ज्ञानप्राप्तीची ठिकाणं
आपले काम काय, आपली नेमणूक कशासाठी, आपली जबाबदारी काय याचे भान विसरुन अनेक सामान्यजण वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटनांवर मतप्रदर्शन करीत असतात. अशा मतप्रदर्शनाचा ठेका काही जाड भिंगाचे चश्मे घालणाऱ्या टीव्हीच्या पडद्यावर नित्यनेमाने झळकणाऱ्या विशेषज्ञांनीच घेतला आहे असे समजूच नये. साधा माणूसही त्याचे मत पोटतिडकीने व्यक्त करु शकतो. त्याच्या मांडणीत कदाचित त्रुटी, अघळपघळपणा, विस्कळीतपणा असू शकेल. पण त्यात प्रामाणिकपणा, सच्चाई आहे, कळवळा आहे. त्याचा अनुभव घ्यायला शिकले पाहिजे.
‘टाळीच वाजवायची होती तर मग आधी इतका श्या कशापायी धिल्या? या लोकांनी व यांच्या लोकांनी एकमेकांच्या पार्टीतल्या लोकान्ला जेवड्या श्या दिल्यात तेवड्या श्या जर इते ऱ्हावून नमकहरामी करनाऱ्या लोकान्ला आपल्या इंडियातल्या देशभक्त लोकांनी दिल्या आसत्या तर ते लोक लाजे-शरमेपोटी पाकिस्तानात न्हायतर बांगला देशात चालते झाले आस्ते! इते तर चुलतभावू आसूनशान बी न्हाय न्हाय ते आरोप आपल्याच लोकांनी एकमेकांवर केले. ठान्याचा रिक्षावाला बोलत्यात तोबी यांच्याच संगट हुता; त्याला पन किती श्या दिल्या त्याची गिनतीच न्हाय बगा!' एक चर्मशिल्पकार मला सांगत होता. मी चपलेला पॉलिश करण्यासाठी गेलो होतो. हल्ली कडक उन्हाला सकाळी दहापासूनच सुरुवात होते. त्यानंतर लोक अधिक बाहेर पडायला मागत नाहीत. म्हणून त्याच्याकडे चपलांची कामं घेउन आलेलं कुणी नव्हतं. त्याला गप्पा मारायला वेळच वेळ होता. आणि मी गाफील श्रोता म्हणून अलगद त्याच्या तावडीत सापडलो होतो. मी पत्रकार असल्याचं (माझ्या सुदैवानं!) त्या चर्मशिल्पकाराला माहित नव्हतं. नाहीतर माझी त्याने शाळाच घेतली असती.
अलिकडे समाजमाध्यमं प्रभावी झाल्यापासून चावडी, चव्हाटा, पार, चौक, तिठा, बाजार, हॉटेल या व अशा ठिकाणांच्या गावगप्पांना काहीशी अवकळा आलेली आहे. बसलेले असतात लोक एकमेकांसमोर..पण गप्पा मारण्याऐवजी त्यांच्या माना खाली असतात आणि ते ‘करलो दुनिया मुठ्ठीमे' धरुन समाजमाध्यमांवर इतर कुणासोबत तरी लागलेले असतात, हे दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. मी वर केलेली सारी ठिकाणं ही एकेकाळची ‘ज्ञानप्राप्तीची मौल्यवान ठिकाणं' म्हणून प्रसिध्दीस पावलेली होती. तिथं साधा भाजीविवयासुध्दा थेट कृषिमंत्र्याच्या ध्येयधोरणांवर तोंडसुख घेऊ शकत असे. भारतीय क्रिकेट संघाला एखाद्या सामन्यात अपयश आलं तर कोणत्याही चाळीतली हिराकाकू हातातला लाटणं दाखवीत ‘आता तुम्ही विटीदांडूच खेळलेलं बरं' असं भारताला अनेक विश्वचषक मिळवून देणाऱ्या या देशाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाला व त्यातील खेळाडूंनाही सुनावताना मागेपुढे बघत नसे. तर साधं प्लास्टर करायला आलेल्या गवंड्याच्या हाताखालचा कडियासुध्दा ‘आताच्या कारमदी काय दम नाय बगा...खरी कार म्हंजे कार म्हंजे अंम्बॅशिडर..काय थाट हुता त्या गाडीचा!' असं ठेवून देत असे. हे बोलताना आपला वकूब काय, आपलं शिक्षण किती, आपला पगार किती, आपली मिळकत किती, आपण करतो काय आणि आपण बोलतो काय याचे भान बाळगण्याची गरज नसे.
