शरम

"अरे, काही लाज, शरम आहे का तुला? सारखा मागे वळून बघतोस माझ्याकडे,” संतापलेल्या नेहाने विचारले.

श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी असलेली नेहा खुपच आकर्षक होती. गव्हाळ वर्ण, मध्यम उंची, सडपातळ बांधा, खांद्यावर विसावणारे मोकळे केस, लाल रंगाचा स्लीवलेस टॅाप, काळी जीन्स, हिऱ्यांची अंगठी, इम्पोर्टेड गॉगल, महागडे घड्याळ, पर्स आणि मोबाईल. नेहा मुंबईतील बॅडमिंटन टूर्नामेंट जिंकून आज सकाळीच परत आली आणि तीला एकदम आठवले की आज परीक्षा फी भरण्याचा शेवटचा दिवस आहे. झटपट तयार होऊन ती कॅालेजला आली. रांगेत सर्वात शेवटी नेहा, तिच्यापुढे राज आणि राजच्या पुढे ३-४ मुलं.

"ताई, मी तुमच्याकडे नाही बघत, मी त्या मागच्या जुन्या गेटकडे बघतोय.” राज म्हणाला. सौंदर्य सम्राज्ञी आणि कॅालेज क्वीन असलेल्या माझ्याकडे न पाहता हा जुन्या गेटकडे पहातोय? नेहाचा अहंकार दुखावला गेला. जरा चिडूनच ती म्हणाली, "तुला कॉलेजला कधी बघितलं नाही, क्लास बुडवून टवाळक्या करत असशील, आई-वडिलांच्या जीवावर.”
"ताई, मी क्लास बुडवतो हे खरं आहे; पण टवाळक्या करण्यासाठी नाही तर काम करून पैसे मिळवण्यासाठी. घरची परिस्थिती अगदीच बेताची आहे; पण शिकण्याची तीव्र इच्छा आहे म्हणून मी दिवसभर काम करतो आणि रात्री घरीच अभ्यास करतो.”

नेहा मनातल्या मनात शरमली. तीने राजकडे निरखून बघितले. मध्यम उंची, सावळा वर्ण, विस्कटलेले केस, चुरगळलेली पँंट आणि तसाच शर्ट, पायात जीर्ण झालेल्या चपला, हातात ना अंगठी, ना घड्याळ, ना मोबाईल. खरोखरच हा गरीब घरातील दिसतो, उगीचच मी त्याच्यावर वृथा आरोप केला.

"पण तू त्या मागच्या जुन्या गेटकडे का बघतोस?” नेहाने विचारले. आज फी भरण्याचा शेवटचा दिवस, पैसे नव्हते म्हणून बाबा त्यांच्या साहेबांकडून पैसे उसने घेऊन मला आणून देणार आहेत. ते जुने गेट म्हणजे माझ्या घराकडून कॅालेजला येण्याचा जवळचा मार्ग. कॅश काउंटर बंद व्हायला थोडाच वेळ आहे आणि म्हणून मी चातकासारखी त्यांच्या येण्याची वाट पाहतोय,” राज म्हणाला.

राजचे वडील राम, हे एका प्रायव्हेट कंपनीत शिपायाचे काम करीत. भरपूर काम, पण कमी पगार त्यामुळे राजला आणि त्याच्या आईलाही काम करावे लागे, तेव्हा कुठे कसेबसे घर चाले. आज आबासाहेबांचा जवळचा मित्र, खूप दिवसांनी त्यांना भेटायला आला होता. गेले काही महिने तो आजारी होता आणि आबासाहेबांनी त्याच्या आजारपणात त्याला खूप मदत केली होती. जीवाभावाच्या मित्रांच्या छान गप्पा रंगल्या होत्या.

"राम, दोन कप चहा आण,” आबासाहेबांनी फर्मावले. लगबगीने दोन कप चहा घेऊन, राम आबासाहेबांच्या केबिनमध्ये दाखल झाला. आबासाहेब हेच का हो, ते राम ज्यांनी ४ वेळा मला रक्त दिले?” आबासाहेबांच्या मित्राने विचारले.

"हो,” आबासाहेब म्हणालेत.  
"धन्यवाद राम, तुमच्यामुळेच माझा जीव वाचला,” असे म्हणत आबासाहेबांच्या मित्राने ५००० रुपये रामला बक्षीस दिलेत. राम जाम खुष झाला. कारण आता राजच्या फीसाठी त्याला आबासाहेबांकडे पैसे मागावे लागणार नव्हते.

"साहेब, माझ्या मुलाच्या परीक्षेची फी भरायची आहे, मी एका तासात जाऊन येतो.” राम म्हणाला. "ठीक आहे राम, पण जाण्याआधी मला ते ५००० रुपये परत कर. कारण तू जेव्हा जेव्हा रक्त दिलेस त्या प्रत्येक वेळी मी तुला १००० रूपये दिले होते,” आबासाहेब म्हणालेत. "साहेब हे पैसे तुम्ही मला दिलेले ॲडव्हान्स समजा, मी महीन्याला १००० रूपयेप्रमाणे ते परत करेन, आज या ५००० रूपयांची मला खूप आवश्यकता आहे. माझ्या मुलाची फी भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. माझ्यावर दया करा साहेब, कृपा करून ते पैसे परत घेऊ नका.”

"नाही राम, मला ते पैसे हवे आहेत, दे ते पैसे मला. पैसे घेऊन आबासाहेबांनी फोन लावला. बेटी, तुझ्या पार्टीसाठी मी हॅाटेल ताज बुक केले आहे आणि हो, तुला तिथे जायची गरज नाही मी माझ्या नोकराला २५००० रुपये ॲडव्हान्स भरायला पाठवतो आहे.”

"राम हे घे २५००० रूपये. हॉटेल ताजला जाऊन ॲडव्हान्स भर आणि त्यानंतर तू ऑफिसला आला नाहीस तरी चालेल,” आबासाहेबांनी सांगितले. आबासाहेबांनी सांगितलेले काम उरकून राम खिन्न मनाने घरी पोहोचला.

"अहो, राज कॉलेजला गेला आहे आणि त्याने तुम्हाला पैसे घेऊन तिथेच बोलवले आहे, तुम्ही लगेचच जा,” सीताबाईंनी सांगितले. "सीता, अगं पैशाची व्यवस्था नाही झाली. साहेबांनी नाही दिलेत मला पैसे,” राम रडवेल्या स्वरात म्हणाला. अचानक रामची नजर सीताबाईंच्या गळ्याकडे गेली. "सीता, एक मार्ग आहे आपल्याकडे,” राम म्हणाला. तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र जर आपण गहाण ठेवले तर आपल्याला पैशाची व्यवस्था नक्कीच करता येईल.” मोठ्या आशेने राम म्हणाला.

"मंगळसूत्र?” डोळ्यातलं पाणी पदराला पुसत सीताबाईंनी मंगळसूत्र काढून दिले.
"ताई, माझे बाबा आलेत,” राज आनंदाने म्हणाला.  नेहाने मागे वळून बघितले. चुरगळलेला हाफ बाह्यांचा शर्ट, पायजमा, जुनाट स्लीपर्स, खोल गेलेले डोळे, सुकलेला चेहऱा आणि खूपच थकलेला इसम हळूहळू पुढे येत होता. "बाबा, तुम्ही अगदी वेळेत आलात, माझा नंबर येईलच आता,” राज म्हणाला. "बेटा, मी पैशाची व्यवस्था नाही करू शकलो रे, साहेबांनी पैसे देण्यास नकार दिला. मी खूप विनवणी केली पण त्यांना दया आली नाही रे पोरा.” बाबा, तुमच्या हातात ते काय आहे?” राजने विचारले. ”तुझ्या आईचे मंगळसूत्र, ते गहाण ठेवून मी पैसे आणणार होतो; परंतु आज सराफ बाजार बंद असल्याने तो मार्गही खुंटला. माफ कर तुझ्या अभागी बापाला.”

तेवढ्यात राजचा नंबर आला. "ताई, जा तुम्ही” राज म्हणाला. "मॅम, फी फक्त ५००० रुपये आहे आणि तुम्ही तर १०००० रुपये दिलेत,” कॅशियर म्हणाला.” हे पैसे माझ्या आणि राजच्या फीचे,” नेहा म्हणाली. उदास होऊन घरी परत जाणाऱ्या राजला नेहाने हाक मारली. "काय ताई?” म्हणत राज माघारी फिरला.

"राज, ही घे तुझ्या फीची रिसीट, मी भरली तुझी फी, पण ते मंगळसूत्र मी माझ्याकडे ठेवणार, माझे पैसे परत मिळेपर्यंत.” धन्यवाद ताई असे म्हणत राज आणि त्याच्या वडिलांनीसुध्दा नेहाला अगदी वाकून नमस्कार केल्याने नेहा शरमली.

