गेट टुगेदर
राज मित्रा, तू आम्हाला ओळखलेस का? अनेकांनी राजला विचारले. राज डोळे भरून मित्रांकडे बघत होता आणि अचानक त्याने मित्रांना हात जोडले. वरदच्या डॉक्टर मित्राचा प्लॅन यशस्वी झाला होता. जे काम महागडी औषधे करू शकली नाहीत ते काम गेट दुगेदरच्या निमित्ताने आलेल्या मित्र-मैत्रिणींनी केले होते. लवकरच राज काका पूर्णपणे बरे होणार याची डॅाक्टर मित्राला खात्री पटली होती.
शेखर, अजय, रमेश, राधा, मुग्धा अशा अनेक मित्र-मैत्रिणींना मेसेज आला, ”शालेय मित्र-मैत्रिणी या ग्रुपमध्ये तुमचे स्वागत आहे. शाळा सोडून जवळजवळ ५० वर्षे झाली होती. शाळेनंतर पुढील शिक्षण, नोकरी, लग्न अशा विविध कारणांमुळे मित्र एकमेकांपासून विखुरले गेले. काही मित्र आठवणीत होते; तर काहींचे फक्त नांवच आठवत होते. कोण कुठे आहे याची कल्पना नव्हती. कसे कोणास ठाऊक, पण राज नांवाच्या मित्राने त्याच्या शाळेतील मित्रांचे फोन नंबर्स मिळवले आणि ”शालेय मित्र-मैत्रिणी हा व्हॅाटसॲप ग्रुप तयार केला. ग्रुपमध्ये अनेक मेसेजेस येऊ लागले, मित्रांशी फोनवर बोलणे सुरू झाले. कुठे असतो? शाळेनंतर काय केले? नोकरी कुठे केली? लग्न कधी केले? बायको कुठली? की वर्ग मैत्रिणींपैकीच कुणाला ढापले? मुलं किती? काय करतात? वगैरे प्रश्न विचारले जाऊ लागले. आश्चर्य म्हणजे बरेच मित्र-मैत्रिणी पुण्यात आणि पुण्याच्या जवळपास होते पण एकमेकांची माहिती नसल्याने, गाठीभेटी होत नव्हत्या. सगळ्यांना खूप हुरूप आला, चैतन्य निर्माण झाले आणि आपण आता लवकरच भेटावे, एक छानसे गेट टुगेदर करावे अशी कल्पना पुढे आली.
आपण आपले आत्ताचे फोटो पाठवावेत म्हणजे कोण कसे दिसतं हे आपल्याला समजेल आणि आपण भेटू तेव्हा एकमेकांना ओळखू शकू असे बऱ्याच जणांचे मत होते परंतु त्याला ग्रुप ॲडमिन राजने विरोध केला. राजचे म्हणणे असे होते की ज्यावेळी आपण एकमेकांना भेटू त्यावेळी ”ओळखा पाहू कोण? करत कोण किती मित्र-मैत्रिणींना ओळखतो ते पाहू या, खूप मजा येईल. राजची कल्पना सगळ्यांनाच आवडली.१ जूनला संध्याकाळी पुण्यातील ”डायमंड या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आपण गेट टुगेदर करूया, राजने मेसेज पाठविला. फाईव्ह स्टार हॉटेलला गेट टुगेदर, म्हणजे बऱ्यापैकी खर्चिक होणार असा विचार करून काहींनी वेगवेगळी कारणे देत मला गेट टुगेदरला येता येणार नाही असे कळविले. दोन दिवसांनी राजने मेसेज पाठविला. या गेट टुगेदरचा होस्ट मी असणार आणि सर्व खर्चही मीच करणार. याचा परिणाम छानच झाला. सर्वांचे टेन्शन कमी झाले आणि मला यायला जमणार नाही असे म्हणणाऱ्या मित्र-मैत्रिणींनी आम्ही इतर प्रोग्रॅम ॲडजेस्ट करू; पण हे पहिले वहिले गेट दुगेदर चुकविणार नाही असे कळविले. एकूण ३० मित्र आणि १० मैत्रिणींनी येण्याचे कन्फर्म केले. राजला धरून एकूण संख्या ४१ झाली. गेट टुगेदरची तारीख जशी जवळ येत होती तसा मित्रमंडळीतला उत्साह वाढत होता आणि प्रत्येक जण गेट टुगेदरच्या संध्याकाळची आतुरतेने वाट पाहत होता.
राज नक्की कोण? वर्गातील हुशार मुलांपैकी राज नक्कीच नव्हता. नांव तसे बहुतेकांना पुसटसे आठवत होते. राजच्या डीपी वर देखील त्याचा फोटो नसल्यामुळे सगळ्यांची उत्सुकता अजूनच वाढली होती.राजने त्याच्या एकुलता एक मुलगा वरदशी चर्चा करत, त्याच्या सल्ल्याने संपूर्ण प्रोग्रॅम प्लॅन केला. बाबा प्रोग्रॅमचे डिटेल्स कुणालाही सांगू नका, सस्पेन्स ठेवा या वरदच्या सल्ल्यामुळे राजने प्रोग्रॅमचे डिटेल्स कुणालाही दिले नाहीत. आपलं गेट टुगेदर "डायमंड हॉटेलमधील दर्पण "या हॉलमध्ये होईल असा मेसेज राजने पाठविला.
आज गेट टुगेदरचा दिवस. ”डायमंड हॅाटेलच्या पहिल्या मजल्यावरील ”दर्पण हॉल अतिशय छान सजविला होता. ताज्या फुलांचा सुवास दरवळत होता. हळुवार आवाजातील मधुर संगीत वातावरणातील प्रसन्नता वाढवीत होते. सुटा-बुटातील मॅनेजर येणाऱ्या प्रत्येकाचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करत वेलकम ड्रिंक देत होते. महिला मंडळीला मोगऱ्याचा गजरा दिला जात होता. बरेच मित्र एकमेकांना अनेक वर्षे भेटले नव्हते त्यामुळे एकमेकांना ओळखणे खूपच कठीण होते. कोणत्याही नवीन मित्राचा हॉलमध्ये प्रवेश झाला की हाच राज असेल का? प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होत होता. हळूहळू जसजशी मित्र-मैत्रिणींची उपस्थिती वाढू लागली तशा गप्पा रंगल्या, चेष्टा मस्करी सुरू झाली. रूबाबदार पेहेरावातील वेटर्स अनेक प्रकारचे स्टार्टर्स आग्रहाने देऊ लागले. मॅनेजर स्वतः काही हवे आहे का? क्वालिटी कशी आहे? असे विचारत होते. सर्व काही उत्तम होते; परंतु राज अजून आला नव्हता. कन्फर्म केलेले ३० मित्र आणि १० मैत्रिणी आता आल्या होत्या. कमी होती ती फक्त राजची. यापुढे जो मित्र येईल तोच राज असणार त्यामुळे राजला ओळखणे अगदी सोपे झाले होते. मॅनेजर साहेबांनी अतिशय मनोरंजक गेम्स अरेंज केले होते. सर्व उपस्थित त्या गेम्समध्ये आनंदाने सहभागी होत होते. साठी पार केलेली ती मंडळी तरुण होऊन मनसोक्त आनंद लुटत होती.
सर, जेवण सुरू करायचे का? मॅनेजर साहेबांनी विचारले.
थोडं थांबू या. आमचा एक मित्र यायचा आहे.
सर, भुकेची वेळ टळल्यास जेवणाचा आस्वाद घेता येणार नाही. मला वाटतं उशीर करू नये.
ठीक आहे, राज आला की तोही सामील होईल आपल्यात म्हणत सर्वांनी मॅनेजर साहेबांना होकार दिला.
गरमागरम, रुचकर आणि स्वादिष्ट भोजनावर सर्वांनी यथेच्छ ताव मारला. मॅनेजर साहेब स्वतः आग्रह करत वाढत होते. भोजनानंतर पाच-सहा स्वीट डिशेस होत्या. डायट, फूड कंट्रोल, डायबेटिस, डॅाक्टरी पथ्य वगैरे विसरून मंडळी स्वीट्सचा आस्वाद घेत होती. दोन तीनदा आईस्क्रीम, रबडी, गाजर हलवा, जिलेबी, अंगुर मलई, गुलाब जामवर ताव मारून तृप्त झालेली मंडळी गच्च भरलेल्या पोटावरून प्रेमाने हात फिरवत आता महिनाभर तरी गोड खायचे नाही असा संकल्प करत होती. राज अजूनही आला नव्हता आणि तो आलाच नाही तर? एका मित्राने शंका व्यक्त केली. क्षणात आनंदी वातावरणात तणाव निर्माण झाला. आजच्या या सोहळ्याचे बिल नक्कीच काही लाखात येणार. राज आला नाही तर मॅनेजर साहेब आपल्याला सोडणार थोडीच आहेत? ते आपल्याकडूनच पैसे वसूल करतील, मित्रमंडळीत चर्चा सुरू झाली. दोघा-तिघांनी राजला फोन करायचा प्रयत्न केला; परंतु राजचा फोन बंद होता. एकंदर परिस्थितीचा अंदाज आल्यामुळे उपस्थित मैत्रिणी, उशीर होतोय, काळोख वाढतोय, आम्हाला आता निघालेच पाहिजे म्हणत स्वतःला आर्थिक झळ बसू नये म्हणून सटकण्याच्या तयारीत होत्या. आता आपल्यालाच पैसे भरावे लागतील याची जाणीव झाल्यावर काही सुज्ञ मित्रांनी विचार केला की मॅनेजर साहेबांना विचारावे, एकूण बिल किती झाले आणि ते सर्वांनी कॉन्ट्रीब्यूट करून द्यावे. इतका वेळ खूप आग्रहाने वाढणारे मॅनेजर साहेब मात्र आता कुठेही दिसत नव्हते.
चौकशी केल्यावर समजले की ते बाजूच्या हॉलमध्ये गेले आहेत आणि त्यांनी सर्व मित्र-मैत्रिणींनादेखील तिकडेच यायला सांगितले आहे. सटकण्याच्या विचारात असणाऱ्या मैत्रिणींना काही मित्रांनी थोडं थांबा म्हणून विनंती केली आणि सर्वजण मॅनेजर असलेल्या हॉलमध्ये दाखल झालेत. या हॉलमध्ये अनेक प्रकारच्या कुल्पया होत्या आणि मॅनेजर सर्वांना आग्रह करत होते. वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्पया घेण्यासाठी. मंडळी बिल अजून वाढू नये म्हणून जेवण जास्त झालं, कुल्फीचा त्रास होईल असे म्हणत कुल्फी घेणं टाळत होती.
मॅनेजर साहेब आमचा मित्र राज आला नाही त्यामुळे बिल आम्हालाच भरावे लागेल. बिल किती झालं? एका मित्राने धीर एकवटून विचारले.
हे हॉटेल तुमचा मित्र राजचे असून मी त्यांचा मुलगा वरद. त्यामुळे बिल भरण्याचे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. नको नको म्हणणाऱ्या मंडळीने दोन-तीन कुल्पयांवर ताव मारत, पण राज का आला नाही? अशी चौकशी करणे सुरू केले.
"आजचा हा प्रोग्रॅम मी आणि माझ्या बाबांनी मिळून प्लॅन केल्याने मला तुमच्या ग्रूपची आणि आजच्या कार्यक्रमाची इत्थंभूत माहीती होती. बाबांच्या प्लॅनप्रमाणे प्रोग्रॅम करायचा मी प्रयत्न केला. काही चुकले असेल तर मला माफ करा” म्हणताना वरद हळवा झाला. वरदने पडदा बाजूला केला आणि सर्वांना आश्चर्य वाटले. भिंतीवर राजच्या शालेय जीवनातील अनेक फोटो होते. अभ्यासात कमी असणारा, परंतु अतिशय हरहुन्नरी आणि इतरांना मदत करणारा राज सर्वांना आठवला. राजने शाळेत असताना मला अनेकदा मदत केली. कधी पुस्तके, कधी वह्या त्याने आणून दिल्या. एवढेच काय बऱ्याचदा माझी शाळेची फी देखील त्याने भरली, असे अनेक मित्र-मैत्रिणींनी सांगितले. राज बद्दलचा सर्वांचा आदर अजूनच वाढला.
वरद, अरे पण राज कुठे आहे? तो का आला नाही? तो ठीक तर आहे ना? सर्वांनी एक सुरात विचारले. तेवढ्यात कुणीतरी व्हीलचेअरवर बसलेल्या एका व्यक्तीला सर्वांच्या समोर आणले. डोळे मिटलेली ती व्यक्ती पडू नये म्हणून खुर्चीला बेल्ट बांधलेला होता.
हा तुमचा मित्र राज, वरदने ओळख करून दिली. वरद, अरे पण अगदी आज दुपारपर्यंत राज ग्रुपवर मेसेजेस पाठवत होता. अचानक काय झाले त्याला? आणि कधी झाले? सगळ्यांनी उत्सुकतेने विचारलं.
चार दिवसांपूर्वी माझे बाबा घरात पडलेत, हातापायाला फारसं लागलं नाही; परंतु डोक्याला मार लागला आणि त्यांची शुद्ध हरपली. हा माझा मित्र डॉक्टर आहे, याच्याच दवाखान्यात आम्ही बाबांना ॲडमिट केले. माझ्या मित्राने प्रयत्नांची पराकाष्ठा केली; परंतु फारसा उपयोग झाला नाही. बोलता बोलता मी त्याला म्हणालो की माझ्या बाबांनी १ जूनला त्यांच्या मित्रांचे गेट टुगेदर अरेंज केले आहे. मी ते कॅन्सल झाल्याचे सर्वांना कळवितो. ते ऐकून त्याने सुचविले, गेट टुगेदर कॅन्सल करू नकोस. सर्व काही प्लॅनप्रमाणे होऊ दे. आपण त्या दिवशी सर्व मित्रांना एकत्र बोलावून राज काकांना त्यांच्या समोर नेऊ. मित्रांचा आवाज ऐकून, त्यांचा स्पर्श अनुभवून काही फरक पडतो का ते बघुया. त्यानंतर अगदी आज दुपारपर्यंत मीच तुमच्या ग्रूपमध्ये बाबांच्या फोन वरून मेसेजेस पाठवत होतो, तुम्हाला बाबांबद्दल काहीही समजणार नाही याची काळजी घेतली.
क्षणभर सर्वत्र शांतता पसरली आणि पुढच्याच क्षणी सर्व मित्र-मैत्रिणी राजशी संवाद साधू लागले. कुणी राजच्या खांद्यावर हात ठेवला, कुणी राजचा हात हातात घेतला, कुणी राजच्या पाठीवरून हात फिरवला, मैत्रिणींनी प्रेमाने राजच्या चेहऱ्यावरून नी केसातून हात फिरवला. परमेश्वरा आमच्या मित्राला बरे कर अशी प्रार्थना अनेकांनी केली. अरे, काकांचा हात हलला! वरदचा डॉक्टर मित्र आनंदाने ओरडला. मित्रमंडळींमध्ये उत्साह वाढला आणि त्यांनी सर्वपरीने राजशी संवाद साधणे चालू ठेवले. मित्रांच्या सहवासाने आणि मैत्रीतील प्रेमाने किमया केली आणि राजने हळूच डोळे उघडले. वरदचे पाणवलेले डोळे बघून एका मित्राने वरदला जवळ घेतले आणि वरद तू काळजी करू नकोस, तुझे बाबा लवकरच बरे होतील असे म्हणत वरदला धीर दिला.
राज मित्रा, तू आम्हाला ओळखलेस का? अनेकांनी राजला विचारले. राज डोळे भरून मित्रांकडे बघत होता आणि अचानक त्याने मित्रांना हात जोडले. वरदच्या डॉक्टर मित्राचा प्लॅन यशस्वी झाला होता. जे काम महागडी औषधे करू शकली नाहीत ते काम गेट दुगेदरच्या निमित्ताने आलेल्या मित्र-मैत्रिणींनी केले होते. लवकरच राज काका पूर्णपणे बरे होणार याची डॅाक्टर मित्राला खात्री पटली होती.
वरदने मनापासून आभार मानत सर्वांना छानसे गिपट दिले. आमचा मित्र राज लवकरच बरा होईल आणि त्यानंतर आम्ही परत गेट टुगेदर अरेंज करू असे म्हणत सर्वांनी राज, वरद आणि वरदच्या डॅाक्टर मित्राचा निरोप घेतला.
आजचे गेट टुगेदर अविस्मरणीय झाले, मित्र-मैत्रिणींना भेटून खूप छान वाटले, मोबाईलवर घेतलेले फोटो ग्रुपमध्ये आठवणीने टाका, पुन्हा लवकरच भेटू, काळजी घ्या, बाय बाय असे म्हणत सर्वांनी आपापल्या घराकडे प्रस्थान केले. - दिलीप कजगांवकर