समज पूर्वक वाचन - जीवन आणि शिक्षण यामधील अंतर कमी करण्याचे साधन
मनातील भाव व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत, अनेक माध्यमं आहेत. त्यापैकी शब्द हे भावनांना साधेपणाने व्यक्त करणारे व ऐकणाऱ्याला लगेच कळणारे माध्यम आहे. संतांनी तर शब्दांना धन मानले आहे आणि साहित्यिकांनी शब्दांना सोन्याचे रूप देऊन वाचकांना श्रीमंत केले आहे. अनेकांनी शब्दांना वेगवेगळ्या उपमा देऊन ऐकणाऱ्यांना अक्षरशः निशब्द केले आहे. एखाद्या व्यक्तीचा एखादा शब्द आयुष्यभर आपण मनामध्ये साठवून ठेवतो, तोच शब्द आपल्या जगण्याच्या प्रेरणेचा स्त्रोत असतो. ही शब्दांची संपत्ती शाळेच्या माध्यमातून, वाचनाच्या संस्कारातून विद्यार्थ्यांनी किती जमा केली आहे हे पाहण्याचं एक माध्यम म्हणजे परीक्षा. नुकतीच अशीच एक परीक्षा सुरू होती. वर्ग होता पाचवीचा. विषय होता शब्द समृद्धी जोपासणारा मातृभाषा मराठीचा. परीक्षेमध्ये असा एक प्रश्न होता, ‘अंतर' हा शब्द वापरून वाक्य तयार करा. चार-पाच मुलांनी ‘अंतर' या शब्दाचा वाक्यात केलेला उपयोग वाचून पाहिला तर सर्वांनी ‘माझे गाव जिल्ह्यापासून अमुक अंतरावर आहे', असे एकच वाक्य तयार केले होते. सगळ्याच मुलांनी एकसारखा विचार कसा केला? असा विचार माझ्याही मनात आला. पुन्हा अजून दुसऱ्या शाळेत गेलो. तेथे मुलांचा शब्द प्रयोग पाहिला. दुसऱ्या शाळेतदेखील शब्दप्रयोगामध्ये बदल दिसला नाही. मग अजून एका तिसऱ्या शाळेत तोच प्रश्न पाहिला. तेथेही परिस्थिती तीच होती. अमृतातही पैजा जिंकणारी माझी माय मराठी एवढी समृद्ध असूनही वेगवेगळ्या शाळेमध्ये वेगवेगळी मुले ‘अंतर' या शब्दाचा एकाच पद्धतीने वाक्यात वापर का करतात? मुलांच्या मनातील भावनांचे तरंग शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होताना त्यामध्ये वैविध्य का नसावे?
‘अंतर या शब्दाचा योग्य प्रयोग विद्यार्थ्यांच्या वाचनात किती ठिकाणी व कोणकोणत्या प्रसंगात आला असेल आणि त्याची नोंद त्यांच्या मनाने घेतली असेल का? ‘अंतर या शब्दाच्या विविध शब्दछटा त्यांना चर्चेतून समजल्या असतील का? याचा विचार मनामध्ये सतत येऊ लागला. उत्तराच्या शोधात असताना, ‘समज पूर्वक वाचन', या संकल्पनेने माझी समज जागृत झाली आणि मुलं जे काही वाचतात ते त्यांना खरंच समजतं की छापलेल्या मजकुराचा फक्त ते उच्चार करतात आणि तेच व तेवढेच लिहितात याचा शोध लावायला हवा असे वाटले. ज्यामुळे मुलांच्या मनातील भावना आणि त्यांच्या शब्दातील वैविध्य यांचा सहसंबंध त्यांच्या अनुभव विश्वाशी आहे का हे समजेल. हा सहसंबंध समजला की मुलांच्या अभिव्यक्ती क्षमता सुधारता येतील याची जाणीव झाली आणि प्रयोगाला सुरुवात केली.
मुलांचे समज पूर्वक वाचन आणि अभिव्यक्ती अनुभवण्यासाठी फक्त पाच वाक्यांचा अत्यंत साधा उतारा तयार केला. उतारा शाळेतील फळ्यावर लिहिला आणि त्याखाली प्रश्न लिहिले. त्यातील काही प्रश्न खूपच सोपे होते. ज्यांची उत्तरे उताऱ्यातच होती. काही प्रश्न विचार करायला लावणारे होते, ज्यांची उत्तरे उताऱ्यात नव्हती पण उतारा वाचल्यानंतर आपल्या पूर्वानुभवाच्या जोरावर आणि तार्ककि विचारांच्या आधारे त्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येणार होती. तिसरी ते पाचवीतल्या मुलांसाठी प्रयोग सुरू केला.
