वेळीच व्यक्त होणे गरजेचं

आपण आपल्या माणसांसमोर व्यक्त झालो नाही तर ती व्यक्ती आपल्या मनातील भावना समजू शकत नाही. प्रत्येक माणसाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो त्याच्यामुळे त्याची विचार करण्याची पद्धतही वेगवेगळी असते. कोणीतरी आपल्याला समजून घेईल याची वाट न पाहता वेळीच व्यक्त व्हावं.

 दिवसांमागून दिवस आणि वर्षांमागून वर्ष निघून जातात.... आपल्याला वाटतं.... ती वेळ आज येईल, पण ती वेळ कधी येतच नाही..... तेव्हा वाटतं......त्यावेळेस व्यक्त होता आलं असतं तर.....!

      मिनू आणि वृषभ यांच्या लग्नाला तीस वर्षे झाली होती. आत्ता ती दोघं साठीच्या जवळपास असतील. कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणून कुटुंबाची सर्व जबाबदारी ऋषभने स्वीकारली होती आणि मिनूने नोकरी करू नये, तिने कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी  वेळ द्यावा, ही त्रषभची इच्छा होती. मिनू उच्चशिक्षित असूनही तिने वृषभच्या इच्छेचा आनंदाने स्वीकार केला आणि आपला पूर्ण वेळ कुटुंबासाठी दिला. कुटुंबाच्या गरजांचा विचार करता ऋषभने पूर्णपणे आपल्याला कामात गुंतवून घेतलं होतं आणि मिनू कुटुंबातील सर्वांची काळजी घेत होती.

    पण हे सर्व करता करता या दोघांचंही स्वतःसाठी जगणं मात्र राहून गेलं होतं. स्वतःचं मन एकमेकांसमोर मोकळं करता येत नव्हतं. कारण त्यांच्याजवळ तितका वेळच नव्हता. वृषभ कामानिमित्त नेहमीच लोकांच्या गराड्यात होता त्यामुळे कुठेतरी त्याच्या विचारांची देवाण-ेवाण होत होती पण मिनूच काय? तिच्या मनाचं काय? मिनूला सर्वांचं करता करता  स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता.

फक्त तिला वाटायचं..आपलंही कोणीतरी आहे..आपण जरी त्रषभला काही नाही सांगितलं तरी तो पाहतो आहे,समजतो आहे .अशी तिला वेडी आशा असे. पण मिनूच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला ऋषभ तिच्या मनापर्यंत पोहोचला का.?

नाही....

कारण मिनू कधी त्याच्यापर्यंत व्यक्तच झाली नाही. तिला वाटायचं, आपण काहीही न सांगता ऋषभने आपल्याला समजावं. अशी अपेक्षा करता करता त्यांच्या संसाराला आज तीस वर्षे झाली होती. आणि आज होते ते फक्त आरोप, प्रत्यारोप.!   अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा वेळीच व्यक्त झालं तर!वेळीच म्हणजे, दररोज नव्हे; प्रसंगानुरूप व्यक्त व्हा.... कोणतंही नातं असो त्या नात्यांमध्ये पारदर्शकता असली की जगणं सोपं होऊन जातं. असाच विचार पालक आणि मुलांच्या बाबतीत केला तर?

    आज बऱ्यापैकी सर्वच पालक वर्ग नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असतात त्यामुळे ते आपल्या मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत. दिवसभर आपली मुलं काय करतात हेही जाणून घ्यायला त्यांच्याजवळ वेळ असत नाही. कुणाजवळ तरी आपल्या मुलांना दिवसभर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वाधीन करून ते आपल्या कामकाजात व्यस्त असतात. नोकरी असो किंवा व्यवसाय असो. त्यांच्यासमोर मोठमोठी आव्हानं असतात आणि त्या आव्हानांना तोंड देता देता त्यांचीही दमछाक होत असते. त्यामुळे पालक आणि मुलं यांच्यात संवाद फार कमी असतो. त्यामुळे मुलांना आपल्या पालकांजवळ म्हणावं तितकं व्यक्त होता येत नाही आणि पालकांची इच्छा असूनही आपल्या मुलांसमोर व्यक्त होता येत नाही. मग मुलं पालकांच्या नकळत बाहेर कुणाशी तरी मैत्री करणं, बाहेर कुणाबरोबर तरी हिंडणं फिरणं अशा गोष्टी सुरू करतात आणि त्यातूनच पालक आणि मुलं यांच्यात दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होते.

    वेळीच पालकांनी मैत्रीचं नातं निर्माण करून आपल्यासमोर असलेल्या अडचणी सांगून मुलांसमोर व्यक्त झालं तर आपली मुलं निश्चितच आपल्याला समजून घेतील. कारण आजची पिढी खूप हुशार आणि बुद्धिमान आहे. दिवसभराचा अर्धा तास का होईना, मुलांबरोबर मैत्रीपूर्ण नातं निर्माण करून त्यांच्या दिवसभराच्या इतिवृत्ताबाबत आणि आपलं दिवसभराचं कामकाज याच्याबाबत त्यांच्याशी चर्चा करून एकमेकांसमोर व्यक्त झालं तर! आपली मुलं समाजात वावरताना सर्व ठिकाणी सावधगिरी बाळगून वावरतील त्यामुळे निश्चितच पालक आणि मुलं यांच्यात गैरसमज वाढणार नाहीत.

    म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने व्यक्त होणे गरजेचं आहे. आपण आपल्या माणसांसमोर व्यक्त झालो नाही तर ती व्यक्ती आपल्या मनातील भावना समजू शकत नाही. प्रत्येक माणसाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो त्याच्यामुळे त्याची विचार करण्याची पद्धतही वेगवेगळी असते. कोणीतरी आपल्याला समजून घेईल याची वाट न पाहता वेळीच व्यक्त व्हावं. मग नवरा बायकोचं नातं असो, आई मुलाचं नातं असो, वडील मुलगीचं नातं असो किंवा कोणत्याही प्रकारचं नातं असो. प्रसंगानरूप व्यक्त व्हा. - सौ.ज्योतिका दिपक हरयाण 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

समस्तामध्ये नाम हे सार आहे