"वेळेचे एक एक मिनिटाचे नियोजन महत्वाचे!”

आकाशवाणी मुंबई केंद्रात वृत्तनिवेदिका म्हणून कार्यरत असलेल्या निवेदिका, लेखिका, कथाकार, अभिवाचक म्हणून लौकीकप्राप्त  व गृहिणीसह पर्यटक व बागकामातही छंदीष्ट म्हणून आघाडीवर असलेल्या श्रध्दा वझे यांच्यातील हे साहित्यिक व व्यक्ती म्हणून असलेले गुण थक्क करणारे आहेत. सौंदर्य स्पर्धेत त्या दोन वेळा उपविजेता ठरल्या आहेत. या साऱ्या गोष्टी त्यांनी कशा जुळवून आणल्या, यशाच्या पायऱ्या चढताना वेळेचे नियोजन कसे   ले...अशा प्रश्नांची त्यांनी दिलेली उत्तरे सुध्दा अशा क्षेत्रात पुढे जाणऱ्यांसाठी प्रेरक ठरावीत. दैनिक ‘आपलं नवे शहर'साठी उपसंपादक राजेंद्र घरत यांनी घेतलेल्या मुलाखतीतून  श्रध्दा वझे यांनी आणखीही काही बाबी स्पष्ट केल्या. त्याचबरोबर महिलांनी, मुलींनी सातत्याने स्वतःचा शोध घ्यायची भूमिका अंगिकारली पाहिजे. यामुळे आपल्यातील कलावंत शोधण्यासाठी मदत होते आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर स्वतःला सिध्द केल्यास आयुष्य नव्यानेच सुरु झाल्याचा आनंद होतो, तो मोठा असतो; असे त्यांनी सांगितले.

निवेदनासारख्या क्षेत्राकडे कशा वळलात? निवेदन ही कला आहे, ती आपल्यात आहे, याची जाणीव कशी झाली?
शालेय जीवनापासून वाचन, लेखन, संभाषण यात पुढे होते. शुध्द भाषा, उच्चार चांगले व स्पष्ट अशा गोष्टींमुळे शाळेत भाषण करणे तसेच  वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत असे. त्यामुळे भाषण आणि वक्तृत्व स्पर्धा असली की शिक्षक माझे नाव पुढे करीत असत. विविध ठिकाणी व शाळांच्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला. यातून आत्मविश्वास बळावला व सूत्रसंचालन, निवेदिका, कथाकथन सादर करणे अशा विषयाकडे वळत गेले.

सूत्रसंचालन, निवेदन या साऱ्याला व्यावसायिक स्वरुप कसे आले? काही प्रशिक्षण कोर्स वगैरे?
शालेय जीवन ते पुढील शिक्षण काळात वक्तृत्वाशी संबंधीत सूत्रसंचालन, निवेदन, कथा सादरीकरण असे सारे साहित्यविषयक घडल्याने खूप चांगले वाटू लागले, आत्मविश्वास बळावला. दरम्यान, अशा प्रकारचे कार्यक्रम पाहणे, ऐकणे झाले. सुधीर गाडगीळ यांचीही भेट झाली होती. तसेच या संबंधीचा एक कोर्सही केला. या साऱ्याचा फायदाच झाला.

निवेदन, सादरीकरण यासाठी आवाज चांगला राहणे आवश्यकच आहे. त्यासाठी काय करता?
गाण्यासाठी जसा नियमित रियाज करावा लागतो, तसेच आवाजासाठी रोजच्या रोज व्यायाम असतात. आवाजाचे चढ-उतार असतात, त्यामुळे तो आणखी चांगला होण्यासाठी आवाजाचे व्यायाम करावे लागतात. तसेच सुगम सांगीताची आवड होती, त्यासंबंधीचे प्रशिक्षण घेतले. त्याचा फायदा निवेदनासाठी होत आला आहे.

कथा अभिवाचनाकडे कशा वळलात?
साहित्य प्रवासात आपल्या राज्यातील दोन ठिकाणी कथा सादरीकरण स्पर्धांमध्ये भाग घेतला होता, त्यात कथा, कविता असे साहित्य प्रकार सादर करण्याची संधी मिळाली. पुढे यातूनच कथा सादरीकरणाची रुची वाढली व ते सादरीकरण होऊ लागले.

साहित्य विषयक विविध कार्यक्रम सादर करताना मनाला चटका लावणारे, अविस्मरणीय असे काही प्रसंग?
होय आहेत काही. त्यापैकीच पुण्यात अमृता प्रितम यांच्या ‘माहेर' या कवितेचे सादरीकरण प्रेक्षकांना आवडले भावले. कार्यक्रमानंतर एक तरुण आला, त्याने या सादरीकरणाचे कौतुुक केलेच, मात्र आई आणि वडील यांच्या नात्यातील कवितेचे शब्द आणि सादरीकरणाने तो इतका भारावून गेला की त्याच्या डोळ्यातून अश्रू आले...  दुसरा प्रसंगही असाच. एका व्यक्तीच्या मुलीचे लग्न होणार होते. मुलगी सासरी जाणार.. त्यावेळी जे दु;ख असेल ते त्या व्यक्तीला ही कविता ऐकून आताच अस्वस्थ करणारे ठरले, हे त्याने सांगितले. असे अनुभव अविस्मरणीय आहेत.

मराठी भाषक साहित्यिक असताना तुम्ही अमृता प्रितम या पंजाबी भाषिक साहित्यिकेचे अभिवाचन का निवडले?
‘काव्य रसिक मंडळ, डोंबिवली' आयोजित कार्यक्रमात मला ‘अमृता प्रितम जन्मशताब्दि' निमित्त दहा मिनिटांसाठी ववता म्हणून बोलावले होते. त्यावेळी मी केलेले वक्तृत्व लोकांच्या पसंतीस उतरले. आणखी बोलावे असे श्रोत्यांनाही वाटत होते, मात्र वेळेची मर्यादा होती. त्यामुळे मग अमृता प्रितम यांच्या साहित्यावर पूर्ण लांबीचा कार्यक्रम करण्याचा विचार पुढे आला आणि तो अभिवाचनाचा कार्यक्रम सुरु केला. आता त्या अभिवाचनाचे ६० हून अधिक प्रयोग होऊन अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरु आहे.

वृत्तनिवेदिका, साहित्यिका, छंदीष्ट, सौंदर्य स्पर्धा, कौटुंबिक जबाबदारी.. हे सारे करताना वेळेचे नियोजन कसे करता?
आई शिक्षिका होती. परिणामी घरात शिस्तीचे वातावरण होते. त्यामुळे वेळ पाळणे हे आलेच. त्यात आपले कार्यक्षेत्र पाहता वेळेचे नियोजन ही आत्यंतिक गरज. त्यानुसार नियोजन केले जायचे आणि आताही करते. आकाशवाणीमध्ये बातम्या देण्याचे (वृत्तनिवेदिका म्हणून) काम करताना एक-एक मिनीट महत्वाचा. त्यामुळे वेळेत पोचणे अपरिहार्य. तशा सूचना कार्यालयाकडून असतातच. त्यामुळे एक एक मिनिटाच्या वेळेचे नियोजन महत्वाचे व ते जमवावे लागले आणि लागतेच. त्यामुळे विविध जबाबदाऱ्या पार पाडणे शवय होते.

या कालावधीत सन्मानाचा योग?  
होय. विविध संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झाले. त्यापैकी कल्याण डोंबिवली महापालिकाच्या वतीने देण्यात आलेला महापौर पुरस्कार प्रेरणादायी ठरला.

आतापर्यंत साहित्य लेखन, कथाकथन केलेत, ते पुस्तकरुपात करण्याचे ठरले आहे का?
होय. माझे साहित्य लेखन पुस्तक रुपात करण्याचा संकल्प आहे. लवकरच ते होईल, असा  विश्वास आहे. विशेष म्हणजे पुस्तकरुपाने साहित्य प्रसिध्द करावे असे मला प्रारंभी वाटले नव्हते, मात्र काही  मैत्रिणी हितचिंतक आणि साहित्यप्रेमींनी तसा आग्रह केल्याने हे पुस्तकरुपाने साहित्य वाचकांना मिळेल, याचा आनंद वााटतो.

 सद्यस्थितीत महिला, मुलींना ही विविध क्षेत्रात संधी निर्माण झाली आहे. अशावेळी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल?
आता महिलांना नोकरी उद्योग-व्यवसाय, साहित्य-कला अशा स्वरुपाची विविध क्षेत्रे खुली आहेत. त्यात करिअर करण्याची आणि पैसा, प्रसिध्दी मिळेल अशी संधी आहे. मीही सौंदर्य स्पर्धेत दोन वेळा उपविजेती ठरली. मात्र जिद्द कायम ठेवली. महिलांनी, मुलींनी सातत्याने स्वतःचा शोध घ्यायची भूमिका अंगिकारली पाहिजे. यामुळे आपल्यातील कलावंत शोधण्यासाठी मदत होते आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर स्वतःला सिध्द केल्यास आयुष्य नव्यानेच सुरु झाल्याचा आनंद मोठा असतो.

- शब्दांकन : रामनाथ चौलकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

ही रामनाम नौका भवसागरी तराया