देवाच्या पुत्राचा गुड फ्रायडे
यंदा १८ एप्रिल ला गुड फ्रायडे आहे. येरूसलेम येथे येशूला वधस्तंभावर खिळून मारले गेले. अवघे ३२ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. "हे परमेश्वरा ते काय करताहेत हे त्यांना माहीत नाही. त्यांना क्षमा कर.” हे त्यांचे शेवटचे उद्गार होते. तो दिवस गुड फ्रायडे म्हणून मानला जातो. तीन दिवसांनी येशू रविवारी पुन्हा जिवंत झाले. त्यांचे पुनरूत्थान झाले.
ख्रिस्ती धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म असून त्याला दोन हजार वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे. जगात ख्रिस्ती धर्माचे लोक जवळपास ३ अब्ज आहेत. बेथलेहेम इथे येशू ख्रिस्तांचा जन्म झाला. त्यांच्या मातेचे नाव मेरी होते. धर्म पिता जोसेफ होते.
त्यावेळी यहुदी धर्मात अंधश्रध्दांचे अवडंबर होते. परमेश्वरा आम्हाला फक्त दोन वेळची भाजी भाकरी दे. कोणत्याही मोहाला आम्हाला बळी पडू नको. अमंगल वाईट गोष्टींपासून नेहमी आमचा बचाव कर” अशी मागणी परमेश्वराकडे केली पाहिजे अशी शिकवण येशू ख्रिस्तांनी दिली. ख्रिस्ती बायबल आपल्याला शिकवते की येशूचे मूळ प्रेषित पीटर; जेम्स; जॉन; अँडर्यू; फिलिप; यहूदा इस्करियोट; मॅथ्यू; थॉमस; जेम्स, अल्फियसचा मुलगा; बार्थोलोम्यू; जुडास थॅडियस; आणि सायमन झेलोट्स होते.
ख्रिस्ती धर्मात मुख्य तीन पंथ आहेत. रोमन कॅथोलिक, इस्टर्न ऑर्थोडॉक्स आणि प्रॉटेस्टंट. प्रॉटेस्टंट पंथात अजून काही उपपंथ आहेत. प्रॉटेस्टंट पंथ सुधारणावादी मानला जातो. तो पंथ येशू आणि त्यांच्या शिकवणुकीला मानतो. रोमन कॅथॉलिक पंथ मेरी आणि येशूला मानतो. जुना करार या बायबलला कॅथोलिक, तर नवा करार बायबलला प्रॉटेस्टंट पंथ मानतो.
नव्या करारात येशूने केलेल्या चमत्कारांचे संदर्भ त्यांच्या शिष्यांनी लिहून ठेवले आहेत. त्यांनी जे प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले ते आहेत. ते बुध्दीच्या पलिकडील आहेत. जेव्हा खाण्यापिण्याचे संकट वाढले तेव्हा त्यांनी पाण्याला द्राक्षांचा वेल आणि द्राक्षरसात बदलले. तसेच येशूने ५ हजार लोकांना ५ भाकरी आणि २ मासे खायला दिले.(यूहन्ना ६ः८-१३.)
येशूने अनेक आजारी आणि अशक्त लोकांना बरे केले. त्यांनी अंधत्व, बहिरेपणा, कुष्ठरोग आणि अपस्मार तसेच पांगळेपणा देखील बरा केला होता. (मत्ती ४.२३).
एकदा येशू आपल्या शिष्यांसह नावेतून गलील समुद्र पार करत असताना अचानक वादळ वाहू लागले. यामुळे त्यांचे शिष्य घाबरले आणि थरथरू लागले. मग येशूने आपल्या सामर्थ्याने वादळ शांत केले.(मत्ती १४ः२४-३३.)
येशूने अशा लोकांना बरे केले ज्यांना भुते ग्रस्त आहेत असे म्हटले जाई. येशूने एका विधवेचा तरुण मुलगा आणि एका लहान मुलीचे पुनरुत्थान केले. त्यांनी मित्र लाजरला देखील पुन्हा जिवंत केले होते.(यूहन्ना ११ः३८-४८; १२ः९-११.)
बराच काळ ते अज्ञातवासात होते.येरूसलेमला पुन्हा येताना टेम्पल माउंटकडे पाहताना त्यांना दिसले की त्या टेम्पलच्या गाभाऱ्यात बाहेरच्या बाजूस रोमन टॅक्स कलेक्टर बसलेले आहेत, मनी चेंजर्स बसले आहेत आणि तिथे सर्व प्रकारचे व्यवसाय सुरू आहेत. हे बघून येशूंना खूप वाईट वाटले की या पवित्र मंदिरात अशा प्रकारचे काम चालले आहे.त्यांनी या गोष्टींना विरोध केला. राज्यपाल पिलातापुढे तक्रारी करण्यात आल्या. रोमन साम्राज्याच्या अंकित असल्याने येशूंना देहदंडाची शिक्षा सुनावली. येरूसलेम येथे येशूला वधस्तंभावर खिळून मारले गेले. अवघे ३२ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले.
यहुद्यांचा राजा म्हणून त्यांचा उपहास केला गेला. त्यांना काटेरी मुकुट घातला गेला. "हे परमेश्वरा ते काय करताहेत हे त्यांना माहीत नाही. त्यांना क्षमा कर.” हे त्यांचे शेवटचे उद्गार होते. तो दिवस गुड फ्रायडे म्हणून मानला जातो. तीन दिवसांनी येशू रविवारी पुन्हा जिवंत झाले.त्यांचे पुनरूत्थान झाले. त्यांना शिष्येने कबरी बाहेर पाहिले. इतर अनेक शिष्यांना, अनुयायांना दर्शन दिले. येशूंनी जरी भविष्यवाणी केली तरी कधीही स्वतःला देव न मानता देवाचा पुत्र म्हणविले.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लेन्ट म्हणजे ४० दिवसांचा उपवास ख्रिस्तीधर्मीय करतात. राखेचा बुधवार ते इस्टर संडेपर्यंत हे उपवास (रविवार खेरीज) असतात. या कालावधीत एकभुक्त राहणे, मांसाहार वर्ज्य करणे, बायबलमधील वचनांचे चिंतन, मनन करणे तसेच श्रध्दाळू भाविक येशूने ४० दिवस भोगलेल्या यातनांचे स्मरण करतात. येशुवरील श्रध्दा यामुळे दृढ होण्यास मदत होते. (संदर्भ-बायबल, विश्वकोश) - बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर द्वारा डॉ. साई प्रसाद कुमठेकर