषा अनिवार्य असल्यामुळे मनाला हुरहुर लागली होती. माझ्या मुलीला (अमृताला) तेथे मिळालेल्या प्रोजेक्टमुळे तिथे जायला मिळाले. आयुष्यातला पहिल्यांदा एवढा दूरचा प्रवाास तोपण एकटीने करण्याचे धाडस केले. अमृताने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन तसेच मार्गदर्शन झाल्यामुळे मी जर्मनीत पहिले पाऊल ठेवले तेव्हा मला स्वतःला आकाश ठेंगणे वाटले. एखादा गड जिंकावा इतका आनंद झाला आणि तोच क्षण माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय ठरला. म्युनिच विमानतळावर आले तेव्हा ते भव्यदिव्य पाहून खूप खुश झाले.
निसर्गाने जर्मनीला सौंदर्य बहाल केले आहे. बदलत्या हवामानानुसार इथली झाडे हिरवी, पिवळी, केशरी, गुलाबी रंगात पाहताना खूप मजा वाटते. तसेच आकाशसुध्दा कागदावर चित्र काढावे तसेच हुबेहुब दिसून येते. एखादा चित्रकार येऊन चित्र काढून गेला असे वाटते.
जर्मनीला युरोपचे हृदय म्हटले जाते. जर्मनीतले लोक हे गोरेपान, सोनेरी केस, उंच सडसडीत बांध्याचे असतात. नियमांचे कायदेशीररित्या पालन करणारे शिस्तप्रिय असतात. धावपळ न करता शांततेने जीवन जगत असतात. स्वच्छता तर त्यांच्या लहानपणापासून भिनलेली असते. त्यामुळे रस्त्यात कोठेही कचरा दिसणार नाही. ठराविक जागेत कचऱ्याचे निर्मुलन केले जाऊन साफसफाई केली जाते. प्रदूषण नसल्यामुळे लोकांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. थंड हवेच्या वातावरणामुळे कधी-कधी सर्दी झाली तरी येथील डॉक्टर अँटिबायोटिक (गोळ्या) न देता नळाद्वारे थेट येणारे गरम पाणी प्यायला सांगतात. इतके येथील पाणी शुद्ध असते.
येथे ‘ऑक्टोबर फेस्टिवल' दणक्यात साजरा होतो. या दिवशी मिळणारी ‘बिअर' ही खास असल्यामुळे ती पिण्यासाठी दूरदूरच्या देशातून लोकांची गर्दी होते. जणूकाही आपल्याकडील जत्रेचे स्वरुप येते. मनसोक्तपणे पर्यटक बिअरचा आस्वाद घेताना दिसतात. जर्मनीची बहुतेक लोकसंख्या ही ख्रिश्चन असल्यामुळे येथे ख्रिसमस साजरा केला जातो. हिरवागार ट्री, त्यावर गडद चमचमणाऱ्या दिव्यांची रोषणाई आणि वरती स्टार, घंटा, चांदणी असा सुशोभित केलेला ख्रिसमस ट्री हे ह्या सणाचे आकर्षण केंद्रबिंदू ठरते. भारतातपण हा सण तितक्याच उत्साहाने साजरा करतात. विशेषतः लहान मुलांना ह्या सणाबद्दल खूप कुतूहल असते किंवा त्यांचा उत्साह दांडगा असतो. कारण त्यांचा आवडता सांताक्लॉज त्यांच्यासाठी खास भेटवस्तू आणतो. ख्रिश्चन धर्मानुसार या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्याला देवाचा अवतार मानतात. त्यांनी जगाला एकता, बंधुताची शिकवण दिली आणि लोकांना देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग दाखवला. तसेच त्यांनी प्रेम व क्षमा करण्याचा संदेश दिला. या दिवशी लोक आपली घरे ख्रिसमस ट्रीने सजवतात. चॉकलेट व केकचे विविध प्रकार करुन त्याला हार्टचा (हृदय) आकार देऊन त्यावर संदेश लिहून भेट देतात.
ख्रिसमसचा शब्दशः खरा अर्थ आहे की, काडस्टस मास म्हणजेच येशूच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामुहिक प्रार्थना. या सणानिमित्त २४ डिसेंबरच्या रात्रीपासून प्रार्थनेला सुरुवात केली जाते. २५ डिसेंबरला येशूचा जन्मदिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो. येशू हे ईश्वराचे पुत्र आहेत अशी त्यांची श्रध्दा असल्यामुळे चर्चमध्ये जाऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. विशेष म्हणजे ख्रिसमस ट्री हे शुभतेचे प्रतिक मानले जाते. ख्रिसमसच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जेणेकरून सर्व लोक एकत्र यावे ही त्यांची (उद्देश) भावना असते. ख्रिसमसच्या चार दिवसात सर्व दुकाने बंद ठेवतात. जर्मन लोक या दिवसात जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाबरोबर घालवतात. नातेवाईक, मित्रांच्या गाठीभेटी अथवा सामुहिक मिलन, एकत्रित जेवण, असे या सणाचे स्वरुप असते. या काळात जर्मनीत हिवाळा व सुगीचा काळ असल्याने परदेशात पर्यटन करतात. ख्रिसमसच्या दिवसात ख्रिसमस मार्केट विविध प्रकारच्या वस्तूंनी फुलून येते. सुशोभित केलेले मार्केट बघण्यासाठी लोकांची गर्दी होते. त्या मार्केटमध्ये शाळेतील मुलांनी स्वतः सजवून तयार केलेले ख्रिसमस ट्री बघताच त्यांच्या कलात्मकतेचे कौतुक वाटते. तसेच येथे वाईनचे विविध प्रकार मिळतात. त्यातल्या त्यात ब्लू वाईनच बहुतेकजण घेतात. प्रत्येक कपचे डिपॉझिट द्यावे लागते. खाद्यपदार्थाच्या वेगवेगळ्या डिश मिळतात. त्या सुंदर सजवलेल्या असतात. रेस हा एक करमणुकीचा प्रकार पहायला मिळतो तेव्हा इतकी गर्दी होते की हे राजेशाही जर्मन लोक खाली बसून त्याचा आनंद घेत असतात. ख्रिसमस मार्केट दर शुकवार, शनिवार आणि रविवारी भरते. वेळेची मर्यादा असल्यामुळे ते रात्री ९ वाजता बंद करतात. लोकांना कोणताही त्रास होऊ नये असा त्यामागील उद्देश असतो. कारण या लोकांना शांतता खूप आवडते. कोणत्याही प्रकारचा गोंगाट, गोंधळ, गडबड इथे दिसून येणार नाही. जर्मन लोकांचा देशाबद्दल असलेला अभिमान हा त्यांच्या वागण्यात, आचरणात दिसून येतो. ख्रिसमसच्या उत्साहात सर्वात मोठी वार्षिक उलाढाल होते. ख्रिसमस हा २४ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत साजरा होत असतो. नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करतात. भारतासारखे इतर देशातील लोकांना पण जर्मनीचे आकर्षण वाटते.
ख्रिसमस ट्री प्रमाणे आपल्या सर्वांच्या जीवनात प्रफुल्लता, उत्साह व ताऱ्याप्रमाणे आयुष्य चमकत राहो. -लीना बल्लाळ