कोण म्हणतं आजची पिढी बेजबाबदार आहे ?
परीक्षा केंद्रात पाऊल टाकेपर्यंत, अगदी स्कूल बसमध्ये बसल्यावरही त्यांची अभ्यासाची उजळणी चालूच होती. तसे ते चौघेही हुशार आणि र्वगमित्रांच्या मदतीला धावून जाणारे असल्यामुळे सगळ्यांचे लाडके होते. ड्रायव्हर काकांची गाडी भरधाव धावत होती. अचानक स्कूल बसला हादरा बसला आणि सगळेच एकमेकांच्या अंगावर कोसळले. राकेश ओरडला, "काका प्लीज गाडी हळू घ्या ना जरा त्या आजींच्या जवळून गाडी गेली हो.”
ड्रायव्हर काका नेहमी चिडलेलेच असायचे. राकेशच्या सूचनेवर ते कावले, "अरे हळू घेऊन कसं चालेल ? परीक्षा आहे ना तुमची ? उशिर झाला तर मला मेमो मिळेल. पण मी म्हणतो ही म्हातारी माणसं घरी बसायचं सोडून बाहेर भटकतातच कशाला?”
"अहो पण काका.. ” राकेश काही बोलणार होता, तोच भरधाव धावणाऱ्या स्कूलबसच्या वेगाला घाबरून धक्का बसल्यामुळे एक आजोबा चक्कर येऊन खाली पडले. राकेश ओरडला, ”ड्रायव्हर काका गाडी थांबवा आजोबांना भोवळ आलीय, अहो ते पडलेत. प्लीज तुम्ही गाडी थांबवा.”
पण काकांनी गाडी थांबवलीच नाही उलट वेग वाढवत ते म्हणाले, "चुकी माझी नाही, तो म्हाताराच मधे आलाय. तोल सांवरता येत नाही तर कशाला बाहेर पडावं ह्या म्हाताऱड्यांनी? त्यांच्याकडे बघतील बाकीची माणसं, तुम्ही नका त्यांच्या मधे पडू. तुम्ही तुमच्या परीक्षेचे बघा. ती महत्त्वाची आहे, आणि तुम्हाला वेळेवर पोहोचवलं नाही तर तुमचे आईबाप आणि शाळेचे मुख्याध्यापक माझी हजेरी घेतील. तुमचंही वर्ष वाया जाऊन नुकसान होईल, ते काय हा म्हातारा भरून देणार आहे का ?”
वर्ष वाया जाईल या भीतीने बाकीची मुलही ओरडली, "राकेश बरोबर आहे ड्रायव्हर काकांचं. आपली परीक्षा महत्त्वाची आहे. पण काय रे ? तुझे कोण लागतात ते आजोबा ? तुला का एवढा पुळका आलाय त्यांचा ?”
राकेशनी पाह्यलं वर्ग मित्रांशी वाद घालण्याची ही वेळ नाही. आजोबा रस्त्याच्या कडेला एकटे पडले होते. जवळून वाहने वेगाने पळत होती. थांबायला कुणालाच वेळ नव्हता कारण माणसातली माणुसकीच नष्ट झाली होती. राकेश आणि त्याचे तिघं मित्र ओरडले, "ड्रायव्हर काका प्लीज गाडी थांबवा. आम्हाला उतरु द्या. असं म्हणून त्यांनी जबरदस्तीने स्कूल बस थांबायला लावली.
गाडीला रागारागाने कचकन ब्रेक दाबले गेले. ती चौकडी खाली उतरून आजोबांकडे वेगाने धावली. तितक्याच वेगाने बस मुलांना परीक्षेला वेळेवर पोहोचवण्यासाठी पुढे निघाली. टवाळखोर मित्र म्हणाले, "स्वतःला फार शहाणे समजतात हे चौघेजण. महत्वाची परीक्षा बोंबलली यांची. आता बसा घरच्यांचा मार खात.”
पण हे ऐकायला राकेश आणि त्याचे मित्र तिथे होतेच कुठे ! ते आजोबांजवळ पोहोचले. एकाने पाणी मारून आजोबांना सावध करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याने त्यांच्या खिशातून मोबाईल काढला. हे काय ? आजोबांना मानलं पाहिजे हं ! त्यांच्या खिशात छोटीशी डायरी, त्यात महत्वाचे नंबर आणि घरचा पत्तापण होता. पटकन मुलांनी फोन लावला, तोपर्यंत रिक्षा आली. रिक्षांत आजोबांना बसवून जवळच्या हॉस्पिटलचा पत्ता, राकेशनी मित्राला आजोबांच्या घरच्यांना कळवायला सांगितला.
पुढच्या घटना वेगाने घडल्या. घरचे आले. आजोबांना ॲडमिट केलं. डॉक्टर म्हणाले, "वेळेवर आणलंत तुम्ही. पेशंटला मेंदूला थोडा मुका मार, धक्का लागला आहे. उशीर झाला असता तर केस कोमात गेली असती, पण काही हरकत नाही?. आम्ही ताबडतोब उपचार सुरू करू. काळजी करण्याचं कारण नाही. आजोबा लवकर बरे होतील.”
हे ऐकल्यावर त्या चौघा मित्रांच्या चेहऱ्यावर सार्थकतेच हंसू ऊमटलं. आजोबांच्या मोठ्या मुलाला राकेश म्हणाला, "दादा आम्ही निघू का आता ? आमचा महत्त्वाचा पेपर आहे.”
दादा आश्चर्याने ओरडले, "अरे बापरे ! म्हणजे महत्त्वाची परीक्षा बुडवून तुम्ही माझ्या बाबांच्या मदतीला धावून आलात ? आमच्यामुळे तुमची वर्षभराची मेहनत वाया गेली. पण बाळांनो, हेही तितकच खरं की वयाने लहान असून तुम्ही मोठ्या माणसांसारखे भराभर निर्णय घ्ोऊन धावत पळत बाबांना ॲडमिट केलंत म्हणून तर पुढचं संकट टळल. तुमच्या उपकाराची परतफेड मी कशी करू?”
चौघंजणं एकदम म्हणाले, "नाही हो दादा, आमचं कर्तव्यच होतं ते.”
त्यावर मुलांची पाठ थोपटत दादा म्हणाले, "बरं मला एक सांगा, तुमची नावं काय ? शाळा कुठली? आणि हो मुख्याध्यापकांचे नाव काय ? दहावीचेच विद्यार्थी आहात ना तुम्ही ? कुठल्या तुकडीत आहात ?”
उत्तरं देताना, त्या चौकडीच्या ध्यानात आलं बाप रे! परीक्षेची वेळ संपत आलीय. कडक शिस्तीचे, नियमांचे काटेकोर, शिस्तप्रिय असलेले मुख्याध्यापक आपल्याला वर्गात काय परीक्षा केंद्रातही शिरू देणार नाहीत या भीतीने ते पळत सुटले. आता त्यांच्यापुढे संकट उभं राहीलं होतं, परीक्षकांना आणि घरच्यांना काय उत्तर द्यायचं ? परीक्षेतल्या प्रश्नापेक्षाही मोठा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. सगळेजण त्यांना मूर्ख, महत्त्वाच्या परीक्षेच्या बाबतीत बेजबाबदार आणि नसते उपदव्याप करणारे असेच लेबल लावणार होते. कारण परीक्षेची वेळ संपली होती. त्यांचा पेपर बुडाला आणि त्यांना परीक्षकांनी घरी पाठवलं होतं. चौघं जण हताश झाले. आजोबांना मदत करायला धावलो ते बरोबर की चूक हेच मुलांना कळेना.
राकेश म्हणाला "आता आपल्याला दोष देणारेच भेटतील. मित्रांनो त्यांच्याकडे लक्ष द्याल तर अजून निराश व्हाल. आपण वाईट काम तर केलं नाही ना, मग मन शांत ठेवून पुढच्या उद्याच्या पेपराचा विचार करूया. कालचा पेपर गमावल्याचं दुःख सोडून आपण आता पुढच्या पेपरात यश नक्की मिळऊया, कारण कालची गेलेली वेळ आता परत येणार नाही.”
...आणि मग दुसऱ्या दिवशी कसंबसं एकमेकांना सावरत ते परीक्षा केंद्राजवळ आले. आज जरा लवकरच आले होते ते. इतक्यात त्यांना सूचना मिळाली की मुख्याध्यापकांनी ऑफिसमध्ये बोलावलंय. चौघंही गांगरले. परीक्षेबद्दलच असणार, सरांना वाटलं असेल पोरांनी बाहेर उपदव्याप करून बेमुर्वतपणे पेपर टाळला आहे. पुढे रामायण काय महाभारत घडणार, ह्या भीतीने ती मुलं खालच्या मानेनी आत शिरली. मुख्याध्यापकांपुढे त्यांचं काहीही चालणार नव्हतं. कितीही कशीही आपली बाजू मांडली तरीही कुणी ऐकून घेणार नव्हतं.
इतक्यात मुलांच्या कानावर आवाज आला, "हो सर हीच ती मुलं. यांच्यामुळेच आमचे बाबा वाचले.”
चमकून चौघांच्या खालच्या माना वर झाल्या. अरेच्चा! हे तर कालच्या आजोबांचे चिरंजीव. हे कसे काय इथे ? मुख्याध्यापकांकडे मुलांनी घाबरून बघितलं ! तर अहो आश्चर्यंम! ते गालांतल्या गालांत हसत होते. नेहमीच्या करड्या नजरेत आता कौतुक होतं. मुख्याध्यापक म्हणाले, "घाबरू नका, तुम्ही उनाड आहात अशी तुमच्या हितशत्रूंनी माझ्याजवळ तक्रार केली होती. म्हणून मी तुमच्यावर नेहमी आग पाखडत होतो. पण माझ्या लक्षात आलं आहे, कान आणि डोळ्यांच्यामध्ये एक वितेचं अंतर असतं. तुम्हाला उनाड म्हणून पदवी मिळाली असली तरी तुमचा कालचा उपक्रम कौतुकास्पदच आहे. या आजोबांच्या चिरंजीवांनी सगळी हकीगत मला सांगितली. तुमच्यामुळे त्यांच्या बाबांवरचं मोठ्ठं संकट टळलं. अडचणीत असलेल्या आजोबांच्या मदतीला तुम्ही धावलात. खूप मोठी कामगिरी केलीत. डॉक्टरांनीपण तुमचं खूप कौतुक केलयं. उद्याचे आदर्श नागरिक आहात तुम्ही. असे कर्तव्यनिष्ठ विद्यार्थी माझ्या शाळेत आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटला.”
या कौतुकाने मुलं संकोचली पण त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची सावली उमटली, कालचा पेपर बुडाल्याचं दुःख होतं त्यांच्या मनात.
आता ते दादा पुढे झाले आणि म्हणाले, "बाळांनो परीक्षा फक्त शाळेतच द्यायची असते असं नाही, जसे तुम्ही वयाने मोठे व्हाल तशी अनुभवाची परीक्षाही तुम्हाला भावी आयुष्यात द्यावी लागेल. जगाच्या पाठशाळेतील पहिली परीक्षा माझ्या बाबांचा जीव वाचवून तुम्ही पार पाडलीत, पण तितकीच शालेय परीक्षाही महत्त्वाची आहे हे मी जाणतो पण आमच्यामुळे तुमचा कालचा महत्त्वाचा पेपर बुडला. मला खंत वाटली. तुमच्या महत्त्वाच्या वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून मी आज मुद्दाम तुमच्या मुख्याध्यापकांना कालची परिस्थिती निवेदन केली आहे, तुम्हाला पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी द्यावी अशी विनंती करायला मी आलो होतो, आणि मुख्य म्हणजे सरांनी ती मान्यही केली आहे.”
मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन सर म्हणाले, "हो, या साहेबांच्या तोंडून मी कालचा प्रकार ऐकला आणि मलाही अभिमान वाटला तुमचा. अभ्यासाची तुमची मेहनत वाया जाणार नाही. परीक्षा देण्याची संधी तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही परीक्षेत यशस्वी व्हाल अशी मला खात्री आहे. पण आता आजचा पेपर द्या आणि यशस्वी व्हा. पळा आता!”
ती चौकडी पळायच्या आवेशात होती तर दादांचा आवाज त्यांच्या कानावर पडला, "तुम्हाला best luck रे बाळांनो, पास झाल्यावर आजोबांना पेढे द्यायला विसरू नका हं!”
राकेश पळता पळता ओरडला, "हो नक्की काका, आजोबांचे आशिर्वाद आम्हाला हवे आहेतच.”
मुलांनी पुढचं पाऊल टाकलं. आता त्यांचं पाऊल पुढे आणि पुढेच पडणार होतं. प्रगतीपथावर, मोठ्यांच्या आशीर्वादावर, आणि यशाच्या मार्गावर ते उत्साहाने धावणार होते.
-सौ. राधिका (माजगावकर) पंडित