जून २०२२ मध्ये मी दुसऱ्यांदा काश्मिरमध्ये गेलो होतो. आमचा ४९ जणांचा ग्रुप होता. पहलगाम येथील हॉटेलात आमचा मुक्काम होता. तेथील हॉटेलात काम करणारे कर्मचारी अर्थातच वेगळ्या धर्माचे होते. आमची त्या धर्माला हरकत असण्याचे कारण नव्हते. कारण आम्ही त्यांना भारतीयच मानत होतो; पण ते लोक मात्र आमच्याशी बोलताना ‘वो तुम्हारा देश, वो तुम्हारा पीएम' असा उल्लेख करीत आमच्याशी संवाद साधत त्यांचे अगाध ज्ञान वाटत होते. ‘हम मोदीको लाईक नही करते' असे सांगायला ते विसरत नव्हते. श्रीनगरच्या दल सरोवरात बोटीतून विहार करतानाही बोटवाला आमच्याशी बोलताना ‘तुम्हारे देशमे, हमारे देशमे' असा वेगळा उल्लेख करुनच बोलत होते. श्रीनगरच्या लाल चौकात एका पुस्तकालयात तेथील पुस्तके, वर्तमानपत्रे पाहण्यासाठी मी शिरलो. माझ्या बोलण्यावरुन, वागण्यावरुन मी बिगरकाश्मिरी पर्यटक असल्याचे कुणीही ओळखले असतेच. तेथील कर्मचारी मला प्रश्न विचारीत होते की ‘धारा ३७० हटानेकी वया जरुरत थी?' जणू काही मी दररोज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर चहा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नाश्ता करीत असणार असा त्यांचा कयास असावा. त्यांच्या त्या विद्वत्तापूर्ण ज्ञानाचे ते प्रदर्शन माझ्यासमोर बिनदिक्कतपणे करीत होते. याच काही फुटीरतावादी लोकांच्या उदार आश्रयामुळेच पाकिस्तानातून येणारे दहशतवादी भारतात मोठमोठे हत्याकांड कसे घडवून जातात ते वेळोवेळी सिध्द झाले आहे, त्याचा पुन्हा एकदा पडताळा २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये आला आहे. सरसकट प्रत्येक काश्मिरी नागरिक हा कट्टर धार्मिक, जिहादी मानसिकतेचा, पाकिस्तानचा हितचिंतक असे मानण्याचे काहीच कारण नाही. पण बहुसंख्य काश्मिरी हे मात्र सिमेपलिकडच्या दुश्मन देशाचे छुपे चाहते आहेत हे एक कटु सत्य आहे. ‘काश्मिर फाईल्स' चित्रपटामध्ये दाखवलेले सारेच खोटे, कपोलकल्पित, अतिरंजित, सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेले होते असे म्हणणाऱ्यांनी आता पहलगाम मधील दहशतवाद्यांनी पर्यटकांना ते कोणत्या धर्माचे होते हे विचारुनच कशा गोळ्या घालून त्यांचा जीव घेतला याचा अभ्यास केला पाहिजे. तिकडे पहलगाममध्ये आपले पर्यटक जिवानिशी मारले जात असताना त्याच दिवशी दिल्लीच्या तालकोटरा स्टेडियमवर वक्फ विरोधासाठी एकत्र येत सरकारला, पोलीसांना, भारतीय सैन्याला शिविगाळ करणाऱ्या किती भारतीय अल्पसंख्यंकांनी त्या हल्ल्याचा निषेध केला? याचाही परामर्श ‘मतलब नही सिखाता आपसमे बैर रखना' याची जपमाळ ओढणाऱ्यांनी करायची वेळ आली आहे. हे सारे अफाट ज्ञान तुम्हा आम्हाला न मागता, न शिकवणी लावता, कोणत्याही शैक्षणिक संस्थेची महागडी फी, देणगी न भरताच मिळत असते.
एकदा अशाच उष्म दिवसांत घशाला कोरड पडलेली असताना एका उसाच्या रसाच्या दुकानात शिरलो. तेथील कर्मचारी मशिनमध्ये उस घालून त्याचा रस काढीपर्यंत गल्ल्यावरच्या मालकाने मला सांगितले की ‘ते युक्रेनवर रशियाने केलेले हल्ले आता थांबले पाहिजेत. यात अमेरिकेचा हात आहे. त्यांची शस्त्रसामुग्री विकली जातेय. तिकडे इस्त्रायलने गाझा पट्टीवर आणखी तोफगोळे टाकले पाहिजेत. त्याशिवाय ते लोक सुधारणार नाहीत. नेपाळमध्ये लोकशाही नकोच; खरे तर तो मुळचा राजेशाहीवाला देश. आता लोकशाही आल्यावर एकेकाळचे भिकारी लोकप्रतिनिधी नेपाळची तिजोरी लुटुन खाताहेत. राजा कसा आधीपासूनच श्रीमंत असतो. त्याला भ्रष्टाचार करुन पैसा कमवायची गरज नसते. त्यामुळे परत राजेशाही नेपाळमध्ये आली तर जगाच्या पाठीवरच्या एकेकाळच्या त्या हिंदुराष्ट्राचे नक्की भले होईल!' उस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया अंगा असे मनाशी म्हणत मी त्या गल्ल्यावरच्या अगाध ज्ञानवाल्या दुकानमालकास (पुन्हा मनातल्या मनातच!) हात जोडले व किती पैसे झाले, असे विचारत सांगितलेली रक्कम देऊन बाहेरचा रस्ता धरला.