उतारा
गणेश आणि राम दोघे मित्र होते. ते नेहमी सोबत खेळायचे, अभ्यास करायचे. गणेशला गोष्टींची पुस्तके वाचण्याची आवड होती. रामला सायकल चालवायचा छंद होता.
पहिल्याच शाळेत मनाला खूप समाधान मिळाले आणि शाळा विद्यार्थ्यांमध्ये शब्द समृद्धी निर्माण व्हावी म्हणून किती प्रयत्न करत आहेत याची जाणीव झाली. पहिलीतल्या मुलाने फळ्यावरचा उतारा एका दमात वाचला. पहिलीतल्या मुलाचा हा प्रयत्न वाचन क्षमतेमध्ये शाळा समृद्ध आहे हे सांगणारा होता. पण मला उत्सुकता होती ती म्हणजे विद्यार्थ्यांमधल्या प्रतिक्रियांच्या वैविध्याची. त्यासाठी एक प्रश्न दिला होता. वरील उताऱ्याला योग्य शीर्षक लिहा. दुसरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पाच वाक्यांच्या उताऱ्यासाठी दहा शीर्षके सुचवली. ‘मैत्री ही मैत्री असते', ‘खरे मित्र', ‘छंद', ‘मित्रांची सोबत', ‘प्रामाणिक मित्र', ‘सोबत', ‘खरी मैत्री', ‘चांगले मित्र', ‘गणेश आणि राम', ‘दोन छान मित्र', ‘माझे मित्र', मैत्री हवी तर अशी', ‘गप्पा टप्पा मित्रांशी'. ‘अंतर ', या शब्दाचा एकाच प्रकारच्या वाक्यामध्ये उपयोग करणारे विद्यार्थी आणि पाच वाक्यांच्या उताऱ्यासाठी दहा पेक्षा जास्त शीर्षक सुचवणारे विद्यार्थी दोन्हीही विद्यार्थी शाळेतच शिकतात. मग सर्वच मुलांमध्ये मनातील अंतरंग आणि अनुभवलेले रंग शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करण्याची क्षमता का नाही?
उताऱ्यात एक प्रश्न होता. ‘उताऱ्यातील सोबत', या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. अनेक मुलांनी बरोबर, ‘एकत्र' असा अर्थ लिहिला होता. समुद्रकिनारी असलेल्या एका शाळेतील एका मुलाने मात्र सोबत म्हणजे ‘मिस करणे' असा अर्थ लिहिला होता. प्रथमदर्शनी कदाचित ‘मिस करणे हा अर्थ चुकीचा वाटेल. पण मैत्रीच्या नात्यांमध्ये खोलवर डोकावून पाहिले तर खरे मित्र नेहमीच एकमेकांसोबत असतात आणि जेव्हा ते सोबत नसतात तेव्हा ते एकमेकांना ‘मिस करतात. एका अर्थाने क्षणाक्षणाला ते एकमेकांना मिस करत असतात. उताऱ्यामध्ये न लिहिलेला पण उताऱ्यांच्या ओळींमध्ये लपलेला अर्थ चौथीतल्या मुलाने शोधला होता. खूप वेळा ते ‘मिस करणे' हे उत्तर वाचले. आपणही आपल्या आयुष्यात आपल्याला ‘मिस करणारे मित्र जोडलेत का? हा विचार मनात आला आणि आपण जे आजपर्यंत मिस केले आहे ते चौथीतल्या मुलाने समज पूर्वक वाचनातून आपल्याला शोधून दाखवले आहे, याची जाणीव झाली आणि ‘सोबत', या शब्दाचा माझ्यापुरता अर्थ मी बदलला. आपल्याला मिस करतील अशी नाती आपण जोडायला हवीत हा धडा चौथीच्या मुलाकडून त्याच्या समजपूर्वक वाचनातून शिकून घेतला.
पुढचा प्रश्न होता, पुस्तके वाचणारा मित्र चांगला की सायकल चालणारा?
