समस्तामध्ये नाम हे सार आहे

भगवंताचा अनुभव स्थळ, काळ, दृश्य वस्तु यांच्या पलिकडे असतो. तो अनुभव येण्यास त्याचे साधन देखीलदेशकालवस्तूच्या बंधनापलिकडे राहणारे पाहिजे. नाम हे असे एकच अतुलनीय साधन आहे.

मना मछरे नाम सांडू नको हो।
अती आदरे हा निजध्यास राहो।
समस्तामध्ये नाम हे सार आहे।
दुजी तूळणा तूळीता ही न साहे । श्रीराम ८१।

भगवंताचे पावन नाम नित्य स्मरणात ठेवावे असा आग्रह समर्थ सातत्याने करीत आहेत. करूणाकर सद्‌गुरूंना लोकांच्या हिताची जी तळमळ लागली आहे, त्यामुळेच त्यांना पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते की नरजन्माचा नाश करू नका. स्वतःचा उध्दार करून घ्या. उध्दाराचे अनेक मार्ग, अनेक साधने आहेत. पण ‘नामसाधन हे सर्वात सोपे, सर्व साधनांचे सारभूत असे अत्यंत प्रभावी साधन आहे. ते नाम ह्रदयात घट्ट धरा आणि कोणत्याही कारणाने सोडू नका. मत्सराचा उल्लेख समर्थांनी लागोपाठ ह्या दोन श्लोकांत केला आहे.

मत्सर दोष एवढा घातक आहे की त्याला अविवेकी गाढवाची उपमा देऊन निकराने त्याचा पराभव करावा हे मागच्या श्लोकात सांगितले. इथे पुन्हा सांगत आहेत की मत्सराच्या नादी लागून नाम ‘सांडू नकोस रे मना! तो मत्सर सांडून टाक. द्वेष-मत्सर ही आसुरी संपत्ती आहे असे स्वतः भगवंतांनी म्हटले आहे. मत्सरग्रस्त माणूस मानवता विसरतो. अविचाराने, अविवेकाने वागतो. अधःपतीत होतो. भगवंत असेही म्हणतात की मत्सरग्रस्त व्यक्तीला माझे ज्ञान सांगू नये. कारण अशी व्यक्ती कोणाचेही काहीही ऐकून घेण्यास तयार नसते. मनमानी, अनैतिक वर्तन, अधःपतन असाच तिचा प्रवास होतो. अंतःकरण शुध्दीशिवाय परमार्थात प्रगती होत नाही. अंतःकरण शुद्ध होण्यासाठी निष्काम कर्म हा उपाय आहे. निष्कामता, निरपेक्षता, निःस्पृहता येण्यासाठी नाम हेच एकमेव साधन आहे. समर्थ म्हणतात की पतन करणाऱ्या मत्सराचा त्याग करा आणि उध्दार करून देणाऱ्या भगवद्‌नामाला ह्रदयात पक्के धरा. नामाचा ध्यास लागावा. त्याचा छंद जडावा. भगवंत आणि त्याचे पवित्र नाम याबद्दल नितांत आदर उत्पन्न व्हावा. त्यासाठी नामस्मरणाचा अभ्यासच करायला हवा. श्लोक ७५ मध्येही नामाबद्दल समर्थांनी म्हटले आहे, "समस्तामध्ये सार साचार आहे”. इथेही पुन्हा म्हणतात, "समस्तामध्ये नाम हे सार आहे”. एकदा सांगून माणसाला कळत नाही, लक्षात राहत नाही, फारसे महत्त्व वाटत नाही. पण पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगितली की नकळत तिचा प्रभाव पडतो. ती लक्षात राहते. हळुहळु कळायला लागते. जसे आकलन वाढते तसे महत्त्व पटत जाते. सर्व वेद, शास्त्रे, पुराणे यांनी एकमताने निर्वाळा दिला आहे की आत्मकल्याणासाठी नामसाधन हेच परमसाधन आहे. इतर कोणतीही साधने केली तरी त्यातही नामाचा अंतर्भाव आहेच. नामाशिवाय कोणतेही साधन पूर्ण होत नाही.

ज्ञानमार्गाचा विचार केला तर ‘ब्रह्म हे नामच आहे. यज्ञ-यागात आहुती देताना नामाचाउच्चार करूनच ‘स्वाहा केले जाते. ध्यान लावताना ज्या ओमकारावर दृष्टी, वृत्ती एकाग्र केल्या जातात तो प्रणवही नामच आहे. सर्वसामान्य माणसांना कोणत्याही बंधनाशिवाय, कष्टाशिवाय घेता येणारे असे हे नाम आहे. त्याच्याशी तुलना करता येईल असे दुसरे साधन नाही. परमार्थ मार्गात साधना करताना अनेकांना प्रश्न पडतो की सगुणाची उपासना करावी की निर्गुणाची. निर्गुण प्राप्ती हे मानवाचे अंतिम ध्येय सांगितले जाते.पण जे निराकार आहे, अदृश्य आहे त्याचे आकलन होत नाही. त्यामुळे त्याची उपासना नेमकी कशी करावी हे कळत नाही. सगुण रूप दिसते. त्याला उपचार अर्पण करता येतात. पण त्या कर्मकांडातच अडकून राहण्याची भीती असते. परंतु नाम असे साधन आहे जे सगुणोपासनापण घडवते आणि निर्गुणापर्यंतही घेऊन जाते. सुरवातीला भगवंताचे कोणतेही आवडते रूप, त्याचे नाम, त्याच्या अवतारलीला यांचे नित्य स्मरण केले असता त्याची गोडी लागते. सवय लागते. हातात माळ घेऊन मोजून केला जाणारा जप नंतर माळ न घेताही अव्याहतपणे सुरूच राहतो. श्वासागणिक, श्वासाप्रमाणेच नकळत होणारा हा ‘अजपा हीच ‘निर्गुण उपासना म्हणता येईल. कारण निरंतर चालणाऱ्या अशा स्मरणात कोणतेही रूपाचे, गुणांचे आलंबन नसते. अखंड नाम तेवढे सुरू असते.

...म्हणूनच नामसाधनाशी इतर कोणत्याही साधनांची तुलना होऊ शकत नाही.आदरणीय बेलसरे बाबा म्हणतात, "भगवंताचा अनुभव स्थळ, काळ, दृश्य वस्तु यांच्या पलिकडे असतो.तो अनुभव येण्यास त्याचे साधनदेखील देशकालवस्तूच्या बंधनापलिकडे राहणारे पाहिजे. नाम हे असे एकचअतुलनीय साधन आहे. अध्यात्म रामायणात श्लोक आहे, ” "राम त्वत्तोऽधिकं नाम इति मे निश्चिता मतिः। त्वया तु तारिताऽयोध्यानाम्ना तु भुवनत्रय” हे रामा, तुमच्याहून तुमचे नाव अधिक श्रेष्ठ आहे, असे माझे निश्चित मत आहे. कारण तुम्ही केवळ अयोध्येचा उध्दार केला. पण तुमच्या नामाने त्रैलोक्याचा उध्दार केला. नामधारकासह त्याच्या कुळाचा आणि पिढ्यान्‌पिढ्यांचा उध्दार करण्याचे सामर्थ्य नामात आहे. म्हणूनच त्याच्याशी तुलना करू शकेल असे अन्य साधन नाही असे समर्थ सांगत आहेत.
जय जय रघुवीर समर्थ  
-सौ. आसावरी भोईँर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

एका रक्तरंजित हत्याकांडाची आठवण .... अर्थातच जालियांवाला बाग ...