‘कमर उतनाही रखू क्या ? बॅकपॉकेट दो चाहिये या एकही रखू? बाटम पहलेके उतना रखू वया थोडा लुज रखु?' माझा टेलर मला विचारत होता. त्याच्या प्रश्नांना मी उत्तरे दिली. मला बोलता ठेवत त्याने तिकडे रिसिटवर मापे लिहिली. किती शिलाई झाली ते लिहिले. माझ्या कापडातून कैचीने एका टोकाचा तिरका तुकडा कापून त्याने रिसिटला स्टॅपल केला. ‘आजकल टेलरकी लाईनमे कुच मजा नही रहा! हरेका आदमी रेडिमेड कपडे पेहनने लगा है! आपभी आजकल ज्यादातर कुर्ता पायजामा मेही दिखाई देते हो! (बघा म्हणजे हेही त्याने कसं हेरुन ठेवलं होतं!) हमारी दुकानसे ज्यादा अल्ट्रेशनवाले कमाने लगे है!' असं निरीक्षणही त्याने माझ्यासमोर नोंदवले. त्यानंतर ‘ये हिंदी सवतीका निर्णय फडनवीसने कॅन्सल किया वो अच्चा किया, नही तो बीजेपी को मुंबाय मुन्शिपाल्टी इलेक्शनमे लोग उल्टीपाल्टी करके रखते थे' असं सांगायला तो कचरला नाही.
दादरहुन वाशीकडे पनवेल एस.टी.ने येत होतो. ‘सुट्टे पैसे काढा, माटुंग्याला गाडी थांबनार नाय, ओ सायेब पाय शीटवर ठेवून बसू नका' अशा सूचना देत देत तो माझ्यापर्यंत आला. मी नेमकेच पैसे दिल्यावर गडी खुश झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. मग उरलेली तिकीटे सर्वांकडून काढून झाल्यावर तो माझ्या शेजारच्याच सीटवर येऊन बसला. का कुणास ठाऊक, माझा चेहराच असा असावा, की कुणाला तरी ओळखपाळख नसतानाही माझ्याशी बोलायला आवडत असावे. कंडवटरने सुरुवात केली..‘आजकालचे टायर चांगले नसतात. पयले थर्ड डिग्री देताना पोलीस लोक म्हणे टायरमध्ये घालून मारायचे. मग गुन्हेगार घडाघडा बोलत गुन्हे कबूल करायचे. मागील वर्षभरात लय गुन्हे घडले, लय आरोपी पकडले. . बदलापूरच्या बलात्काऱ्याला पोलीसांनी एन्काऊन्टर करुन मारले. काय गरज होती? त्यापेक्षा टायरच्या आतल्या ट्युबमध्ये घालून त्याला सुजवायला पायजे होते. पाकिस्तानी घुसखोर, दहशतवादी किंवा त्यांना मदत करणारा इथला कुणी देशद्रोही पकडला तर त्याला गोळ्या घालून खतम नाय करायचा, त्याला सडवायचा, त्याला तुडवायचा, त्याला बडवायचा. त्यासाठी पोलीसांचे हात पाय कमी पडत आस्तील तर आमाला सांगा. आमी ते काम इमानदारीत फुकटमदे करुन देऊ.'
आपले काम काय, आपली नेमणूक कशासाठी, आपली जबाबदारी काय या साऱ्याचे भान विसरुन असे अनेक सामान्यजण वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटनांवर विविध प्रकारचे मतप्रदर्शन करीत असतात. अशा मतप्रदर्शनाचा ठेका काही जाड भिंगाचे चश्मे घालणाऱ्या, टीव्हीच्या पडद्यावर नित्यनेमाने झळकणाऱ्या विशेषज्ञांनीच घेतला आहे असे थोडेच आहे? साध्यातला साधा माणूसही त्याचे मत पोटतिडकीने व्यक्त करु शकतो. त्याला कमी समजण्याची काहीएक गरज नाही. त्यांच्या मांडणीत कदाचित त्रुटी, अघळपघळपणा, विस्कळीतपणा असूही शकेल. पण त्यात प्रामाणिकपणा, सच्चाई आहे, कळवळा आहे. त्याचा अनुभव घ्यायला शिकले पाहिजे. तुमच्या ज्ञानात भरच पडेल.
----राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई