इतिहास मिटवणे सोपे..पण  घडवणे मात्र अवघड!

देशात किंवा महाराष्ट्रात शत्रूंच्या कबरी म्हणजे आमच्या पूर्वज राजांच्या शौर्याच्या निशाण्या आहेत. त्या सांगतात ‘यांचा नाद करायचा नाय, नाद कराल तर असेच गाडले जाल!' हा भविष्याचा संदेश आहे. पण, हा संदेश देणार कोणाला? नाकच चोंदलेले फुलाचा वास कसा घेणार?

गत कांही दिवसापासून राज्यासह देशभरात औरंगजेबाच्या कबरीवरुन व त्याच्या अत्याचारयुवत कारभारावरुन गदारोळ उठला आहे. त्याची सुरुवात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटापासून झाली, पहिली ठिणगी समाजवादी पार्टीच्या नेत्याने पाडली व त्यातून जी आग लागली ती महाराष्ट्रापासून देशभरात पसरली, ती आता थांबण्याचे नाव घेत नाही.

राजकीय नेत्यांबरोबरच, काही ठराविक चॅनेल्सनी आगीत तेल ओतण्याचे काम केल्याचे दिसून येते, ही मंडळी भडकाऊ भाषणे देतात, मिडियावाले त्यात आपल्या पदरचा माल-मसाला घालतात आणि तथाकथित भवतापर्यंत म्हणण्यापेक्षा अविचारी अंध भक्तांपर्यंत पोहचवतात, मग अंध भवत ‘आव देखा ना ताव' आपला राग समोरच्या लोकांवर काढतात, मग क्रियेची-प्रतिक्रिया उमटायला वेळ लागत नाही. नागपूरच्या दंगलीने हेच दाखवून दिले आहे.

पूर्वीच्या शिक्षणात विद्यार्थ्यांना विविध विषयाचे ज्ञान व आकलन व्हावे म्हणून विविध विषय शिकवले जात होते, त्यात इंग्रजी, मराठी, हिंदी विषयासह इतिहास-भूगोल, गणित व विज्ञान-विज्ञानातही तीन प्रकारच्या भागाचा समावेश असे, भूगोलातून वातावरणासह विविध भागातील माहिती उपलब्ध करुन दिली जात असे, तर इतिहासातून विविध राज्यांच्या कारकिर्दीची माहिती दिली जात असे, तसा इतिहास म्हणजे ‘थडगी उकरणे' असेच म्हणावे लागेल, पण त्यातूनही शिकण्यासारखे बरेच काही आहे. इतिहासामुळे व पूराणामुळे आपल्याला पुर्वजांची ओळख मिळाली. त्यांच्या परक्रमाची, नितीमत्तेची, त्यांच्या चांगल्या वाईट वर्तनाची माहिती झाली. त्यांच्या प्रसंगानुरुप संकटाना सामोरे जाण्याची कला माहित झाली व त्यातून आपण काही बोध घ्यावा असे अपेक्षित असतांना आपण नेमके तेच विसरत चाललो आहोत, इतिहासाचा अर्थ चुकीच्या पध्दतीने घेत आहोत.

आज जग चंद्रावर मंगळावर जाण्यासाठी धडपडत असतांना आपण साडेतीनशे-चारशे वर्षापूर्वीची थडगी उकरुन आपापसात तेढ निर्माण करत आहोत. ज्या औरंगजेबाच्या गोष्टी करत आहोत. त्याला आपल्या शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीत गाडले, त्याचा दक्षिणेकडे जाण्याचा मनसूबा हाणून पाडला, त्याच्या अन्यायी सरदारांना व शिपायांना महाराष्ट्राच्या मातीत विलिन केले.

प्रत्येक गोष्टीत, कथेत-चित्रपटात नायक व खलनायक असतात, त्याचप्रमाणे इतिहासाचेही आहे. जर खलनायकच नसेल तर नायकाचे कामच उरणार नाही; रामायणात रावणच नसता तर रामायण घडलेच नसते व रामाला महत्त्व आलेच नसते, महाभारतात कंस किंवा कौरव नसते तर महाभारत अस्तीत्वाच आले नसते. कृष्णाची किमया किंवा धर्म राजाचा धर्माचरणपणा कोणाला कसा कळला असता?

महाराष्ट्रापूरते बोलायचे झाल्यास, मोगलाईच्या क्रूरकर्माचा शिरकाव महाराष्ट्रात झाला नसता तर महाराष्ट्रात शिवरायाचा जन्म वाया गेला असता. माता जिजाऊंनी अन्यायाविरुध्द लढण्याची शिकवण शिवरायांना दिली व शिवराय पेटून उठले व त्यांनी आतल्या व बाहेरच्या शत्रूंची नांगी मोडली. शिवरायांनी रयतेच्या हितासाठी जे त्यांना शक्य होते, ते त्यांनी केले. जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद न करता सर्वांना एकत्र घेऊन राज्य कारभार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्यांनी ज्यांनी त्यांच्याशी गद्दारी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्याची योग्य शिक्षा देण्यातही गय केली नाही.

खरं तर या देशात परकियांना बोलवण्याच पातक या देशातील लोकांनीच केलं. त्यामागे स्वार्थ, मतलब व गर्व व महाराजा बनण्याची लालसा हेच कारण होते. त्या काळात छोटी-छोटी राज्ये होती व त्यांचा एक एक राजा होता. पण, प्रत्येकात आपला वकूब होता, पण काही राज्यांना आपल्या राज्याच्या सिमा वाढवून राज्य मोठे करण्याची मनशा स्वस्थ बसू देत नसे मग एक-दुसऱ्यांवर हल्ला करुन त्यांची राज्य खालसा करुन स्वतःच्या राज्याच्या विस्तारासह जास्त महसूल गोळा करुन स्वतःचा दबदबा निर्माण करण्यात त्यांना धन्यता वाटत असे, पण, एखादा राजा जुमानत नसल्यास हे कमकुवत राजे, परकियांच्या मदतीने आपल्याच भाऊ बंदाचा काटा काढत असत, यातूनच ‘तुला ना मला - घाल कुत्र्याला' या वाकप्रचाराचा उदय झाला.

त्या काळात धर्मा-धर्मात सौहार्दाचे वातावरण होते असे म्हणतात. पण राजघराणे-घराण्यात वैरभाव नवकीच होता. प्रत्येक राजाकडे विविध धर्माचे लोक कामं करीत असत. शिपायातही सर्व जाती-धर्मातील ताकदवान व लढावू प्रवृत्तीचीच मुले सैनिकी पेशा पत्करीत असत. मात्र राजाप्रती निष्ठा जपली जायची.

शिवरायाच्या अष्ठप्रधान मंडळात ही विविध जाती धर्मातील गुणवंत मंडळी होती, सैन्यातही अठरापगड जातीचा समावेश होता त्यापैकी अनेक महत्त्वाच्या पदावर मुसलमानही कार्यरत होते असा इतिहास सांगतो. शिवाजी महाराजांना प्रतापगडावर वाचवणारा ‘जिवा' कोण होता? ज्याने महाराजावरील वार आपल्या बाहूवर झेलला. अफझलखानाच्या वधानंतर, शिवबांनी रायगडावर जल्लोष साजरा करुन जिवाला आनंदाने मिठी मारुन सर्वांना त्याची मर्दूमकी सांगतांना सांगितले की, ‘नसता जीवा तर नसता शिवा'
त्याचप्रमाणे शिवरायांच्या कारकिर्दीत राज्यातील सर्व धर्म समभावाबरोबरच महिलांचाही आदर व मान राखण्याची खबरदारी घेण्याचे बंधन प्रत्येकाला होते, महिलांचा अपमान कधीही सहन केला जात नसे, खुद्द महाराजांनी सुरत लुटीतील खजिन्यांसह आणलेल्या सरदाराच्या सुनेला त्यांनी मानाची वागणूक देऊन, खणा-नारळांनी ओटी भरुन तीला तिच्या घरी पाठवून दिले. तिचे वर्णन करताना महाराजांनी म्हटले ‘अशीच आमुची आई सुंदर असती आम्हीही असेच सुंदर झालो असतो.'

अशा कितीतरी गोष्टी शिवरायांच्या इतिहासातून शिकण्यासारख्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे शत्रूलाही मरणोत्तर मान सन्मान देण्याचे औदार्य फक्त सत्पुरुषातच असू शकते. ते काम महाराजांनी इमानेइतबारे केले, त्याचा पुरावा म्हणजे प्रतापगडाच्या मध्याशी बांधलेल्या अफझलखानाच्या कबरीचा देता येईल, महाराजांनी स्वखर्चाने शत्रूची कबर तर बांधलीच; पण तिच्या निगराणीचा खर्चही केला व भविष्यातील खर्चाची तरतूदही करुन ठेवली आहे.

पूर्वीचे आपले वाडवडील सांगायचे ‘जिवंत असे पर्यंत प्रेम, हेवा, दावा, दुष्मनी हे ठीक आहे, मेल्यानंतर कसले प्रेम? कसला हेवा? कसला दावा व कसली दुष्मनी' म्हणूनच आज आपण जेव्हा शोकसभेला जातो तेव्हा प्रत्येक वक्ता मयत व्यक्तीचे गुणगान गाताना दिसतो. मग प्रश्न पडतो की, खरोखरच ती व्यक्ती तेवढी गुणवान होती? शेकडो अवगुण असलेल्या व्यवतीचेही मरणोत्तर गुणगानच केले जाते. तशी प्रथाच पडलेली आहे.

नाशिक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्यात आले आहे, त्याच्या उद्‌घाटन प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगाबाद जवळील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर उखडून टाकणार, त्या क्रूरकर्म्याचे अवशेष महाराष्ट्रातून बाहेर फेकणार... एवढं ऐकताच महाराष्ट्रातील तथाकथित शिवभवतांना प्रेमाचा उबाळा आला, त्यांनी औरंगजेबाच्या प्रतिक पुतळ्याचे दहन करताना एका पिरावरील चादरीचा वापर केला, त्यावर कुराणातील आयातीचे लिखाण होते, त्या लिखाणासहीत चादर जाळण्यात आली; त्याचा राग मुस्लीमांना येणे साहजिकच आहे. त्यांच्यापैकी, काही आतंकी विचारकांनी दंगा सुरु केला, त्या दंग्याचे लोण नागपूरवरुन निघून महाराष्ट्रासह देशात पसरले आहे. देशी दारुच्या ढिगांवर विराजमान आहे. देशात मोठा भडका केव्हा उडेल सांगता येत नाही. त्यात देशाचे काय होईल हेही सांगता येत नाही.

सध्या देशात अर्धवटरावांची कमतरता नाही. इतिहासाचे ‘ई' माहित नसलेली मंडळी, इतिहासच नष्ट करायला निघाली आहेत, एकीकडे शिवरायाचे पाईक असल्याचा आव आणायचा आणि त्याच वेळी त्यांचे अस्तित्वच नष्ट करणारी कृती करायची. हा कसला ढोंगीपणा?

देशात किंवा महाराष्ट्रात शत्रूंच्या कबरी म्हणजे आमच्या पूर्वज राजांच्या शौर्याच्या निशाण्या आहेत. त्या सांगतात ‘यांचा नाद करायचा नाय, नाद कराल तर असेच गाडले जाल!' हा भविष्याचा संदेश आहे. पण, हा संदेश देणार कोणाला? नाकच चोंदलेले फुलाचा वारस कसा घेणार?

इतिहास मिटवायला बरीच मंडळी निघाली आहे त्यांना वाटते. यामुळे आमचं नाव होईल! पण बाबांनो तुम्हाला फवत नष्ट करता येते, बनवण्याची कुवत तुमच्यात नाही.
-भिमराव गांधले 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

श्रीरामांचे जीवनचरित्र प्रत्येकाने अभ्यासावे !