ही रामनाम नौका भवसागरी तराया

ह्या भवसागरातून सुखरूप तरून जाणे म्हणजे त्यात बुडून न जाता, जन्म-मरणाच्या चक्रात न अडकता पैलतीरी म्हणजे आपल्या स्वरूपात जाऊन मिळणे. मुक्त होणे. त्यासाठी रामनाम नौका हेच साधन आहे.

धरा श्रीवरा त्या हरा अंतराते।
तरा दुस्तरा त्या परा सागराते।
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते।
करा नीकरा त्या खरा मछराते । श्रीराम ८०।

श्रीसमर्थ सांगत आहेत की संसाराची चिंता करू नका. भगवंताचे चिंतन करा. देवांचा देव त्या महादेवानेही ज्या लक्ष्मीपती श्रीविष्णूला ह्रदयात घरून ठेवले आहे त्या भगवंताला तुम्हीही ह्रदयात धरुन ठेवा. श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीविष्णू हे एकच तत्त्व आहे. कोणत्याही नावाने त्याचे नित्य स्मरण करावे. ते पावन नामअंतःकरणात धरुन ठेवावे. तरच हा दुस्तर भवसागर - संसारसागर तरून जाणे शक्य आहे. ह्या भवसागरातून सुखरूप तरून जाणे म्हणजे त्यात बुडून न जाता, जन्म-मरणाच्या चक्रात न अडकता पैलतीरी म्हणजे आपल्या स्वरूपात जाऊन मिळणे. मुक्त होणे. त्यासाठी ”रामनामनौका” हेच साधन आहे.

भवसागराच्या ऐलतीरावरून पैलतीरी जाणे हे काही व्यवहारातील प्रवासासारखे एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी जाणे असे नाही. तर जिथे, जसे आहोत तिथूनच त्या संसाराकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे. तो खरा नाहीच, केवळ भ्रम आहे असे जाणून ज्ञानदृष्टीने तो भ्रम नाहीसा करणे हेच तरून जाणे आहे. भ्रम नाहीसा झाला की त्याच्याशी जोडून आलेले भय, चिंता इ. आपोआप नाहीसे होतात. तत्वज्ञानातील रज्जू सर्पाचे प्रसिद्ध उदाहरण इथे पाहता येईल. एखादी दोरी पडलेली असते. अंधारात आपल्याला वाटते की साप आहे. त्या सापाची भीतीवाटते. तो दंश करेल का, डसला तर काय करावे, त्याला कसे घालवून द्यावे, पकडावे की मारावे इ.चिंता निर्माण होतात. परंतु ही समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्षात त्या काल्पनिक (पण तेव्हा खरा भासणारा) सापाला काहीही करायचे नसते. फक्त अंधारावर उपाय करायचा असतो. उजेडाची योजना करायची असते. दिवा लावला की अंधार आपोआप जातो. तो काही वेगळा बाहेर काढावा लागत नाही. उजेड पडला की सापाचा भ्रम नाहीसा होतो. मूळ रूप जे दोरी आहे तेच स्पष्टपणे दिसते. चिंता, भय सहजच नाहीसे होते. आपल्या अज्ञानाच्या अंधारामुळे मूळ निराकार परब्रह्म स्वरूपावर साकार सृष्टीचा भास होतो. अखंड एकमेव ब्रह्मस्वरूप न दिसता भेदात विभागलेले जग दिसते. भेदामुळे द्वैत निर्माण होते. द्वैतातून अहंता, क्रोध, द्वेष, राग इ. उत्पन्न होतात. भेदामुळे अपूर्णता भासते. ती पूर्ण करण्यासाठी चिंता वाटू लागते. महद्‌भाग्याने मिळालेला नरदेह आपण भ्रमरूप संसाराची पूर्तता करण्याच्या प्रयत्नात अक्षरशः वाया घालवतो. संसाराची व्यावहारिक सत्ता आहेच. ती नाकारून चालणार नाही.

