सर्वार्थाने महात्मा
महात्मा फुले हे केवळ चार्तुवर्ण्यावर-ब्राम्हण श्रेष्ठत्वावर एकूण विषमताधिष्ठीत हिंदू धर्मावर आघात करुन थांबले नाहीत. तो त्यांच्या बंडखोरीचा केवळ आवश्यक आणि प्राथमिक असा विघ्वंसक अविष्कार होता, पण त्याहूनही श्रेष्ठ अशी फुल्यांची प्रेरणा होती. ती म्हणजे संपूर्ण समतेची, बंधुत्वाची, मानवतेची, विश्वकुटुंबाची! त्यामध्ये वर्ण, जात तर सोडाच पण देश, धर्म, वंश या मधील भेदांना त्यांच्या वृथा अभिमानाला यकिंचितही वाव नव्हता.
एकविसाव्या शतकाकडे नजर लावून बसलेल्या भारतात शिक्षण तळागाळापर्यंत पोहचू शकलेलं नाही हे वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आजही समाजात हक्कांची जाण आहे. पण कर्तव्याचा विसरच पडला आहे. दीनदुबळे, दलित अन्याय सोसतच आहेत. जिकडे तिकडे द्वेषाचे, विद्रोहाचे अशांत वातावरण खदखदत आहे. साक्षरतेचे प्रमाण फारच कमी आहे. महात्मा फुल्यांनी अस्पृश्य मुलांसाठी शाळा काढली आणि ज्ञानांच दालन त्यांच्यासाठी खुले केले हे जरी खरे असले तरी विषमता आणि जातीभेद यांना आजदेखील पूर्णपणे मुठमाती मिळू शकलेली नाही, ही वास्तविकता आहे.
शिक्षणाचा प्रसार जर तळागाळापर्यंत झाला तरच क्रांती होईल असं तर विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शुद्र खचले. शंभर वर्षापूर्वीची हिच स्थिती आजही आहे. माणसाच्या समुद्रात आज माणुसकीच हरवली आहे. सामाजिक आणि आर्थिक विषमता याचं आजही पूर्णपणे उच्चाटन झालेले नाही. बंधुभाव फक्त ओठातच आहे. अशी स्थिती पाहिल्यावर महात्मा फुल्यांसारखी माणसं का बरं अस्वस्थ होणार नाहीत? आज जर महात्मा फुले आपल्यात असते तर त्यांनी आपल्या परखड विचारांच्या पवित्र्यांनी द्वेष, भ्रष्टाचार, अन्याय, दरिद्रय यांचा अंधःकार दूर करायचा नक्कीच प्रयत्न केला असता.
ज्योतिबांने शाळेतला अभ्यासक्रम पूर्ण करतांनाच १८४७ पर्यंत ज्योतिबा बुध्दिने चांगले प्रौढ झाले होते. त्यांनी समाजाचे बारकाईने निरीक्षण केले. त्यातून त्यांच्या असे लक्षात आले की, आपला हिंदु समाज जातीभेदाने आणि विशिष्ट वर्गाच्या गुलामगिरीत राहिल्याने प्रतिगामी बनला आहे. स्त्रिया आणि शुद्रांची कुचंबणा होत आहे. हे सर्व स्त्रिया आणि बहुजन समाज शिक्षणापासुन दुर राहिल्यामुळे घडत आहे, असे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यावरुन त्यांनी भावी जीवनातील कार्याची दिशा ठरविली. ते सरकारी नोकरीच्या मागे न लागता समाजकार्य करायचे ठरवून कामाला लागले. सामाजिक गुलामगीरी दूर करणे आणि सर्वांना शिक्षणाची दारे खुली करणे त्यासाठी प्रयत्नशील राहणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय ठरले.
