काळानुरूप व्यवसायात बदल आवश्यक
काळानुरूप बदलले तर आपल्याला काहीही नुकसान नाही. पण आपण बदल स्विकारला नाही; तर मात्र आपले नुकसान नक्की होईल. पुर्वी शेतकरी आपल्या शेतीसाठी बैलगाडी, नांगर, औत अशा पारंपरिक औजारे वापरी. बैलांची जोडी त्यांच्याकडे असायची. आत्ता याची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. शेतीची यांत्रिक अवजरे आज बाजारात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यावर अवलंबून असणारी बलुतेदार पद्धत राहिली नाही. या बलुतेदारांचेही व्यावसायीकरण झाले आहे. ते उपाशी नसून त्यांनी अन्य पर्याय शोधलेले आहेत.
सायंकाळी गिष्म ऋतूतील गर्मीतून थोडी सुटका व्हावी म्हणून मी घराबाहेर पडलो. साधारण सायंकाळचे सहा वाजले होते, तरी हवेत उष्णता होती. सूर्यदेव मावळतीला झुकला होता. इमारतीच्या पायऱ्या उतरुन मी बाजाराच्या दिशेने चालायला लागलो. उन्हाळा असल्याने नेहमी गजबजलेल्या चौकात आज फार अशी गर्दी दिसली नाही. पुढे पुढे जात असतांना माझे लक्ष वेधून घेतले ते बारदाना विकणाऱ्या मारवाडी समाजाच्या दुकानदाराने. त्याच्या दुकानात तीन-चार कामगार चक्क प्लास्टिकच्या तीस किलो धान्य बसेल अशा वजनाच्या पिशव्या व्यवस्थितपणे एकावर एक ठेवतांना दिसले. मला त्या क्षणी ते दृष्य पाहून आश्चर्य वाटले. कारण मी या नागोठणे नगरीत आल्यापासून या व्यापाऱ्यांचा एकच व्यवसाय मला पाहायला मिळाला होता, तो म्हणजे बारदाना देवाणघेवाण करण्याचा. बाजारातील रिकामा व थोडाफार खराब बारदाना विकत घे याचा व तोच बारदाना (पोते) दाभणाने शिलाई मारून व्यवस्थित करायचा व पुन्हा बाजारात तो उपलब्ध करून द्यायचा. हे त्यांचे काम वर्षानुवर्षे अविरतपणे चालू होते. त्यांच्याकडे अशा बारदाना पोत्यांची थप्पी लागलेली असायची.
सर्व कुटुंब तेथे राबतं हे विशेष. यावरून स्पष्ट होते की, कोणत्याही धंदा छोटा किंवा मोठा नसतो. पण तो व्यवसाय सातत्यपूर्ण व वेळ देऊन केला पाहिजे. मोठमोठ्या ट्रॅक्समधून हा माल त्यांच्याकडे येतो व प्रक्रिया केलेला माल परत बाजारात जातो. पण काळाच्या ओघात एक क्विंटल मालाचे पोते लोप पावत चालले आहेत. शिवाय या हायब्रीडच्या जमान्यात असे क्विंटलभर वजन उचलण्यासारखी शरीरयष्टी असणारे लोकही कमी झाले आहेत. शक्यतो पंचवीस, तीस किलो वजनाचे पॅकिंग आज बाजारात उपलब्ध झाले आहेत. पण हे एक ठळकपणे सांगायचे उदाहरण झाले. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. मी नागोठण्यात आलो त्याला सत्तावीस वर्ष पूर्ण होत आले आहेत. तेव्हा एस. टी. डी. बुथ वाल्यांचा धंदा तेजीत होता. दोन-तीन टेलिफोन सुविधा उपलब्ध असूनही फोन लावण्यासाठी लोकांचे त्या ठिकाणी नंबर असायचे. शिवाय कॉल्स महाग असल्याने कमीतकमी बोलणे व्हायचे. मग हळूहळू मोबाईल आले. पण टॉक टाईम महाग असायचे किंवा रात्री बारा ते पाच सहा जरा स्वस्त असायचे. नंतर मोबाईलवर अनलिमिटेड कॉल्सचा जमाना आला. यामुळे हा व्यवसाय पूर्णपणे बंद करावा लागला.
मध्यंतरीच्या काळात मीनी बँकिंगचा व्यवसाय चांगला चालू लागला होता. लोकांना वेळेवर पैसे हातात मिळत होते. पण ए. टी. एम. सुविधा वाढल्याने व हल्ली पेटीएम, फोन पे, जी पे, भीम ॲप आल्यामुळे हाही व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. कधी काळी टाईप रायटरने सरकारी कामे होत होती. तिथे नंतर इलेक्ट्रॉनिक टायपिंग आले व आत्ता संगणकीय प्रणाली आला. त्यामुळे टाईप रायटर कायमचे अडगळीत गेलेले आहेत. रेडीमेड कपडे बाजारात उपलब्ध झाल्यामुळे तरुणांना कपडे शिकून घ्यायला नको. यामुळे टेलरिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. शिवाय आत्ता ऑनलाईन कापड, किराणा, इलेक्ट्रॉनिक वस्तू सहज मिळत असल्याने बाजारात बऱ्याच व्यवसायात मंदी पाहायला मिळते. पर्यायाने आज स्थानिक कापड, किराणा व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकाने बंद करण्याची वेळ येत आहे. पुर्वी शेतकरी आपल्या शेतीसाठी बैलगाडी, नांगर, औत अशा पारंपरिक औजारे वापरून शेती करीत होता. दोन दोन बैलांची जोडी त्यांच्याकडे असायची. पण आत्ता याची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. शेतीची यांत्रिक अवजरे आज बाजारात उपलब्ध झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यावर अवलंबून असणारी बलुतेदार पद्धत ग्रामीण भागात राहिली नाही. या बलुतेदारांचे व्यवसायीकरण झाले आहे. काहींनी व्यवसायाचे अन्य मार्ग शोधले आहेत. म्हणून सर्व उपाशी आहेत असे मुळीच नाही. त्यांनी अन्य पर्याय शोधलेले आहेत.
करोना महामारीच्या काळात कितीतरी लोकांना स्वतःच्या नोकऱ्या व व्यवसाय टिकवता आले नाही. या अशा लोकांनी देखील यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधलेला आहे. मला एवढेच सांगायचे आहे की, काळानुरूप बदलले तर आपल्याला काहीही नुकसान नाही. पण आपण बदल स्विकारला नाही; तर मात्र आपले नुकसान नक्की होईल. थोडा वेळाने मी या विचार चक्रातून बाहेर पडलो व त्या व्यापाऱ्याला माझ्या समाधानासाठी एक प्रश्न विचारला की, प्लास्टिक पिशव्या कशा काय? त्यावर मला उत्तर आले की, आज जी बाजारात मागणी आहे तेच करावे लागते. म्हणून हा बदल तुम्हाला दिसतो आहे. त्यांच्या या उत्तराने मला समाधान झाले असे वाटले व मी पुढे चालायला लागलो. किरकोळ व्यापार बंद होण्याची अनेक कारणे आहेत, आणि यापैकी काही कारणे एकमेकांशी संबंधित आहेत. किरकोळ व्यवसाय मालकांनी या कारणांवर लक्ष देऊन योग्य उपाययोजना केल्यास व्यवसायाला अधिक काळ टिकवून ठेवता येऊ शकते. म्हणजे काळानुरूप माणसांनी बदलायला हवे. - प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे