महाबली हनुमानाचे वेगळेपण

भक्ती आणि शक्ती
यांचा अद्‌भुत संगम म्हणजे हनुमान
मारुततुल्यवेग मूर्तिय बुध्दीमतां वृध्दम !

वातात्मजं वानरस्ययुथमुख्य श्रीरामद्‌तम्‌ शरणं प्रपद्ये शक्ती आणि बुध्दीचा अस्सल संगमेच्या हनुमानाची जयंती आज शनिवार दिनांक १२ एप्रिल रोजी देशभर साजरी होणार आहे. चैत्र शुध्द पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाने जन्म झाला. त्यामुळे त्या दिवशी हनुमानाच्या सगळ्या मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा होत असतो! हनुमानाला मारुती, बजरंगबली रामभक्त, आंजनेय, महावीर पवनपुत्र, पवनसुत केसरीनंदन अशा अनेक नावांनी संबोधले जाते. तसेच हनुमानाला महादेव शिवशंकराचा अवतार मानले जाते.

हनुमान यांचा जन्म नाशिक जिल्हयातील अंजिनेरी येथे झाला असे मानले जातो. या दिवशी उत्तर भारतात विशेष रुपाने व्रत उपवास पालन केले जाते. रामायणातील सुंदर कांड याचा पाठ वाचला जातो. वाल्मिकी रामायणात हनुमानाचे चरित्र सुंदर कांडा शिवाय किष्किंधाकांड, युद्धकांड, उत्तरकांड अशा तीन ठिकाणी आलेले आहे.  किष्किंकधा खंडात हनुमानाच्या जन्म कथेचा संदर्भ येतो. हनुमान सफरचंद समजून सूर्याला गिळंकृत करण्यासाठी झेपावला होता. तेव्हा इंद्रदेवाकड आपले अस्त्र वज्राचा प्रहार हनुमानावर झाला असता मुच्छीत हनुमान जमिनीवर पडलेला पाहून वायूदेव संतापले आणि त्यांनी पृथ्वीवरील आपले अस्तित्व संपविण्याचा निर्णय घेतला. आता हवेअभावी पशु-पक्षी मरण पावतील. या भीतीने देवांनी वायुदेवाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वायुदेवाचा क्रोध शांत होण्यासाठी स्वतः ब्रह्मा, विष्णू, महेश प्रकट झाले. ब्रद्माचे ब्रह्मास्त्र विष्णूचे सुंदर्शनचक्र आणि शंकराचे शंकराचे त्रिशुल अशा कोणत्याही शस्त्रांचा मारुतीवर परिणाम होणार नाही असे स्पष्ट केले. त्यानंतर मारुतीला इंद्राने विलक्षण जबडा असलेला म्हणजेच हनुमान असे नाव दिले. रामायणात हनुमानाच्या भक्तीने प्रसन्न झाल्याने खुद्द श्री रामानी हनुमानाला चिरंजीवी भव असा वर दिल्याचा उल्लेख आहे म्हणजेच अमरत्वाचं वरदान दिले आहे.

मारुती हा पुष्कळ शक्तीमान होता. त्याने एका हातावर द्रोणागिरी पर्वत उचलला होता. तसेच समुद्रावरुन उड्डाण करुन लंकेत प्रवेश केला होता. भक्तीनेच भक्ती मिळते. या अनुषंगाने श्रीरामाची भक्ती करुन त्याचा दास बनून हनुमान शक्तीमन झालेला आहे. मारुतीच्या जन्माच्या वेगवेगळ्या कथा पाहावयास मिळतात. त्यापैकी एक राजा दशरथाने पुत्रपाप्तीसाठी यज्ञ केल्यावर अग्निदेव प्रसन्न होऊन त्यांनी दशरथाच्या राण्यांना खिरीचा प्रसाद दिला; तसाच तो अंजनीलापण मिळाला. त्यामुळे तिला मारुती पुत्र लाभला. मारुतीने जन्मतःच उगवता सूर्य पाहिला त्यामुळे त्याचा जन्मोत्सव हा चैत्र पौर्णिमेला सकाळी सुर्योदयाच्या वेळी साजरा करण्याची प्रथा आहे. हनुमानाने जणू माली, अक्ष, ध्रूमाक्ष, निकुंभ या मोठमोठ्या विरांचा नाश केला. तसेच त्याने रावणाच्या लंकेचे दहन केले. मारुतीला देवाच्या सेवेपुढे सर्व तुच्छ वाटतं असे. युध्दाच्या वेळीसुध्दा थोडा वेळ बाजूला जाऊन मारुती ध्यान लावे आणि प्रत्येक वेळी यांचे स्मरण करीत असे. मारुतीरायाला सर्व व्याकरणसूत्रे ठाऊक होती. त्याला अकरावा व्याकरणकार मानले जात होते. एवढा तो बुध्दीमान होता. मारुतीचे आपल्या इंद्रीयांवर नियंत्रण होते. सीतेच्या शोधासाठी गेलेल्या मारुतीला अनेक स्त्रिया पाहुनसुध्दा स्त्रीविषयी कोणताच वाईट विचार क्षणभरसुध्दा आला नाही. कारण त्याने सर्व विकारांवर नियंत्रण मिळविले होते. मारुतीचे रावणाच्या दरबारातील भाषण हे तो उत्तम वक्ता असल्याचे उदारहरण आहे. त्याच्या भाषणाला दरबार थक्क झाला.

एकदा सीतेने स्नानानंतर कपाळाला शेंदूर लावला. तेव्हा हनुमानाने त्याचे कारण विचारले असता सीतेने म्हटले रामाचे आयुष्य वाढते म्हणून मी शेंदूर लावते. मारुती हा रामाचा निस्सीम भक्त असल्याने तो म्हणाला माझ्या स्वामीचे आयुष्य जर त्यांनी वाढणार असेल तर मी सर्व अंगाला शेंदूर लावतो. असे म्हणून त्याने सर्व अंगाला शेंदूर लावला. हे श्रीरामाला कळल्यावर तो प्रसन्न तर झालाच; पण तुझ्यासारखा माझा अन्य कुणीच भक्त नाही तेव्हा पासून मारुतीला रंग शेंदरी आहे. मारुती द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरताने त्याला बाण मारला तेव्हा त्याच्या पायाला दुखापत झाली आणि ती शेंदूर आणि तेल लावल्याने बरी झाली. त्यामुळे हनुमानाला शेंदूर लावतात व तेल वाहतात. रामापुढे हात जोडून मस्तक झुकवून उभा असलेल्या मारुतीचे रुप पाहून हनुमान किती नम्र आहे हे कळून येते. आपण काही ठिकाणी पंचमुखी मारूतीची मूर्ती पाहतो. गरुड वराह हयग्रीव सिंह आणि कपिमुख अशी मूर्तीची मुखे असतात. याचाच अर्थ पाच दिशांचे रक्षण करणारा मारुतीच आहे. मारुतीला शेंदूर तेल व रुईच्या पानांची माळ घालतात. कारण या पानांमध्ये महालोकापर्यतची देवतांची शक्ती आकर्षित करण्याची क्षमता अधिक असते. तसेच मारुती स्तोत्र हनुमान चालीसा पठण हे सगळ्या हनुमान मंदिरात केले जाते. श्री हनुमान हे महारुद्राचे ११ वे अवतार मानले जातात. श्री समर्थ रामदासंनी स्वामीनी चाफळ आणि त्यांच्या आजुबाजूला गावांमध्ये ११ मारुतींची मंदिरे स्थापन केली.

 हनुमानामध्ये ब्रह्मतेज व क्षत्रतेज दोन्ही असल्याने युध्दात श्रीकृष्णाने हनुमताला अर्जुनाच्या स्थावर स्थान दिले. तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रेहवेतच नष्ट केली असे महाभारतात म्हटले आहे. आजही मारुतीचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र व धर्माच्या सुरक्षेतेसाठी सर्व एक होऊन हनुमान जयंती साजरी करु या.
-लीना बल्लाळ 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आरोग्य सुविधा रसातळाला, पेशंट लागतोय गळाला