कोकणातील पाऊस
कोकणस्थ मान्सून एकदा का आला की मग जाण्याचे नाव घेत नसे. शेवटीं-शेवटी तर आम्ही खरंच कंटाळून जायचो. "अरे, जारे बा पावसाळ्या! अशी तृप्तीची हाक मारुन त्यांस विनंती करायचो. जरासे ढग पसरून गेले काय आणि सूर्य आपल्या किरणांनी मातीत वसू लागला काय की लगेच आम्हां बच्च्या कंपनीत आनंद संचारुन यायचा की लागलो गोट्या खेळायला, विटी-दांडू खेळायला! मज्याच मज्जा!!
हयात कोकणात गेली. काही निवडक लोक भर पावसात यायचे आणि खूप सरीवर सरी बरसत असल्याने आपल्या घरातच स्वतःला डांबून घ्यायचे. तरीही स्थानिक नागरिकांना धोधो ओतणारा तो पाऊस केव्हाच नावडता झाला नाही. त्यावेळी लालमातीचे कच्चे गाडी रस्ते होते. एका वेळी एकच गाडी येजा करू शकेल एवढीच रस्त्याची रुंदी! त्यावरून लालपरी कायम येजा करत असे. लोक तो प्रवाससुद्धा एन्जॉय करायचे. कारण त्याला काहीं पर्याय नव्हता. लाइलाज को क्या इलाज...?
एक गावकरी जो नोकरी निमित्ताने शहरांत सहपरिवार रहात होता, एके दिवशी तो अचानकपणे भर पावसात एकटाच गावी आला. माझी भेट घेण्यास घरी आला. त्याचवेळी घराशेजारच्या फेक्ट्रित नारळाच्या सोलण्यापासून सुंभ बनविण्याचे प्रशिक्षण आम्ही घेत होतो. ते शिकवण्यासाठी म्हणून तळकोकणातून एक निपुण प्रशिक्षक बोलावला होता. एकाच वेळी सातजण आम्ही त्या कार्यशाळेत प्रशिक्षण घेत होतो. म्हणून आर्थिक दृष्टीने ते आम्हांस परवडले होते. लांबून तो मुंबईकर मला निरखून पहात होता. पाहुणा आल्याने आम्हास मध्येच टी ब्रेक घ्यावा लागला.
आमच्यात बोलणं सुरू झालं. आपल्या कामाविषयी बोलणं टाळून त्याचे अचानक गावी येण्याचे कारण मी विचारु लागलो. तो हंसला. नेमकं वर्मी बोट ठेवल्याचा आभास त्यांस झाला असावा. स्वरांत एक वेगळा स्तर जाणवला. त्यांत नैराश्य कमी, पण उत्सुकता जास्त जाणवली. नारळाच्या सोलण्यापासून फायबर तयार करणारी सेमी इलेक्ट्रिक मशीन सुरू होती. फायबर आणि भुसा असे दोन प्रकार वेगळे करण्यांत मी व्यस्त होतो, तो नेमका प्रकार काय? त्याचे कुतुहल शब्दांत अवतरले. तो उत्स्फूर्तपणे माझे बोलणे ऐकत होता.
भातशेती बंद केली आणि त्याजागी हे असे लघु/गृह उद्योग सुरू केले. ते का? त्याचा प्रश्न चुकीचा नव्हता. पण हतबल शेतकरी काय करणार? भातशेतीत पैसा जास्त आणि पीक कमी, हे फसलेले आर्थिक गणित किती काळ चालणार? त्याशिवाय त्यावेळी गावठी भात किंवा त्यापासून तयार झालेला गावठी तांदूळ कुणीही विकत घेत नसे! पॉलिश न केलेला तांदूळ खाणारे आम्ही गावंढळ, असे त्यावेळी तोंडावर बोलत असत.(आज डायबेटीसचे प्रमाण वाढल्याने तोच ‘गावठी' तांदुळ दुप्पट दाम देऊन विकत घेतला जातो!) याला काय म्हणावे?
मुळात, गावी आलेला तो शहरी गाववाला काही तरी विचारू इच्छित होता, बाहेर पाऊस बरसतच होता.
