सामना
तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना वर्तमानपत्रांतील, दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांवरील बातम्या, ब्रेकिंग न्युज, गौप्यस्फोटाचे वृत्तांत घरबसल्या पाहताना कदाचित फारसे वेगळे असे काही वाटत नसेल; मात्र ते करण्यामागे प्रसारमाध्यमकर्मींची मोठी मेहनत असते. प्रसंगी काही जोखमीच्या बातम्या करताना त्यांच्या जीवालाही धोका असतो. अशावेळी त्यांच्यातलाच कुणी फुटीर, विकाऊ सदस्य जर ज्यांच्याबाबतीत एखादा गौप्यस्फोट, विरोधात जाणारा एखादा स्पेशल रिपोर्ट आधीच फोडणारा, संबंधिताशी संधान बांधणारा निघाला तर...?
मी आणि माझा मुलगा पुण्याला निघालो होतो.. मुलगा अमेय गाडी चालवत होता.. मी बाजूला बसलो होतो. गाडी पनवेलच्या पुढे आली एवढ्यात मोबाईलच्या स्क्रीनवर "रंजना पाटील नाव झळकलं. मला खुप आनंद झाला.. खुप दिवसांनी रंजनाचा फोन..
हा.. बोल ग रंजू.. कशी काय आठवण झाली आज?”
"सर, आनंदाची बातमी कळली, तुमची पहिल्यांदा आठवण झाली.”
काय कसली बातमी?”
"सर, मी आमच्या न्यूज चॅनेलची हेड झाले.. आताच मेल आला मला.. तुमची पहिली आठवण झाली..”
"अरे छान छान रंजू.. अभिनंदन.”
"हो सर, करिअरच्या सुरवातीलाच एक मोठा सामना करावा लागला मोठया राजकारण्याबरोबर..तुम्ही सोबत होतात, म्हणून त्या मोठया धेंडाबरोबर सामना करता आला.. नाहीतर.”.
"जाऊ दे रंजू, पत्रकाराला असे सामने करावेच लागतात.. नाहीतर प्रत्येक ठिकाणी मांडवली करावी लागते.. पण तू आणि मी त्यावेळी दिलेला सामना माझ्या पूर्ण लक्षात आहे.. परत एकदा अभिनंदन..”
मी फोन बंद केला आणि खिशात ठेवला.
आमचे बोलणे गाडी चालवत असताना अमेय ऐकत होता. तो म्हणाला..
"बाबा कोण ही रंजू? आणि कसला सामना?”
"रंजना, म्हणजे रंजना पाटील.. त्यावेळी नवीन पत्रकार होती आमच्या चॅनेल मध्ये आता एका मोठया चॅनेल ची हेड झाली आहे.
"आणि सामना कसला? कोणामध्ये?”
त्या साठी सुमारें पंचवीस वर्षे मागे जावे लागेल. मी अमेयला सांगू लागलो...
पंचवीस वर्षापूर्वी
मी एका मराठी न्यूज चॅनेल मध्ये उपसंपादक होतो, त्याआधी दोन चॅनेलवर पत्रकार म्हणून नोकरीं केली होती. माझ्या डिपार्टमेंटमध्ये दहा रिपोर्टर होते, ते स्पॉटवर जाऊन रिपोर्टींग करत होते. बातमी देताना माझ्या परवानगीने बातमी चॅनेलवर दिली जात असे. काही विशेष कार्यक्रम किंवा संवादपण माझ्या परवानगीने होत असत.
एके दिवशी रंजना पाटील मला भेटायला आली. रंजना ही लातूर भागातील; पण शिक्षण पुण्यात. जर्नालिझमचा कोर्स करून मुंबईत आली होती. एका वर्तमानपत्रात दोन वर्षे नोकरीं करून या चॅनेलमध्ये आलेली. चलाख, चटपटीत मुलगी.
"सर, बोलायचं होतं..”
"बोल ना..”
" सर, मला दोन सोर्स कडून माहिती मिळाली की सध्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागतात..
"काय? पैसे मागतात.. कोणाकडून?”
"लोकांकडून आणि आमदाराकडून..”
"असे आरोप नेहमी होत असतातच.. पण पुरावे लागतात, सिद्ध करण्यासाठी..”
"सर, पुरावे आहेत.. फोटो आहेत.. आवाजाचे रेकॉर्डिंग आहे.. क्लिप्स आहेत.”
"तुला कुठे मिळाले? सध्या विधान परिषद विरोधी पक्ष नेते कोण आहेत, माहित आहे ना? फाडून खातील.. खोटे पुरावे असले तर..”
"सर, सर्व पुरावे खरे आहेत..”
"मला पहावे लागतील.. नाहीतर ते महाशय चॅनेलवार केस करतील.. ऑफिस फोडतील त्यांचे गुंड.”
रंजनने लॅपटॉपवर क्लिप्स ऐकवल्या, फोटो दाखवले.. बोलण्याच्या रेकॉर्डिंग ऐकवल्या.
यात हे विरोधीपक्ष नेते प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागताना दिसत होते.
यातील काही लोक त्याना पैसे देताना दिसत आहेत.. प्रत्यक्षात ते कबूल करतील की आयत्यावेळी टोपी फिरवतील?
"नाही, ते कॅमेऱ्यासमोरपण सांगतील.. कारण पैसे घे ऊन पण त्यानी सभागृहात प्रश्न दुसरेच विचारले.”
"ठीक आहे.. मी डायरेक्टरच्या कानावर घालतो.. कारण शेवटी चॅनेलनेपण तयारी दाखवायला हवी.. कारण चॅनेललापण भीती असते.. सिद्ध झाले नाही तर त्याना हक्कभंगाची नोटीस येईल... चॅनेलची तोडफोड होईल आणि आर्थिक नुकसान होईल. शिवाय विरोधी पक्ष कायम विरोधी होईल.
हरकत नाही सर, तुम्ही चॅनेलचे मत घ्या.
मी ताबडतोब चॅनेलच्या हेडना भेटलो आणि रंजनाने जमा केलेल्या क्लिप्स, फोटो दाखवले. त्यांनीपण उत्सुकता दाखवली.
"हरकत नाही सामंत, पुरावे भक्कम दिसतात पण आपल्या चॅनेलचे मालक या विरोधी पक्ष नेत्याचे जवळचे आहेत हे विसरता नये. म्हणून मालकांच्या कानावरपण घातले पाहिजे".
हेडनी मालकांना फोन लावला. सुदैवाने आमचे मालकपण तत्व मानणारे होते. चूक ती चूक असे मानण्यातील होते. त्यानी हेडना कळविले.. याची बातमी करताना काळजी घ्या.. फक्त ठराविक मंडळींना हे माहिती पाहिजे.. असा अटॅक करा की त्याना बचावात जावे लागेल आणि हक्कभंगाची नोटीस येणार हे निश्चित, त्याची तयारी आधीपासून ठेवा.
रंजनाने जमा केलेलं पुरावे मी पुन्हा एकदा तपासले. शेवटी आपली बातमी इतरांपेक्षा वेगळी करताना कुणावरही अन्याय होता नये कारण एका बातमीने त्यांचे राजकीय जीवन उध्वस्त झाले असते.
बातमी खरी होती, पुरावे अस्सल होते. मग या खळबळजनक बातमी करिता टीम निवडली.कार्यक्रमाचे निवेदन आणि प्रश्न विचारण्यासाठी आमच्या चॅनेलचा हुकमी अँकर अतुल ठोंबे याची निवड केली, त्याला संपूर्ण स्क्रिप्ट आणि विचारायच्या प्रश्नांची लिस्ट सोपवली, या सुमारास जोंधळे नावाचे असिस्टंन्ट हेड या चॅनेलमध्ये जॉईन झाले.. त्यामुळे जोंधळेपण या ग्रुपमध्ये आले. हा कार्यक्रम प्रसारित झाला म्हणजे विरोधी पक्षनेता खवळणार आणि हक्कभंगाची नोटीस येणार हे निश्चित होते. त्यामुळे त्यादृष्टीने सर्व तयारी केली गेली.
शेवटी एक जून ही तारीख ठरली. त्या दृष्टीने "महागौप्योस्पोटच्या जाहिराती चॅनेलवर चालू झाल्या. लोकांना उत्सुकता होती की चॅनेल कसला स्फ़ोट करणार आहे? चॅनेलमधील पाचजण सोडून कुणालाच काहीही माहिती नव्हती. उत्सुकता टांगणीला लागली आणि..कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी पुन्हा सर्वांची मिटिंग झाली..त्या मीटिंगला मी, रंजना, अँकर अतुल ठोंबे, आमच्या विभागात नवीन आलेले जोधळे आणि आमचे हेड उपस्थित होते. पुन्हा एकदा सर्व पुरावे पहाण्यात आले. जोंधळे यावेळी म्हणाले ”या क्लिप्स मध्ये एकही महिला आमदार किंवा महिला तक्रार करणारी नाही, सर्व पुरुष दिसतात."
"मग काय करायचे?” मी विचारले.
"त्या करिता कुठल्यातरी एका महिलेचा आवाज घेऊ.. तिच्या आवाजात एक क्लिप तयार करू. महिला त्यात ती दलित असली की केसला वजन येते.”
