रिcycle, रिuse,  रिduse... आणि आज्जीबाईचे चविष्ट पदार्थ

'Recycle, reuse, reduce, rebuilt, regenerate and re-recognise ns हे ‘रि ने सुरू होणारे महत्त्वपूर्ण इंग्रजी शब्द तर आता आता आपल्या कानी यायला लागलेत. यांचा थोडक्यात अर्थ असा की माणसाने आपल्या सभोवताली असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अनिवार्य गरजेपुरताच योग्य तो वापर करावा आणि आपला निसर्ग वाचवावा. असं केलं म्हणजे दुसऱ्या अर्थाने साधन संपत्तीची कमी वापरामुळे बचत होते आणि पुनर्वापर जिथं शक्य तिथं नक्कीच या विचारांचा अवलंब केल्याचा आनंद होतो. हे झालं बोलण्यातलं परंतु ‘बोलाची आणि फुलाची म्हणजेच कृतीची गाठभेट झाली तरच वरच्या इंग्रजी शब्दांना अर्थ आहे. हे शब्द बऱ्याच उत्पादनांच्या वेस्टनांवर लिहिलेले असतात. कधीकधी तीन बाणांचा त्रिकोन काढून चिन्हांकित केलेलं असतं पण आपण त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करतो. या बचतीची सुरुवात व तिचा इतिहास पाहायचा असेल तर आपल्याला नक्की आपली आज्जी आठवल्याशिवाय राहणार नाही.

 आपल्या लहानपणात जर गेलो तर एकत्रित कुटुंबांत बऱ्यापैकी जास्त माणसांची रेलचल असायची. सकाळ दुपार संध्याकाळ असं तींनतीनदा सगळ्यांनीच जेवायचं म्हणलं तर भाकरी कालवणाची अजिबात कमतरता नसायची. बऱ्याचदा ते दिवसभराचं उरलेलं कालवण (भाजी) आज्जी नक्की आठवण करून आपल्या आईला भाकरीत मिसळायला लावायची अन्‌ तीच तिखट भाकर आपण आवडीने आणि आत्मीयतेने खायचो की जेवढ्या प्रमाणात तेच कालवण दुपारी आपल्याला कधीकधी आवडलेलं नसायचं. म्हणूनच आजही आपल्या आज्जी आणि आईच्या Recycle  या कलेला मी तर नक्कीच दाद देईल. बऱ्याचदा उरलेल्या पातळ भाजीची तव्यावर टाकून खमंग चटणी मला माझ्या आईने आणखी रुचकर कशी होते याची ती जिभेवर ठेवल्यावर न सांगता कल्पना यायची! एका अर्थाने तिने Recycle चे तत्व कुणी न शिकवता स्वतःच अंगीकारले याचा सर्वांनाच त्याकाळी प्रत्यय आलेला असेलच.
गव्हाच्या चपात्या तर जुन्या काळात फक्त सणासुदीला पाहायला मिळायच्या. कधीकधी तर आपल्या आईने काठवटीत मळलेल्या गव्हाची कणिक बघून बऱ्याचदा माझ्या तोंडाला पाणी सुटायचं! त्याकाळच्या सर्वांचीच ही अवस्था झालेली असणार! न राहून मी तर त्या मळलेल्या कणकीतून कितीतरी वेळा कच्च पीठ खाऊन आत्मशांती केलीय! ते खाल्ल्यावर खरंच मला तर पुन्हा पुन्हा ते खाऊशी वाटायचं; पण आईने पहिल्यांदा केलेलं दुर्लक्ष म्हणून जमलं परंतु दुसऱ्यांदा कणकीकडे गेलेला हात बघून उगारलेलं लाटणं आपल्याला हळूच मागे सरकायला भाग पाडायचं. शक्यतो केलेल्या चपात्या संपूनच जायच्या. पण हळूहळू वर्षागणिक गव्हाचं क्षेत्र वाढायला सुरुवात झाली आणि चपात्यांचा घराघरात सुकाळ चालू झाला. साधारणतः नव्वदीचा काळ असेल तो. आता सकाळ संध्याकाळ केलेल्या चपात्याही शिल्लक राहू लागल्या म्हणून आपल्या आज्जीबाईची कल्पकता पुन्हा जागी झाली आणि सकाळच्या नाश्त्याला पोह्यांपेक्षा खमंग कांदा, मीठ, टमाटे, कोथिंबीर घालून अलौकिक चपातीचा पिवळाधम्मक भुगा जिभेचे पारणे फेडायला आईने बनवला! नक्कीच त्या भुग्याने पोह्यांना कधीच नमवलं हे कळलंसुद्धा नाही. कधीकधी रात्रीच्या शिळ्या चपातीचे तुकडे उकळत्या गुळाच्या पाण्यात टाकले म्हणजे गरम गरम गोड चपातीचा शिरा काही औरच ! Recycle and reuse हे माझ्या निरक्षर आज्जी आणि आईच्या हाताखालून तेव्हाच गेलेलं.

