प्लास्टीक, थर्माकोल, कागद पर्यावरणपूरक पत्रावळी द्रोणांच्या मुळावर
राज्यासह देशात लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्लास्टिक, कागदी व थर्माकोलच्या पत्रावळीचा वापर मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येतो आणि ह्या पत्रावळी मानवाच्या व पशुंच्या आरोग्यासाठी दिवसेंदिवस विष बनतांना दिसत असुन घातक सिद्ध होत आहेत. ज्या वनस्पती पासुन किंवा वृक्षांपासुन ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होवू शकते अशा वृक्षांना पुनर्जीवित करून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हायला पाहिजे.
अनेक वर्षांपासून झाडांच्या पानांच्या पत्रावळीवर जेवणाची परंपरा चालत होती. यातूनच ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार सुध्दा मिळत असे. परंतु आता अत्याधुनिक युगात यंत्राच्या साहाय्याने प्लास्टिक, कागदी व थर्माकोल यावर आवरण असलेल्या पत्रावळी व द्रोण विक्रीला आल्याने आरोग्याच्या दृष्टीकोणातु अत्यंत घातक सिद्ध होत आहे तरीही आपण त्याचा वापर सर्रास मोठ्या प्रमाणात करीत आहोत ही अत्यंत गंभीर बाब आहे. कृत्रिम पत्रावळी-द्रोणमुळे ग्रामीण भागातील रोजगारांवर मोठे संकट ओढावले आहे. राज्यासह देशात आपण निसर्गावर अहोरात्र बेछूट अत्याचार, अन्याय आणि हत्या करीत असल्याने अनेक महत्त्वपूर्ण वृक्ष नामशेष होत आहेत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपण पुर्वी ज्या पर्यावरणपूरक पत्रावळीत आनंदाने जेवणाचा स्वाद घेत होतो आणि भाजी व कडीचा आनंद ज्या द्रोणच्या माध्यमातून मिळत होता तो आज पुर्णपणे संपुष्टात येवून लुप्त झाला आहे किंवा होण्याच्या मार्गावर आहेत.कारण पर्यावरणपूरक पत्रावळी-द्रोण याचे पुर्वी आगळेवेगळे महत्त्व होते आणि त्यातील जेवणाचा स्वाद आल्हादायक, आरोग्यदायक आणि मनाला आनंद देणारा होता.
आज कागदी पत्रावळी- द्रोण, प्लास्टिक पत्रावळी-द्रोण, थर्माकोलच्या पत्रावळी-द्रोण या विषावत वस्तूंनी संपूर्णपणे जेवणाच्या पर्यावरणपूरक पत्रावळी, द्रोणवर घणाघाती हल्ला करून नामशेष केला आहे. आपण समजू शकतो की आज पळसाची पाने, मोहाची पाने, घोगराची पाने, टेंम्बुनचे पाने, कुड्याची पाने ज्यापासून पत्रावळी/द्रोण तयार होतात तीच झाडे आज वृक्षतोडीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने आज आपल्यावर अशी दुर्गती आली आहे. जे आपले जेवणाचे साधन नाही अशा प्लास्टिक, थर्माकोल व कागदी पत्रावळी/द्रोणाचा मोठ्या प्रमाणात वापर होतांना आणि याचा विपरीत व गंभीर परिणाम आरोग्यावर सुध्दा होत आहे. सोबतच जंगलतोड व वृक्षतोड यामुळे ज्या-ज्या झाडांची मानवाला, पर्यावरणाला व पशुपक्ष्यांना आवश्यकता आहे ते संपूर्ण वृक्ष लूप्त होण्याच्या मार्गावर आहेत किंवा नामशेष होत आहेत, ही बाब आरोग्यविषयक व पर्यावरण विषयक अत्यंत चिंताजनक व गंभीर बाब आहे. परंतु आजची पिढी नको ते स्टेटस जपण्याकडे वळत असून स्वतःच्या पायावर कुह्राड मारतांना दिसतात हे मानवाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. आज पर्यावरणपूरक पत्रावळी/द्रोण नामशेष होत असल्याने ग्रामीण भागातील कारागिरांचा व्यवसाय संकटात येवून त्यांच्यापुढे मोठे संकट ओढावले आहे.
सरकार नेहमीच पर्यावरणाची किंवा निसर्ग वाचविण्याची भाषा करीत असते. याच अनुषंगाने सरकारने प्लास्टिक, थर्माकोल व कागदी पत्रावळी-द्रोण यावर बंदीचे आदेश देवून पर्यावरणपूरक पत्रावळी-द्रोण करीता लागणारे वृक्ष लागवडीकडे सरकारने जास्त जर भर दिला तर पुन्हा पर्यावरणपूरक पत्रावळी-द्रोणचा आनंद जेवणामध्ये मोठ्या प्रमाणात घेता येईल व याचे स्वागत आजची नवीन पिढी सुध्दा करील. सरकाने अनेक क्षेत्रात प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घातलेली आहे याचे मनापासून स्वागत.
पानांच्या पत्रावळी-द्रोणची प्रथा बंद झाल्याने ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. नैसर्गिक विविध गुणधर्म असलेल्या पानांच्या हिरव्यागार पत्रावळीमध्ये जेवण करणे, हे मानवी आरोग्यासाठी मोठे फायदेशीर आहे असे ज्येष्ठ वयोवृद्ध व जाणकार आजही आपल्या अनूभवातून सांगतात. पानांच्या पत्रावळी-द्रोण शिवण्यासाठी बारीक कडुनिंबाच्या काड्या किंवा बांबूच्या काड्यांचा वापर केला जाई. पानांच्या पत्रावळीत केलेले जेवण पचनास हलके, रूचकर आणि आनंददायी वाटायचे त्यामुळे पत्रावळीतील जेवणाचा स्वाद निराळाच होता. त्याचप्रमाणे या पत्रावळी जेवणानंतर गुरे-ढोरे खायच्या. त्यामुळे त्यांनाही आनंद मिळत असे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीकोनातून, वाढते प्रदुषण व बदलते हवामान याकरीता निसर्ग वाचवून व नैसर्गिक विविध गुण असलेल्या साधनांचा पुरेपूर वापर करून निसर्गाला वाचविले पाहिजे. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या कारागिरांच्या व्यवसायांवर येणारे संकट दुर करण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे व आपले आरोग्यसुध्दा सुरक्षित ठेवले पाहिजे. नैसर्गिक विविध गुणधर्म असलेल्या हिरव्यागार पत्रावळी फक्त श्राद्ध पक्षात, पितृमोक्ष अमावस्या किंवा अन्य महत्त्वपूर्ण विविध कार्यक्रमांत किंवा पुजेच्या दरम्यान वापरतांना आपण पहातो. या संपूर्ण बाबींवर सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे व ज्या वनस्पती पासुन किंवा वृक्षांपासुन ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होवू शकते अशा वृक्षांना पुनर्जीवित करून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हायला पाहिजे. यामुळे पर्यावरणपूरक पत्रावळी-द्रोण तर मिळतीलच, सोबतच वाढत्या हवामानातील बदलांवर मात करण्यास थोडी का होईना मदत अवश्य होईल. - रमेश कृष्णराव लांजेवार