वयम् मोठम् खोटम्
वाढतं वय हा केवळ एक आकडा आहे. त्याच्याकडे विनोदाने, गंमतीने, मजेने बघा, त्यांना उलटे फिरवून बघा..मग ५२ चे २५ वाटतील..६२ चे २६ आणि ७२ चे २७ वाटतील ! आताच्या अनेक तरुणांना, बालकांनाही माहिती तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे ज्येष्ठ लोकांपेक्षा जास्त माहिती असते. ती मुलं केवळ वयाने कमी आहेत म्हणून त्यांना दुय्यम लेखण्याचं काहीच कारण नाही. ज्येष्ठांचं ज्येष्ठत्व, मोठेपण कुणी हिरावून घेत नाही. त्यांनीही स्वतःला एकटं, परावलंबी, दुय्यम समजू नये. कपाळाला आठ्या पाडून बसू नये. उठसूठ सगळ्यांना नावं ठेवण्याची मानसिकताही ज्येष्ठांनी बदलली पाहिजे.
अलिकडेच एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. ज्यात निवेदक समरसुन सांगत होता की ‘जिसे हम बुढापा कहते है वो दरअसल लाईफ के गोल्डन इयर्स है ! जीनेकी असली उमर तो साठ है बुढापेमेही असली ठाट है..' असं सांगताना त्या मध्यमवयीन निवेदकाने साठीत असणाऱ्या साऱ्यांना शुभेच्छाही दिल्याचे मी पाहिले. एप्रिलच्या ३ तारखेला माझाही ६२ वा जन्मदिवस साजरा झाला. अनेकांनी समाजमाध्यमांवरुन, थेट भेटून मला शुभेच्छा दिल्या व दीर्घायुष्यासाठी शुभचिंतन केले. पण मी मुळचा वात्रट, नटखट, अवखळ, मिश्किल, खोडकर, हसमुखभाई गँगचा सदस्य असल्यामुळे माझे अनेक मित्र-मैत्रीणीही त्याच धर्तीचे असणार हे ओघाने आलेच ! १९८३-८४ च्या सुमारास उल्हासनगरच्या आर के तलरेजा महाविद्यालयातून मी एम ए च्या वर्गात शिकत असताना कॉलेजच्या ‘स्टुडन्डस कौन्सिल'वर निवडून गेलो होतो. त्याच वर्षी बी कॉम च्या प्रथम वर्षात शिकणारी माझी मैत्रीण ‘लेडीज रिप्रेझेंटेटीव्ह' म्हणून निवडून आली होती. तिने माझ्या जन्मदिवसानंतरच्या दिवशी आता ४ एप्रिलला व्हाट्सअप वर संदेश पाठवला. ‘सॉरी सॉरी. बिलेटेड हॅप्पी बर्थडे डियर. गॉड ऑल्वेज कीप यु इन गुड हेल्थ.' यावर मी उत्तर दिले की..‘असेच प्रेम आणि माया, लोभ, स्नेह कायम मिळत राहो हीच प्रार्थना.'
यानंतर एखादी गप्प बसली असती किंवा त्यावर स्मायलीचा इमोजी किंवा हात जोडण्याचा, फुलाचा फोटो पाठवून पुढच्या कामाला लागली असती. पण तसे करील तर मग माझी मैत्रीण कसली? तिने त्यावर ठेवून दिले की ‘घोडा किती वर्षांचा झाला?' मग मी गप्प राहिलो असतो तर तिला बरे वाटले नसते. मीही तिच्या संदेशाला उत्तर दिले..‘घोडी मैत्रीणीपेक्षा ३ वर्षे जास्त! म्हणजे तू १९६६ ची तर मी १९६३ चा. आता ६२ वर्षांचा!' यावर मग तिने दात विचकणारे दोन आणि लाल चश्मा घातलेला एक असे तीन स्मायली पाठवले.
अशाच मैत्रीणींबरोबर डोंबिवलीमध्ये जात असताना मागे तीन व पुढे एक असे रिक्षाने प्रवास करण्याची वेळ आली. मी रिक्षावाल्याजवळ अवघडलेल्या, वाकड्यातिकड्या अवस्थेत बसल्याचे मागे बसलेल्या तिघींपैकी माझ्या एका प्रेमळ मैत्रीणीने पाहिले व मला विचारले...‘बाळा, तिथे तुला बसायला त्रास होत असल्यास आमच्या मांडीवर बसतोस का?'
यावर बाळालाही सणसणीत काहीतरी बोलायचे होते, पण ते ऐकून रिक्षा बंद पडली असती, आपापसात धतिंगबाजी ठिक आहे, इतरांसमोर त्याचे प्रदर्शन कशाला, म्हणून मग बाळाने पाव किलो मुग गिळून गप्प बसण्याची भूमिका निभावली.
