छळतें अजुनिं सत्य तें मला !
आपल्याकडे शिक्षण आलं; पण सहृदयता आली नाही, आपल्याकडे पैसा आला.. पण आपली दृष्टी खाली जायलाच तयार नाही. पुन्हा वैचारिक तत्वज्ञान उगाळायला किंवा रवंथ करायला मीडीयावरच्या चर्चा आणि वादविवाद आहेतच ना.. आपण त्या चर्चा घरातल्या गुबगुबीत सोपयावर आरामात बसून, गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत बघतो ना, तेवढं केलं की आपलं समाजाविषयीचं कर्तव्य संपलं की.. भारतीय जागरूक नागरिक म्हणून मिरवण्यासाठी तेवढं पुरेसं असतं...
सोलापूरच्या एसटी स्टॅन्डवर गाडीची वाट पाहत बसलो होतो. अनेक प्रकारची माणसं वेगवेगळ्या कारणांमुळे प्रवास करण्यासाठी तिथं जमलेली. बस उशीरा फलाटावर लागणार होती. त्यामुळे माझ्यासारखीच खूप माणसं ताटकळलेली होती. पण बाजूला एका कोपऱ्यात बसलेली एक दृष्टीहीन बाई मात्र माझ्या डोळ्यांसमोरून हलत नव्हती. पस्तिशी ओलांडलेली ती महिला जमिनीवरच एक गोणपाटाचा तुकडा अंथरून बसली होती. तिच्यासमोर एक डिजिटल वजनकाटा होता आणि हातात लहान मुलांसाठीचे काही खुळखुळे होते. वजन पाहण्यासाठी २ आणि खुळखुळ्याची किंमत होती १०.. मला सोडण्यासाठी आलेल्या माझ्या काकानं मात्र त्या महिलेला ओळखलं आणि तिथं जाऊन तिच्याशी बोलला. तिने तिचे आणखी दोन-चार दृष्टीहीन बांधव बोलावले, तेही माझ्या काकाशी बोलले. मी ते दृश्य पाहत होतो. एकजण पॉपकॉर्न विकतोय, एकजण कॅलेंडर विकतोय... काका त्या सगळ्यांशी बोलून परत आला. त्यानं मला सांगितलं, "ही सगळी अंध मुलं-मुली एका संस्थेत शिकत होती, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आता ही सगळी मोठी झालीयत, मिळेल ते काम करतायत.” माझी उत्सुकता वाढली आणि मी आणखी माहिती काढली. वस्तुस्थितीचा जो उलगडा झाला, तो मन विषण्ण करणारा आहे.
ही महिला २०-२२ किलोमीटर अंतरावरच्या एका छोट्या गावात राहते आणि तिथून रोज सोलापूरला येते, दिवसभर एसटी स्टॅन्डवर हे काम करते आणि रात्री शेवटच्या बसने परत जाते. प्रवास मोफत आहे, त्यामुळं तो खर्च नाही. पण दिवसभर हे काम करून तिला किती पैसे मिळत असतील? एकूण रागरंगाचा अंदाज घेता शंभर रूपयांपेक्षा अधिक पैसे मिळत नसावेत. शिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तीची ‘स्मार्ट सिटी होऊ घातलेल्या शहरात ही अवस्था?
मला टिळक-आगरकर यांच्यातल्या ‘आधी संपूर्ण स्वराज्य की आधी समाजशिक्षण? या वैचारिक मतभेदांची आठवण झाली. या वैचारिक मतभेदाचीही शताब्दी कधीच होऊन गेली आहे. पण अजूनही सुधारणेचा पत्ताच नाही. दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षणाविषयी सगळेच आग्रही आहेत; पण त्या शिक्षणाच्या उपयोजनाविषयी मात्र कुणी चकार शब्द काढायला तयार नाही. बोटावर मोजण्याइतकी उदाहरणं दाखवायची आणि त्यातच धन्यता मानायची असा जो प्रकार दुर्दैवानं सुरू आहे, तो खरोखरच सामाजिक अपराध आहे.
साक्षर दिव्यांग व्यक्तीला दिवसभर वजनकाटा अन्खेळण्यातले खुळखुळे घेऊन बसण्याची वेळ आली, याला जबाबदार कोण? केंद्र शासन, राज्य शासन यांच्या दिव्यांग व्यक्तींसाठीच्या शैक्षणिक तरतुदींच्या रकमा आपण तपासून पहाव्यात. वय वर्षे १८ नंतर ही मुले-मुली काय करत आहेत, याचा अद्ययावत अहवाल शासनाकडे आहे का? स्थानिक प्रशासनाकडे आहे का? दिव्यांग व्यक्ती असल्याचं प्रमाणपत्र, मोफत शिक्षण, निवासी विद्यालयं, प्रवास व वैद्यकीय सवलती या गोष्टींमुळे मिळालेला आधार तुटपुंजा आहे आणि वेगवान प्रगतीच्या जगात तो टिकणारा नाही.
बदलत्या काळाचा विचार करून आधुनिकव सुसंगत व्यवसाय प्रशिक्षणाची खरी आवश्यकता आहे. आपल्या शैक्षणिक प्रगतीच्या वयातला समाज पुढच्या दहा वर्षात आमूलाग्र बदललेला असतो. तो इतका वेगानं बदलतो की त्या वेगाबरोबर जुळवून घेणं भल्याभल्यांना शक्य होत नाही. तिथं अशा व्यक्तींची काय अडचण होत असेल, याचा विचार करायला हवा. पण तेवढा वेळ कुणाला आहे?
वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत शिकलेली एखादी अतिशय गरीब कुटुंबातली व्यक्ती तिच्या वयाच्या पन्नाशीपर्यंत तिचं आयुष्य स्वबळावर, स्वकर्तृत्वावर, पूर्ण सुरक्षितपणे आणि समाधानपूर्वक जगू शकेल इतकं सामर्थ्य त्या शैक्षणिक अभ्यासक्रमात आहे का? याविषयी तथाकथित सामाजिक कार्यकर्ते किंवा विचारवंतांनी आवाज उठवलेला दिसत नाही. समाजानंही या बाबतीत जागरूकतेनं पाठपुरावा केल्याचं दिसत नाही. आपल्या सामाजिक, भावनिक, बौद्धिक जाणिवांनाच दिव्यांगत्व आलंय की काय असं वाटावं, इतकं निर्लज्ज निर्ढावलेपण आपल्यात आलंय. मग कशाला होतोय समाजाचा विकास?
आपल्याकडे शिक्षण आलं; पण सहृदयता आली नाही, आपल्याकडे पैसा आला.. पण आपली दृष्टी खाली जायलाच तयार नाही. पुन्हा वैचारिक तत्वज्ञान उगाळायला किंवा रवंथ करायला मीडीयावरच्या चर्चा आणि वादविवाद आहेतच ना.. आपण त्या चर्चा घरातल्या गुबगुबीत सोपयावर आरामात बसून, गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत बघतो ना, तेवढं केलं की आपलं समाजाविषयीचं कर्तव्य संपलं की.. भारतीय जागरूक नागरिक म्हणून मिरवण्यासाठी तेवढं पुरेसं असतं....
आपली उलटी काळीजं सुलटी कधी होणार? असा प्रश्नच पडावा इतकी रूक्षता आपल्यात आली आहे. हा मानसिक रूक्षपणा का आणि कसा आला? तो कसा रूजला? कसा फोफावला? आपण इतकी वर्षं शिकून-सवरूनसुद्धा इतके निर्दय, आपमतलबी आणि अप्पलपोटे कसे काय असू शकतो की, समोरच्या माणसाचं दुःख, यातना, वेदना, अडचणी यातल्या कशाचीही जाणीवसुद्धा आपल्याला होऊ नये?
त्याचं काय आहे, सध्या तांत्रिक प्रगतीचा जमाना आहे. आपण फार उच्च कोटीची वैज्ञानिक प्रगती केलेली आहेच. यंत्रानं रक्तदाब मोजता येतो, हृदयाचे ठोके मोजता येतात, डोळ्यांचा नंबर काढता येतो तसं आपल्यात माणूसपण किती आहे हे मोजता येण्याचं यंत्रही तयार करता आलं तर करावं आणि प्रत्येकातल्या माणूसपणाची तपासणी करावी. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के जनता सहृदय आहे आणि जे सहृदय आहेत त्यांच्यातल्या माणूसपणाचं प्रमाण किती आहे हे तरी समजेल निदान...... नाही का?
- मयुरेश डंके, मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे