कथा कथन : एक जीवंत कला

कथाकथन करणाऱ्यास कथा आटोपशीरपणे कशी लिहिता येईल हे ज्ञात असले पाहिजे. त्यासाठी इतर मराठी लेखकांच्या कथांचे वाचन केले पाहिजे. आठ-दहा पानांची कथा सादर  करताना ती किमान दहा ते पंधरा मिनिटात सांगता आली पाहिजे. प्रेक्षक पूर्ण  संमोहित होईल अशा तर्हेने आपली कथा सादर करता आली पाहिजे.

१९६६ ला एक हिंदी सिनेमा आला होता, त्याचं नाव होतं प्यार किये  जा हा सिनेमा तसा कॉमेडीकडे वळणारा. किशोर कुमार, ओमप्रकाश, मेहमूद ही तगडी स्टारकास्ट असली की प्रेक्षक खदखदून हसणारच! त्यांतील एक स्किट सादर केलंय मेहमूद आणि ओमप्रकाश या दिगग्ज कलाकारांनी. मेहमूद एक भयानक गूढ कथा आपल्या तिरकस शब्दात कथन करतो व ती ओमप्रकाश यांनी ऐकावी असा आग्रह करतो. नाईलाजाने ओमप्रकाश ते कथन ऐकत असतो...मेहमूदचे कथन तर लाजवाब; पण त्याहीपेक्षा जबरदस्त प्रतिसाद देणारा ओमप्रकाश हा हरहुन्नरी कलाकार! सिनेमागृहात  सुमारे वीस मिनिटांचा तो सीन ऐकून प्रेक्षक सपशेल घाबरून जातो व नंतर ती एक स्किट होती व त्यांत कॉमेडी ठासून भरलेली होती, हे ध्यानीं येताच थिएटरमध्ये हश्या पिकतो व टाळ्यांचा कडकडाट ऐकू येतो। तोच सिनेमा नंतर व्हिडीओ केसेटवर मी पुन्हा पाहिला. कथाकथन कसं परिणामकारक असावं ह्याचं जीवंत उदाहरण म्हणजे मेहमूद आणि ओमप्रकाश यांनी सादर केलेला तो सीन! आजही युट्युबवर पाहता येईल.

काहीं वर्षांनंतर दापोली येथील पोलीस स्टेशन प्रमुख व नंतर डिवाय एसपी पर्यंत प्रगत झालेले श्री. दिवाकर सावंत ह्यांची ओळख झाली. ऑर्केस्ट्रा, नाटकं त्यावेळी दापोलीत खूप यायची. सावंत साहेबांनी कथाकथन हा मराठी साहित्यातील दुर्लाक्षित प्रकार याकरिता काही विशेष करता येईल का यावर माझ्याशी अनेकदा चर्चा केली. "तीच ग बाई मी  ही भयकथा मी त्यांना act करून ऐकवली. त्यांना आवडली. त्यांच्या प्रोत्साहनामुळे हा साहित्यिक प्रकार मला पुणे येथील नवोदित साहित्य संमेलनात सादर करता आला व बक्षीस मिळवता आले! ह्याचे सर्व श्रेय सावंत यांना जाते. दिवाकर सावंत हे खाकी वर्दीतील दर्दी माणूस आज हयात नाहीत. एक उत्तम मित्र मी गमावला.

तद्‌नंतर  मराठी साहित्य क्षेत्रात उत्सव साजरे झाले. अगदीं थेट पाश्चात्य देशातही मराठी मान्यवर/नामांकित लेखक/कवी जाऊन भाषेचा प्रसार करून आले. पण  कथाकथन हा प्रकार प्रगत व्हावा म्हणून विशेष कुणी प्रयत्न केल्याचे ऐकिवात किंवा वाचनात नाही आले. असो. नवी मुंबईतील एका स्थानिक कवी संमेलनात कवी म्हणूनच मलाही बोलावण्यात आलं होतं. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीं  कदाचित टाईमपास म्हणून एका कथा लेखकास स्वलिखित कथा सादरीकरण करावे अशी सूचना देण्यात आली, त्याने भरगच्च आठ पानी कथा वाचायला सुरू केले. उपस्थितांना वाटले ते कथा सांगतील, पण उपस्थित कंटाळले. म्हणजे त्यांस अभिवाचन म्हणावे का? बसलेले लोक हळूहळू आपापसात दबक्या स्वरात वैयक्तिक बोलू लागले. डायसवर स्थानापन्न झालेल्यांची  जाम पंचाईत झाली. त्या कथाकाराचे आठपानी वाचन ऐकावंच लागलं उपस्थित मंडळींना. अनेकांनी तद्‌नंतर आपापल्या वेळेत कविता सादर करण्यापूर्वी जर कथाकथन असावं तर ठीक; पण त्याचं  वाचन नसावं, तेही चक्क आठपानी...! अशी नाराजी व्यक्त केली.
कथाकथन म्हणजे स्वलिखित कथा प्रथम मनातल्या मनात स्वतःला सांगणे. जमल्यास भावमुद्रा, देहबोली, हातवारे इत्यादि कसे असावेत त्याचे स्वतः आरश्यात का होईना स्वनिरीक्षण करावे. स्वरातला चढउतार फार  महत्वाचा.. अशा अनेक टिप्स  डी.वाय. एसपी साहेब स्वर्गीय दिवाकर सावंत यांनी मला दिल्या. पोलिस क्षेत्रात राहूनही ते कविता तसेंच मराठी लघुकथा खूप दर्जेदार लिहायचे. हे विशेष!

मयुर पंख या माझ्या हिंदी नोव्हेलेटवर त्यांनी लिहिलेली वाङ्‌मयीन प्रतिक्रिया चिपळूण येथील सागर पेपरमध्ये त्यावेळीं प्रकाशित झाली होती. सावंत साहेबांनी मला खूपच प्रोत्साहित केले, कारण त्यांच्या खाकी वर्दीतला दडलेला एक सच्च्या साहित्यिक होय!

खरं तर कथाकथन हा एक प्रकारे one act play म्हणावा लागेल. स्वतः लिहिलेली कथा आपण मनातल्या मनात मुखोद्‌गत करावी व शब्दांशब्द तसाच न सांगता, कथा सांगतो त्याच प्रमाणे ती सादर करावी. अलिकडे सोशल मीडियावर अशा  कथाकथनाची  रेकॉर्डेड क्लिप बरीच व्हायरल झालेली दिसते. कोहिनूर, अमर अकबर अँंथॉनीसारख्या बहुचर्चित सिनेमांमधून दिलीप कुमार व अमिताभ बच्चन सारख्या सक्षम महानायकांनी अश्या स्कीट्‌स त्यावेळी यशस्वीपणे सादर केलेल्या आहेतच. त्याचं निरिक्षण करून बरंच काही शिकता येईल.

कथाकथन करणाऱ्यास कथा आटोपशीरपणे कशी लिहिता येईल हे ज्ञात असले पाहिजे. त्यासाठी इतर मराठी लेखकांच्या कथांचे वाचन केले पाहिजे. आठ-दहा पानांची कथा सादर  करताना ती किमान दहा ते पंधरा मिनिटात सांगता आली पाहिजे. अन्यथा प्रेक्षक कंटाळतो. प्रेक्षक पूर्ण  संमोहित होईल अशा तर्हेने आपली कथा सादर करता आली पाहिजे. एव्हढी तयारी पाहिजे कथाकथन सादरीकरण करताना!

गेल्या वर्षी असाच एक योग जुळून आला व ठाणे येथील नामवंत साहित्यिक डॉ नारायणराव तांबे यांनी एका कार्यक्रमात मला बोलावलं होतं. नील/पुष्प साहित्यिक चळवळीचे ते संस्थापक! सुमारे २५ वर्षांपासून ठाण्यातील विविध ठिकाणी हजाराेंच्या सदस्यांसमवेत कार्यक्रम करत राहिले. नामवंत मंडळी त्यांच्या समवेत या उपक्रमात सहभागी होत राहिली. शासकीय, राजकीय, साहित्यिक अशा विविध क्षेत्रातील अनेक नामवंत दर्दी आत्मीयतेने त्यांच्या नियोजित कार्यक्रमात सहभागी होत असत. नील-पुष्प हे एक कुटुंब म्हणून त्यानी जपले. हे मी स्वतः अनुभवले आहे. दुर्दैवाने कोरोना काळात त्यांना देवाज्ञा झाली आणि मराठी साहित्य विश्वातील एक हरहुन्नरी कलाकार या जगातून निघून गेला.
तीच गं बाई मी ही गूढकथा अशाच एका कार्यक्रमात मी सादर केली होती. त्यांस उपस्थितांनी मनसोक्त दाद दिली. अर्थातच कथाकथन ही कला सादर करतांना नामवंतांची उपस्थिती असल्यास उत्तम, त्यामुळे मार्गदर्शन ही मिळू शकते. शिवाय  दर्दी माणसं असल्याने  मैफल बऱ्यापैकी रंगते.

महाराष्ट्राची हास्य जत्रा व चला हवा येऊ द्या हे कार्यक्रम निव्वळ स्किटवर बेतलेले असतात. पंचचे टायमिंग ज्याचे उमदा तो बाजी मारून जातो. हवा येऊ दे...मधील पोस्टमनचा तो one act play  इतर संपूर्ण कार्यक्रमावर मात करून जातो. पत्र वाचन कसे करावे हे सागर कारंडे यांनी दाखवून दिले. लाजवाब!

अलिकडेकच माझ्या एका हिंदी कथेचा मी अनुवाद करावा असं ठरवले. पण त्याची मूळ प्रत शोधून वेळेत न मिळाल्याने त्या कथेचा मनोमनी मी स्वतःशीच संवाद सुरू केला. हळूहळू अँड्रॉइडवर लिहिता झालो. आश्रित ही पस्तीस वर्षांपूर्वी लिहिलेली हिंदी कथा कसलाही लिखित रेफरन्स न घेता मराठीत लिहून पूर्ण केली. लॉकडाऊनच्या काळात हा प्रयोग मी करू शकलो, ही दैवीशक्ती असेल जी मला प्रवृत्त करते विचार शब्दरूपात व्यक्त करण्यासाठी..! ज्यासाठी एकाग्रता महत्वाची!

सुमारे दोन वर्षांपूर्वी नवी मुंबईतील एससईएस या कॉलेजात अशीच एक स्पर्धा आयोजित करण्यांत आली होती. त्यांस परिक्षक म्हणून मला मुंबई विद्यापीठाकडून लिखित पत्र ई मेलद्वारे आले होते. त्या कॉलेजातील ती कथाकथन स्पर्धा अप्रतिम रंगली! नवीन पिढी काय लिहिते, कसे सादर करते ते मला शिकता आले. प्रत्येक कथेचा विषय नवीन, वेगळा आणि सादरीकरण लाजवाब! कथाकथन हा मराठी नाट्य क्षेत्राशी निगडित प्रकार सजीव वाटतो. म्हणूनच कदाचित आजही नवनवीन मराठी नाटके स्टेजवर येत आहेत ज्यांस प्रेक्षक भरपूर दाद देत आहेत! मी लिहिलेल्या काही निवडक कथा आज ऑडिओ रेकॉर्ड करुन युट्युबवर अपलोड केल्या आहेत. ज्यांना आवड असेल त्यांनी नक्कीच कथाकथन हा प्रकार जाणून घ्यावा.

कथाकथन हा प्रकार जर का सोशल मीडियावर व्हायरल होउन त्यांस एव्हढी प्रसिध्दी मिळत असेल तर विविध मराठी साहित्य संमेलनातून,  निमंत्रित कथाकथनकार म्हणून का बोलवले जात नाहीत? त्यामुळे किमान ताणलेली, नको असलेली भाषणबाजी तरी आटोक्यात येऊन  सकस मराठी साहित्य लोकांसमोर येऊ शकेल. जाणकारांनी याचा विचार करावा, ही विनंती. -इक्बाल शर्फ मुकादम 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सुखी राहणे आपल्या हातात