पंखात बळ आले की....

पंखात बळ आले की पक्षी भुर्रकन उडून जातात; ही म्हण माणसाला लागू होत नाही. पण आपल्या अवतीभवती पावलोपावली या म्हणीचा वापर होतो. ऐवढे सांगण्याचे तात्पर्य हे की, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक नर व मादी चिमणी (चिमणी व चिमणा) आपल्या पिल्लांना ही सजीव सृष्टी दाखवण्याच्या हेतूने सिमेंटच्या जंगलात घरटं बांधण्यासाठी सुरक्षित जागा शोधत होते. त्यांना आमचे घर आवडले असावे म्हणून त्यांनी आमच्या हॉलच्या पी. ओ. पी. च्या एका थराच्या आतल्या बाजूला संपूर्ण हॉलमध्ये फिरून घरटं कुठे व कसे तयार करता येईल म्हणून सर्वे करायला सुरुवात केली.

दोन दिवसाच्या सर्वेक्षणानंतर खिडकीच्या अगदी जवळच्या आतल्या बाजूला त्यांनी घरट्यासाठी जागा पक्की केली. तिथे पांच सहा इंच जागा असल्याने बरोबर कोपर्यात त्यांनी गवत, काडी, कापूस, दोरीचे धागे ई. असं मिळेल ते उचलून काडी-काडी जमा करायला सुरुवात केली. सुरुवातीला सौ. मिनाक्षी व मला घर घाण होईल म्हणून हे बरोबर वाटत नव्हते. पण तरीही एक वेळत्यांना संधी देऊन त्यांच्या घरट्यात होणारे बदल दररोज पाहू लागलो. त्यांनी त्या थराच्या आतल्या बाजूला घरटं बांधतांना पूढे चार-पाच इंच घरटे वाढवले. जेणेकरून अंडी व नंतर बाळे खाली पडू नयेत म्हणून हे त्यांनी केले. अगदीच सुग्रणीसारखे बाभळीच्या झाडाला लटकलेले घरटं बांधण्याइतपत त्यांना मेहनत करावी लागली नाही. पण ते त्यांनी खूप सुबकपणे बनवले होते.

 मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरटं तयार होऊन अंडी देण्याची तयारी त्यांनी पूर्ण केली व बाळांचा जन्म झालासुद्धा. लहान बाळांनी भूक लागली की टाहो फोडावा तद्वतच पिल्लांचा इवलसा चिवचिव आवाज कानी पडायला सुरुवात झाली. शिशू पिल्लांची भूक जास्त असते. शिवाय चिमणीचे बाळ पूर्णपणे आई-वडिलांवर अवलंबून असते.  त्याला अन्न आणि संरक्षण मिळवण्यासाठी नर व मादी चिमणीवरअवलंबून राहावे लागते. म्हणून नर व मादी चिमणीच्या पायाला भिंगरी बांधावी तशे ते अन्न आणूनत्या पिलांना भरवण्यात एक एक दिवस घालवत होते. त्यांच्या या चिवचिवाटामुळे आम्हाला आमचेकन्या चैत्राली व चिरंजीव प्रज्वल घरीच आहेत याचा फिल येत होता. एक एक दिवस पुढे पुढे जात होता. रात्री बरोबर साडेसात-आठ वाजता तो चिवचिवाट थांबे. रात्रभर चांगली झोप घेतली की बरोबर सकाळीसहा-साडेसहा वाजता चिवचिव आवाज चालू होत असे. पिल्ले स्वतःच्या पायावर उभे राहून चालायला लागले तसे त्यांना त्यांच्या पालक चिमणी जोडीने दिवसभर संपूर्ण घरात फिरायला शिकवले. हळूहळू पंख फूटुन त्यांच देखणं रूप आमच्या नजरेला पडायला लागले होते. घरट्याच्या आतील आवाज आत्ता हॉलच्या प्रत्येक कोपऱ्यातून ऐकू येत होता. एक दिवस फिरता फिरता एक पिल्लाचा एक पाय बाहेर घसरला होता. पिल्लू पडतो की काय म्हणेपर्यत ते पिल्लू सावरले व अनर्थ टळला. अशा रितीने त्यांचे शेवटचे उडण्याचे प्रशिक्षण चालू होते. या प्रशिक्षणात मोठा अडथळा होता तो म्हणजे जमले नाही तर, जीव गमवावा लागणार होता. याची कल्पना त्या मातापित्यांना होती. दोन तीन रात्री पिल्लांना एकट्यांना सोडून पालक जोडी बाहेर थांबली तेव्हा, मात्र त्यांच्या चिवचिवाटाला पारावार उरला नाही.

पण हाही त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग असावा. आपल्यासारखी त्यांची कुटुंब व्यवस्था सध्यातरी अस्तित्वात नाही. या जगात त्यांना एकट्यानेच राहायचे असते आणि अशा रितीने एक दिवसी एका पिल्लाने आपल्या पालकांच्या मदतीने मोकळा श्वास घेतला. पण दुसरे पिल्लू घरातच एक दोन दिवस अडकले. चिमणी पालक दिवस असतांना येत होते; पण रात्री त्याला एकट्याला राहावे लागे. काल परवा त्या दुसऱ्या पिल्लाने स्वतःहून आकाशात झेप घेतली. पण या नवख्या सर्वत्र दिसणाऱ्या सिमेंटच्या जंगलात कोणी ओळखीचे भेटले नाही. चिवचिव करून पालक चिमणीला बोलावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण अजून तरी त्या पिल्लाला ते किंवा दुसरा चिमणी समूह भेटलेला दिसत नाही. कारण ते पिल्लू येथेच घरात डोकावून चिवचिवाट करीत आहे. खरतर जंगल कमी झाल्याने ही परिस्थिती या पक्षांवर आलेली आहे. थव्याने उडायला तेवढे पक्षी एकत्र येत नाहीत. पण कौतुकास्पद बाब ही आहे की, चिमणी नर-मादी दोघे मिळून घर बांधतात, जबाबदारीने बाळांचे संगोपन करतात, अंड्यांंतून बाहेर आलेली कोवळी-कोवळी पिल्लांना दोघेही भरवतात, त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांच्या सोबत थांबतात व एकदा का ती आकाशात झेप घेण्याची झाली की, आपापल्या मार्गाने निघून जातात. ती कधीही न भेटण्यासाठी. चिमणीचे बाळ साधारणपणे तीन आठवड्यांमध्ये मोठे होते.  एका निरक्षणानुसार, समशीतोष्ण देशांमध्ये पिल्ले तीन आठवड्यांपेक्षा कमी वयाची किंवा उष्ण कटिबंधीय देशांमध्ये सुमारे २५ दिवसांची झाल्यावर उडून जातात.  नीतीमत्ता व सामाजिक उत्तरदायित्वात चिमण्या माणसाच्या खूप पुढे आहेत. एकदा जोडीदार म्हणून परस्परांना निवडलं की जन्मभर एकमेकांना सोडत नाहीत. माणसं मात्र आज नीतीमत्ता सोडून वागत आहेत याचं वाईट वाटतंय. - प्रा. डॉ. श्रीकृष्ण दिगंबर तुपारे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

समज पूर्वक वाचन - जीवन आणि शिक्षण यामधील अंतर कमी करण्याचे साधन