मरणाला मिठी मारणारा योद्धा : धन्वंतरी!

मरण त्याला काही अगदीच अनोळखी नव्हतं. वैद्यकीय व्यवसायात आणि पुढे सेनेत जबाबदारी सांभाळली तेंव्हा त्याने कित्येक जखमी शरीरं, शत विक्षत देह पाहिले...आणि अर्थात कित्येक मृत्यूसुद्धा! सैन्यसेवा आणि मरण एकमेकांच्या हातात हात गुंफून चालत राहतात... काहींचा हात सुटतो.. काहींचा सुटत नाही! त्या दिवशी मृत्यूदूत त्याला अगदी समोरासमोर भेटले... नव्हे, त्यातील एक तर त्याच्याच दिशेने येताना दिसला!

गोष्ट आहे वर्ष २०१० मधील फेब्रुवारी महिन्यातील. त्यादिवशी २६ तारीख होती आणि मेजर डॉक्टर साहेबांना अफगाणिस्तान देशातील राजधानी काबूलमधील भारतीय दुतावासात कर्तव्यावर रुजू होऊन केवळ तेराच दिवस उलटलेले होते. त्यांचा १४ मे १९७२ रोजी सुरु झालेला जीवनप्रवास मणिपूरपासून सुरु होऊन आज ते अफगाणिस्तानमध्ये होते.

जात्याच बुद्धीमान असलेले मेजर साहेब १९९६ मध्ये एम.बी.बी.एस.डॉक्टर झाले. पण अभ्यासासोबत साहेबांना खेळाची आणि त्यातल्या त्यात शरीरसौष्ठव क्रीडाप्रकाराची अतिशय जास्त आवड होती. क्रीडा वैद्यक शास्त्राचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी मोठ्या हौसेने पूर्ण केला होता.

भारतीय सैन्यात निष्णात वैद्यक अधिकाऱ्यांची नेहमीच गरज असते. पण त्यासाठीची निवड प्रक्रिया अतिशय कठीण मानली जाते. या अधिकारी मंडळींना डॉक्टरकी तर करावी लागतेच, पण गरज पडली तर हाती शस्त्रही धरावे लागते.

 १५ फेब्रुवारी २००३ रोजी मेजर साहेब सिल्चर येथील लष्करी रुग्णालयात रुजू झाले. त्यांना वैद्यकीय ज्ञान तर प्रचंड होतेच; पण सैन्यात त्यांना सैन्य प्रशिक्षणही प्राप्त झाले.
अतिउंचावर लष्करासाठी रस्ते बांधणी करण्याची जबाबदारी असलेल्या Border Road Organization या GREF अर्थात General Reserve Engineering Force (GREF) मध्ये साहेबांची नेमणूक झाली. भारतीय सैनिकांना ते वैद्यकीय उपचार देत असतच; पण परिसरातील इतर नागरीकांनाही त्यांच्या सेवेचा लाभ देत असत. अरुणाचल प्रदेश हा तर अतिशय दुर्गम प्रदेश. तिथे मेजर साहेबांसारखे निष्णात डॉक्टर उपलब्ध असणे, ही तेथील सामान्य नागरीकांच्या दुष्टीने सुदैवाची बाब होती.

९ फेब्रुवारी २००६ मध्ये डॉक्टरसाहेब आगरतळा येथील लष्करी रुग्णालयात बदलून गेले... आणि हे रुग्णालय त्यांनी अक्षरशः एकहाती चालवले. तेथील जवानांना त्यांनी आपल्या क्रीडावैद्यक शास्त्रातील अभ्यासाचा आणि अनुभवाचा खूप फायदा करून दिला. वेळ मिळेल तेंव्हा फुटबॉल आणि badminton खेळणे हा तर त्यांच्या आवडीचा विषय होता. असा माणूस सर्वांना प्रिय होईल यात नवल नव्हते.  