 आपला देह आहे. त्याचे भरण-पोषण करणे आहे. आप्त-स्वकीय आहेत. त्यांचे नातेसंबंध सांभाळणे आहे. मोक्ष जरी मानवाचे अंतिम साध्य असले तरी धर्म, अर्थ, काम हे तिन्ही पुरुषार्थ करणे आहे. वर्णाश्रमाची कर्तव्ये आहेत. हे सर्व जरी व्यावहारिकदृष्ट्या आवश्यक असले तरीही त्यात जीवनाचा किती काळ घालवायचा हे ठरवणे आपल्या हातात आहे. समर्थ म्हणतात, पोट भरण्याचा विचार जरा तरी बाजूला सारून ते भरण्यासाठी ज्याने अन्न निर्माण केले आहे. त्याचा थोडा तरी विचार करावा. ”प्रपंच सुखे करावा। परी काही परमार्थ वाढवावा। परमार्थ अवघाचि बुडवावा। हे विहित नव्हे” । श्रीराम । (दा.बो.५-३-१०३) ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, "सायास करिसी प्रपंच दिननिशी। हरिसी न भजसी कवण्यागुणेे”(हरिपाठ ४-३) केवळ पोट भरण्यासाठी जगणे हे पशुवत्‌ जीणे झाले आणि हे पोट तर दुर्भर आहे. त्याला दर काही तासांनी भरत रहावे लागते. आता आपण जे अन्न ग्रहण करतो त्यातले भुकेसाठी किती आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किती, याचा माणसाने प्रामाणिक विचार करावा. पोट भरणे हा जसा संसाराचा एक पैलू आहे तसाच नातेसंबंध हाही एक पैलू आहे. आपल्या भोवतालच्या लोकांकडे आपण वेगवेगळया नात्यांच्या दृष्टीने पाहतो. त्यात कोणी आपले वाटतात तर कोणी परके वाटतात.कोणाविषयी प्रेम वाटते, कोणाचा मत्सर वाटतो, कोणाचा क्रोध येतो. हे सगळे विकार एका अहंतेमुळे येतात."मी”, "माझे” ह्या ममता, आसक्तीतून येतात. कोणत्याही करणाने अहंता दुखावली की क्रोध येतो. द्वेष उत्पन्न होतो. या द्वेष-मत्सराला समर्थ ‘खर' म्हणजे ‘गाढव' म्हणतात. अविचाराने कसेही वागणे याला गाढवपणा म्हणतात.

पूजनीय बाबा बेलसरे म्हणतात, "द्वेषामुळे माणसाचे समाधान नष्ट होते. द्वेष हा स्वानंदाचा प्रधान शत्रु समजावा. स्वानंद जितका आल्हाददायक आहे तितकाच द्वेष दाहक आहे. द्वेषाचे समूळ उच्चाटन केल्याशिवाय कोणासही भगवंताचे सान्निध्य लाभणे शक्य नाही”. द्वेष किंवा मत्सर म्हणजे दुसऱ्याचे बरे न पाहणे. स्वतःला मिळो न मिळो याचे सुख-दुःख वाटणे ठीक आहे, पण दुसऱ्याचे सुख पाहून त्रास होणे किंवा दुःख पाहून बरे वाटणे हे माणसाला शोभणारे नाही. म्हणूनच समर्थांनी मत्सराला गाढवाची उपमा दिली आहे आणि निकराचे प्रयत्न करून, हट्टाने झगडून त्याचा नाश करावा असे म्हटले आहे. कारण आपले समाधान टिकवायचे असेल तर द्वेष-मत्सरापासून मुक्त व्हायलाच हवे. मनातील द्वेष संपूर्णपणे काढून टाकायचा असेल तर तिथे दृढपणे भगवंताची स्थापना करायला हवी. त्यासाठी सातत्याने त्याचे स्मरण करायला हवे. म्हणजे द्वेषच नव्हे तर इतर सर्व विकारही नाश पावतील. मग संसाराकडे भगवंताचे रूप म्हणून पाहता येईल. सर्वत्र भगवंताचे दर्शन होऊ लागले की भ्रमरूप संसार जिथल्या तिथे नाहीसा होईल. यालाच भवसागर तरून जाणे म्हणतात. माऊली म्हणतात, "ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे। तुटेल धरणे प्रपंचाचे” (ह.पा.४-४) भगवंताचे नाम अंतःकरणात दृढ धरल्यानेच अंतःकरण शुद्ध होते,विकारांचे उच्चाटन होते, शुद्ध अंतःकरणात भगवंताचा साक्षात्कार होतो आणि प्रपंचाचे बंधन तुटून जाते. मनुष्य सुखरूपपणे पैलतीरी पोचतो.
जय जय रघुवीर समर्थ
-सौ.आसावरी भोईर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कम्फर्ट झोन