टीचभर पोट
मुंबईत आला आणि उपाशी राहिला असं होऊच शकत नाही. जो मुंबईत उपाशी राहिला.. तो जगात कुठेच पोट भरू शकत नाही असं म्हणण्यापेक्षा जगात कुठेही उपाशीपोटी असला तरी जो मुंबईत आला तो पोटभर जेवला. म्हणुनच मुंबईवर सगळ्यांचा डोळा!
नमस्कार मंडळी मी आता जीवनाच्या अनकट वाटेवर दुर्लाक्षित; पण नकळत मनात रुंजी घालत आयुष्य जगायला लावणारी अनेक माणसं दिसतात. काही भेटतात, काही निघून जातात. काही नात्याने जवळ असतात.. पण खुप दुर असतात. काही इतकी दुर असतात..काही क्षणभर भेटतात; पण देउन जातात खुप काही. सगळे असते बरोबर; पण ते आपले काहीच नसते. महापुरुषांचे विचारसुध्दा आपण विसरलेले असतो. उगाचच आम्ही त्यांच्या विचारांचे पाईक आहोत हे फक्त भासवतो..खरं म्हणजे प्रत्येकाला या जगात आपली इमेज किंवा ओळख तयार करायची असते. पैसा, प्रसिद्धी, सत्ता, संपत्ती कशासाठी? तर टिचभर पोटासाठी आणि एकदा का पोट भरले की सुविचार सुचायला लागतात आणि उपाशीपोटी वेदना सुचतात. मी पोटाने तृप्त आहे; पण समाजात फिरताना मला वेदना होतात दिसतात. मग त्या कागदावर लिहून काढतो. म्हणून माझ्या पहिल्या पुस्तकाचे नांव ‘पडसाद एक व्यथासंग्रह' असे ठेवले होते. तत्कालीन आदरणीय लोकसभा अध्यक्ष प्रि. मनोहर जोशी यांनी प्रस्तावना लिहिली होती. त्यांना जेव्हा मी भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यांना माझा व्यथासंग्रह हा शब्द खुप आवडला. ते मला म्हणाले, तु लोकांच्या व्यथा मांडतोय. मी नक्की पुस्तकाला प्रस्तावना देईन आणि ती दिली. हा माझा सन्मान समजतो. अरे यार, पुन्हा भरकटलो.
माझा आजच्या विषयापासून थोडा दुर झालो. विषय होता टीचभर पोट. मागील खेपेस चण्याची पुडी हा त्याच अनुषंगाने लिहिला होता. आज त्याच चण्याच्या पुडीचा आधार घेत एक व्यक्तीची ओळख. स्थळ अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज पार्क कट्टा आणि एक गोलाकार फेरफटका. या लेखासोबत एक फोटो दिसतोय. वरकरणी पाहता तो पुतळा वाटतो.. पण तो पुतळा नसून एक मुलगा आहे. संपूर्ण अंगाला चेहऱ्यासकट सोनेरी रंग लावतो आणि एकाच पोझिशनमध्ये म्हणजे पुतळ्यासारखा तासन्तास उभा राहतो. तो हात पसरून भीक मागत नाही; पण हे उदरनिर्वाहाचे साधन. मुंबईत आला आणि उपाशी राहिला असं होऊच शकत नाही. जो मुंबईत उपाशी राहिला.. तो जगात कुठेच पोट भरू शकत नाही असं म्हणण्यापेक्षा जगात कुठेही उपाशीपोटी असला तरी जो मुंबईत आला तो पोटभर जेवला. म्हणुनच मुंबईवर सगळ्यांचा डोळा! जग हादरवण्याची ताकद या मुंबई आणि मुंबईकरांत आहे. आता माझ्या म्हणण्याचा रोख ध्यानात आला असेलच. मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणूस. माझे अस्तिवच मुळी माझ्या असण्यात आहे हे सिद्ध करवून दाखवण्याची आहे. जर एक अनामिक पुतळा बनून पोट भरतो आणि मी फक्त पोट भरायचे साधन शोधतो. प्रत्येक प्रांत प्रत्येक व्यवसाय माझा आहे. मी पुतळा बनणार नाही. त्याच्याकडून प्रेरणा मात्र घेईन. - राजन वसंत देसाई