असं खोटं करायला माझा विरोध होता. रंजना माझ्याकडे पाहू लागली. पण जोधळे सांगू लागले
"अहो सामंत, अशा आमदाराविरुद्ध अनेक तक्रारी आम्ही केल्या आणि निभावल्या.. दलित महिला म्हंटले की हक्कभंग समितीची खिळ बसते.
शेवटी आमच्या ऑफिसमधील एका दलित स्त्रीकडून विरोधी पक्षनेता प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागतो अशी व्हाईस रेकॉर्डिंग घेतली.
एक जून.......एक जून रोजी "महागौप्यस्पोट कार्यक्रम लाईव्ह सुरु झाला. अतुल त्याच्या नेहेमीच्या स्टाईलमध्ये एक एक क्लिप्स दाखवत होता.. त्याचवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते, आमदार यांच्याशी बोलत होता.. त्याना याबद्दल प्रश्न विचारत होता.सर्वांनाच धक्का होता.. मग आम्ही आधीपासून काही घटनातज्ज्ञ लोक स्टुडिओत बोलावले होते... त्यांना प्रश्न विचारत होता.. काही प्रश्न आधीपासून तयार ठेवले होते.. काही आम्ही मंडळी पिसीअरमध्ये बसुन सुचवत होतो.
जिकडतिकडे खळबळ माजली होती..पुरावे जबरदस्त होते.
सत्ताधारी खुशीत होते आणि विरोधी पक्ष बॅकफूट वर गेला होता. बाकी सर्व चॅनेल्स आश्रयचकित झाली होती-या चॅनेलने एवढे पुरावे जमवले कसे? कोण हा रिपोर्टर? ज्यांच्यावर आरोप झाले त्यानी सर्व आरोप फेटाळले. उलट या चॅनेलचे मालक आपल्या मतदारसंघात निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत, म्हणूंन हे खोटे आरोप आपल्यावर करत आहेत असे सांगून हा प्रश्न विधिमंडळात विचारला जाईल तसेच या चॅनेलवार अब्रूनुकसानीचा दावा ठोकू असा इशारा दिला. ही बातमी दिल्लीतील आमच्या मुख्य चॅनेलने पण दाखवली, त्यामुळे देशभर याची चर्चा झाली.दिल्लीच्या मुख्य संपादकांनीपण माझे कौतुक केले आणि आम्ही तुमच्या मागे आहोत असा शब्द दिला.
दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हाणामारी झाली, प्रत्यक्ष विरोधी पक्षनेता सापडला होता.. सत्ताधारी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते तर विरोधक हा मुख्यमंत्र्याचा कट म्हणत होते.
पण हा निवडून आलेल्या आमदारावर आरोप झाले होते.. त्यामुळे सभापतीनी ‘हक्कभंग समिती' स्थापन केली. यात दोन्ही सभागृहातील सर्व पक्षाचे काही आमदार होते.
हक्कभंग समितीची मला, रंजनाला, अँकर अतुल आणि आमच्या हेडना नोटीस आली. अतुल हा फक्त अँकर होता, त्यामुळे त्याने त्याचे काम केले होते. माझी आणि रंजनाची उलटतपासणी झाली.. तेंव्हा रंजनाने तिला कोणी माहिती दिली, क्लिप्स कोणी पाठविल्या, त्याच्या सत्यता कशा तपासल्या याची माहिती दिली.
मग हा घोटाळा चॅनेलवर प्रसारित झाला, त्याचा संपादक मी होतो. मला पहिलाच प्रश्न विचारला गेला..
"ज्या दलित महिलेचा आवाज ऐकू येतो ती महिला कोण? आणि खरेच या महिलेने प्रश्न विचारायला पैसे दिले होते काय?”
मी आणि रंजना चमकलो कारण तो आवाज आमच्या ऑफिसमधील एका स्त्रीचा होता. पण मी म्हणालो,
"हो.. ती महिला खरीच आहे आणि तो तिचाच आवाज आहे..”
"मग पुढील वेळी त्या स्त्रीला या समितीसमोर उभे करा..” आणि त्या दिवशीची मिटिंग संपली.
आमचे धाबे दणाणले. कोणती स्त्री उभी करणार होतो आम्ही? आणि तिच्या आवाजाची टेस्ट केली तर?
आमचे हेड आमच्यासोबत होते. त्यांनापण प्रश्न विचारले गेले.
आम्ही चौघे एका हॉटेलमध्ये चहा घेत बसलो. त्यावेळी हेड म्हणाले..
"कमाल आहे, एवढ्या क्लिप्स, ऑडिओ दिल्या असताना फक्त त्या स्त्री आवाजाबद्दल त्याना संशय का यावा?”
