लोकाविष्कार : नाथांच्या भारुडांचा - तत्कालीन समाजप्रबोधन नव्या पिढीला समजण्यासाठी
डौर वाद्य, भारुडाचे विविध नायक त्यांचे प्रकार व वैशिष्ट्ये भारुडांचं अध्यात्म म्हणून वेगळेपण इत्यादी बाबी लोककला आणि आध्यात्मिक परंपरेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, नाटक, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शनपर ठरणार आहे.
नुकतेच प्रकाशित झालेले डिंपल पब्लिकेशन्सचे लोकाविष्कारः नाथांच्या भारुडांचा हे मृदुला वाघमारे यांचे पुस्तक वाचनात आले. मुखपृष्ठावर पांढऱ्या ज्ञानसूर्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही हातांनी ज्ञानदान करीत असलेले नाथांचे चित्र जणू पुस्तकाचे अंतरंग बोलके करीत आहे!
धवल रंगातील पुस्तकाचे शीर्षक नाथांची शुद्ध वृत्ती आणि पावित्र्याचे निदर्शक वाटतात. मुखपृष्ठावरील केशरी लाल रंग हा नाथांच्या संतवृत्तीचा, वैराग्यवृत्तीचा सूचक वाटतो. चित्रकार सरदार जाधव यांनी समर्पक व कल्पक मुखपृष्ठ साकारले आहे.
प्रत्येक कर्तृत्ववान स्त्रीच्या पती हा तिच्या पाठीमागे असणारा मोठा आधार असतो. लेखिका हे जाणून आहे. त्यांचे पती आयु. जयंत यांच्या आदर्शांना सदर पुस्तक म्हणूनच ती अर्पण करते. ज्ञानसूर्य बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संतांच्या, विशेषतः नाथांच्या वाङ्मयाचा प्रभाव होता; हे विशद करणारा एक इंग्रजी अवतरणातील छोटा परिच्छेद पुस्तकाच्या सुरुवातीलाच आढळतो. एकविसाव्या शतकात सामाजिक विघटनाच्या पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर महापुरुष डॉ. आंबेडकर आणि संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा सांस्कृतिक अनुबंध म्हणजे आंबेडकरी ते वारकरी हाच या ग्रंथाची नांदी ठरतो.
ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक श्रीपालजी सबनीस यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना सदर ग्रंथास लाभलेली आहे; तर लोककला अकादमीचे डॉक्टर गणेश चंदनशिवे यांनी पुस्तकाची पाठराखण केलेली आहे. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी. संतांनी पाजलेल्या बोधामृतावरच महाराष्ट्राचा पिंड घडलेला आहे. महाराष्ट्रधर्म हा समाजवादी शांततावादी भागवतधर्माशी एकरूप झालेला आहे. संत परंपरेतील नाथ महाराज हे समाज कल्याणकारी वृत्तीचे. त्यांचे कर्तृत्व असामान्यच होय. लेखिकेने अगदी समर्पक विषय निवडला. नाथांची भारुडे, त्यांची उत्पत्ती, भारुडे म्हणजे काय, भारुडांची व्याख्या पूर्वसुरींचे दाखले देत लेखिका स्पष्ट करते. भारुडे लोकमानसात बहुरूढ झाली. अगदी आजच्या काळातही नाथांची काही भारुडे लोकप्रिय आहेत. ही भारुडे भक्तिपर, रंजक, उद्बोधक आणि अध्यात्मप्रवण आहेत. मराठी साहित्यात भारूड प्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या डिजिटल युगातील पिढीला नाथांची भारुडे निश्चितच दिशा व बोध देतात. मृदुलाताईंनी आपल्यापुढे नाथांचा आविष्कार आणून मराठी साहित्यात भरच घातली आहे.