परीक्षा जवळ आली तसा राजने अभ्यास वाढवला. शेवटचे २ आठवडे तर तो रात्रभर अभ्यास करत होता. दिवसा काम नी रात्रभर अभ्यास. राजला पेपर्स छान गेले. परवाच राजचा रिझल्ट लागला. राज जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. शिक्षणाधिकारी साहेबांनी स्वतः राजच्या घरी जाऊन त्याचे अभिनंदन केले आणि त्याला ५००० रुपये रोख बक्षीस दिले. राज खूप खुश झाला. "बेटा, एक चांगला शर्ट, पँट आणि चप्पल घे या पैशातून,” आई म्हणाली.

"मला खूप कपडे आहेत आई. हे पैसे मला वापरायचे आहेत एका खूप खास कामासाठी.”
"कोणते काम बेटा?” आईने विचारले. तुला लवकरच समजेल आई, जरा दम धर,” राज ऊत्तरला.

आईचे लक्ष नसताना, राजने नेहाचा पत्ता आणि ५००० रुपये त्याच्या बाबांना दिले, आईचे मंगळसूत्र सोडवून आणण्यासाठी. संध्याकाळी साहेबांची परवानगी घेऊन राम लवकरच ऑफिसमधून निघाला आणि राजने दिलेल्या नेहाच्या पत्त्यावर पोहोचला. "बेटी, मी तुझे ५००० रुपये परत करायला आलोय.” राम म्हणाला. बसा ना काका, मी काकूंचे मंगळसूत्र देते तुम्हाला,” पैसे घेत नेहा म्हणाली. "चहा घेणार का काका?” नेहाने विचारले. "नको नको बेटी, तुझ्यातील मायेने मन भारावते बेटी, देव तूला सदैव सुखी ठेवो.”

आबासाहेब ऑफिसमधून घरी जायला निघाले आणि त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या पाकिटातील ५००० रुपये कमी झालेत. राम घरी लवकर गेला म्हणजे रामनेच पैसे चोरले असणार. त्याला नेहेमीच पैशांची चणचण भासत असते, सोपा मार्ग म्हणून त्यानेच चोरी केली असणार. आबासाहेबांच्या मनातील रामबद्दलचा राग अजूनच वाढला. आबासाहेब घरी पोहोचले आणि बघतात तर काय, राम त्यांच्या घरात होता. "राम तु इथे कसा?” आबासाहेबांनी रागाने विचारले. "पप्पा, मी  दिलेले ५००० रुपये परत करायला ते आलेत. तुम्ही त्यांना कसे ओळखता?” नेहाने आश्चर्याने विचारले.

"बेटी, हा माझ्या ऑफिसमधला नोकर आहे आणि माझेच चोरलेले ५००० रुपये तो तुला देतोय.”
"हे काय काका? हे शोभते का तुम्हाला?” नेहाने चिडून विचारले.
"बेटी, मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, हे पैसे चोरीचे नाहीत, हे माझ्या राजला मिळालेल्या बक्षिसाचे पैसे आहेत,” राम कळवळून म्हणाला.
"खोटारडा कुठला, म्हणत आबासाहेबांनी रामला धक्के देत घराबाहेर काढून दम भरला, परत फिरकू नकोस इकडे.”

५००० रूपये रामने नेहाला दिले. पण तरीही तो सीताबाईंचे मंगळसूत्र मिळवू शकला नाही. रिकाम्या हातानेच राम घरी परतला. नेहा ताईंच्या घरी काय घडले ते रामने राजला आणि सीताबाईंना सविस्तर सांगितले. आबासाहेबांनी राजच्या बाबांवर घ्ोतलेला चोरीचा आरोप आणि त्यावर नेहानेही विश्वास ठेवला हे ऐकून राज व्यथित झाला.

"बेटी, मी क्लबला जाऊन येतो” म्हणत आबासाहेब घराबाहेर पडलेत. दोनच मिनिटांनी  आबासाहेबांचा फोन वाजला, आबासाहेब फोन घरीच विसरले होते. फोन आबासाहेबांच्या सेक्रेटरीचा होता आणि त्यांनी सांगितले की आबासाहेबांच्या पाकिटातील ५००० रुपये त्यांच्याच खुर्चीखाली पडले होते, उद्या मी त्यांना देईन. नेहा मनातल्या मनात शरमली. एका चांगल्या माणसाला तिने आणि आबासाहेबांनी चोर ठरविले होते. आबासाहेबांनी तर निर्दयपणे, अगदी धक्के मारत त्यांना घराबाहेर काढले होते.

