मनोरुग्णतेच्या दिशेने

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारा माझा एक मित्र मराठवाड्यातील लातूर या जिल्हयात वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाला. तो मुंबईला असताना त्याची नेहमी भेट व्हायची. आता तो लातूरला गेल्यामुळे त्याची भेट दुर्लभ झाली आहे. म्हणून मी त्याला भेटण्यासाठी मुद्दाम लातूरला गेलो. दुपारी डब्बा खात असताना तो एका व्यक्तीची ओळख करून देत मला म्हणाला, ‘हे राजीव कुलकर्णी, अमेरिकेत होते. अमेरिकेत त्यांनी भाडेतत्त्वावर जमीन घेऊन खूप वर्ष कसली. आता कुलकर्णी काही कारणास्तव लातूरमध्ये वापस आले आहेत. माझे जवळचे मित्र आहेत'.

मी कुलकर्णी यांना नमस्कार केला. बराच वेळ गप्पा मारल्यावर कुलकर्णी वरिष्ठ अधिकारी असलेल्या माझ्या मित्राला म्हणाले, ‘मी खूप अडचणींत आहे. त्यातून मार्ग कसा काढावा यासाठी मी येथे आलो आहे'.

ते वरिष्ठ अधिकारी मित्र म्हणाले, ‘बोला ना'. माझ्याकडे बघत ते मित्र दबक्या आवाजात म्हणाले, ‘माझा मुलगा समर्थ आता आठवीला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो व्यसनाधीन झालाय. आम्ही अमेरिकेत खूप इलाज केले, पण उपयोग झाला नाही. म्हणून आम्ही अमेरिका सोडून पुन्हा गावी लातूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला'.

माझे अधिकारी मित्र त्यांना म्हणाले, ‘तो इतका व्यसनाच्या आहारी गेला, तेव्हा तुम्ही काय करत होतात?

कुलकर्णी म्हणाले, ‘मी माझ्या शेती उपक्रमात होतो. माझी बायको यमुना नोकरी करायची. तो नाना प्रकारचे व्यसन करायचा. आम्हाला कळू न देता गोळ्या खायचा'.
कुलकर्णी त्यांच्या मुलाच्या व्यसनाधीनतेचे किस्से सांगत होते आणि आम्ही अवाक् होऊन ऐकत होतो. कुलकर्णी यांच्या आपबीतीने माझे हातपाय एकदम गळून गेले. आम्ही एकदम निःशब्द झालो. सर्व सांगून झाल्यावर कुलकर्णी  यांनी खिशातला रुमाल काढून आसवांनी डबडबलेले डोळे पुसले. माझ्याकडे बघत माझा तो अधिकरी मित्र म्हणाला, ओ या स्वरूपाच्या तक्रारी माझ्याकडे दररोजच्या आहेत. आईवडलांना मुलांकडे बघायलाही वेळ नाही आणि सहज करता येतात म्हणून मुले व्यसनांचे अनेक प्रयोग करतात.

अधिकारी मित्राने बेल वाजवून शिपायाला बोलवले. ते त्या शिपायाला म्हणाले, ‘जरा विजयकुमार यादव सर यांना फोन करून बोलावून घ्या'.

शिपाई गेला. कुलकर्णी यांनी अमेरिकेसह भारतातही पालकांच्या लाडामुळे, दुर्लक्षामुळे लहान लहान मुले खूप मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन झाली आहेत. अनेक मुले व्यसनाधीनतेच्या मार्गावर आहेत. नशील्या पदार्थांच्या सेवनाबरोबर मोबाईल,  टीव्हीच्या अतिवापरामुळे अनेकांचा कसा सत्यानाश झाला. आज दहावीच्या आतमध्यली ३० टक्के मुले व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याचे कुलकर्णी आणि वरिष्ठ अधिकारी मित्राच्या बोलण्यातून समजले.

इतक्यात यादव सर आले. यादव सरांची ओळख करून देताना अधिकारी मित्राने सांगितले, ‘हे यादव सर. यांनी आजवर तब्बल दोन पिढ्यांना व्यसनाच्या खाईत जाण्यापासून वाचवले आहे. मी अनेक वेळा त्यांच्या व्यसनमुक्ती सेंटरला जाऊन आलो. मी अनेक माणसं त्यांच्याकडे पाठवली. यादव सरांनी अनेकांचे संसार वाचवण्याचे काम केले आहे. त्यांच्या कामाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. वरिष्ठ अधिकारी मित्र आणि कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलाची सर्व परिस्थिती यादव सरांना सांगितली.

यादव सर म्हणाले, ‘लहान मुलांच्या व्यसनाचा प्रकार खूप वाढलाय. बरं, या मुलांचे काय करायचे हा प्रश्न आहे. मोठ्या माणसांप्रमाणे त्यांना कोणत्याही व्यसनमुक्ती केंद्रात ठेवता येत नाही. लहान मुलांसाठी खूप कडक कायदे आहेत. त्यामुळे या लहान मुलांचं काहीही करता येत नाही. न्यायाधीश, जिल्हाधिकारी, समाज कल्याण अधिकारी, पोलीस अधिकारी या सगळ्यांनाच रोज त्यांच्याकडे येणाऱ्या लहान मुलांच्या व्यसनाधीनतेवर करायचे काय हा प्रश्न आहे. वरिष्ठ अधिकारी असलेले मित्र मला म्हणाले, ‘संदीपराव, तुम्ही एकदा जाऊन यादव सर करत असलेलं काम पाहून या. तुमच्या लक्षात येईल, त्यांचं काम किती मोठे आहे!'

अधिकारी मित्र यादव सरांविषयी भरभरून बोलत होते. मलाही यादव सर यांचे काम जाणून घ्याण्याची उत्सुकता लागली होती. कुलकर्णी यांना यादव सरांनी त्यांच्या मुलाला व्यसनाधीनतेतून बाहेर कसे काढायचे, याबाबत योग्य तो सला दिला. त्या मुलांचे समुदेशन कसे करायचे, कोणते औषध द्यायचे हे सांगितले. मुलाला वेळ देणे, मुलावर खूप प्रेम करणे, त्यांना समजून घेणे किती गरजेचे आहे, हे यादव सर यांनी समजावून सांगितले. तुम्हाला जर या मुलांना खरंच व्यसनांतून बाहेर काढायचे असेल तर, तुम्हाला वैयक्तिक त्यांना वेळ द्यावा  लागेल. तरच ती बाहेर येतील, अन्यथा येणार नाहीत.      

अधिकारी मित्र आणि कुलकर्णी हे दोघे बोलत बसले. मी उठलो आणि यादव सरांसोबत त्यांच्या आंबेजोगाई रोडवर असलेल्या व्यसनमुक्ती सेंटरमध्ये जाऊन पोहोचलो. दारू, गांजा अशा अनेक व्यसनांच्या आहारी गेलेल्या शेकडो लोकांचा तिथे इलाज केले जात होते. लातूरमधलं हे व्यसनमुक्तीचं सेंटर कसं सुरू केलं? त्या एका सेंटरचे अनेक सेंटर कसे झाले? राज्यभरातले व्यसनमुक्तीचे  यादव सरांचे काम भारतभर कसे पोहोचले? आणि आज एक दोन हजार नाही तर तब्बल साठ हजारांहून अधिक लोकांना व्यसनमुक्त कसे केले, याचा खूप मोठा इतिहास यादव सरांनी माझ्यासमोर ठेवला. प्रचंड आत्मविश्वास, प्रत्येकाचे चांगले करायची भावना आणि माझा जन्म देण्यासाठीच झाला आहे, ही उदात्त भावना यातून यादव सरांचे काम कुठलीही प्रसिध्दी न करता देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहचले आहे. 

 डॉ. विजयकुमार यादव  (९३७२३४६४७६) उच्चशिक्षित, मोठ्या घरात जन्मलेले, एका शिक्षकाचे सुपुत्र. तरुण वयामध्ये आजूबाजूला असलेली व्यसनाधीन मंडळी यामुळे व्यस्थित होऊन ‘मी आयुष्यभर लोकांना व्यसनांतून बाहेर काढेन,' या निर्धाराने पेटून उठलेले यादव सर यांनी १९९९ ला लातूरमध्ये जीवनरेखा प्रतिष्ठान नावाची एक संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून ‘जीवनरेखा व्यसनमुक्ती केंद्र, एकात्मिक व्यसनाधीनता पुनर्वसन केंद्र आणि व्यसनमुक्तीचे पुनर्वसन केंद्र' असे दोन सेंटर लातूरमध्ये सुरू केले.

 पैसे मिळोत वा न मिळोत, व्यसनग्रस्त  माणसाला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले. जसंजसं काम वाढत गेलं, तशी काही अंशी शासनाची मदतही मिळू लागली. पण शासनाच्या तुटपुंज्या मदतीवर काही भागेना. स्वतःच्या जवळचे जे काही होते ते सरांनी अनेक वेळा विकायला काढले, पण सेंटरच्या माध्यमातून चालत असलेले काम काही थांबू दिले नाही.

दारू, गांजा आणि वेगवेगळ्या रसायनांचे सेवन करून त्याच्या आहारी गेलेले, पेट्रोलचा वास घेणारे, व्हाइटनरपासून ते चपल पॉलिश करण्याच्या क्रीमला व्यसनाचे साधन बनवणारे असे अनेक महाभाग त्या व्यसनमुक्ती सेंटरमध्ये होते. कोणी दारूच्या व्यसनापायी वडलांची होती नव्हती ती सगळी शेती विकली. कोणी दारूच्या व्यसनातून अनेक ठिकाणी चोरी केली. कुणाला दारूच्या व्यसनामुळे वेगवेगळे आजार झाले होते. गांजाच्या व्यसनामुळे अनेकांचे आयुष्य बरबाद झाले होते. एक दोन नाही, हजार नाही, तर ६० हजार लोकांना व्यसनांच्या विळख्यातून यादव सर यांनी बाहेर काढले आहे. तिथं असणाऱ्या प्रत्येक माणसावर स्वतंत्र चारशे पानांचा ग्रंथ होऊ शकेल, इतकं व्यसनांमुळे त्यांचे आयुष्य खंगून गेले होते.