सदर पुस्तकात नाथांची भारुडे, तत्कालीन सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, सांस्कृतिक परिस्थितीचा संक्षिप्त आढावा लेखिका मांडते. नाथांच्या भारुडांचे भाषिक, वाङ्मयीन आणि सामाजिक विशेष हे या पुस्तकात विशेत्वाने आलेले दिसतात. संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांची मुलाखत पुस्तकाचे एक खास वैशिष्ट्य म्हणता येईल. एकनाथ महाराजांच्या साहित्यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. भारुडकार चंदाताई तिवाडी आणि भारुडसम्राट हमीद सय्यद यांची मुलाखत पुस्तकाच्या मौलिकतेत भरच टाकते. तथापि सदर ग्रंथनिर्मितीकार लेखिका म्हणून प्रत्येक मुलाखतीच्या सुरुवातीला प्रस्तावनापर व शेवटी समारोपपर काही वाक्यांचा समावेश, ग्रंथाविषयाला बळकटी देणारा ठरला असता असे वाटते.
नाथांच्या काळात समाजमनाचे होत जाणारे अधःपतन, अवनती याचा वस्तुनिष्ठपणे आढावा घ्ोण्यात लेखिका काही प्रमाणात यशस्वी झालेली दिसते. नाथांच्या भारुडांचे विविध प्रकार लेखिका वर्णिते. सुप्रसिद्ध भारुडांबद्दल अधिक लिहिता आलं असतं. भारुड प्रकारांची आणखी काही उदाहरणे या पुस्तकात यायला हवी होती असे वाचताना वाटत राहते. मला कोल्हाटीण भारुडाचे सोदाहरण अर्थ स्पष्टिकरण अधिक भावले.
सौ शून्याचा मांडला खेळू
ब्रम्हा विष्णू जयाचे
आली कोल्हाटीण खेळाया..
वरवर पाहता हे साधे वाटणारे शब्द. पण त्यामागचे तत्त्वज्ञान, आदिमायेचा विचार नाट्यात्मक रूपाने नाथ महाराजांनी लोकाभिमुख केलेले दिसतो. लोकभूमिकाकलावंत म्हणजे वासुदेव. लेखिका त्याचे वर्णन करताना लिहिते, सुप्रभाती भोग सोडून, दारोदार भीक मागणारा वासुदेव खऱ्या अर्थाने भीक मागत नाही उलट तो दान वाटत फिरतो. पूर्णज्ञानाचा अंगरखा पांघरून, ब्रह्ममायेच्या चिपळ्या घ्ोऊन, गिरकी घालत येतो, विचारांच दान देऊन जातो.'
माझं बालपण खेड्यात गेलेलं. दर दशमी-एकादशीला दिंडीतून सादर होणारी विंचू, दादला, भूत, रोडगा ..अशी नाथांची काही भारुडं मला माहीत झालेली; त्यांची अधिक माहिती मिळाली. बुरगुंडाचा अर्थ नव्याने समजला. डौर वाद्य, भारुडाचे विविध नायक त्यांचे प्रकार व वैशिष्ट्ये भारुडांचं अध्यात्म म्हणून वेगळेपण इत्यादी बाबी लोककला आणि आध्यात्मिक परंपरेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, नाटक, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शनपर ठरणार आहे.
नाथांची सर्वच भारुडे समाजप्रबोधन करतात. समाजप्रबोधन ही तत्कालीन समाजासाठी आवश्यकच होतं; पण आजच्या जग कवेत घ्ोणाऱ्या पिढीलाही हे ज्ञात होणं आवश्यक आहे. आजच्या समाजस्थितीला या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल. मानवी दोषांचा, दुर्गुणांचा नाश होणं, आजही आवश्यकच आहे. त्यादृष्टीने सदर छोटेखानी ग्रंथाची निर्मिती कौतुकास्पदच आहे.
प्रत्येकाने हा ग्रंथ विकत घ्यावा, वाचावा, संग्रही ठेवावा असे मराठी साहित्य वाचक, रसिक यांना आग्रहपूर्वक सांगते. नाथांच्या भारुडांचा लोकाविष्कारचे स्वागत!
लोकाविष्कार : नाथांच्या भारुडांचा
लेखिका मृदुला वाघमारे डिंपल प्रकाशन, वसई- पालघर
पृ. ८२मूल्य रु. १५० /
-पुष्पा कोल्हे