असाही एक ‘धर्म'वीर...
मी माझ्या भारजगाव येथून लातूरकडे येताना एक स्लीपर पायात घेऊन एका ऑटो रिक्षामध्ये सगळा पसारा भरून आलो होतो. गरिबी काय असते, ती किती सूड घेते, आपल्याला जर कोणी दहा रुपयाची मदत केली, तर ती मदत किती मोठी असते, याची जाण मला खूप मोठ्या प्रमाणावर होती. या जाणिवेला संस्कारांची झालर लागली. माझं काम खूप गतीने वाढवत मी अनेकांना प्रचंड मदत केल्यामुळे निसर्गानेही मला भरभरून दिले...कसे वाढत जाते सामाजिक बांधिलकीचे काम...वाचाच!
सकाळी लवकर मीटिंगला सुरुवात करता येईल याच बेताने रात्री उशीरा मी खारघरवरून पुण्याला निघालो. खारघरवरून मुख्य रस्त्याला लागल्यावर दोन पोलिसांनी माझी गाडी अडवली. गाडीची काच केल्यावर समोर उभे असलेले पोलीस म्हणाले, ‘साहेब, हे माझे दोन पोलीस सहकारी आहेत. त्यांना पुण्याला जायचे आहे. आम्ही खूप वेळेपासून गाडीची वाट पाहतोय, पण त्यांना गाडी मिळत नाही. कृपया, त्यांना तुमच्यासोबत घ्या ना'. मी त्या दोन्ही महिला पोलिसांकडे पहिले आणि गाडीत बसा' असा त्यांना इशारा केला. माझा पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला. त्या पोलीस अधिकारी महिला कोण आहेत? त्या कुठे जात आहेत? असे आमचे बोलणे सुरु झाले.
मी ज्या मुलींशी बोलत होतो, त्यामध्ये एक अनिता गिरी आणि दुसरी रंजना गोसावी. दोघीही मुंबई पोलिसांत पी. एस. आय. आहेत. रंजना हिंगोलीची तर अनिता यवतमाळची आहे. रंजनाचे वडील शेतकरी व अनिताचे वडील पूजाअर्चा करतात. दोन वेळेस कुटुंब समाधानाने खाऊ शकेल, इतकीच काय ती त्या दोघींच्या वडलांची कमाई होती. अशा परिस्थितीत मुलींना शिकवायचं, त्यांना मोठं स्वप्न दाखवायचं याचा तसा काही संबंध नव्हता. रंजनाला शाळेतल्या गुरुजींकडून आणि अनिताला तिच्या नातेवाईक मैत्रिणींकडून, पुण्यात एक व्यक्ती आणि त्याची संस्था हुशार आणि होतकरू मुलींना-गरजूंच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी, प्रोफेशनल शिक्षणासाठी मदत करते', अशी माहिती मिळाली. त्या व्यक्तीला भेटण्यासाठी दोघींचेही वडील गेल्यावर त्यांना खात्री पटली की ही संस्था, ही व्यक्ती खरंच आमच्या मुलीला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मदत करेल.
दहावीनंतरच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी, त्यानंतर पोलीस प्रशिक्षणासंदर्भातले सर्व शुल्क, नोकरीला लागेपर्यंत सर्व खर्च संबंधित व्यक्ती आणि संस्थेने केला. त्या दोघीजणीही अधिकारी झाल्या. त्या दोघीजणींनी ठरवलं होतं की, आपलं मागचं देणं जेव्हा संपेल तेव्हा, निश्चितपणे काही रक्कम जमा करुन ती, ज्या व्यक्तीने, संस्थेने आपल्याला उभे राहण्यासाठी मदत केली त्या, व्यक्तीला आणि संस्थेला द्यायची.