प्रत्येकाची करूण कहाणी ऐकून असं वाटत होतं की, या जगात प्रचंड आनंद आहे, पण तुम्हाला जर एखादं व्यसन जडलं तर ते व्यसन  कॅन्सरपेक्षाही खतरनाक असतं, हे तिथल्या प्रत्येक माणसाच्या पाणावलेल्या डोळ्यांतील आसवांना पाहून जाणवत होते.

यादव सर त्यांच्या कामात व्यग्र झाले. एक केंद्रात असलेली एक व्यक्ती संपूर्ण ट्रीटमेंट घेऊन घरी निघाली होती. त्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी सोबतचे अनेकजण गेटपर्यंत आले होते.

मी त्या माणसाला विचारले, ‘काय झाले? तुम्ही कुठले? आता सुटले का व्यसन?' तो माणूस मला म्हणाला, "मी राजीव रस्तोगी. मी ट्रक डायव्हर होतो. मित्रांच्या संगतीने दारूच्या व्यसनात बुडालो. शेवटी ज्या मित्रांची दारू यादव सर यांच्या सेंटरमुळे सुटली, त्याच  मित्रांनी मला पैसे गोळा करून इकडे पाठवले. आज निर्व्यसनी बनून एक नवे आयुष्य मी सुरू केले आहे. कपाळावर टिळा आणि गळ्यात माळ हे सारे काही केंद्रात मिळणाऱ्या शिकवणीतून शक्य झाले. माणूस कितीही श्रीमंत किंवा कितीही गरीब असो, तो एकदा व्यसनाच्या आहारी गेला की त्याच्या जगण्याला काहीही अर्थ उरत नाही. मला दोन मुली आहेत. त्या कधी मोठ्या झाल्या आणि कधी त्यांचे लग्न झाले, हे मला कळलेच नाही. दारूपायी आयुष्य कसे उध्वस्त झाले, हे समजलेच नाही,” असे म्हणत राजीव रडत होते. बाकी सर्व  जण त्यांची समजूत काढत होते.

राजीव गेले. त्यांना पाठवताना त्यांचे सर्व मित्र भावुक झाले होते. मी यादव सर यांच्याकडे निघालो. यादव सर यांच्याकडे असताना एक व्यक्ती तिथल्या सर्वांना घेऊन समुपदेशनाचे धडे देत होती. त्याचे  समुपदेशन ऐकत राहावे असेच होते. त्या सेंटरमध्ये औषधाशिवाय वाचन, चिंतन, मनन, कीर्तन, हे सारे काही होते. मी यादव सर यांच्याकडे गेलो.  समुपदेशन करणारे सरही तिथे आले. त्या सरांची ओळख करून देताना यादव सर म्हणाले, ‘हा माझा मुलगा कृष्णा यादव. सर्व कामं आता हाच पाहतो.'

अजून एका मुलीला यादव सरांनी जवळ बोलावले. तिची ओळख करून देत ते म्हणाले, ‘ही कान्होपात्रा नखाते. चंद्रपूरची आहे. पुण्याच्या दवाखान्यात अधिकारी आहे. आमच्याच नर्सिंग कॉलेजमध्ये शिकली आहे. नखाते यांच्यासारख्या १५० मुली दरवर्षी आमच्या कॉलेजमधून प्रशिक्षित होऊन पडतात. आम्ही जो सेवाभाव ठेवून काम उभे केले आहे, त्या कामाला ह्या सर्व मुली हातभार लावतात. पाचवीच्या मुलांपासून ते ७५ वर्षांच्या व्यक्तीपर्यत सर्वांच्या व्यसनाचे प्रकार खूप वेगवेगळे आहेत. अतिशय चिंताग्रस्त चेहरा करून यादव सर म्हणाले, ‘एपीजे अब्दुल कलाम यांनी देशाला महासत्तेच्या दिशेने जाण्याचा कानमंत्र दिला खरा, पण प्रचंड प्रगती आणि सहजतेने, निष्काळजीपणाने आम्ही खूप गतीने मनोरुगणतेच्या दिशेने वाटचाल करतोय. अनेक ठिकाणी हेच चित्र आहे'. यादव सर खूप तळमळीने बोलत होते आणि मी खूप हतबल होऊन ऐकत होतो.
यादव सरांचे काम समजून घेताना रात्रीचे अकरा कधी वाजले, ते कळलेच नाही.

यादव सरांचा निरोप घेऊन मी परतीच्या मार्गाला लागलो. यादव सर, त्यांचे वडील रघुनाथ यादव, सरांची आई भगीरथबाई आणि आता तिसरी पिढी, म्हणजे यादव सरांचा मुलगा कृष्णा यादव हे सर्व कुटुंबीय सुरू केलेले काम खूप नेटाने पुढे नेट आहेत. समाजात बदल घडवून आणण्यासाठी असे अनेक यादव परिवार आपल्या आसपास आहेत, ज्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे, बरोबर ना? - संदीप काळे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

गेट टुगेदर