चला वाचू आनंदे
‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते' ज्ञानासारखी अन्य कोणतीही पवित्र वस्तू या साऱ्या विश्वात नाही. हे ज्ञान मिळविण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे पुस्तक होय! दरवर्षी २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा केला जातो. युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे या हेतूने जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. आपल्याला कल्पना आहे की, मानवी जीवनात पुस्तकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्तकांमुळेच आपले व्यक्तिमत्त्व बहुआयामी, बहुढंगी होते. याचाच अर्थ, ही पुस्तके वाचूनच आपली ज्ञानवृद्धी होते.
पुस्तकांमुळे आपली चित्तशुद्धी होते. आपली बुद्धी तीक्ष्ण, तल्लख व कुशाग्र होते. आपणांस बहुश्रुतता प्राप्त होते. आपल्या मनाचे रंजन होत असते. वाचन आणि पुस्तके यांत अगदी निकटचा संबंध आहे. त्याकरिता ‘मानवी जीवनात वाचनाचे व पुस्तकांचे महत्त्व' या विषयावर अधिक भाष्य करणारा ‘चला, वाचू आनंदे' हा लेख चोखंदळ वाचकांसमोर सादर करतांना मला मनस्वी आनंद होत आहे.
मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान बहून
दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः
याचा अर्थ आहे की, ‘वाचनामुळे आपल्याला अनेक विषयांचे आकलन होते. वाचन केल्यानेच आपण आपल्या कार्यात दक्ष होतो, आपणांस बहुश्रुतता प्राप्त होते.'शालेय जीवनात एक शिक्षक व एक विद्यार्थी म्हणून वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाचन म्हणजे एखाद्या लिखित अथवा मुद्रित मजकुराचा अर्थ लावणे व समजून घेणे. वाचन म्हणजे केवळ अक्षरांची ओळख नसून एखाद्या मजकुरातील आशय समजून घेणे, एखादी गोष्ट आकलन करून घेणे, विचार करून त्याद्वारे उचित असे निष्कर्ष काढणे होय. वाचनाचे मूकवाचन व प्रकटवाचन किंवा मुखवाचन असे प्रमुख दोन प्रकार पडतात.
१. मूकवाचन (Slient Reading) - हे वाचन मनात केले जाते. आवाज न करता, डोळ्यांनीच शब्दांचा मागोवा घेत वाचन केले जाते. हे वाचन जलद आणि अधिक परिणामकारक असते.
२. प्रकटवाचन किंवा मुखवाचन (Loud Reading) - हे वाचन मोठ्याने, आवाज करून केले जाते. शिक्षक, विद्यार्थी किंवा वक्ते याचा उपयोग करतात. यात उच्चार, स्वर आणि शब्दोच्चार यावर भर असतो.
गोष्ट व कथा, कादंबरी, व्यक्तीचरित्र, नाटक, कविता, प्रवासवर्णन, प्रसंगवर्णन, आत्मचरित्र, निबंध, ललित लेखन, वर्तमानपत्र नियतकालिके व दिवाळी अंक अशा विविध रूपांतील साहित्य व आपल्या शालेय अभ्यासक्रमाची विविध प्रकारची पाठ्यपुस्तके आणि इतर पुस्तके व ग्रंथ आपण वाचत असतो. वाचनाच्या माध्यमातून आपल्याला विविध विषयांचे ज्ञान मिळते, विविध गोष्टींची माहिती समजते, अनेक क्षेत्रातील विविध प्रकारच्या व्यक्ती ते समष्टीचे अनुभव मिळतात. तसेच आपले मनोरंजनही होते. विविध साहित्यकृती वाचून आपल्या मनाला शांती प्राप्त होऊन आपल्या चित्तवृत्ती स्थिर व शांत होत असतात. वाचन आणि पुस्तके व ग्रंथ यांचा निकटचा संबंध असल्याने मानवी जीवनात वाचन व पुस्तके यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. साने गुरुजींचे ‘पुस्तकांमध्ये माणसाचं खरं आयुष्य लपलेलं असतं.' हे विधान आपल्याला अधिक अंतर्मुख करते.
पुस्तकांमध्ये उत्कृष्ट लेखकांचे, प्रतिभावंत साहित्यिकांचे जीवन अनुभव आणि प्रगल्भ व सारासार विचार असतात. त्यांची पुस्तके वाचून आपण त्यांचे उच्च विचार जाणून घेऊ शकतो. आपण स्थळ-काळाच्या भिंती ओलांडून लेखकांच्या जीवनानुभवांची प्रत्यक्ष अनुभूती घेऊ शकतो. ज्यातून आपण स्वतः ज्ञानसंपन्न व गुणसंपन्न होऊन बहुश्रुत होतो. आपल्यात हजरजबाबीपणा येतो.
सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन यांनी म्हटले आहे की, ”वाचनाने परिपूर्ण माणूस घडतो. एक चांगला वाचक एक चांगले व्यक्तिमत्त्व विकसित करतो.” पुस्तकांमध्ये ज्ञानाचे अंकुर असतात. चांगली पुस्तके चांगला नैतिक सल्ला देतात. पुस्तके वाचतांना काही मर्यादा आहेत. अथांग ज्ञानरुपी सागरातून ज्ञानामृत मिळवायचे असेल तर काही गोष्टी आपण निश्चितच लक्षात घेऊन व वेळेचे नियोजन करून शालेय जीवनात जास्तीत जास्त उत्तम पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. एक विद्यार्थी किंवा एक शिक्षक म्हणून मी कोणत्या प्रकारचे वाचन करावे? समाजाचा एक जाणकार घटक म्हणून मला कशाचे वाचन करणे हितावह आहे, हे लक्षात घेऊन आपण विविध प्रकारचे वाचन केले पाहिजे.
शीलं सद्गुणसम्पत्तिः ज्ञानं विज्ञानमेव च
उत्साहो वर्धते येन वाचनं तद हितावहम
मला असे वाचन करणे हितावह आहे की, ज्यामुळे आपले शील वा चारित्र्य व सद्गुणरुपी संपत्ती यांची वृद्धी होते, आपले ज्ञान व विज्ञान तसेच आपल्यातील उत्साह वाढतो. हे लक्षात घेऊनच आपण प्रत्यकाने आपल्या आवडीनुसार व सवडीनुसार आवश्यक त्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. एक विद्यार्थी म्हणून मी रामायण-महाभारतातील गोष्टी, हितोपदेश, पंचतंत्र आदी गोष्टींचे वाचन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय अभ्यासक्रमाची विविध प्रकारची पाठ्यपुस्तके मनःपूर्वक वाचून समजून घेतली पाहिजेत.
संस्कार कथा, शौर्य कथा, मूल्यवर्धनात्मक कथा आदी कथांचे वाचन केले पाहिजे. तर एक शिक्षक व देशाचा सुजाण व कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपण सर्वांनी मन व शरीरयांचे स्वास्थ्य जपणाऱ्या गोष्टींचे ज्ञान आपण विविध पुस्तके वाचून मिळविले पाहिजे. तसेच आपल्या भारत देशाचा प्राचीन ते आजतागायतचा दैदीप्यमान इतिहास आपण वाचून समजून घेतला पाहिजे. आपण आपल्या भारतीय ज्ञान प्रणालीचा इतिहास व परंपरा समजून घेतली पाहिजे. वाचनाद्वारे आपण आपले विज्ञान, नीतिशास्त्र खगोलशास्त्र, संगीत जाणून घेतले पाहिजे. वेद, शास्त्र, पुराणे, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत; संत-पंत-तंत साहित्य; आदी धार्मिक व आध्यात्मिक वाङ्मय तसेच गोष्ट व कथा, कादंबरी, काव्य, व्यक्तीचरित्र, नाटक, प्रवासवर्णन, प्रसंगवर्णन, आत्मचरित्र, निबंध, ललितलेखन, वर्तमानपत्र नियतकालिके व दिवाळी अंक अशा विविध रूपांतील साहित्य आणि इतर पुस्तके व ग्रंथ आपण वाचलेच पाहिजेत. आज माहिती व तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात इंटरनेटवरही डिजिटल स्वरूपात हा ज्ञानाचा खजिना उपलब्ध आहे. इंटरनेटवरील ज्ञानाचा खजिना आपण आपल्या उपयुक्ततेनुसार व वेळेनुसार वाचला पाहिजे, त्यातील ज्ञान समजून तले पाहिजे.
चांगल्या पुस्तकांच्या वाचनानेच आपल्यावर उत्तम संस्कार व सवयींचे बीजारोपण होत असते. उत्तम व चांगली पुस्तके वाचनाने आपला नावलौकिक होत असतो. चांगली पुस्तके आपल्यावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतात आणि आपल्या आयुष्याला ती योग्य दिशेने नेतात. पुस्तकांमुळेच आपल्यात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. वाचनामुळे भाषेची कौशल्ये आणि शब्दसंग्रह विकसित होऊन आपल्याला भाषिक व वैचारिक प्रगल्भता प्राप्त होते. नवनिर्मितीची क्षमता विकसित होऊन नवीन लेखन करण्याची ताकद आपल्यात निर्माण होत असते. आपले संप्रेषण कौशल्य विकसित होते. वाचनानेच आपली एकाग्रता शक्ती विकसित होत असते. आपल्या मनाचे रंजन होत असते. पुस्तकांमुळेच आपले व्यक्तिमत्त्व बहुआयामी, बहुढंगी होते. आपण अष्टपैलू होतो.ग्रंथ हे आपले उत्तम व सच्चे मित्र तर असतातच; पण आपले गुरु असतात. ते आपल्याला आपल्या चुकांची जाणीव करून देतात व त्या चूका पुन्हा कधीही होणार नाहीत यासाठी मार्गदर्शन करत असतात.
विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते
म्हणूनच तर आज आपण आदी वाल्मिकी, विश्वामित्र, शंकराचार्य, गौतम बुद्ध, भगवान महावीर, आर्यभट्ट, वराहमिहीर, नागार्जुन, सुश्रुत, कालिदास, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदास, संत तुलसीदास, संत कबीर, संत सूरदास आदी संतांचे व महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, अरविंद घोष, रवींद्रनाथ टागोर, डॉ.अब्दुल कलाम, डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ.जयंत नारळीकर, डॉ.प्रकाश आमटे आदी भारतीय विचारवंतांचे तसेच अब्राहम लिंकन, रुसो, प्लेटो, अरस्तू, मार्टिन ल्युथर किंग, विल्यम शेक्सपिअर, विल्यम वर्ड्सवर्थ, रसेल आदी पाश्चात्य विचारवंतांचे साहित्यही आवर्जून वाचले पाहिजे. कारण पुस्तकांमुळे आपण जगाचे विचार घेऊन आपले विचारही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवून योग्य ते परिवर्तन घडवून आणू शकतो.पुस्तके आपल्यात योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता विकसित करतात. आपल्या दैनंदिन जीवनात भवताली घडणाऱ्या नानाविध प्रसंग व घडामोडींचे ज्ञान व आकलन वाचनाने होत असते. आपण आपल्या अंगी वाचनाच्या चांगल्या सवयी बाणवल्या तर आपल्याला आपल्या जीवनात कधीही कंटाळा व थकवा येत नाही तसेच आपल्याला कधीही एकाकीपणा वाटत नाही.चांगल्या पुस्तकांच्या व ग्रंथांच्या संदर्भात वरील सर्व बाबी आपण लक्षात घेता - आपल्याला आजच्या स्पर्धेच्या युगात यशस्वी वाटचाल करायची असेल, आपल्याला इतरांपेक्षा अधिक स्मार्ट व हुशार बनायचे असेल, आपल्यातील ताणतणावांना अपल्यापासून कायमचे दूर करायचे असेल, आपली उन्नती व प्रगती साधून आपल्या देशाचा योग्य दिशेने विकास घडवून आणायचा असेल तर आपल्याला उत्तम पुस्तकांच्या वाचनाशिवाय तरणोपाय नाही!
संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात
"वाचूनिया वाचाल तेव्हाचि शहाणे”
केवळ पुस्तकं वाचून नाही तर वाचलेल्या गोष्टी समजून घेतल्यावरच शहाणपण येते, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. इंटरनेटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब आदींमध्ये नको तिथे व नको त्या गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपण वेळेचा सदुपयोग म्हणून त्याद्वारे आपल्याला आवश्यक त्या गोष्टींचे वाचन केले तर आपल्या जीवनाचे सोने होईल. वाढदिवसाच्या वेळी केक कापून, इतरांना पुष्पगुच्छ देऊन आपला वाढदिवस साजरा करण्यापेक्षा चांगली व उपयुक्त अशी पुस्तके एकमेकांना वाटून वाढदिवस साजरा करावा. आपल्या कुटुंबात एखादया व्यक्तीचे निधन झाले असल्या नातेवाईक व परिवारातील व्यक्ती यांनी शाळेला किंवा एखाद्या वाचनालयाला ग्रंथ वा पुस्तक दान करावे. लग्न-सोहळ्यात पुष्पगुच्छ व वस्त्रभेट देण्यापेक्षा एखाद्या शाळेला किंवा एखाद्या वाचनालयाला पुस्तके भेट द्यावीत. शासनाने व उद्योजक, धनवान आणि दानशूर व्यक्तींच्या सहयोगाने व लोक सहभागातून ‘गाव तिथे वाचनालय' व ‘शाळा तिथे ग्रंथालय', डिजिटल स्वरूपातील विशेष वाचनालय अशा चळवळी उभारून वाचन चळवळ उभारत प्रोत्साहन दिले पाहिजे. वाचन चळवळीच्या विकासासाठी शासनाने विशेष आर्थिक तरतूद केली पाहिजे. शासनाने व सेवाभावी संस्थांनी, ग्रंथप्रेमींनी जुन्या आणि प्राचीन अशा दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटल स्वरूपात जतन करण्याची मोहीम विशेषत्वाने राबवून सर्वसामान्य वाचकांना त्याचा लाभ करून दिला पाहिजे. या वाचन चळवळीच्या यशस्वीतेसाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक यांसह समाजातील सर्व घटकांनी सहकार्य व मदत केली पाहिजे. कदाचित, त्यातून वैचारिक क्रांतीने मनमशाली पेटून इतरांना प्रबोधनाचा वा उन्नतीचा नवा मार्ग सापडू शकेल. म्हणूनच आपण सर्वजण ‘वाचाल तर वाचाले' हा मंत्र जपू या! अनेक उत्तमोत्तम पुस्तकांचे वाचन करण्याचा ठाम निर्धार करू या!! यशाची उत्तुंग शिखरे काबीज करण्यासाठी ‘चला, वाचू आनंदेे' - सुनील मारुती म्हसकर