आज तीच रक्कम देण्यासाठी या दोन्ही मुली त्यांना मदत केलेल्या व्यवतीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुण्याला निघालेल्या आहेत. पनवेलपासून पुणे येईपर्यंत आमच्या त्या व्यक्ती व त्या संस्थेविषयी गप्पा सुरू होत्या. केवळ ह्या दोघी जणीच नाही, तर यांच्या संपर्कामध्ये ज्या ज्या मुली आल्या, त्या सगळ्या मुलींना या संस्थेने उभं केलं. मी चकित होऊन विचार करीत होतो की, स्वार्थाने बरबटलेल्या या काळात अशी कुणीतरी व्यक्ती अशा मुलींना इतक्या मोठ्या स्वरूपावर मदत करते, त्यांच्या मदतीवर एक पिढी पुढे जाते, कित्येकांचा तो आधार बनतो. निश्चितच त्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा त्या दोन्ही अधिकारी मुलींकडे मी व्यक्त केली. ‘उद्या सकाळी आम्ही पुण्यात त्यांना भेटण्यासाठी जात आहोत. तुम्हाला यायचं असेल तर आमच्यासोबत निश्चित या', असे रंजना मला म्हणाली. त्या व्यक्तीला कुठे, किती वाजता भेटायचं हे आमचं ठरलं. ठरल्याप्रमाणे मी त्या व्यक्तीच्या कार्यालयामध्ये पोहोचलो. बाहेर पुस्तकाने भरलेले टेम्पो, वह्या, असे शालेय साहित्य मला दिसत होते. एक टेम्पो जळगावला, एक टेम्पो नाशिकला, एक टेम्पो नागपूरला जात होता. मी बाहेर उभ्या असलेल्या वॉचमनला विचारलं, हा माल कुठे चाललाय?' त्यांनी मला सांगितलं, ‘ज्या ज्या भागांतून शालेय साहित्याची मागणी आली, त्या भागांत आज हे साहित्य जात आहे'. तो शालेय साहित्य वाटपाचा विषय माझ्या कल्पनेच्या बाहेर होता. रंजना तिथे आल्या. आम्ही दोघेजण त्या व्यक्तीच्या कार्यालयात गेलो. माझ्या लक्षात आलं की, हे कार्यालय कोणीतरी मोठ्या व्यावसायिकाचं आहे. रंजना आल्याचे पाहून त्या व्यक्तीला खूप आनंद झाला. अगदी भावुक होऊन रंजनाने त्या व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवलं. रंजनाने तिच्या हातातला बॉक्स त्या व्यक्तीला दिला. तो व्यक्ती म्हणाला, हे काय आहे?' त्यावर रंजना म्हणाली, ‘दादा, तुम्ही जे काही आम्हाला दिलं होतं, त्यातलं थोडंसं परत करून त्या माध्यमातून इतरांना कुणाला तरी मदत व्हावी, अशी माझी छोटीशी भावना होती'. तिचे बोलणे एकूण त्या व्यक्तीने मंद स्मित केले. ‘नाही, नको बेटा' म्हणत त्या व्यक्तीने अगदी नम्रपणे ती मदत नाकारली. ते रंजनाला म्हणाले, ‘मी माझं काम केलं. ते अजूनही करतोय. देवाच्या कृपेनं माझ्याकडं सगळं काही आहे. तुम्ही माझा चालवत असलेला वारसा तुमच्या स्वतःच्या संपर्कात आलेल्या गरजूंच्या माध्यमातून पुढे चालवा'. रंजना आग्रह करत होती, पण ‘ती' व्यक्ती काही ऐकायला तयार नव्हती.
आम्ही बसलो. रंजनाने माझी त्या व्यक्तीसोबत ओळख करून दिली. आमच्या गप्पांतून त्यांचा छान परिचय झाला. काही वेळाने अनिता आली आणि अजून आमच्या गप्पामध्ये रंगत आली. एक माणूस आपल्या समाजासाठी, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी, ज्याला मदतीची आवश्यकता आहे त्याला, का आणि कशी मदत करू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. आपला जन्म देण्यासाठी झालेला आहे. आपण जर इतरांना दिलं, तर निसर्गही आपल्याला भरभरून देईल. हीच भावना मनात ठेवून, त्या व्यक्तीने त्या संस्थेच्या, त्या कामाच्या माध्यमातून राज्यातील हजारो मुलं कामाला लागली होती. त्यात हजारो मुलांनी इतर अनेकांना मदत करून त्या व्यक्तीचा वारसा पुढे चालवला होता. मी ज्या व्यक्तीशी बोलत होतो त्यांचं नाव धर्मवीर भारती सर (९५४५५५११११). ते मूळचे अंबाजोगाईचे. आता पुण्यात स्थायिक झाले आहेत. लातूर, सोलापूर, संभाजीनगर अशा अनेक शहरांमध्ये वास्तव्यास राहिलेल्या धर्मवीर यांचा जन्म संस्कारी घरात झाला. युवराज भारती हे धर्मवीर भारती यांचे वडील. धर्मवीर यांची आई भागीरथी यांचे वडील वैद्य नागेश गिरी हे मोठे कीर्तनकार होते. अशा समृद्ध संस्कृतीने नटलेल्या घरात जन्म घेऊन वाढलेल्या धर्मवीर यांच्यावर अर्थातच सेवाभावाचे संस्कारपण झाले होते. आपल्या दोन्ही आजोबांचा आणि वडिलांचा सामाजिक सेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी धर्मवीर यांनी ‘निश्चलपुरी फाउंडेशन', ‘भारती फाउंडेशन' नावाने दोन संस्था सुरू केल्या.
निश्चलपुरी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षांपासून धर्मवीर आणि त्यांच्या टीमने राज्यभरातल्या गरजूंसाठी प्रचंड मोठं काम केलं. धर्मवीर यांच्या पत्नी सुरेखा भारती यांनी महिलांसाठी राज्यभर उपक्रम सुरू केले. महिलांचे संघटन, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय, शासनाच्या योजनांच्या आधारे महिलांना सशक्तिकरणाचे धडे देण्याचे काम धर्मवीर यांच्या पत्नी सुरेखा यांनी केलं होतं. धर्मवीर म्हणाले, ‘शिक्षण, आरोग्य आणि लग्नासारखे विषय आम्ही मार्गी लावतो. अलीकडेच एच. आय. व्ही. बाधित असलेल्या राज्यातील दीडशेहून अधिक मुलांना आम्ही उभे राहण्यासाठी मदत केली. एच. आय. व्ही. सोबत मी राज्यभरात अजून दोन महत्त्वाचे विषय हाती घेतले. एक अनाथ बालकांचा, आणि दुसरा विषय होता विधवा महिलांचा. या दोघांनाही मदतीचा हात मिळावा, त्यांनी आयुष्यात ताठ उभे राहावे, या उद्देशाने आम्ही टीमच्या माध्यमातून त्यांचा राज्यभरात सर्वे पूर्ण केल्यावर एक गोष्ट लक्षात आली, की अनेक गरजू, प्रचंड हुशार विद्यार्थी आहेत, पण त्यांच्या पाठीमागे कोणीही नाही. त्यांच्यावर अनाथाचा शिक्का असल्यामुळे ते जागेवरच बसून आहेत. रूढी-परंपरांमुळे वयाच्या तिशीच्या आतच अनेक विधवा महिलांचे आयुष्य संपून गेले. त्यांना उभे करण्याच्या अनुषंगाने, या अनाथ मुलांना मदत करण्याच्या अनुषंगाने आम्ही मागच्या पाच वर्षांमध्ये कृती कार्यक्रम आखला. त्यातून शेकडो जणांना आधार मिळाला.
आमची चर्चा सुरू असताना रंजना मध्येच म्हणाली, दादा, ‘तुम्ही परदेशात मुलं शिक्षणासाठी पाठवली. त्यांच्याबद्दलही सांगा'. धर्मवीर हसले आणि म्हणाले ‘अहो, आपण जे जे चांगलं काम करतोय, ते मी केलं असं कधी सांगायचं नाही. त्यामुळे नैसर्गिक बरकत थांबत असते'. आमच्या गप्पा सुरू असताना एक व्यक्ती येऊन धर्मवीर यांच्या बाजूला बसल्यावर धर्मवीर त्या व्यक्तीची ओळख करून देताना म्हणाले, ‘हे माझे सहकारी मित्र अनिल पुरी. खरं तर माझं सामाजिक काम हेच करतात. माझी सामाजिक चळवळ देताना म्हणाले, ‘हे माझे सहकारी मित्र अनिल पुरी. खरं तर माझं सामाजिक काम हेच करतात. माझी सामाजिक चळवळ हेच चालवतात, मी काय, दुरून सगळं पाहतो आणि जसं जमलं तसं योगदान देतो'. मी ज्या पुरी नावाच्या व्यक्तीशी बोलत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, आजही गोसावी समाजाचे राज्यात प्रचंड हाल आहेत. पारधी, आदिवासी अशा अनेक समाजांकडे तो विकसित व्हावा यासाठी खूप प्रयत्न झालेत. पण अठरापगड जातीचा कणा असलेला गोसावी समाज सामाजिक सुधारणेपासून खूपच लांब आहे. त्यामुळेच या समाजाचे मोठे नुकसान झालेले आहे', असं पुरी मला सांगत होते. हा समाज पुढे जावा, त्यातून एक चांगली पिढी समोर यावी, यासाठी पुरी यांनी ‘निश्चल फाउंडेशन' आणि ‘भारती फाउंडेशन'च्या माध्यमातून सुरू केलेले प्रचंड मोठे उपक्रम माझ्यासमोर ठेवले. सामूहिक विवाहापासून ते राज्यातल्या कानाकोपऱ्यांत शालेय साहित्य पोहोचविण्यापर्यंत, विधवांच्या पुनर्विवाहापासून ते मुलं परदेशात शिक्षणासाठी पाठवण्यापर्यंत, काय काय उपक्रम ते घेतात त्याविषयी ते मला सांगत होते. आमचं बोलणं सुरू असताना धर्मवीर यांनी बाहेर डोकावत बाहेरच्या