हरवलेलं गारीगार..!
दिवस कितीही पालटले तरी बालपणातल्या दहा, पाच, पंचवीस पैशांवर घेतलेलं गारीगार अन् आपल्या गावात फिरणारा गोटीराम आज गल्लीतून फिरताना दिसत नाही असं वाटतं; गोटीराम आज येईल.. उद्या येईल अन् म्हणेल "गारीगारवाले गारेगार. थंड गारेगार लै मस्त रंगीत लालभडक गारेगार.” अन् ते खाऊन मनाला थंडावा मिळेल त्या गारीगारने सर्दी होईल. शिंका येतील याची मात्र मुळीच चिंता कोणीही करणार नाही.
राजस्थानी कुल्फीच्या गाडीवरून आम्ही नवरा बायकोने दोन कुल्पया घेतल्या अन् खात खात घराकडे निघालो. सध्याच्या विकासलेल्या जगात फूड व्हॅल्यू खूपच उंचावलेली कुल्फी हातात होती; परंतु रेंगाळलेली चव मात्र त्या लहानपणीच्या गारीगारची अजिबात येत नव्हती! ते तर सगळं बर्फाचं होतं. यात बर्फ अजिबात नव्हता असं म्हणलं तरी चालेल. मग उलटं झालंच कसं काय? दिवस मागे गेले एवढंच, बाकी सगळं जिथल्या तिथं आहेच; कळायला काहीच मार्ग नव्हता. चव नसूनही आपण आज उलट प्रगती झाली असं म्हणतोय आपण! अनेक मार्गांनी ते आपल्या जगण्यातून हद्दपार झालं असं म्हणावं लागेल.
तेव्हा एकदा का संक्रांत झाली म्हणजे तीळ तीळ दिवस वाढून उन्हाळा सुरू व्हायची चाहूल लागायची. चांगलंच चटकायला लागायचं अन् आमच्या शाळेसमोर दिवसातून बऱ्याचदा "गारीगारवाले गारेगार. थंड गारेगार लै मस्त रंगीत लालभडक गारेगार.” अशी गावातल्या गोटीरामची फिरती आरोळी सुरू व्हायची. मधल्या सुट्टीत त्याचं आणखी जोरजोरात आवाज देणं सुरू व्हायचं. तोही करणार तरी काय? त्यालाही पोटापाण्याचा प्रश्न सोडवायला हाच एकमेव मार्ग होता. मला तरी वाटतं त्याला शेती नव्हतीच; म्हणून बऱ्याच वेळा त्याला कुठं बाहेरगावी जायचं काम पडलं तर तो ती पेटी सायकलवरून खाली उतरून एखाद्या झाडाखाली किंवा पाण्याच्या टाकीखाली ठेवायचा. तेव्हा दिवसभर ते सगळं दुकान त्याच्या बायकोच्या हवाली करून तो पुन्हा दुसऱ्या दिवशी हजर असं चाललं होतं. म्हणजे तो त्याच्या गारीगार धंद्याला काहीही काम असलं तरी खाडा होऊ देत नव्हता याचाच तो अर्थ! पोरांची शाळा सुरू असली म्हणजे त्याच्या धंद्याला तेजी अन् सुट्टी असली म्हणजे मंदी हे समीकरण कायमचं पडलेलं होतं. तसं पाहिलं तर हा सीजनल व्यवसाय म्हणून पावसाळा हिवाळा तो कधी पेरू तर कधी केळी विकायचा. त्याची फिरून विकायची टॅक्ट दुसरी कुणालाही सहज जमेल अशी नक्कीच नव्हती. पण यापैकी गारीगार धंद्याला त्याची सीझनला सुरुवात झाली म्हणजे मला खूप बरं वाटायचं.
मला हप्त्यातून चार आठ आणे दादाकडून हमखास मिळायचे. शाळेत यायचं म्हणलं म्हणजे तोही मला आवडीने द्यायचा. आम्ही दोघं एकदम खास दोस्त. दोस्तीतलं अंतर ५० वर्षांचं म्हणजेच दादाचं वय ६० अन् माझं १० असं अगदी हेलकावा खाणाऱ्या तराजू काट्यासारखं पण मैत्री मात्र लै अतूट..! दादा कोपरीच्या खिशात जेवढे पैसे सांभाळून ठेवायचा ते फक्त त्याच्या तंबाखू चुना अन् माझ्यासाठीच. बऱ्याचदा तंबाखू पुडी आणायला सांगितल्यावर त्यासोबत शिल्लक राहिलेले वीस पंचवीस पैसे म्हणजे त्यावर माझीच मालकी आपोआप तयार व्हायची. मीही मधल्या सुट्टीत मनसोक्त उन्हाळा असला म्हणजे त्या पंचवीस पैशांचं गोटीरामकडून लालभडक बर्फाचं गारीगार घेणार अन् शाळेची घंटा होईपर्यंत चोखत बसणार असा तो मोठा मजेशीर कार्यक्रम की ज्याचा परमानंद आज कितीही म्हणलं तर आपल्याकडे कितीही पैसे असले तरी मिळेल म्हणून मला वाटत नाही.
दिवस कितीही पालटले तरी बालपणातल्या दहा, पाच, पंचवीस पैशांवर घेतलेलं गारीगार अन् आपल्या गावात फिरणारा गोटीराम आज गल्लीतून फिरताना दिसत नाही असं वाटतं; गोटीराम आज येईल.. उद्या येईल अन् म्हणेल "गारीगारवाले गारेगार. थंड गारेगार लै मस्त रंगीत लालभडक गारेगार.” अन् ते खाऊन मनाला थंडावा मिळेल त्या गारीगारने सर्दी होईल. शिंका येतील याची मात्र मुळीच चिंता कोणीही करणार नाही. शेवटी जर ते आज खायला मिळालंच तर मात्र उरलेल्या काडीला रंगसुद्धा कोणी शिल्लक ठेवणार नाही इतकी चाटूनपुसून गारीगार संपेल यात तीळमात्र सुद्धा शंका नाही. म्हणून हरवलेलं गारीगार अन ्गोटीराम पुन्हा एकदा सापडतील का?
-निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी, मंडळ कृषी अधिकारी, फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर