चरित्रातून उगवलेले तेजस्वी मार्गदर्शन

महान व्यक्तींच्या जीवनकथांमधून प्रेरणा मिळते, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. पण त्या प्रेरणेला शब्दरूप देणं, ती भावनिकतेच्या सीमांतून शब्दकलेच्या प्रभावी पातळीवर उभं करणं हे केवळ लेखनकौशल्याने शक्य होतं. श्री राजकुमार राम लखन यादव यांची  "हमारे प्रेरणा स्त्रोत ही कृति हेच कौशल्य साकारते. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने आपल्या लेखणीद्वारे देशाच्या २४ महान विभूतींच्या जीवनचरित्राचे प्रभावी आणि प्रेरणादायी चित्रण केले आहे. हे पुस्तक केवळ माहितीपर नव्हे, तर देशभक्तीचा जागर करणारी, तरुण पिढीला दिशा दाखवणारी एक महत्त्वाची साहित्यसंपदा ठरते.

पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचा विषय  "प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची ओळख.” आजच्या यांत्रिक आणि स्पर्धात्मक युगात, तरुणाईला दिशा देणारे आदर्श आणि आदर्शवत व्यक्तिमत्त्वांची ओळख फारच गरजेची आहे. लेखकाने या गरजेची जाणीव ठेवूनच ‘हमारे प्रेरणा स्त्रोेत' हे हिंदी भाषेत पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या व्यक्तिमत्त्वांची निवड काळजीपूर्वक आणि समतोल केली आहे. लाल बहादुर शास्त्रीपासून सिंधुताई सपकाळांपर्यंत प्रत्येक जीवनकथा वेगळी आहे, संघर्षमय आहे आणि प्रेरणादायी आहे. प्रत्येक व्यक्तीने समाजाच्या, राष्ट्राच्या किंवा विशिष्ट क्षेत्राच्या उन्नतीसाठी अतुलनीय कार्य केलं आहे.

श्री यादव यांची लेखनशैली अत्यंत सोपी, ओघवती आणि वाचकाला गुंतवून ठेवणारी आहे. भाषेची रचना अशी आहे की ती कोणत्याही वयोगटातील वाचकांना सहज समजेल. शैलीत भावनात्मकता असली तरी अतिशयोक्ती नाही. लेखकाने नायकांच्या गुणांचं गाणं गाताना त्यांचं देवतीकरण केलं नाही; उलट त्यांच्या जीवनातील अडचणी, पराभव, संघर्ष यांचे चित्रणही प्रामाणिकपणे केलं आहे. या कथनशैलीमुळे वाचक त्या व्यक्तींच्या जीवनात डोकावतो, त्यांच्या संघर्षात स्वतःला पाहतो आणि त्यांच्या प्रेरणेतून स्वतःसाठी ऊर्जा घेतो. हेच एका चांगल्या चरित्रलेखकाचे लक्षण आहे.

प्रत्येक जीवनकथा म्हणजे एखाद्या जिवंत व्यक्तीचा जीवनप्रवास आहे. लेखकाने त्या प्रवासात केवळ यशाच्या टप्प्यांची नोंद केलेली नाही, तर त्या यशामागची मेहनत, विचार, सामाजिक परिस्थिती यांचाही विचार केलेला आहे. त्यामुळेच पुस्तकात फक्त माहिती दिली गेलेली नसून, एका जीवनदृष्टीचा विचार मांडलेला आहे.सामाजिक क्षेत्रातील सिंधुताई सपकाळ, राजकारणातील शास्त्रीजी, विज्ञानातील आणि शिक्षणातील थोर विभूती, साहित्यिक, तत्त्वज्ञ या सगळ्यांचा समावेश म्हणजे एक प्रकारे भारताच्या वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्त्वांचा आरसा आहे. ही कृति केवळ वाचनापुरती मय्राादित न राहता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्याही अत्यंत उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी आणि समाजसेवकांनी हे पुस्तक अवश्य वाचावं. यातून मिळणारी प्रेरणा त्यांचं दृष्टिकोनच बदलून टाकेल.

लेखकाने खास करून युवकांना उद्देशून ही प्रेरणा मिळावी, त्यांनी देशाच्या उन्नतीसाठी झटावं, ही भावना मुळातून स्पष्ट केली आहे. राष्ट्रप्रेम, सामाजिक समरसता, धार्मिक सहिष्णुता, एकात्मतेची भावना हे या पुस्तकाचे अंतःस्त्रोत आहेत. साहित्य म्हणून पाहिलं तर ही कृति चरित्रपर साहित्याचा एक ठसा उमटवणारी ठरते. लेखकाच्या शब्दांत जिवंतपणा आहे. काही प्रसंग वाचताना डोळ्यात पाणी येतं, तर काही ठिकाणी छाती अभिमानाने भरून येते. हेच साहित्याचं खरं सामर्थ्य असतं भावनेशी नातं जोडणं.

‘ज्योतीने ज्योती पेटावी' या उक्तीनुसार हे पुस्तक वाचकांमध्ये उजेड पेरतं, त्यांच्या अंतःकरणात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची प्रेरणा जागवतो. हमारे प्रेरणा स्त्रोत हे पुस्तक एक आदर्श चरित्रसंग्रह आहे. यात लेखक राजकुमार यादव यांनी एक जाणिवपूर्वक, अभ्यासपूर्ण आणि मनापासून लिहिलेली कृती साकारलेली आहे. ही कृति वाचकाला माहिती देते, प्रेरणा देते आणि विचार करण्यास भाग पाडते. श्री यादव यांचं व्यक्तिमत्त्व जितकं सौम्य आणि नम्र आहे, तितकंच ते सामाजिक जाणिवेने भरलेलं आहे.त्यांच्या लेखणीतून जे काही उमटलं आहे, ते नक्कीच वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचतं. त्यांच्या पुढील साहित्य प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन.

ही कृति केवळ चरित्र लेखनापुरती मर्यादित नाही; ती एक शिक्षण, प्रेरणा आणि राष्ट्रप्रेमाची अमूल्य भेट आहे. हे पुस्तक प्रत्येक तरुणाने, पालकाने, शिक्षकाने आणि समाजभान असलेल्या नागरिकाने वाचावे. यातील प्रत्येक जीवनकथा ही एक ऊर्जा आहे, जी आपल्याला स्वप्न पाहायला आणि ती सत्यात उतरवायला शिकवते.

 हमारे  प्रेरणा स्त्रोत लेखकः श्री राजकुमार राम लखन यादव भाषा - हिंदी
प्रकाशन : अंतरा शब्द शक्ती प्रकाशन तृतीय  आवृत्ती  मूल्य - १९०/-
-सौ. मनिषा राजन कडव 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मरणाला मिठी मारणारा योद्धा : धन्वंतरी!