हे कार्य तत्कालीन रुढीप्रिय समाजाला रुचले नाही. मुलींची शाळा काढण्यासाठी पूर्वतयारी म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला प्रथम शिक्षण दिले. सावित्रीबाईंनीही आपल्या पतीच्या जीवन कार्याला मनापासून सहाय्य केले. १८४८ मध्ये पहिली १८५१ मध्ये दुसरी आणि १८५२ मध्ये तिसरी मुलींची शाळा काढली. या शाळा व्यवस्थित चालू लागल्या. मेजर कँडी यांनी सरकारतर्फे ७५ रुपये अनुदान मंजुर केले. फुले यांच्या या महान सामाजिक कार्याचा गौरव म्हणुन त्यांचा सत्कारही करण्यात आला. यानंतर व्यक्ति स्वातंत्र्य, समता आणि बुध्दि प्रामाण्य यासाठी ते झगडू लागले. सतीची प्रथा, विधवा पूर्नाविवाह, भ्रूणहत्या या समाजविघातक गोष्टींना त्यांनी विरोध करुन ‘बालहत्या प्रतिबंधगृह' ही संस्था सुरु केली. समाजस्पृश्य-अस्पृश्य असा भेदाभेद पाळणाऱ्याचा रोष पत्करुन त्यांनी आपल्या घरी असलेला पाण्याच्या हौद सर्वांना म्हणजे अस्पृश्यांनाही खुला केला.
शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हे लक्षात येताच अस्पृश्यासाठी, स्त्रियांसाठी त्यांनी शाळा उघडल्या, अनाथाश्रम काढले, वृत्तपत्र काढले. धर्म जन्माने न मिळता माणसाच्या स्वतःच्या बुध्दीने स्विकारला पाहिजे. शेतकऱ्यांच्या व्यथा इंग्रज प्रशासनाच्या कानी पोहोचविल्या. शेतकरी हा समाजाचा कणा आहे. पोशिंदा अन्नदाता आहे, असे मत मांडून जगजागृती केली. त्यांच्या साठाव्या वर्षी जनतेने मुंबईस त्यांचा सत्कार करुन त्यांना ‘महात्मा' ही पदवी बहाल केली. सामाजिक समता, आर्थिेक न्याय व शोषणमुक्ती यासाठी ज्योतिबाने अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. ज्योतिबांच्या कृतीमुळे, कर्तृत्वामुळे या समाजाची नवी पहाट उदयास आली. सावित्रीमाई भारतातील आद्य कांतीकारी थोर स्त्री होती. ज्योतिबांना सावित्रीमाईची सक्रीय साथ लाभली. सुधारकाग्रणी, संपूर्ण महाराष्टाचे भुषण, सुधारकांचे सुधारक त्यांच्या विचारांनी आणि धाडसी वृत्तीने कृत्तीने समाजाला जागे केले. काळाच्या खूप पुढे जाण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. हीन-दीन-जीवांना एकोणिसाव्या शतकात त्यांनी आपल्या विशिष्ट ध्येयासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.
मानवी सामाजिक सुधारणेचे, परिस्थितीचे अवलोकन केले आणि प्रकाशमय मानवी स्वातंत्र्याच्या दिव्य युगाकडे सामाजिक माणसाच्या नवयुगाची ग्वाही देणारा आधुनिक भारतातील पहिला समाजक्रांतीकारक क्रांतिबा ज्योतिराव फुले नावाचा धगधगता लाव्हा तयार झाला. कारण देशात जातीभेदाची सुनामी ऊफाळुन आली होती. त्यामुळे कोणी शुद्र नदीकाठावर वस्त्रधुत असता तेथे एखादा भट आला तर शुद्रास आपली सर्व वस्त्रे गोळा करुन भटाच्या अंगावर शिंतोडा येण्याचा संभव नाही, अशा स्थळी जाऊन वस्त्रे धुवावी लागत. भटाच्या अंगावर नकळत पाण्याचा शिंतोडा उडालाच तर भटाने रागाने अग्नीसारखे तप्त होऊन आपल्या जवळचे जड भांडे शुद्रांच्या डोक्यावर मारावे, ब्राम्हणावर तर सावलीसुध्दा पडू नये याची पूर्णपणे खबरदारी शुद्राने वस्तीतून वाट असेल त्या वाटेवरुन जाण्यास सुध्दा धोका पत्करु नये असा कायदा, अशा कायद्याचे राज्य होते. त्यामुळे राज्यात अनेक छळवाद होते. पुरुषप्रधान व्यवस्थांच्या रणधुमाळीविषयी फुले म्हणतात की, स्त्री ही जात अबला असल्यामुळे तिच्यापूढे लोभी व धाडसी पुरुषांनी स्वतःचेच म्हणणे खरे केले आणि स्त्रीयांना मानवी हक्क समजू नयेत म्हणून पूर्ण अंधारात ठेवले. ज्योतिरावांना सावित्रीमाईंची भक्कम साथ मिळाल्यानंतर त्यांनी विचार केला की, हे आता शुद्र अतिशुद्रांचा छळवाद बदलला पाहिजे. त्यावेळेपासून स्त्री चळवळीचा जन्म झाला.