"मला गावी माझ्या घरी येऊन स्थायिक व्हायचा विचार करतोय, ते शक्य होईल का?
ढगांचा कडकडाट झाला. सकाळचे सुमारे अकरा वाजले असतील, तरीपण बाहेर सांज झाल्यागत वाटत होते. त्याने चहाचा रिकामा कप खाली ठेवत पुन्हा विचारले...
"तू सांग ते शक्य होईल?”
इकड तिकडच्या बऱ्याच गप्पा झाल्या. तिकडे प्रशिक्षण वर्ग पुन्हा सुरू झाला. स्वतःला आवरता घेत एकच वाक्य त्यांस सांगितले...
"कोकणातला एक पूर्ण पावसाळा, म्हणजेच चार महिने ज्याने काढले तो कोकणात स्थायिक झाला, हे निश्चित. यावरुन तू काय ते ठरव. घरच्यांना जमेल असे एकांतात जगणे? त्यांसही विश्वासात घे.” असे मी त्यांस सुचवले.
कोळथरे येथील नेव्ही ऑफिसर आता ज्येष्ठ नागरिक ताजुद्दीन अब्दुल रहमान नामक देशाभिमान जपणारे भर पावसात गावी आले. आजचा व्हाट्स अपचा काळ असता तर केव्हाच कळले असते. पण चार दिवसांनी जेव्हां पावसाने उसंत घेतली तेव्हा ते जामा मस्जिदकडे गेले. पाहतात तर मस्जिदच्या प्रांगणात बरीचशी शाळकरी मुलं तसेच काही तरुण (त्यांत मी स्वतः उपस्थित होतो) डेग हा कृषिपूरक पारंपारिक सण साजरा करत होते. गावांत वीज नसल्याने स्पीकर चालत नसावा. अशा वेळी नगाडा वादन झाले आणि आम्ही गावकरी सर्व गोळा झालो. सालाबादप्रमाणे वरिष्ठांनी डेग हा सण साजरा करण्याचे ठरविले. शाळेत जाणारी मुले रविवार असल्याने गावीच होती. गावातल्या काही निपुण आया-बहिणींनी तीन पायली तांदळाचा गोड भात शिजविला. गूळ-नारळी दूध, वेलची, दालचिनी, तेजपत्ता इत्यादी मसाले मिश्रित डालडा तुपात दम दिलेला गोड भात उपस्थितांना केळीच्या पानावर खाऊ दिला. लाकडी चुलीवर शिजलेला तो गोडभात खाऊन सारे तृप्त झाले. उपस्थितांमधून एकाने प्रश्न विचारला कि "डेग” हा सण म्हणून का साजरा केला जातो, तोही भर पावसात!
मुंबईहुन गावी आलेले ज्येष्ठ नागरिक त्वरित उत्तर देऊ लागले...
"जमात शेतकरी आहे. आपली दहा मणाची भातशेती आहे. ज्यावेळी त्यांत लावणी व्हायची तेव्हा पीक बऱ्यापैकी यायचे. पुढे तरुण मंडळी शहरांत स्थलांतरित झाली आणि शेती ओसाड पडली. त्या दाण्यातून गोड भात शिजवून घरोघरीं सर्वांना पोच देण्याची प्रथा होती. आनंद व्यक्त करण्याचा तो एक क्षण असावा. अतिवृष्टीमुळे लोक घराबाहेर पडत नाही, किमान डेग सणाच्या आकर्षणामुळे तरी आपण सर्वजण एकत्रित यावे व एकमेकांची खुशाली जाणून घ्यावी. हिच त्या मागची संकल्पना असावी. मी गावी आलो पण गावकरी मला कुणी दिसलेच नाही...?”
असं बोलता-बोलता त्यांचे डोळे भरून आले. पाऊस आता थांबला होता, वातावरण जरी ढगाळ असले तरी डेग हा पावसाळी सण साजरा केल्याने सारेच आनंदी झाले होते. गावातली जमातुल-मुस्लिमान ही रजिस्टर्ड संस्थाच मुळात शेतकरी असल्याने जास्तीत जास्त पाऊस पडो अशी दुआ सर्वांनी मागितली.