२००७ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या आंतराष्ट्रीय सैन्य क्रीडा स्पर्धांत साहेबांनी खेळाडूंच्या अंमली पदार्थ सेवन करून खेळणाऱ्या खेळाडूंविरोधात कडक सेवा बजावली. त्यांनी २००८ मध्ये पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही वैद्यकीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती. आगरतळा येथे लष्करी वैद्यकीय रुग्णालयात काम करीत असताना वेळात वेळ काढून त्यांनी इतर खाजगी, शासकीय रुग्णालयांतही विनामूल्य सल्लासेवा उपलब्ध करून दिली होती.. हे विशेष.  २००७ मध्येच त्यांना सैन्य सेवा मेडल आणि अतिउंचीवर उत्तम सेवा केल्याबद्दलचे पदक प्रदान केले गेले. सैनिक निवडीसाठी असलेल्या वैद्यकीय पथकातही त्यांनी अतिशय उत्तम सेवा केली. २०१३ वर्ष सुरु झाले होते. त्यावेळी भारताचे अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये वैद्यकीय कार्य सुरु होते. साहेबांचा अनुभव आणि कष्ट करण्याची वृत्ती पाहून त्यांना काबूल मध्ये Indian Medical Mission मध्ये सहभागी करून घेण्यात आले... हा एक मोठा बहुमान समजला जातो!

 युद्धग्रस्त, हिंसाचारग्रस्त अफगाणिस्तानमधील अनेक नागरिक भारताने मानवतेच्या भूमिकेतून उभारलेल्या या वैद्यकीय सेवा कार्याचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी करीत होते. तिथल्या नूर गेस्ट हाऊस मध्ये भारतीय डॉक्टर्स मंडळींची राहण्याची व्यवस्था केली गेली होती. अर्थात या गेस्ट हाऊसला भारतीय सैन्याने सशस्त्र संरक्षण पुरवले होतेच. कारण अफगाणिस्तानमधील परस्परविरोधी गट कधीही हल्ला चढवू शकत होते. खरे तर मानवतेच्या दृष्टीकोनातून चाललेले हे सेवाकार्य होते.. पण अतिरेकी मनाला ह्या बाबी समजू शकत नाहीत... हेच खरे!

 त्यादिवशी या गेस्ट हाऊसमध्ये सहा लष्करी वैद्यकीय अधिकारी, ५ सह-वैद्यकीय कर्मचारी आणि इतर काही अधिकारी वास्तव्यास होते. आणि या इमारतीवर अतिरेकी हल्ला चढवण्यात आलाच... भयावह हल्ला. पाचशे किलो आर.डी.एक्स.ने भरलेले एक वाहन या इमारतीच्या अगदी समोर आले. त्यातून तीन हल्लेखोर उतरले आणि इमारतीकडे धावले.. याच इमारातीच्या पलीकडील इमारतीत अन्य काही परदेशी लोक वास्तव्यास होते... आधी भारतीय पथकाला मारले की ते अतिरेकी तिथून पुढील इमारतीत जाणार होते...

तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी विरोध करताच त्या वाहनचालकाने ते वाहन स्वतःसह इमारतीच्या सीमा भिंतीवर धडकवले. हा धमाका इतका मोठा होता की तिथे साडे तीन मीटर बाय अडीच मीटर खोलीचा खड्डा पडला! वाहनातून आधीच उतरून पळत आलेल्या चालून आलेल्या तिघा अतिरेक्यांनी मग या इमारतीवर हातगोळे फेकले... आणि ती इमारत पेटली!

कामावर निघायच्या तयारीत असलेल्या डॉक्टर्स लोकांकडे एकच हत्यार होते... स्टेथोस्कोप.. आणि हे हत्यार जीव वाचवणारे होते... पण स्वतः डॉक्टर मंडळीचा जीव वाचवण्याच्या क्षमतेचे नव्हते. सर्वजण त्यातल्या त्यात सुरक्षित असणाऱ्या खोल्यांकडे पळाले...पण त्यांना अतिरेक्यांनी पाहिले.. क्षणार्धात एके ४७ रायफली धडाडल्या... हातगोळे फेकले जाऊ लागले... आश्रय घेतलेल्या खोल्यांमध्ये आता मृत्यूचे तांडव सुरु झाले.. काही माणसं मारली गेली!

