लघुउद्योग ते डी.लिट. - प्रवास एका उद्योजकाचा !

पितांबरी उद्योगसमूहाचे श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना मागच्याच महिन्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डी.लिट.(विद्यानिधी) ही मानाची पदवी प्रदान केली. त्या प्रित्यर्थ आज १७ एप्रिल रोजी  राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रभुदेसाई यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. श्री. प्रभुदेसाई यांच्या प्रदीर्घ मेहनतीच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख..

साधारण ३५ वर्षांपूर्वी घरच्या घरी लिक्विड सोप आणि क्लिनिंग पावडर बनवून ती हॉटेल्स आणि घरोघरी स्वतः जाऊन विकणे ते आज १३०० हुन अधिक कर्मचाऱ्यांची कंपनी उभी करून अमेरिका, कॅनडा, ब्राझील, रशिया आणि ऑस्ट्रेलियासह २६ हुन अधिक देशांत कंपनीची उत्पादने पोहचवणे, नऊ डिव्हिजन्समध्ये ८२ हुन अधिक दर्जेदार उत्पादने बाजारात आणणे असा थक्क करणारा प्रवास साध्य केला आहे तो एका मराठी उद्योजकाने. ‘बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी' ही टॅगलाईन घेऊन तांब्या पितळेची भांडी लखलखीत करणारी पितांबरी शायनिंग पावडर घेऊन बाजारात उतरणारी पितांबरी आज घरोघरी पोहोचली आहे. या पितांबरीचा डोलारा उभा करणारे आणि तितक्याच ताकदीने तो पेलणारे पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांची उद्योगक्षेत्रातील भरीव कामगिरी आणि ते करत असलेल्या सामाजिक कार्याची दाखल घेत गेल्याच महिन्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना सन्माननीय डी.लिट.(विद्यानिधी) पदवी प्रदान करण्यात आली. एका मराठी उद्योजकाला मिळालेला हा बहुमान समस्त मराठी जनांसाठी गौरवास्पद आहे. श्री. प्रभुदेसाई यांच्या या यशाचा यथोचित गौरव करण्यासाठी प्रभुदेसाई यांची जन्मभूमी आणि प्रथम कर्मभूमी असलेल्या ठाणे शहरात १७ एप्रिलला डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात राज्याचे उपमुख्यमंत्री मान. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्याला जेष्ठ अणुशास्त्रज्ञ पदमविभूषण डॉ. अनिल काकोडकर, सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ, सच्चीदानंद शेवडे, सनातन संस्थेच्या सद्‌गुरू सुश्री अनुराधा वाडेकर आणि चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  

           समाजसेवेचा आणि देशभक्तीचा वारसा श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्याकडे त्यांच्या वडिलांकडूनच आला आहे. लहानपणापासून राष्टीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत त्यांचे जाणे असल्याने समाजसेवेचे आणि देशसेवेचे बालकडू त्यांना लहानपणीच मिळाले आहे. आपल्या प्रत्येकावर देव, पितर, ऋषी आणि समाज अशी चार ऋणे असतात. त्यापैकी समाज ऋण फेडण्याच्या दृष्टीने ते विविध सामाजिक संस्था, राष्ट्र आणि धर्म यांच्या पुनरुत्थानासाठी झटणाऱ्या संघटना, उदयोन्मुख कलाकार, गरजू व्यक्ती, गतिमंद मुले यांना नियमितपणे दान देत असतात. मग ते दान  पैशाच्या स्वरूपात असो वा पितांबरीच्या गृहोपयोगी उत्पादनांच्या स्वरूपात. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकोपयोगी कार्यांना प्रायोजकत्व देऊनही ते सामाजिक बांधिलकी जपत असतात. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला ते ठराविक रकमेचा धनादेश विविध सामाजिक, शैक्षणिक, आध्यत्मिक संस्थांना, गोशाळांना आणि आश्रमांना अर्पणस्वरूपात देतात.   कोरोना काळात स्वच्छता दूत, पोलीस कर्मचारी, रुग्णालये यांना पितांबरीचे सॅनिटायजर, मास्क, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी पितांबरीच्या हेल्थ केअर डिव्हिजनची आयुर्वेदिक औषधे कंपनीच्या वतीने विनामूल्य वितरित करण्यात आली. आषाढी आणि कार्तिकी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरीची वारी पायी करत असतात. त्यांच्या सेवेसाठी पितांबरीचा चमू वारीमार्गात दरवर्षी कार्यरत असतो. या  चमूतील  पितांबरीचे कर्मचारी  पितांबरीचे क्युअर ऑन हे वेदनाशामक आयुर्वेदिक तेल वारीतील वारकऱ्यांच्या पायांना लावून त्यांच्या पायांची मालिश करून देतात. ज्यामुळे वारकऱ्यांना वारीसाठी पुनश्च्य नव्याने मार्गरत होण्यासाठी स्फूर्ती मिळते. पितांबरीत काम करणारा मग तो शिपाई असो वा स्वच्छता कर्मचारी त्याला कर्मचारी म्हणणे प्रभुदेसाई यांना आवडत नाही.  पितांबरीचा प्रत्येक कर्मचारी पितांबरी उद्योगसमूहाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपापलया परीने हातभार लावत असतो, या विचाराने ते कंपनीतील कर्मचाऱ्यांना ‘सहकारी' म्हणून संबोधतात आणि इतरांनाही तसेच संबोधण्यास सांगतात.  

पितांबरीतील सहकाऱ्यांच्या अडी-अडचणीत श्री. प्रभुदेसाँई त्यांना आर्थिक साहाय्यही करतात, प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करतात. त्यामुळे पितांबरीचा प्रत्येक सहकारी त्यांच्याकडे मालकाच्या भावनेने नव्हे, तर अन्नदाता पित्याच्या भावनेने पाहतो. आज कंपनीने १३०० हुन अधिक गरजवंतांना कंपनीत रोजगार दिला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक वर्षे एकाच ठिकाणी नोकरी करणारे कर्मचारी केवळ शासकीय सेवेतच दिसून येतात; मात्र अशाही काळात २० हुन अधिक वर्षे कार्यरत असलेली मोठी फळी केवळ पितांबरी या खासगी कंपनीतच पाहायला मिळते. कोरोनासारख्या महामारीत जेव्हा सर्वच उद्योगधंदे बंद होते, अशाही काळात त्यांनी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवू दिले नाही. पितांबरी म्हणजे गुणवत्ता हे समीकरण ठरलेले आहे. प्रभुदेसाई यांनी कंपनीच्या प्रत्येक उत्पादनात गुणवत्ता जपताना त्यापासून ग्राहकांना कोणताच त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतलेली आहे. ही काळजी घेण्यासाठी आणि उत्पादनाची गुणवत्ता पडताळण्यासाठी प्रभुदेसाई यांनी कंपनीचे स्वतंत्र ‘आर अँड डी' युनिट उभारले असून त्याठिकाणी उत्पादनांची गुणवत्ता पडताळण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. प्रभुदेसाई यांची आधीपासूनच आयुर्वेदात अधिक रुची असल्याने त्यांनी आपल्या बहुतांश उत्पादनांच्या निर्मितीमध्ये आयुर्वेदाचा आधार घेतला आहे. केवळ व्यवसाय वाढवायचा म्हणून रसायनांचा अधिक वापर करून बाजारात आपले उत्पादन खपवणे हे त्यांना कधीच मान्य झाले नाही.

मराठी माणसांनी नोकरीमध्ये अडकून न पडता लहान मोठा व्यवसाय करावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी प्रभुदेसाई वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. हजारो कर्मचाऱ्यांचे संसार आज त्यांच्यामुळे उभे आहेत. त्या कुटुंबियांचे तसेच सामाजिक कार्यात ते वेळोवेळी करत असलेल्या मदतीमुळे अशा कृतार्थाचे आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रभुदेसाई यांच्या पाठीशी आहेत. उद्योगक्षेत्रात गरुडभरारी घेऊनही ते अजातशत्रू आहेत. पितांबरीच्या प्रत्येक युनिटमध्ये दिवसाची सुरुवात जगद्‌गुरू भगवान श्रीकृष्णाला सामूहिक प्रार्थना करून होते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यामागे ईश्वराचे अधिष्ठान आहे. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्रभुदेसाई स्वतः साधना करतात. साधनेमुळे त्यांचा चेहरा सदैव हसतमुख असतो. केवळ यशस्वी उद्योजक म्हणून नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपणारे, दानधर्म करण्यात सदैव पुढे असणारे, गरीब-श्रीमंत, लहान-थोर असा कोणताच भेदभाव न बाळगता सर्वांशी आपुलकीने वागणारे, कंपनीतील कर्मचाऱ्यांची पित्याच्या नात्याने काळजी घेणारे, सर्वांना हवेहवेसे वाटणारे श्री. रवींद्र प्रभुदेसाई मराठी उद्योगविश्वातील एक अनोखे उदाहरण आहे. - जगन घाणेकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वयम्‌ मोठम्‌ खोटम्‌