हे फार कमी जणांना माहिती असेल की एके वर्षी गावांतील यातीच्या विनंती वरून मी यातीची भातशेती अर्धेलीत करण्याचे मान्य केले होते. माझ्याकडे दोन नांगर होते. पाचवा बैल मी दुसऱ्या शेतकऱ्यास खांदी म्हणून दिला होता. यातीची शेती तशी पाणथळ; पण गाडी रस्त्यालगत असल्याने शेळी-गुरेढोरे यांचा चोर शिरकाव सहज होत असे. मला त्याचा खूप त्रास सोसावा लागला. आर्थिक गणित चुकले. आठ मनाचा मक्ता देऊन माझ्या पदरी निव्वळ पेंडा आला जो माझ्या पाळीव प्राण्यांस मुबलक ठरला. असो, जातीसाठी काहीवेळा माती खावी लागते अशी म्हण कोकणात प्रचलीत आहे. त्यातलाच हा प्रकार असावा.
गुगल येण्यापूर्वी कोकणातील जनजीवन विशेषतः पावसाळ्यात अतिशय संथ झाल्याचे जाणवायचे. मी सलग ३५ वर्षे भात, नाचणी तसेच बागायती शेती केली. म्हणूनच आजही मला गावातील एकूणच जनजीवनाविषयी जास्त आकर्षण आहे. गोठ्यापासून ते चोंड्यापर्यंत अंगमेहनतीने वावरलो. रानांत गुरे चरवणे, कुक्कुटपालन हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून अनुभवला. गावात स्थानिक पावसात कसे रमत असत? म्हणूनच अशावेळी शेतकरी झाप विणतो. केरसुणीकरिता पातीतून हिर काढतो. रानभाज्या निवडणे हाही एक मस्त छंद मी स्वतः अनुभवला आहे. आळुची खारवलेली ओसरी खायला मज्या यायची. उकडून चिनी मातीच्या मोठया बरणीत खारावलेले आंबट-गोड रायवळ आंबे खायचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण!
यासर्वांची पूर्व तयारी आगोटीतच करावी लागत असे. अशावेळी जसे आज गर्दुल्ले कोकणात फोफावलेत, तसा रानटी प्रकार होत नसे. आपुलकी माया, ज्येष्ठ नागरिकांचा मान राखला जायचा. वाचनाची आवड असलेली माणसे पुस्तक वाचत असत. पत्ते खेळण्याचा टाईम पास बैठाखेळ रंगात यायचा. पाऊस असल्याने वातावरण स्थिर, स्तब्ध असायचे. रेडियो विविध भारताच्या माध्यमातून गाणी ऐकवायचा.
असा हा कोकणस्थ मान्सून एकदा का आला की मग जाण्याचे नाव घेत नसे. शेवटीं-शेवटी तर आम्ही खरंच कंटाळून जायचो. "अरे, जारे बा पावसाळ्या!” अशी तृप्तीची हाक मारुन त्यांस विनंती करायचो. जरासे ढग पसरून गेले काय आणि सूर्य आपल्या किरणांनी मातीत वसू लागला काय की लगेच आम्हां बच्च्या कंपनीत आनंद संचारुन यायचा की लागलो गोट्या खेळायला, विटी-दांडू खेळायला! मज्याच मज्जा!!
कोकणातील पावसाचे चार महिने गेले की मग पहावे कोकण किती हिरवेगार दिसते ते...वाहत्या नद्या, नारळ-पोफळीच्या बागा, हिरवळीने सजलेले डोंगर, अजून समुद्रकिनारी निवांत नांगर टाकून बसलेल्या मच्छीमार बांधवांच्या होड्या. श्रवणी नक्षत्रात आकाशी दिसणारे सप्तरंगी इन्द्रधनुष्य! आनंदी आनंद गडे...बाल मनापासून ते वृद्धापर्यंत सारेच साजरा करतात तो कोकणातील पावसाळा!
-इक्बाल शर्फ मुकादम