सार्वभौमत्वावर हल्ला !

पहलगाम येथे झालेला हा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे. या  हल्ल्याने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले असून  काश्मीरमध्ये पुन्हा घातपाती कारवाया सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्याने सहा वर्षापूर्वी काश्मीरमधीलच पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याची आठवण झाली.

 काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम हटवून केंद्र सरकारने काश्मीरचे त्रिभाजन केले. या घटनेला या ऑगस्टमध्ये सहा वर्ष पूर्ण होतील. ३७० वे कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्याने काश्मीरमध्ये बराच काळ शांतता होती. त्यामुळे पर्यटनालाही  चालना मिळाली होती. त्यामुळे नंदनवनात पुन्हा शांतता प्रस्थापित झाली असा समज निर्माण झाला होता मात्र  या समजाला छेद देणारी घटना काश्मिरात घडली आहे. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात २८ पर्यटक ठार झाले. या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले. ठार झालेल्या  पर्यटकात महाराष्ट्रातील  सहा पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे.

पहलगाम येथे झालेला हा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे. या  हल्ल्याने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले असून  काश्मीरमध्ये पुन्हा घातपाती कारवाया सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्याने सहा वर्षापूर्वी काश्मीरमधीलच पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याची आठवण झाली.

सहा वर्षापूर्वी पाकिस्तानच्या जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले होते. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन ठार केले. दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना जाणीवपूर्वक टार्गेट करून ठार केले. याचाच अर्थ हा टार्गेट कीलींगचा प्रकार आहे. काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगचा हा पहिलाच प्रकार आहे असे नाही. मागील वर्षी जम्मू काश्मीरच्या दिवशी जिल्ह्यातील कंदा परिसरात वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्यात १० भाविक मरण पावले तर ३३ हून अधिक भाविक जखमी झाले होते. पहलगाम येथे झालेला हल्ल्याला गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये झालेला सर्वात मोठा भीषण हल्ला म्हणता येईल. अर्थात काश्मीर खोऱ्यात कडेकोट बंदोबस्त असूनही लहान मोठे हल्ले चालूच होते. मात्र या हल्ल्याने काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्याने दहशतवाद्यांनी केंद्र सरकारला दाखवून दिले आहे की काश्मीरमध्ये दहशतवाद अजूनही कायम आहे. केंद्र सरकारने हा हल्ला गांभीर्याने घेतला असून या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

भारताचे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्र्यांनी हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृतच असून या हल्ल्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे. पाकिस्तानने मात्र हे पाप आमचे नाही असे म्हटले आहे. पाकिस्तान काहीही म्हणो  मात्र हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृतच होता हे शाळकरी मुलेही सांगतील. सुंब जळाला तरी पिळ जात नाही ही म्हण पाकिस्तानसाठी तंतोतंत लागू पडते. पाकिस्तान आज अक्षरशः भिकेकंगाल झाला आहे. पाकिस्तानी सरकार कटोरा घेऊन जगभर फिरत आहे मात्र त्यांना कोणीही भिक द्यायला तयार नाही. पाकिस्तानमधील जनता अक्षरशः देशोधडीला लागली आहे. एकवेळचे पोटभर अन्न मिळाले तरी पुरेसे अशी त्यांची अवस्था आहे. आपल्या देशातील नागरिकांना खायला मिळत नसताना तेथील सरकार मात्र दहशतवाद्यांना पोसत आहे. पाकिस्तान सरकार आजही दहशतवाद्यांना आर्थिक आणि लष्करी मदत करत आहे.

पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात आजही दहशतवाद्यांचे अड्डे सुरू आहेत. तिथे पाकिस्तानी लष्कर दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण देत आहे. अनेक दहशतवादी संघटनांची कार्यालये पाकिस्तानात आहेत अशाच एका दहशतवादी संघटनेने हा भ्याड हल्ला केला असण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या भ्याड हल्ल्याची गांभीर्याने दखल घेऊन पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे. जर भारताने या दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर दिले नाही तर दहशतवाद्यांची मुजोरी आणखी वाढेल आणि काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद पसरेल. ते होऊ द्यायचे नसेल तर भारतानेही आक्रमक व्हायला हवे. प्रसंगी सर्जिकल स्ट्राईक सारखा पर्याय वापरायलाही हरकत नाही.

भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर देतानाच या दहशतवाद्यांना साथ देणाऱ्या फुटिरतावाद्यांचा देखील बंदोबस्त करावा. काश्मीरमधील अनेक फुटीरतावादी नेते दहशतवाद्यांना साथ देतात. स्थानिक फुटीरतावादी लोकांची साथ असल्याशिवाय इतका मोठा हल्ला करणे दहशतवाद्यांना शक्य नाही त्यामुळे दहशतवाद्यांशी दोन हात करताना आणि पाकिस्तानला जशास तसे उत्तर देतानाच केंद्र सरकारने ही फुटिरतावादी कीड देखील मुळापासून उखडून टाकायला हवी. आज जरी हा दहशतवादी  हल्ला भारतात झाला असला तरी दहशतवाद ही केवळ भारताचीच समस्या नाही, तर ती वैश्विक समस्या आहे. दहशतवाद आज जगातील प्रत्येक देशाचे दार ठोठावत आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया या प्रगत देशांनाही दहशतवादाची झळ बसली आहे. म्हणूनच दहशतवादाचा मुकाबला करायचा असेल तर जगातील सर्व देशांना एकत्र यावेच लागेल. पाकिस्तानसारखा देश जो सातत्याने दहशतवादाला प्रोत्साहन देतो, दहशतवाद्यांना मदत करतो अशा देशांवर आंतरराष्ट्रीय समूहाने कारवाई करावी. पाकिस्तानसारख्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या देशांवर आंतरराष्ट्रीय समूहाने आर्थिक निर्बंध आणावेत. प्रसंगी त्या देशांवर बहिष्कार टाकून त्यांची कोंडी करावी. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या देशांची कोंडी केल्याशिवाय दहशतवाद संपणार नाही. अमेरिकेसारख्या सुपर पॉवर देशांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. - श्याम ठाणेदार 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

छळतें अजुनिं सत्य तें मला !