केरळला सहलीनिमित्त गेलो होतो. सोबत पत्नी, सासरे, मेव्हणे, मित्र, मित्रांच्या पत्नी, माझ्या वर्गातल्या मुली अशी मोठी गँग होती...हॉटेलात जेवणापूर्वीच्या वेळेत दंगा मस्ती, जोक सांगणे, कल्ला सुरु होता. माझ्या एका मैत्रीणीने एक जोक सांगितला...‘एक अभिनेत्री चित्रपटाच्या सेटवर एक सीन झाल्यानंतर रुममध्ये जाऊन विश्रांती घेत असते. तिथे तिला भेटायला कुणी एक येतो आणि सांगतो मला तिला भेटायचे आहे. तेथील कर्मचारी सांगतो..बाई विसावा घेत आहेत. तर हा म्हणतो..बाईंना सांगा, "एकविसावा" आलाय म्हणून!' हे असले बर्स्टींग जोक्स. तेही ज्येष्ठ नागरिकांसमोर सांगणे सुरु होते. त्यानंतरच्या हास्यकल्लोळात सारेच सामील झाले होते. जोक सांगणारी मैत्रीण माझ्याच वर्गातली असल्याने साठीपुढची होती.
हे सगळे सांगायचे तात्पर्य हेच की वय हा केवळ एक आकडा आहे. ते वाढण्यासाठी तुम्हाला काहीही वेगळं करावं लागत नाही. पण वाढत्या वयातही तारुण्य, बाल्य, वात्रटपणा, अवखळपणा, धतिंगगिरी शाबूत ठेवण्यासाठी मात्र बरंच काही करावं लागतं. वाढत्या वयामुळे येत असलेला थकवा, कराव्या लागणाऱ्या विविध तपासण्या, जडलेल्या काही व्याधी-आजार, गोळ्या-औषधांचे टाईमटेबल सांभाळणे, काहींचा नोकरी-व्यवसायातून विहीत वयोमानपरत्वे निवृत्ती घेतल्यावर मासिक उत्पन्नाचा ओघ आटल्याने होणाऱ्या खर्चाचा समतोल सांभाळणे, काहींच्या घरातील कारभार नव्या शिलेदारांच्या हाती गेल्याने येणारे दुय्यमत्व स्विकारण्यातील मजबूरी, काही घरांतील सुनांकडून केला जाणारा ज्येष्ठांचा जाच, ज्या भाच्या-पुतण्या-भावंडे यांचे त्यांच्या लहानपणी जिवापाड लाड केले त्यांनी आता दु्र्लक्ष करणे..अशा एक ना दोन अनेक नकारात्मक बाबींचा सामना करत विनोदबुद्धी कायम ठेवणे, वातावरणातील ताण हलका करणे, सर्वांना आपली सोबत हवीहवीशी वाटू लागण्याची स्थिती निर्माण करणे हे खचितच सोप्पे काम नव्हे! कारण अलिकडचे वातावरण एकदम बदललेले आहे. काका, मामा, आत्या, मावश्या यांच्याकडे कधीही जाऊन हक्काने राहणारी आमची पिढी. ती सोय आता आहे असे म्हणवत नाही. कारण एक (किंवा दोनच !) अपत्ये जन्माला घालण्याचा युगात या साऱ्या नात्यांचे जवळपास उच्चाटन झाले आहे. नातीच राहिली नाहीत. अनेक घरांतील मुलांना मावशी, मामा, काका, आत्याच उरले नाहीत. त्यामुळे नात्यातील ज्येष्ठांशी वागण्याची पध्दतच अनेकांना माहिती नाही. टेलिव्हिजन, सोशल मिडियाने साऱ्यांना घरातल्या घरात जणू स्थानबध्द केले आहे. त्यातही अनेकांच्या घरात मी पाहिले आहे की घरातल्या आई-वडीलांशी त्यांची मुले-सुना धड बोलत नाहीत, नातवंडेही आपापल्या शाळा-क्लास-छंद-व्हॅकेशन बॅचेस यांच्यात दंग असतात. अशा वेळी ही ज्येष्ठ माणसे एकाकी पडतात व त्यांच्या मनात नकारात्मक विचार घर करु लागतात. त्यांच्या एकेकाळच्या समृध्द जीवनाचे साथीदार एकेक करुन त्यांचा हात सोडुन वैकुंठाची वाट धरत असतात आणि त्यामुळे मग संध्याछाया यांना आणखीच घाबरवतात. या सगळ्यावर वाचन, फेरफटका, समवयीनांत मिसळणे, कामाच्या व्यापात, तरुणपणीच्या जीवनसंघर्षात जे छंद जोपासता आले नाहीत, त्यात रमणे हे काही चांगले उपाय आहेत; पण ते साऱ्यांनाच अंगिकारता येतात अशातला भाग नाही.
लेखक-पत्रकार म्हणून समाजात वावरताना, लोकांना भेटताना, वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींशी संवाद साधताना माझ्यासारख्या भटक्यासमोर अनेकजण मन मोकळे करत असतात. तर काहींना मी माझ्या पध्दतीने बोलतं करुन माहिती मिळवतो. त्या वेळी असे लक्षात येते कित्येक ज्येष्ठ नागरिकांच्या मनात आताच्या पिढीबद्दल विखार दाटलेला आहे. अनेकांच्या डोक्यात आपल्या तरुणपणीच्या कर्तृत्वाची हवा, अहंकार, दंभ, दर्प, गर्व आहे. ‘आम्ही एवढे केले, तेवढे केले, सगळे विसरले, नमकहराम-एहसान फरामोश निघाले. आता आमच्या उतारवयात आम्हाला भेटायला येत नाहीत, आमचा मान राखत नाहीत, आम्हाला बोलावत नाहीत, आम्हाला साधा फोनही करत नाहीत' अशी त्यांची कुरकुर सुरु असते. खरेतर आताचे शहरी धकाधकीचे वातावरण इतकेबेभरवशाचे, संघर्षाचे, गळेकापू स्पर्धेचे झाले आहे की अनेक तरुणांना, मध्यमवयीनांना मनात असूनही अनेकदा ज्येष्ठांना भेटता येत. फोन करुन बोलण्याचीही फुरसद नसते. बरे फोन केलाच तर तेथेही हे काही तथाकथित ज्येष्ठ चार शब्द सुनावून कान उपटण्याचीच भाषा करीत असतील आणि ‘मी तुझ्यासाठी एवढे केले, तेवढे केले' याचीच कॅसेट वाजवीत बराच वेळ खात असतील तर यांना फोनतरी कोण परत करील? यामुळे मग या काही ज्येष्ठांच्या नकारात्मकतेत आणखीच भर पडत जाते आणि कपाळाला आठ्या पाडीत हे लोक घराचे सिलिंग पाहात बसतात.
यावर उपाय आहेत. ते करण्याची मानसिकता मात्र सकारात्मक हवी. विख्यात शायर-गीतकार साहिर लुधियानवी यांनी ‘कभी कभी' चित्रपटासाठी लिहिलेले ‘मै पल दो पल का शायर हुँ ' या अमिताभ बच्चन याच्यावर चित्रीत झालेल्या गाण्यात पुढच्या ओळी अशा आहेत की ‘कल और आएंगे नग्मों की खिलती कलिया चुननेवाले मुझसे बेहतर कहनेवाले तुमसे बेहतर सुननेवाले..' मला या ओळी वृध्दत्वाकडे जाणाऱ्या, वृध्द असणाऱ्या (म्हणजे प्रत्येकानेच! कारण कुणालाच तरुणपणी मरायचं नाही; तर वृध्द, ज्येष्ठ, म्हातारं होऊनच या जगाचा निरोप घ्यायचा आहे.. म्हणून..!) साऱ्यांनीच आपल्यात भिनवून घ्यायला हव्यात, अंगावर-मनात-मेंदूत ठाम कोरुन ठेवायला हव्यात असे वाटते. कारण आपली जागा कधीतरी रिकामी करायचीच आहे, त्या जागेवर उद्या कुणीतरी दुसरे, आपल्यापेक्षा आणखी चांगले येणार आहे, ते खिलाडूपणाने स्विकारायला स्विकारायला हवे. त्यासाठी जिंदादिल वृत्ती हवी, मनमोकळा, दिलखुलास स्वभाव हवा. आज ८३ व्या वर्षीही अमिताभ हरिवंशराय बच्चन घट्टपणे पाय रोवत त्याच्या आवडीच्या कामात सक्रिय राहिला आहे, ते यामुळेच! या साऱ्याला विनोदाची, गंमतीची, टवाळकीची, मिश्किलपणाची जोड दिली की कुठल्याही वयात एकटेपणा येतच नाही. उलट लोकच आपल्याला बोलवायला येतात, ‘तुम्ही पाहिजेतच, तुमच्याशिवाय मजा नाही' असं म्हणत!
म्हणून तर कविवर्य मंगेश पाडगावकर ‘सांगा कसं जगायचं?' कवितेत पुढे लिहुन गेले की... ‘काळ्याकुट्ट काळोखात जेंव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं..काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा..'
म्हणून म्हणतो...वाढतं वय हा केवळ एक आकडा आहे. त्याच्याकडे विनोदाने, गंमतीने, मजेने बघा, त्यांना उलटे फिरवून बघा..मग ५२ चे २५ वाटतील..६२ चे २६ आणि ७२ चे २७!
राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई