राम गावा राम ध्यावा। राम जीवींचा विसावा
नामात भगवंत स्थित असल्यामुळे तिथे आनंदाशिवाय दुसरे काही नाहीच. जिथे चिदानंदरूप भगवंत वास करतात तिथे कोणत्याही प्रकारचे दुःख, शोक,संताप, ताप, शंका, कुशंका कशालाही थारा नसतो. जसे, जिथे सूर्यप्रकाश असतो तिथे अंधारसंभवत नाही. प्रकाशाच्या केवळ अस्तित्वाने अंधाराचा लोप होतो. त्याचप्रमाणे जिथे नाम आहे तिथे भगवंताचे अस्तित्व असल्याने दुःख-शोकाचा लोप होतो.
मुखी राम विश्राम तेथेचि आहे।
सदानंद आनंद सेऊनि राहे।
तयावीण तो सीण संदेहकारी।
निजधाम हे नाम शोकापहारी । श्रीराम ८६।
रामाच्या स्मरणात विश्राम आहे. भल्या भल्या योग्यांना रामनामात आराम वाटतो. अगदी भगवान शंकर ही त्यासाठीरामाचे स्मरण करतात. ‘राम' या दोन अक्षरांत अशी काही विलक्षण जादू आहे. ज्यामुळे त्याचा उच्चार केला किंवा केवळ स्मरण केले तरी जीवाला शांत, निश्चिंत वाटते. अनेकांचा लहानपणीचा हा अनुभव असेल की मोठी माणसे आपल्यालासांगत , "भूताची भीती वाटली की राम राम राम राम म्हणा. मग भूते काही करत नाहीत.” त्या वयात खरे तर ना भुताची काही ओळख होती ना रामाची. मोठ्या माणसांचे ऐकायचे असते एवढेच माहित होते.
आताही तेच करायचे आहे. तपस्वी साक्षात्कारी महापुरूषांनी सिद्ध केले आहे की भगवंत त्याच्या नामात राहतो. नाम आणि नामी यांचा अभेद आहे. त्याबद्दल शंका, संदेह घेण्याचे कारण नाही हे समर्थांसारखा स्वानुभवी महात्मा आपल्याला सांगत आहे. परमात्म्याच्या ठिकाणी केवळ आनंद आहे कारण तिथे संपूर्ण अभेद आहे. त्या आनंदस्वरूपातून सर्व चराचराची निर्मिती झाली. जरी देहाच्या उपाधीने खंडित भासले तरी प्रत्येक जीवात अखंड, आनंदस्वरूप परमतत्व आहेच आहे. मात्र अज्ञानाच्या आवरणामुळे भेदाचा अनुभव येतो. भेदामुळे "मी-तूपण” येते. ही द्वैतभावनाच दुःखाचे मूळ आहे. असमाधानाचे कारण आहे. असे असले तरी माणसाला आपल्या आनंदस्वरूपाची स्वाभाविक ओढ आहे. म्हणूनच तो सतत दुःख समाप्ती आणि आनंद प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो. पण त्याच्या प्रयत्नांची दिशा चुकते. तो आनंदाचा शोध घेत हिंडतो ते दुःखरूप संसारात. कृपावंत करुणाकर संत-सज्जन सद्गुरू परोपरीने सांगत आले आहेत की हा संसार भयंकर आहे. त्याचे भय घालवायचे असेल तर भगवंताचे नाम सतत घेत रहा. संसार तापदायक आहे,
दुःखदायक आहे. तिथे जेवढे गुंतावे तो सगळा व्यर्थ शीण आहे. पण भगवंताचे नाम मात्र जीवाला शांत करणारेआहे. आराम देणारे आहे. आनंददायक आहे. या ज्ञानी, श्रेष्ठ महात्म्यांच्या उपदेशानुसार नामावर विश्वास ठेवून नित्यनामस्मरणाची सवय केली तर नक्कीच स्वानंदाचा अनुभव येईल. स्वानंद किंवा सदानंद हा स्वतःमध्येच असतो. इतर कोणावरही, कशावरही अवलंबून नसतो. जिथे नामाचे स्फुरण होते तेच स्वानंदाचे स्थान आहे. जो नित्य नामातराहतो तो नित्य आनंदाचे सेवन करत राहतो. कारण नामात भगवंत स्थित असल्याने तिथे आनंदाशिवाय दुसरे काही नाहीच. जिथे चिदानंदरूप भगवंत वास करतात, तिथे कोणत्याही प्रकारचे दुःख, शोक, संताप, ताप, शंका, कुशंकाकशालाही थारा नसतो. जसे, जिथे सूर्यप्रकाश असतो तिथे अंधार संभवत नाही. प्रकाशाच्या केवळ अस्तित्वाने अंधाराचा लोप होतो. त्याचप्रमाणे जिथे नाम आहे तिथे भगवंताचे अस्तित्व असल्याने दुःख-शोकाचा लोप होतो. एखाद्या अप्रिय घटनेचे माणसाला दुःख होते. पण त्या दुःखाचे पुन्हा पुन्हा स्मरण करण्याने शोक निर्माण होतो.त्याने समाधान भंगते. मन व्याकूळ होते. संतप्त होते. विचारांच्या भोवऱ्यात फिरून फिरून थकून जाते. हा शोक संपवण्याचा उपाय आहे तो म्हणजे दुःखाचे स्मरण थांबवणे. ते थांबवण्याचा उपाय आहे आनंददायक भगवद्नामाचे स्मरण करणे. समर्थ म्हणतात भगवंताचे निजधाम म्हणजे त्याचे स्वतःचे हक्काचे स्थान असलेले त्याचे नाम घ्या. ते शोकाचे हरण करून मनाला पूर्ण विश्रांती देते. ज्या नामात तपस्वी, योगी, सिध्द सारे रमतात, त्या रामनामाचा उच्चार केल्याने भवभय संपते, मन निःशंक होते, निश्चिंत होते आणि विसावते.
जय जय रघुवीर समर्थ
-आसावरी भोईर