बांगलादेशात अल्पसंख्य खतरे में !
ढाका येथील मानवाधिकार संघटना ‘ऐन ओ सलीश केंद्र च्या गेल्या मासातील एका अहवालात असे म्हटले होते की, बांगलादेशात हिंदूंची घरे, मंदिरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठान यांची तोडफोड करण्याच्या एकूण १४७ घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनुमाने ४०८ घरांची तोडफोड करण्यात आली, ज्यात ३६ जाळपोळीच्या घटनांचा समावेश आहे.
अल्पसंख्यांकांच्या मालकीच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्याच्या ११३ घटना घडल्या आहेत. मागील आठ महिन्यांपासून बांगलादेशमध्ये अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून देशातील बहुसंख्यांकांकडून जाणीवपूर्वक अल्पसंख्यकांना लक्ष केले जात आहे.
बांगलादेश पूजा उद्यापन परिषदेच्या बिरल युनिटचे उपाध्यक्ष भाबेश चंद्र रॉय यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची घटना गुरुवारी १७ एप्रिल रोजी उघडकीस आली. त्यांच्या राहत्या घरातून त्यांचे अपहरण करण्यात आले आणि जवळच्या गावात नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. बेशुद्ध अवस्थेत त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ५ ऑगस्टला बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. दंगली झाल्या, प्रचंड प्रमाणात जाळपोळ झाली. शेख हसीना यांनाही देश सोडून भारतात पलायन करावे लागले. या दंगलीमध्ये स्थानिक हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष केले जाऊ लागले, हिंदूंना घरात घुसून मारहाण होऊ लागली, त्यांची घरे, दुकाने लुटून ती जाळण्यात येऊ लागली, त्यांच्या जमिनी हडपण्यात आल्या, त्यांना त्यांच्याच घरातून हाकलले जाऊ लागले. हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले होऊ लागले, देवतांच्या मूर्तींची तोडफोड होऊ लागली, हिंदू स्त्रियांवर, बालकांवर अत्याचार होऊ लागले.
ऑगस्ट महिन्यात बांगला देशात पसरलेले हे हिंदुविरोधी लोण आजही कायम आहे. ढाका येथील मानवाधिकार संघटना ‘ऐन ओ सलीश केंद्र च्या गेल्या मासातील एका अहवालात असे म्हटले होते की, बांगलादेशात हिंदूंची घरे, मंदिरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठान यांची तोडफोड करण्याच्या एकूण १४७ घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनुमाने ४०८ घरांची तोडफोड करण्यात आली, ज्यात ३६ जाळपोळीच्या घटनांचा समावेश आहे. याखेरीज अल्पसंख्यांकांच्या मालकीच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्याच्या ११३ घटना घडल्या आहेत. मागील आठ महिन्यांपासून बांगलादेशमध्ये अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून देशातील बहुसंख्यांकांकडून जाणीवपूर्वक अल्पसंख्यकांना लक्ष केले जात आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद भारतातही उमटले असून भारतातील हिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेशातील या दडपशाहीच्या विरोधात आजतागायत देशभर आंदोलने केली आहेत. भारतातील अल्पसंख्यांकाची तळी उचलण्यास सदैव तत्पर असणारा अल्पसंख्यांक आयोग बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात मूग गिळून गप्प का असाही सवाल आज विचारला जात आहे.
१९४७ साली पूर्व पाकिस्तानमध्ये म्हणजे आताच्या बांगलादेशमध्ये एक तृतीयांश हिंदू होते. २०२२ मध्ये जेव्हा देशात जनगणना झाली तेव्हा तेथे ७.९६ टक्के हिंदू शिल्लक राहिल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. फाळणीनंतर तेथील हिंदूंची संख्या कमी होत गेली; तर मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. फाळणीपासूनच स्थानिक अल्पसंख्य हिंदूंना लक्ष केले जात आहे, स्थानिकांच्या छळाला कंटाळून दरवर्षी लाखो हिंंदू देशातून पलायन करतात. हे प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बांगलादेशातील हिंदूंना दिली जाणारी अन्याय्य वागणूक हा जुना विषय असला तरी गेल्या सात-आठ महिन्यांत तेथील हिंदूंची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे, हे असेच चालत राहिले तर पुढील काही महिन्यांतच बांगलादेशात नावालाही हिंदू शिल्लक राहणार नाही. या उपरांत बांगलादेशातील गरिबीला कंटाळून बांगलादेशी मुसलमानांचे लोंढेच्या लोंढे भारतात येत आहेत.
आजमितीला भारतात आलेल्या बांगला देशी मुसलमानांची संख्या १० कोटीहून अधिक झाली आहे. भारतातील विकसनशील शहरी भागात बांगलादेशी नागरिकांच्या वस्त्या तयार झाल्या आहेत. येथील स्थानिक झोपडपट्टी दादा पैशांच्या मोबदल्यात या बांगलादेशी घुसखोरांच्या निवाऱ्याची, नोकरी व्यवसायाची आणि कागदपत्रांची व्यवस्था करून देतात. आजमितीला अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आणि अनधिकृत कामांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग असल्याचे उघड होत आहे. घुसखोरांना त्यांच्या देशात हाकलण्याचा कायदाही अस्तित्वात आहे; मात्र त्याची कठोरपणे अंमलबजावणीच केली जात नाही. एकीकडे बांगलादेशातील हिंदू नामशेष होऊ लागला आहे तर दुसरीकडे भारतात आलेले बांगलादेशी घुसखोर भारताची अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणू लागले आहेत. भारतात अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना हाकलून देण्यासाठी देशभरात विशेष मोहीम राबवण्यात यावी; तसेच भारताच्या शेजारील राष्ट्रांत अल्पसंख्य हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात भारताने आंतराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे; मात्र दर वेळेस अशा काही घटना घडतात तेव्हा त्या घटनेचा तीव्र निषेध करण्याव्यतिरिक्त सरकारकडून अन्य काही पावले उचलली जात नसल्याचे लक्षात येते. आज जसे बांगलादेशात हिंदूंना लक्ष केले जात आहे तसे ज्यू लोकांना लक्ष करण्याची हिम्मत कोणत्याही देशाची नाही. ज्यू लोकांवर जगभरात कोठेही हल्ले झाले तर इस्त्रायल पेटून उठतो, ज्यू लोकांना संरक्षण देण्यासाठी आक्रमक होतो. भारत अशा प्रकारची भूमिका केव्हा घेणार आहे ? - जगन घाणेकर