मघापासून काळजीत पडलेली रंजना पटकन म्हणाली
"एका स्त्री आमदार किंवा नागरिक हिचा ऑडिओ हवा असा आग्रह जोंधळे सरांचा? त्यान्च्यामुळे आपण अडचणीत आलो.. बाकी कुठल्याही पुराव्यात कसूर नव्हती.. त्यानी तरी तो आग्रह का धरला? आणि नेमकी त्याच स्त्रीला सभापतीनी का बोलावले? म्हणजे आपल्या चॅनेलमधील आपल्या गुप्त मिटींग्स मधील बातम्या बाहेर कश्या गेल्या?
"होय.. आपल्या मिटिंग मधील बातम्या सभापतीना कळत होत्या हे खरे.. पण कश्या?
"सर, तुमच्या एक लक्षात येतंय का.. प्रत्यक्ष सर्व गुप्त मिटिंगमध्ये आपल्या चार जणांबरोबर जोंधळेपण असायचे.. आणि आता हक्कभंग समितीची नोटीस जोंधळे यांना आलेली नाही.”
हेड बोलू लागले "होय रंजना.. तुझे खरे आहे.. जोंधलेला नोटीस आलेली नाही याचा अर्थ त्याने सभापतीबरोबर आधीच फिक्सिंग केलेले आहे.. त्यानेच या महिलेचा आवाज घेण्याची कल्पना आपल्या माथी मारली. ठीक आहे.. उद्या त्याला बोलावतो”.
दुसऱ्या दिवशी चॅनेलच्या मालकांच्या केबिनमध्ये मिटिंग सुरु झाली. आमच्या हेडनी काल विधिमंडळच्या समितीसमोर झालेलं बोलणे सांगितले आणि सभापतीना सर्व बातम्या कशा मिळतं होत्या.. याबद्दल जोंधळेवर निशाना ठेवला.
"मी यांच्या मिटींग्सना हजर नव्हतो सर, माझ्यावर उगाच आळ घातलाय.. मी त्या सभापतीना ओळखत नाही.. हे सर्व सामंत यांचेच काम असणार.
जोंधळे यांनी माझे नाव घे तले. मी कावराबावरा झालो.. खरं तर ही बातमी जगासमोर यावी म्हणून मी रंजनाच्या साथीने प्रयत्न केले होते.
"सर, एखादी बातमी इतर कुणा चॅनेलच्या आधी आपल्या चॅनेलला मिळावी म्हणून रंजना पाटील हिने आणलेली या बातमीचा आणि पुरव्यांचा मी पाठपुरावा केला.. चार वेळा पुरावे तपासले.. मग मी आपल्या चॅनेलमधील आतली बातमी बाहेर कशी आणेन..” मी म्हणालो.
मग आमच्या चॅनेलचे मालक बोलू लागले ही बातमी सर्वप्रथम आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जगासमोर आली.. याचे कौतुक वाटते.. आपली रिपोर्टर रंजना हिचे कौतुक.तिचे भवितव्य उज्वल आहे. सामंत हे जबाबदार संपादक आहेत. मग आपल्या चॅनेलमधील गुप्त गोष्टी बाहेर कश्या गेल्या.?
मालकांनी आपल्या टेबलाखालील एक लिफाफा काढला, त्यात हक्कभंग सभापतीच्या गाडीत जोंधळे बसलेले होते.
"जोंधळे, हे तुम्हीच ना.. आठ दिवसापूर्वी मरीन लाईन्स मधील वेस्ट एन्ड हॉटेल मधून या सभापतीसोबत दोन तास होतात.. जेवण करून तुम्ही दोघे या गाडीतून विरोधीपक्षनेत्याच्या बंगल्यावर गेला होतात?
जोंधळे पांढरेफटक पडले.. हात जोडून शेटजीसमोर उभे राहिले.
"जोंधळे, तुम्हाला हाकलून लावले आहे.. असली नमकहराम माणसे माझ्या चॅनेलमध्ये नको. चालता हो.”
रंजना, सामंत तुम्हाला प्रमोशन मिळतील. त्या विधिमंडळ केसची काळजी करू नका.. सगळे आमचे मित्रच आहेत.. आता मी पाहतो.
शेटजीनी पुढील सर्व सांभाळले. आपल्या चॅनेलचे मालक किती शक्तिमान असतात हे मला कळले.
गाडी चालवता चालवता माझा मुलगा अमेय मला म्हणाला
"मग बाबा, पुढे काय झाले? तुम्हाला परत त्या समिती समोर जावे लागले काय?
"नाही, शेटजीनी सर्व सांभाळले. त्या विरोधी पक्षनेत्याने त्यावेळी आमदारकीचा राजीनामा दिला पण...”
"पण काय बाबा?”
"पुढील निवडणुकीत तो भरघोस मतांनी विजयी झाला आणि मंत्रीपण झाला.”
- प्रदीप केळुस्कर