 ‘गरज ही शोधाची जननी आहे असं त्यांना माहीत नसताना त्यांनी फक्त अन्नधान्याची कमतरता म्हणून ते शोधलं. तसंच शिळ्या बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरींना सुद्धा आईने आणि आज्जीने फेकून दिलं नाही. त्यांचाही जरी त्या कडक असल्या तरीही त्यांच्यावर पाणी मारून नरम करून फेक झोक टाळून भुगा केलाच. ते जर जमलं नाही तर सरळ सकाळचा स्वयंपाक पाणी झाला, न्याहाऱ्या उरकून आई जेव्हा वावरात कामाला जायची तेव्हा सरळ चुल्ह्यीच्या आहारावर भाकरीचे बारीक बारीक तुकडे करून त्यावर झाकण टाकलं की आई शेतात जायची. दुपारच्याला नुसतं जेवणाची सुट्टी व्हायचा उशीर मी पाहिला तव्यावरच्या कोरक्यांचा समाचार घ्यायचो! त्यात भाकरीच्या पापूड्याचे पातळ कोरके म्हणजे खाताना त्याकाळचे कुरुम कुरूम अन्‌ आत्ताचे क्रंची म्हणजे त्या स्वादिष्टतेची आपोआप कल्पना सर्वांना येईल यात शंका नाही. जर त्यावर सकाळी आईने जाता जाता लाल मिरचीच्या गोळ्याचं पाणी शिंपडून गेली तर त्या कोरक्यांपुढे जगातला कोणताही पदार्थ फिका पडेल असे ते पक्वान्न ज्यांना आज्जी आणि आईच्या recyle, reuse आणि reduce म्हणजेच काटकसरीतलं जगणं आम्ही तेव्हाच आज्जीच्या बचतीतून शिकलो. त्यातून ज्यांना काही असे नवनवीन पदार्थ खायला मिळाले त्यांनी तर स्वतःला परम भाग्यवान समजावं!... आता कितीही भारीतले पिझ्झा आणि बर्गर त्यापुढे फिक्के पडतील.

 केंद्र सरकारने नुकत्याच कर्मयोगी आणि i GOT ॲपच्या माध्यमातून सर्वच सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करायसाठी चांगला निर्णय घे तला. त्यातून नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर टाळावा किंवा मय्राादित वापर व्हावा या हेतूने अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यातल्या एका विषयातूनreuse recyle rebuiltअस चांगल्या पद्धतीने संबोधित करण्याचा प्रयत्न केलाय. मीही त्यावर खूप विचार केला. बऱ्याचदा उत्पादनांवर लिहिलेलं असूनही आपण मध्येच प्रतिष्ठा आडवी आणून कितीतरी गोष्टींचा पुनर्वापर करायला टाळाटाळ करत असतो. मी तर म्हणतो जर का या रियुज आणि रिसायकल या शब्दांना आपल्या पूर्वजांपासून सुसंस्कृत असा इतिहास आहे तर मग आपण त्याची जोपासना का करत नाही? आपल्या आज्जीला आणि आईला कोणी पुनर्वापर किंवा पुनरुपयोग करा असं सांगायला होतं का? सर्वांचेच या प्रश्नाला एका शब्दातले उत्तर ‘नाही असेच असेल. मग आपल्याला एवढं सांगणारे किंवा शिकवणारे असूनही आपण का याकडे दुर्लक्ष करतोय. देश वाचेल आणि देशाचीच बचत होईल अन ्‌फायदा मात्र सर्वांनाच खात्रीशीर मिळेल. आज्जी कायमच म्हणायची, "पोरांनो, खाऊन माजोरपणे फेकून नका माजू..” एवढं जरी ध्यानात ठेवलं तरी आपोआप हळूहळू ‘लागिले वळण इंद्रिया सकळ..”प्रमाणे उक्तीप्रमाणे सर्वांचेच इंद्रिय त्यांना सूचना देतील. Recyle.. resue.. rebuilt, reduce...! आणि मग खरंच ही ‘रि'  जर आपण फोडली तर खरंच देशात बचतीची क्रांती व्हायला वेळ तरी कसा लागेल? -निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी, मंडळ कृषी अधिकारी, फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

नये जयासि तुळणा। श्रीराम राम हे म्हणा