मेजर लैश्राम मात्र त्या आगीने वेढलेल्या खोलीतून थेट बाहेर पडले.. एक अतिरेकी त्याच खोलीच्या दिशेने धावत येत होता... त्याच्या हातात शस्त्रे होतीच...हातगोळेसुद्धा होते. मेजर लैश्रामसुद्धा त्याच्या दिशेने विद्युतवेगाने धावत सुटले...मेजर स्वतः खूप जखमी होते.. रक्तबंबाळ झालेले होते...

अतिरेक्याने हातगोळा फेकण्याआधीच लैश्राम साहेबांनी त्याला मिठी मारली... त्याचे दोन्ही हात जखडून टाकले....तारुण्यात शरीरसौष्ठव सरावाने कमावलेले स्नायू आता खरोखरीचे बळ दाखवू लागले... तो अतिरेकी खूप धिप्पाड, बलदंड होता.. पण मेजर साहेबांची हिंमत त्याच्यापेक्षा भारी होती...पण त्या हल्लेखोराकडे आणखी एक जालीम शस्त्र होते....शरीराला गुंडाळून घेतलेली स्फोटके! तो सुसाईड मिशनवर होता....त्याच्यासोबत तो अनेक जीवांना घेऊन परलोकी जाण्यास सज्ज होता....!

मेजरसाहेबांनी त्याला असा दाबून धरला की त्याला श्वास घेणे दुर्धर झाले...रायफल चालवणे तर दूरच...त्याच्या हातातल्या हातगोळ्यांचा त्याला वापर करणेही शक्यच नव्हते...यात बराच वेळ गेला...त्यामुळे इतरांना तिथून सुरक्षित निसटून जाण्याचा अवधी मिळाला.

 शेवटी त्याने करायचे ते केलेच..त्यापासून मात्र साहेब त्याला दुर्दैवाने रोखू शकले नाहीत... त्याने कमरेला लावलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणला... क्षणार्धात दोघांच्याही देहांच्या चिथड्या उडाल्या... रक्ता-मांसाचा चिखल नुसता! पण यात साहेबांचे रुधीर त्यागाच्या, देशभक्तीच्या सुगंधाचे वाहक होते! आपल्या इतर दहा सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी या डॉक्टर साहेबांनी आपले प्राण अर्पण केले होते...

औषध उपचारांनी प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांनी आपले रक्त शिंपडून इतरांचे प्राण राखले! ही कामगिरी केवळ अजोड... निःस्वार्थी आणि मोठ्या शौर्याची. संकट आले म्हणून माघारी न पळता संकटाला आपल्या पोलादी बाहुपाशात घेणाऱ्या भारतीय सैनिकाचे रक्त होते ते....

 शांतता काळातील सर्वोच्च सैन्यपदक ‘अशोक चक्र डॉक्टर साहेबांना मरणोत्तर प्रदान करण्यात आले. त्यांच्या बंधूंनी हे पदक तत्कालीन राष्ट्रपती महोदया महामहीम श्रीमती प्रतिभाताई देवीसिंग पाटील यांच्या हस्ते मोठ्या अभिमानाने आणि भावाच्या आठवणींनी भरलेल्या काळजाने स्वीकारले.

 मणिपूरमधील नाम्बोल गावात हुतात्मा मेजर डॉक्टर लैश्राम ज्योतीन सिंग साहेब यांच्यामागे त्यांचे पिताश्री आणि मातोश्री त्यांच्या आठवणीत दिवस काढत आहेत. आईबाबा लहानग्या ज्योतीन साहेबांना लाडाने इबुन्गो म्हणून हाक मारत.

विविध प्रकारे त्यांच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न झाले आहेत. पण भारतातील खूप लोकांना हे नाव अद्याप बहुदा माहीत नसावे... असे वाटले... म्हणून हा लेखन-प्रयास!
जय हिंद! जय हिंद की सेना  

      ही माहिती लिहिताना मेजर जनरल ए.सी. आनंद साहेब, (विशिष्ट सेवा मेडल विजेते) यांच्या लेखाचा आणि इंटरनेटवरील इतर साहित्याचा आधार घेतला आहे. - संभाजी बबन गायके 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

प्रेमासाठी सारे काही...