महात्मा फुले आज जरी आमच्यात नाहीत; परंतु कर्तृत्वाच्या रुपाने ते निश्चितच आमच्यांत आहेत. कारण जे दुस-यांसाठी मरतात, तेच खऱ्या अर्थानं जगतात आणि आपल्या कार्यकर्तृत्वाच्या रुपानं अमर असतात, म्हणजेच आपल्यातच असतात. आता हे जर खंर असेल तर महात्मा फुलेदेखील कार्यरुपानं आपल्यातच आहेत. मला तर वाटतं, या विषयाच्या निमित्तानं ज्ञानज्योतीचं चरित्र आणि चारित्र्याचा आचार, विचार आणि उच्चाराचा जवळून परिचय व्हावा आणि आपण त्यांचे कार्य जोमानं, जिद्दीनं आणि निष्ठेनं करावं असंच बहुधा बहुतेकांना अपेक्षित असावं.
ज्ञानज्योत प्रज्वलित केलेल्या ज्योतिबांना सामाजिक समता, मानवता, विवेक, विनय आणि नम्रता यावर प्रकाश टाकुन राष्ट्राला स्वायत्ततेच ध्येय गाठण्यासाठी गतिमान बनवायचं होतं. समाजजागरणाचा वसा घेतलेले स्त्रीशिक्षण आणि स्त्रीशक्ति जागृतीचा मंत्र निनादात ठेवणारे, आणि अस्पृश्यांबद्दल कणव आणि बंधुता बाळगणारे ज्योतिबा आज असते तर? खरंच काय बरं वाटलं असतं त्यांना? आजही समाजात समता आणि बंधुता पूर्णपणे उतरु शकली नाही हे पाहून ते नक्कीच अस्वस्थ झाले असते. जयंती आणि पुण्यतिथी या दोन दिवशी आपली आठवण ठेवणारे, याच दिवशी आपल्या पुतळ्याला हार घालून खोटी पूजा करुन अवडंबर माजवणारे तथाकथित कार्यकर्ते आणि पुढारी पाहून त्यांना नक्कीच चीड आली असती.
फुले आणि आंबेडकरांचे हे अतूट नाते ध्यानात घेतले की, दोघांच्याही वैचारिक त्याचप्रमाणे व्यावहारिक जीवनावरही नवाच प्रकाश पडतो. दोघांचे चरित्र आणि कतृत्व शेजारी शेजारी ठेवले. तर दोन्ही समजायला निःसंशय मदत होते. ६३ वर्षे चंदनासारखे झिजले. प्रवास केला, व्याख्याने दिली, लेख लिहिले. स्वातंत्र्य, समता, लोकशाही, विज्ञान, इहवाद या आधुनिक मुल्यांवर भर देऊन सामाजिक क्रांतीची प्रेरणा दिली. डॉ. आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले. सहज, सोप्या भाषेत नेमकी स्पष्टता आणणे त्यांना जमत असे. विचारांना कृतिशीलतेची जोड दिली. "जैसे बोलावे, तैसे चालावे, मग महंतलीला स्वभावे, अंगी बाणे” या समर्थवचनाची सार्थकता सिध्द करणारा हा महात्मा! ‘सर्व सुखाचे आगर नीतितत्त्वांचे माहेर' अशा हया महात्म्याचे अविरत कष्टाने २८ नोव्हेंबर १८९० मध्ये अनंतात विलीन झाले, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! - प्रविण बागडे