पाच शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांनी, ‘पुस्तके वाचणारा मित्र चांगला असे लिहिले'. फक्त एकाच विद्यार्थ्यांने ‘पुस्तके वाचणारा आणि सायकल चालवणारा दोन्ही मित्र चांगलेच असे लिहिले होते'. सर्व मुलांचे हे उत्तर विचार करायला लावणारे होते. मुलांनी वेगळ्या उत्तराचा विचार केलेला दिसून आला नाही. सर्वांनी जे आदर्श आहे तेच लिहिले. फक्त जे लिहिले आहे ते तसे का लिहिले आहे हे जाणून घेण्यासाठी दुसरीतील एका मुलीला मी विचारले, जी मुलगी गेल्या वर्षी पहिलीत असताना माझ्यासाठी अध्ययन अक्षम होती. ”तुला पुस्तके वाचणारा मित्र का आवडतो?” ती काहीच बोलणार नाही याची मला खात्री होती, कारण अध्ययन अक्षम असलेली मुले अभ्यासाविषयी काही कसं बोलू शकतील असा माझा समज होता. माझा समज हा गैरसमज होता हे एका क्षणात सिद्ध झालं आणि समोरून उत्तर आले, ”अभ्यास करणारा पुढे जातो, सायकल चालवणारा अभ्यासात मागे राहतो म्हणून मला पुस्तके वाचणारा मित्र आवडतो” उत्तर जरी आदर्श असले तरी त्या मागचे दुसरीतील मुलींनी दिलेले तार्ककि समर्थन योग्य होते. अभ्यासाविषयी तिने तिच्या मनातील अंतरंग वेगळ्या पद्धतीने बोलून व्यक्त केले. पुस्तके वाचणे म्हणजेच अभ्यास हा तिने तिच्या समज पूर्वक वाचनातून लावलेला अर्थ मला भावला.
उताऱ्यातला शेवटचा प्रश्न होता, आपल्याला मित्र का हवेत?
अनेक मुलांनी लिहिलेली उत्तरे वाचली आणि आपण मुलांना लहान म्हणतो आणि मानतो हे किती चुकीचे आहे याचा प्रत्यय आला. मुलांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती वेगळा आणि व्यापक आहे याची जाणीव झाली. मुलांचे हे वेगळेपण शिक्षणाच्या माध्यमातून समजून घ्यायला आपण खूप कमी पडत आहोत हेही मनाला पटलं. दुसरी ते पाचवीत शिकणारी ही चिमुरडी आपल्याला मित्र का असावेत हे सांगताना लिहीत होती, "आपण एकटे पडू नये म्हणून मित्र असावेत.” "आपल्या दुःखात सामील व्हायला मित्र असावेत.” "आपले मित्र आपल्याला समजून घेतात.” "आपले मित्र नेहमी आपल्या सोबत असतात”. "आपल्या घरातील भांडणे, दुःख सांगण्यासाठी मित्र असावेत. "छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषण पाठ करण्यासाठी मित्र असावेत.” आजपर्यंत मित्र या संकल्पनेच्या व्याख्या अनेक तत्त्वज्ञांनी केल्या आहेत. पण लहान मुलांनी मित्राच्या या व्याख्या इतक्या सोप्या पद्धतीने सांगितल्या की ज्या अगदी हृदयाला भिडल्या. मुलांनाही दुःख असतं. त्यांनाही ते व्यक्त करायचं असतं, मात्र ते मित्रासमोरच व्यक्त करायचं असतं कारण मित्र आपल्याला समजून घेतो ही जाणीव त्यांना या वयातच झाली आहे. फक्त या जाणिवेचे रंग ओळखायला आपण शिकायला हवं. मुलांना व्यक्त व्हायची संधी द्यायला हवी. मग छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषण मित्रासोबत पाठ करून अखंड विश्वातील दुःख ही मुलं कमी कसे करायचे हे आपल्याला त्यांनी कमवलेल्या शब्द संपत्तीच्या माध्यमातून शिकवतील. आपण फक्त त्यांचे समज पूर्वक वाचनाचे क्षितिज त्यांना दाखवायला हवे. जमलंच तर तिथपर्यंत जाणारा रस्ता त्यांना कसा शोधायचा हे सांगायला हवं. मग मुले त्या वाटेवरून चालताना कुठे कुठे थांबतात, काय विचार करतात हे आपल्याला सहज समजेल. ते समजणे म्हणजेच मुलांच्या भावविश्वातील आपल्याला कधीही न समजणाऱ्या भावना आपल्याला कळणे.
‘अंतर' या शब्दापासून सुरू झालेला माझा प्रवास मुलांमध्ये आणि आपल्या मध्ये किती अंतर आहे याची जाणीव करून देणारा होता. हे अंतर कमी करायचे असेल तर आपल्याला अजून खूप अंतर चालावे लागेल. समज पूर्वक वाचन ही क्षमता खऱ्या अर्थाने विकसित झाली तर कदाचित आपले आणि आपल्या मुलांमधले अंतर कमी होईल. लांब अंतराच्या या प्रवासासाठी शब्दांचे धन आपल्या सोबत असायला हवे. आपल्या शाळा त्या धनाची निर्मिती निश्चित करतील. मग मुलंही आपल्या शाळा मिस करतील, समज पूर्वक वाचनामुळे शिक्षण आणि जीवन यांच्यात अंतर उरणारच नाही. - अमर घाटगे, केंद्रप्रमुख रत्नागिरी