शिपायाला सांगितलं, ‘बाहेर बसलेल्या माणसाला आणि त्या मुलाला आत पाठवून द्या'. तो माणूस आणि मुलगा समोर येऊन बसला. तो माणूस म्हणाला, ‘दादा, मी सोलापूरहून आलोय. सुधीर मठपती असं माझं नाव आहे. माझा मुलगा आता एमबीबीएसला जाणार आहे. सुरुवातीला त्याच्या फीसच्या बाबतीत काही मदत झाली, तर बरे झाले असते. मी टप्प्याटप्प्याने घेतलेली रक्कम परत दिली असती'. धर्मवीर यांनी अगदी शांतपणे त्या व्यक्तीचे प्रकरण नेमके काय आहे समजून घेतले. त्यानंतर त्या व्यक्तीला कशा स्वरूपात ते मदत करू शकतात हेही सांगितले. ऑफिसमध्ये धर्मवीर यांच्या टीममध्ये असलेल्या व्यक्तीकडे त्यांनी ते प्रकरण दिलं. त्या व्यक्तीला धर्मवीर यांनी सांगितलं, की ‘येत्या चार दिवसांमध्ये या व्यक्तीला मदत झाली पाहिजे'. मी धर्मवीर यांना विचारले, 'असे मदतीसाठी तुमच्याकडे अनेक लोक येत असतील. त्यातून तुम्ही खरे गरजू निवडता कसे?' धर्मवीर म्हणाले, ‘मदतीची मागणी आल्यावर तो खरच किती गरजवंत आहे हे आम्ही शोधतो. चांगुलपणाची खात्री झाल्यावर मात्र त्याला मदतीचा आधार देण्याचे काम आम्ही निश्चितपणे करतो'.
आलेल्या काही लोकांना धर्मवीर भेटत होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत होते. कोणी वह्या, कोणी शाळेचे दप्तर आणले होते. मी बाहेर धर्मवीर यांच्या टीमशी बोलताना माझ्या लक्षात आलं की, हजारो लोकांना, हजारो महिलांना आणि हजारो युवकांना, राज्यभर नाही तर राज्याबाहेरही मदत करण्याचे काम धर्मवीर यांनी केले आहे. कुठल्या एका समाजाला मदत नाही, तर सर्वसमावेशक सरसकट गरजूंना मदत अशी ओळख असणाऱ्या या धर्मवीर विषयी काय मत व्यक्त करावं असं त्यांचं सगळं काम पाहून माझं झालं होतं. मी निघताना धर्मवीर मला म्हणाले, ‘दादा, मी जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात केली, मी माझ्या भारजगाव येथून लातूरकडे येताना एक स्लीपर पायात घेऊन एका ऑटो रिक्षामध्ये सगळा पसारा भरून आलो होतो. गरिबी काय असते, ती किती सूड घेते, आपल्याला जर कोणी दहा रुपयाची मदत केली, तर ती मदत किती मोठी असते, याची जाण मला खूप मोठ्या प्रमाणावर होती. या जाणिवेला संस्कारांची झालर लागली. माझं काम खूप गतीने वाढवत मी अनेकांना प्रचंड मदत केल्यामुळे निसर्गानेही मला भरभरून दिले.' संपूर्ण दिवस मी भारती सर यांच्याबरोबर घालवला. त्या दिवसभरात त्यांनी मला अशी अनेक उदाहरणं सांगितली, की ज्या ज्या व्यक्तीला भारती यांनी मदत केली, त्या मदतीतून त्यांचे आयुष्य खूप मोठे झाले. पुन्हा त्याच व्यक्तींनी इतरांना मदत करण्याचं काम अविरतपणे सुरू ठेवलं. मी भारती यांचा निरोप घेतला आणि माझ्या पुण्यातल्या इतर कामाला लागलो. मी वाटेने जातांना विचार करत होतो की, आपल्या समाजात असे धर्मवीर नसते तर काय झालं असतं? कोणाच्या भरवशावर या सृष्टीचा गाडा चालला असता? कोण गरिबांचा आणि सर्वसामान्यांचा वाली झाला असता? असे धर्मवीर तुमच्या आमच्या अवतीभवती खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आपण पुढाकार घेत त्या धर्मवीरांना प्रोत्साहन दिले पाहिजे किंबहुना आपणही असे धर्मवीर बनून समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून कामही केलं पाहिजे, बरोबर ना? - संदीप काळे