थोड्याच वेळात नेहाचा फोन वाजला, फोन कॉलेजच्या प्राचार्यांचा होता. नेहा, उद्या तुझा आणि राजचा कॉलेजमध्ये सत्कार करण्यात येणार आहे. राज संपूर्ण जिल्ह्यात पहिला आणि तू मुलींमध्ये पहिली म्हणून. आज खुद्द शिक्षणाधिकारी साहेबांनी राजच्या घरी जाऊन त्याचे अभिनंदन करून त्याला ५००० रुपये बक्षीस दिले. नेहाला शरमेने मेल्याहून मेल्यासारखं झालं. राजचे वडील जे सांगत होते ते खरे होते, ते पैसे चोरीचे नव्हते तर राजला मिळालेल्या बक्षिसाचे होते.

डार्क निळी साडी, मॅचिंग ब्लाऊज, इयर रिंग्ज, बांगड्या, घड्याळ आणि पर्स. सत्काराच्या दिवशी नेहा एखाद्या परीसारखी सुंदर दिसत होती. सगळ्यांची नजर नेहावर होती आणि नेहाची नजर मात्र राजला शोधत होती. राज कुठेही दिसत नव्हता. नेहाची नजर सारखी जात होती त्या जुन्या गेटकडे, राज कदाचित तिकडून येईल या आशेने. राज का आला नाही? काल पैसे द्यायला राज आला नाही तर त्याचे वडील आलेत. म्हणजे तो आजारी तर नसेल ना? की इतर काही प्रॅाब्लेम? नेहा विचारात पडली. तिला तो दिवस आठवला, राजचा अपमान केलेला. ज्याला मी टवाळक्या करतोस असे म्हणाले त्याने माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवित जिल्ह्यात पहिला नंबर पटकावला. नेहा मनोमनी शरमली.

सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम असणाऱ्या नेहाचा मुलींमध्ये पहिली म्हणून सत्कार करण्यात आला. प्राचार्यांनी नेहाला स्टेजवरच थांबायला सांगितले व म्हणाले, "यानंतर आपण सत्कार करणार आहोत संपूर्ण जिल्ह्यात पहिला आलेल्या राजचा. राज हा खूप मेहनती मुलगा आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याला लेक्चर्स अटेंड करता आले नाहीत पण तरीही घरी अभ्यास करून त्याने हे यश मिळविले आहे. राजच्या यशाचे श्रेय नेहालाही जाते. कारण नेहानेच राजची परीक्षा फी भरली. राजला बरे नसल्याने तो या कार्यक्रमाला येऊ शकला नाही म्हणून त्याच्या वतीने त्याच्या आई, सीताबाईंचा आपण सत्कार करणार आहोत.”

किडकिडीत प्रकृती, ओढलेला चेहरा, अतिशय साधी साडी, अन अंगावर एकच दागिना, तो म्हणजे दोन्ही हातात २-२ बांगड्या, त्याही सोन्याच्या नव्हे, तर काचेच्या. सीताबाईंचा सत्कार होताना नेहाच्या लक्षात आले, त्यांचा गळा मोकळा होता. नेहाने पटकन पर्समधून मंगळसूत्र काढून सीताबाईंना दिले. प्राचार्य म्हणाले, "मला नेहाचा अभिमान वाटतो. तिने या कार्यक्रमाचे औचित्य साधत, सीताबाईंचे मंगळसूत्र त्यांना परत मिळवून दिले. वेल डन नेहा.” टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

काल ५००० रूपये देऊनही नेहाकडून मंगळसूत्र परत मिळाले नव्हते हे सत्य फक्त नेहा आणि सीताबाईंनाच माहीत होते, पण त्या दोघीही गप्प होत्या. सीताबाई उपकाराच्या ओझ्यामुळे; तर नेहा लाज आणि शरमेमुळे. परिस्थितीने अतिशय गरीब, पण अत्यंत हुशार असलेल्या राजची उघडउघड लाज आणि शरम काढणाऱी नेहा आज मात्र मनोमनी लाजून शरमली होती. -दिलीप कजगांवकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

बांगलादेशात अल्पसंख्य खतरे में  !