मन मोराचा पिसारा..
मोराचा पिसारा कोणाला पाहून फुलत नसतो, तर स्वतःमध्ये अंतरीक आनंदाची उर्मी आल्यावर मोर व्यक्त होतो; असं माणसालाही व्यक्त होता आलं तर सगळेच आनंदी दिसतील, राहतील. माणसांनीही असं निर्व्याज व्यक्त व्हायला हवं.
चित्र जसं फोटोत कैद करता येतं. माणसांनाही आणि माणसांच्या मनातल्या संवेदनानाही कैद करता यायला हवं. काही सुंदर क्षणांनाही कैद करता यायला हवं. आनंदी क्षण हे अत्तरासारखें असतात, त्यांनाही कैद करता यायला हवं. अत्तर जसं कुपीत सुरक्षित असतं,तसं काही आनंदी क्षण सुरक्षित ठेवायला हवेत, दुःखाच्या प्रसंगी कामाला येतात.
सर्व काव्य निसर्गातच आहे फक्त टिपायला नजर हवी. अत्तर उडून जाऊ नये म्हणून आपण अत्तराला आपण अत्तराच्या कुपीत ठेवतो. अशाच चांगल्या क्षणांना मनाच्या कुपीत जपून ठेवायला हवं. वेळ प्रसंगानुसार आपण अत्तराला हवं तेवढच फक्त वापरतों.
काही आनंदी क्षणांना वेळ प्रसंगी आठवावे मनाचे सांत्वन करण्यासाठी तें क्षण वापरावेत.
मोर दिसणं हा आज आनंदाचा भाग झाला आहे, त्याहूनही मोरपीस दिसणं म्हणजे दुग्ध शर्करा योग. मोरपीस स्पर्श कळण्यासाठी तरल भावना आवश्यक असतें. मोरपिसामुळे मोराचं सौंदर्य आहे, जसं चांगले व अर्थपूर्ण शब्दं हे आशयाचं सौंदर्य आहे. आशयाचं सुंदर असणं शब्दावर असतं. मोराच्या थुई थुई नाचण्याला आनंदाची उपमा दिली जाते. शरीरावरून मोरपीसाचा स्पर्श झाल्याचे अनुभव, या सगळ्या अनुभूतीच्या गोष्टी आहेत या नवीन पुढील कळायला हव्यात.
त्यासाठी त्यांनी मोर पाहायला हवा. उगीच नाही आनंदाच्या अनुभुतीला वन्स मोर म्हटलं जात. प्रत्येकाचा आनंदाचा कोटा ठरलेला आहे. आपणच आपल्या आनंदाला आणि दुःखाला कारणीभूत असतो हे माहीत असूनही माणसे चाकोरी सोडत नाहीत. आनंदाचे क्षण वेचायचे असतात सामान्या मध्यें, त्यांच्या दुःखामध्ये त्यांचे सांत्वन करून सुद्धा आनंदाचे क्षण मिळतात.
स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्यांच्या आनंदाला जास्त महत्व देतात ते खरेच आनंदाचे भागीदार असतात. आनंदाचा उत्सव साजरा करायला, कौतुकाला साक्षीदार हवें असतात. आपल्या आनंदाला कुणीतरी गोंजारावं, कुरवाळावं असं प्रत्येकाला वाटतं.कौतुक सोहळा हा आनंदाचा असतो. कौतुकाच्या शब्दांनी माणसे बहरतात, सुखावतात. पारिजातकाचा सडा पडतोच तो हलवून पाडायचा नसतो. तुमचे कर्तृत्वच तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव करतं.
मोराचा पिसारा कोणाला पाहून फुलत नसतो, तर स्वतः मध्ये अंतरीक आनंदाची उर्मी आल्यावर मोर व्यक्त होतो, असं माणसालाही व्यक्त होता आलं तर सगळेच आनंदी दिसतील, राहतील.माणसांनीही असं निर्व्याज व्यक्त व्हायला हवं.
पहाटेच्या समयी पक्षांचा किलबिलाट, मुलांचं बागडणं हे आपल्यासाठी आनंददायी आहे पण आपण उठल्यावर आपल्या स्वार्थाचे हिशोब करतो. माणसांचा सगळा दिवस दुसऱ्यांच्या मनांचा अभ्यास करण्यात जातो. स्वतःच्या मनाची काळजी माणसे फार क्वचित करतात. दुसऱ्यांच्या विचार करत असताना तुलना नावाचा तराजू त्याला स्वस्थ बसू देत नाही.स्वतःचा आनंद व्यक्त करताना मोर जसा स्वतः आनंद अनुभवतो तसं माणसांचं नाही त्याला आपल्या तालावर व आपल्या बोटावर माणसांना नाचवल्यावरच आनंद मिळतो.
निसर्गात प्रत्येक गोष्टीकडून आनंद घेण्यासारखं काहीतरी आहे. निसर्ग न पाहण्याचा, अनुभवण्याचा संसर्ग आज अनेकांना झाला आहे. घरात स्वतः स्वतःच्या कोषात माणसें इतकी गूरफटून गेली आहेत, त्यातल्या त्यात निर्जीव समूह संपर्कांनी त्याला इतकं गुंतवून ठेवलं आहे की रात्रंदिवसही उठल्यावर तो त्यांचाच विचार करतो जे त्याला त्रास देतात. आनंद देणारे वेटिंगवर असतात. माझे मेसेजेस, मला किती लाईक आल्या, माझ्याबद्दल समाज माध्यमात काय चालू आहे? आणि त्याचं मन या सगळ्या गोष्टींना व्यापलं असल्यामुळे आनंद कुठून मिळणार?
पूर्वी लोक उठल्याउठल्या देवाचे दर्शन, सूर्याचे दर्शन घ्यायचे, प्रसन्नता येऊन दिवसाची सुरुवात चांगली व्हायची. आता उठल्या उठल्या मोबाईलचे दर्शन घेतल्यामुळे मनामध्ये विचारांची सुनामी यायला लागते आणि मन शांत होत नाही, स्वैर भैर होतं. आम्हीच आमच्या रस्त्यात इतके स्पीड ब्रेकर्स निर्माण केले आहेत की इच्छित स्थळी आम्ही पोहोचतच नाही. डोळ्यावर मोबाईलचे झापड असल्यामुळे माणसे घाण्याच्या बैलाप्रमाणे नुसतेच फिरत राहतात.
फुलांचा सुगंध, फुलांचा स्पर्श घेतल्याशिवाय आनंदाची अनुभूती मिळत नाही. अनुकूल वातावरण असले की वनस्पती, फुलं बहरून येतात. माणसांचेही तसेच आहे, त्यांच्यासाठी संपर्कात चांगली माणसे आली, आवडीची माणसें संपर्कात आली तर माणसेही आतून उमलतात. माणसाचं आतून उमलणं फार महत्त्वाचं आहे.
काही विशिष्ट चांगली लोकं आपल्या संपर्कात आली म्हणून आपण बऱ्यापैकी चांगले घडत असतो. भाजीवर जसं पाणी टाकलं की भाजी ताजी टवटवीत दिसते, तसंच माणसांचं आहे. कौतुकाचे चार शब्द पडले तर माणसें शहारून जातात, सुखावून जातात. - डॉ.अनिल कुलकर्णी