नये जयासि तुळणा। श्रीराम राम हे म्हणा
भक्त आणि भगवंत यांच्या एकरूपतेचे मनोहर उदाहरण म्हणून शिव आणि विष्णू यांच्या ऐक्याकडे पाहता येईल. साक्षात महाविष्णूच राम आणि पांडुरंगाच्या रूपात लोकांच्या कल्याणासाठी अवतरले आहेत. भगवान शंकर अखंड रामनामाचा जप करतात. त्यांना रामाचा अखंड ध्यास लागलेला आहे आणि पंढरीनिवासी पांडुरंग शंकरांना आपल्या डोईवर मिरवतात.
बहु नाम या रामनामी तुळेना।
अभाग्या नरा पामरा हे कळेना ।
विषा औषधे घेतले पार्वतीशे।
जिवा मानवा किंकरा कोण पूसे । श्रीराम ।८२
जेणे जाळीला काम तो राम ध्यातो।
उमेसी अती आदरे गूण गातो।
बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे।
परी अंतरी नामविश्वास तेथे । श्रीराम । ८३
विठोने शिरी वाहिला देवराणा।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा।
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी।
जिवा सोडवी राम हा अंतकाळी । श्रीराम। ८४
भजा राम विश्राम योगेश्वरांचा।
जपू नेमिला नेम गौरीहराचा।
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी।
तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी । श्रीराम । ८५
रामनामाचे महात्म्य सांगताना साक्षात भगवान शंकर त्या पावन नामाचा जप निरंतर करीत असतात हे समर्थांनी पुनः पुन्हा सांगितले आहे. मानवाच्या उध्दारासाठी उपलब्ध असलेल्या साधनांपैकी कोणत्याही साधनाची तुलना नामसाधनाशी होऊ शकत नाही. याची कारणे समर्थांनी आधीच्या श्लोकांतून सांगितली. नाम सोपे आहे, सर्वांना सहज उपलब्ध आहे, बंधनरहित आहे, सर्व साधनांचे सार आहे. पण अभागी मानवाला हे कळत नाही. संसार दुःखापासून सुटण्यासाठी तो पुन्हा पुन्हा दुःखमय संसाराकडेच आशेने पाहतो. पुन्हा पुन्हा दृश्य जगातच उपाय शोधतो. आपल्या दुःखाची संपूर्ण निवृत्ती होत नाही, अखंड समाधान लाभत नाही हे दिसत असूनही मनुष्य महानुभाव संत-सज्जनांचे विचार लक्षात घेत नाही, हे केवढे दुर्दैव आहे. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्याची मूर्ती असलेले भगवान शिव हलाहलाने झालेला आपला दाह शमविण्यासाठी औषध म्हणून रामनाम घेतात. त्या रामनामाचे सामर्थ्य किती असेल याची क्षुद्र माणसाला कल्पनाही करता येत नाही. भगवान शिव हे देवांचेही देव-महादेवआहेत. आदिगुरू आहेत. आता आपण जे दत्त संप्रदाय, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय इ.मानतो त्याचे मूळ भगवान शंकर आहेत. त्यांनी केलेला ब्रह्मतत्वाचा उपदेश गुरूपरंपरेने पुढे पुढे चालत आला आहे. असे भगवान शंकर आपल्या दुःख निवारणासाठी रामनामाचा जप करतात. तिथे सामान्य माणसाचे सांसारिक दुःख संपविण्याची ताकद त्या नामात नसेल काय? हे लक्षात न घेणाऱ्या माणसाला समर्थ अभागी, पामर म्हणतात.
कितीही धनवान असला तरी ज्याला रामभक्ती कळत नाही, ज्याच्याकडे रामनामाचे घबाड नाही, तो समर्थांच्या दृष्टीने भाग्यहीन, दैन्यवाणाच आहे. ज्ञानमूर्ती भगवान शंकर वैराग्यमूर्तीही आहेत. कामदेव मदनाला त्यांनी जाळून भस्म केले. अत्यंत बलाढ्य कामाला जिंकून घेणाऱ्या शिवांचे वैराग्य जाज्वल्य आहे.त्यांना कोणतेही दुःख बाधू शकेल हे संभवत नाही. तरीही अत्यंत आदराने ते रामाचे नाम घेतात. स्वतः नित्य नामस्मरण तर करतातच; शिवाय आपल्या पत्नीला, जी साक्षात जगन्माता आहे त्या पार्वतीलाही रामनामाची महती सांगतात. श्रीबुधकौशिक ऋषि रामरक्षा स्तोत्राची समाप्ती करताना म्हणतात, "रामरामेतीरामेति रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने” भगवान शंकर पार्वतीला सांगतात, "हे सुमुखी, मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो. रामाचे एक नाम विष्णूच्या हजार नावांच्या बरोबरीचे आहे.” भक्त आणि भगवंत यांच्या एकरूपतेचे मनोहर उदाहरण म्हणून शिव आणि विष्णू यांच्या ऐक्याकडे पाहता येईल. साक्षात महाविष्णूच रामाच्या तसेच पांडुरंगाच्या रूपात भक्तांच्या कल्याणासाठी अवतरले आहेत. भगवान शंकर अखंड रामनामाचा जप करतात. त्यांना रामाचा अखंड ध्यास लागलेला आहे आणि पंढरीनिवासी पांडुरंग शंकरांना आपल्या डोईवर मिरवतात. विठूमाऊली होऊन आपल्या लाडक्या भक्ताला मोठ्या प्रेमाने डोक्यावर धारण करतात. भगवान शिवांचा हलाहल विषाने झालेला तापअखेर रामनामाने निवला. चंद्र, गंगा, सर्प, हिमालय आदि कोणालाही विषदाह शमविता आला नाही. शिवाची तगमग शांत करता आली नाही. मात्र रामनाम घेताच त्यांची सर्व तळमळ संपली. त्यांना विश्रांती लाभली. शंकर हे योगिराज आहेत. चित्तशांती त्यांच्या स्वाधीन आहे. तरीही रामनाम हे त्यांचे विश्रामस्थान आहे. म्हणूनच शिवपार्वती दोघेही नित्य नेमाने रामनामाचा जप करतात.
श्रीरामनामाने जीवाला आराम मिळतो.एवढेच नाही तर अंतकाळी हेच रामनाम त्याला जन्म-मरणाच्या चक्रातून सोडवते. मृत्युसमयी जर मनात वासना शिल्लक असतील तर त्या वासनेप्रमाणे पुढचा जन्म निश्चित घ्यावा लागतो. जन्म-मरणात पुन्हा अडकावे लागते. परंतु मृत्युसमयी जर रामाचे स्मरण झाले तर मनुष्य रामाशी एकरुप होऊन भवपाशातून मुक्त होतो. अशी मान्यता आहे की काशी क्षेत्री भगवान शंकर मनुष्याच्या अंतसमयी त्याच्या कानात रामनामाचा उच्चार करतात. त्यामुळे तो मुक्त होतो. म्हणून अनेक लोक अंतकाळी काशीक्षेत्री जाऊन वास्तव्य करतात. श्रीराम आणि श्रीशिव यांचे असे विलक्षण नाते आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ”तरि श्रध्दावस्तूसि आदरू। करिता जाणिजे प्रकारू। जरी होय श्रीगुरू। सदाशिवू” (ज्ञा.१२-२१६) आपल्या श्रध्देच्या विषयाचा आदर आपण कोणत्या प्रकारे करावा हे जाणून घ्यायचे असेल तर भगवान शंकराला गुरू केले पाहिजे. माऊलींच्या मुखातून भगवान श्रीकृष्ण (अर्थात विष्णू अवतार) म्हणतात, "मग याहीवरी पार्था। माझिया भजनी आस्था। तरी तयाते मी माथां। मुकुट करी (ज्ञा.१२-२१४) "अर्जुना मी एवढेच सांगतो की, अशा भक्ताला मी मस्तकी वाहतो.” भगवान शंकरांची रामभक्ती अशी विलक्षण आहे की त्यासाठी ते वानरदेह धारण करून रामाचे अखंड दास्य करतात. (रामभक्त हनुमान हे रुद्रावतार आहेत) शिव-विष्णूंच्या प्रेम-भक्तीच्या कथा श्रवण करून बोध घ्यायचा तो एवढाच,
"सुरेन्द्र चंद्रशेखरू। अखंड ध्यातसे हरू।
जनासि सांगतो खुणा। श्रीराम राम हे म्हणा
अपाय होत चुकला। उपाय हा भला भला।
नये जयासि तूळणा। श्रीराम राम हे म्हणा”
जय जय रघुवीर समर्थ
-सौ. आसावरी भोईर